साधारण वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात संजीव अहलुवालिया यांनी लिहीलेला एक लेख त्यांच्या ब्लॉगवर प्रसिद्ध झाला आणि प्रशासकीय सनदी वर्गामध्ये मोठी खळबळ माजली होती. कारण त्यात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टिकेची झोड उठवली होती. अर्थात हे गृहस्थ कोणी राजकीय टिकाकार वा पत्रकार नाहीत. म्हणूनच त्यांच्या अशा टिकेने लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याचे प्रमुख कारण हे लेखक अहलुवालिया म्हणजे तेव्हाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालियांचे बंधू होत. मनमोहन सिंग यांचे विश्वासू सहकारी व अधिकारी असलेल्याच्या भावानेच मनमोहन सिंग यांच्यावर अशी टिका करावी, त्याने अस्वस्थता पसरली होती. मात्र संजीव यांनी अन्य वृत्तपत्रिय आरोपांच्या भाषेत पंतप्रधानांवर झोड उठवली नव्हती. त्यांनी व्यक्तीगत टिका केलेली होती आणि त्यामागे विरोधापेक्षाही आत्मियता अधिक होती. त्यातले एक वाक्य कधीही विसरता येण्यासारखे नाही. गेल्या दोन वर्षात मनमोहन सिंग यांना अपुर्व टिकेचा, आरोपांचा व आक्षेपांचा भडीमार सहन करावा लागला. त्यांच्या वाट्याला अन्यायकारक अपमानास्पद वागणूक आली. त्याचाच समाचार त्या लेखकाने घेतला होता. त्याचे म्हणणे इतकेच होते, की मनमोहन सिंग स्वत:चाच जितका अपमान करून घेत आहेत, तितका त्यांना अन्य कोणी अपमानित करू शकणार नाही. त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. मनमोहन सिंग राष्ट्रसंघाच्या अधिवेशनासाठी अमेरिकेला गेलेले होते आणि तत्पुर्वी त्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेतलेला एक अध्यादेश वादग्रस्त झाला होता. त्यावर काहूर माजले होते. तो राष्ट्रपतींकडे सहीसाठी पडून होता. त्या संबंधाने कॉग्रेस पक्षाच्या मुख्यालयात एक पत्रकार परिषद चालू होती आणि मुख्य प्रवक्ते अजय माकन त्याचे समर्थन करीत होते. तिथेच ती घटना घडली होती.
अकस्मात तिथे कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी येऊन धडकले आणि त्यांनी तिथेच पत्रकारांना सांगितले, की ‘हा अध्यादेश निव्वळ मुर्खपणा असल्याने तो फ़ाडून कचर्याच्या टोपलीत टाकून द्यावा, असे आपले मत आहे.’ इतके बोलून पत्रकारांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देताच राहुल निघून गेले. मग काही मिनीटापुर्वी त्याच अध्यादेशाचे समर्थन करणारे माकन, तोच अध्यादेश मुर्खपणा असल्याचे बरळू लागले. माकन यांची गोष्ट वेगळी होती. पण राहुलच्या तेवढ्या विधानाने परदेशी नेत्यांच्या सोबत वावरणार्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांची फ़टफ़जिती झाली होती. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या नेत्याला एका फ़टक्यात त्याच्याच पक्षाच्या उपाध्यक्षाने बेअक्कल ठरवून, त्याची जगापुढे पुरती नाचक्की करून टाकली होती. कुठलाही स्वाभिमानी व कर्तबगार माणूस तो अपमान सहन करू शकत नव्हता. पण इतके होऊनही पंतप्रधान गप्प राहिले व त्यांनी माघारी परतताच अध्यादेश गुंडाळला. त्याच संदर्भात संजीव अहलुवालियांनी उपरोक्त विधान लिहीलेले होते. एक व्यक्तीने वा राहुलनी पंतप्रधानांना मुर्ख ठरवले नव्हते, तर त्याचेच शब्द योग्य असल्याचे कृतीतून दाखवणार्या मनमोहन सिंग यांनी त्यातून आपला अपमान झाला नसल्याचे दाखवून दिले होते. म्हणजेच त्यांनीच स्वत:चा असा अवमान करून घेतला होता. असे एकटे मनमोहन सिंगच नाहीत. १९७० नंतरच्या कालखंडात उदयास आलेल्या पिढीतल्या नेतृत्वाची आजकाल अशीच अवस्था झाली आहे किंवा कसे, अशी शंका येते. कारण जवळपास त्याच काळात म्हणजे मागल्या वर्षभरात भाजपाचे भीष्म पितामह मानल्या जाणार्या लालकृष्ण अडवाणी किंवा मुरलीमनोहर जोशी यांनी नेमक्या त्याचप्रकारे आपल्याच पक्षात व जगापुढे आपली हास्यास्पद स्थिती करून घेण्याचा अट्टाहास केलेला दिसतो. कालौघात आपला जमाना संपल्याचे संकेत ओळखण्याची क्षमता गमावल्याचा तो दृष्य परिणाम असावा का?
हा थोडा जुना इतिहास इतक्यासाठी सांगितला, की जवळपास त्याच कालखंडात महाराष्ट्राच्या दोघा जुन्या नेत्यांचीही तशीच केविलवाणी कसरत राजकारणात होताना अनुभवास येत आहे. शरद पवार आणि मनोहर जोशी हे समकालीन राजकारणातले जुने मित्र. काही पत्रकार तर दोघांना मनमोहन देसाईच्या चित्रपटकथेतले बालपणी जत्रेत हरवलेले सख्खे भाऊ असेही म्हणायचे. त्यापैकी गेल्या वर्षभरात मनोहरपंतांनी सेनेच्या नव्या नेतृत्वाकडून आपली अकारण नाचक्की करून घेण्याचा अट्टाहास केला. सेनेतली सर्वच मोठी सत्तापदे बाळासाहेबांच्या कृपेने त्यांना विनासायास मिळत गेली आणि त्यासाठी अनेकदा इतर ज्येष्ठ सेना नेते वा शिवसैनिकांनाही अन्याय सोसावा लागलेला आहे. इतके झाल्यानंतरही पंताचा सत्तापदाचा हव्यास संपलेला नाही. मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री पदापासून लोकसभेच्या सभापती पदापर्यंत अधिकारपदे भूषवलेल्या पंतांना, पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्याच्या हव्यासाने अपमानित व्हायची पाळी आली. ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या नंतरचे दुसर्या क्रमांकाचे नेते म्हणून त्यांचा सेनेत मान होता; तिथेच त्यांना व्यासपिठावर आले असताना हुर्यो उडवून शिवसैनिकांनी पिटाळून लावायचा प्रसंग आला, त्याला दुसरा कोणी जबाबदार होता काय? बदलत्या काळाची पावले ओळखण्याच्या चुकीमुळे पंतांना अपमानित व्हावे लागले नाही का? अन्यथा त्यांना दुसरा कोणी इतका अवमानित करू धजला असता काय? पण इतके धडे समोर असताना सत्तेची लालसा माणसाला काहीही शिकवत नाही, हेच खरे. अन्यथा त्याच पंतांचे जुळे हरवलेले बंधू शरद पवार, आज इतक्या थराला कशाला पोहोचले असते? येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निमीत्ताने पवार सध्या जे डावपेच खेळत आहेत व रणनिती आखत आहेत, ती त्यांच्यासाठीच अपमानास्पद ठरत चाललेली नाही काय?
तब्बल बावीस वर्षापुर्वी महाराष्ट्राचे एकमुखी नेतृत्व म्हणून मुख्यमंत्रीपदी असलेले शरद पवार; मग राजीव हत्याकांडानंतर थेट दिल्लीला पंतप्रधान पदावर दावा सांगत पुढे सरसावले होते. पण डावपेचाच्या अतिरेकाने त्यांना तेव्हाही माघार घ्यावी लागली आणि आजपर्यंत त्यांची दिल्लीत डाळ शिजू शकलेली नाही. पुन्हा त्यांना राज्यात मुख्यमंत्रीपदी यावे लागले आणि पुढल्या काळात दिल्लीत बस्तानही बसवता आलेले नाही. अखेरीस त्यांना कॉग्रेसमधला गाशा गुंडाळून वेगळी प्रादेशिक पक्षाची चुल मांडावी लागली होती. त्यातून राज्यात आपल्या पाठीराख्यांना सत्तेची लालूच दाखवून गेली पंधरा वर्षे राजकारण केल्यानंतर आता राज्यातला पायाही ठिसूळ होत गेला आहे. त्यातून सावरण्य़ाची केविलवाणी धडपड करताना पवार दिसतात, तेव्हा त्यांच्या विरोधकांनाही खंत वाटल्याशिवाय रहाणार नाही. अलिकडेच राज्याचा मुख्यमंत्री आगामी मतदानापुर्वी बदलावा, म्हणून त्यांनी केलेल्या खेळी फ़सल्या आहेत आणि सत्ता गमावण्याचा धोका जाणवू लागला आहे. त्यातून सावरण्याचे प्रयास पवारांना अधिकच केविलवाणे करून सोडत आहेत. त्या संदर्भात माध्यमातून येणार्या बातम्या पवारांच्या प्रतिष्ठेला कलंकित करणार्या आहेत. त्यांनी राज्यात विधानसभेचे नेतृत्व करावे, किंवा कॉग्रेस पक्षात विलीन व्हावे; असल्या बातम्या एका प्रदिर्घ राजकीय कारकिर्दीला शोभादायक नक्कीच नाहीत. आपल्याला मुख्यमंत्री होण्यात स्वारस्य नाही, असे शब्द पवार बोलून दाखवतात, त्यातून निरीच्छतेपेक्षा त्यांची अगतिकता स्पष्ट होते. सेनेतल्या मनोहरपंत वा भाजपातल्या अडवाणींपेक्षा पवारांचे आजच्या महाराष्ट्रातील राजकीय स्थान कितीसे भक्कम उरले आहे? मनोहरपंत वा मनमोहन सिंग स्वयंभू तरी नव्हते. पवार लढवय्या राजकारणी होते, हे विसरून चालणार नाही. मग त्यांनी काळाची पावले ओळखून आपल्या कारकिर्दीला निदान अपमानित होण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न का करू नये? की त्यांनाही अडवाणीबाधा झाली म्हणायचे? १९७० नंतरच्या कालखंडातील नेत्यांना ही कुठली अवदसा सुचली आहे?
No comments:
Post a Comment