शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी धुर्त नेता नाही, असेच नव्या पिढीच्या पत्रकारांनी सतत ऐकले आहे. त्यामुळेच मग पवार साहेब काय बोलतात, त्यात कुठलातरी गर्भित अर्थ शोधण्याचे प्रयास नेहमीच सुरू असतात. गेल्या तीन दशकात, म्हणजे यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटिल यांच्या निर्वाणानंतर राज्यात पवारांइतका राज्यव्यापी प्रभूत्व असलेला दुसरा नेताही झाला नाही. त्यामुळे मग पवार म्हणजेच महा,राष्ट्र हे गृहीत तयार झाल्यास नवल नव्हते. पण म्हणून ती वस्तुस्थिती नव्हती. १९९९ साली सोनियांना परदेशी ठरवून त्यांनी वेगळी राजकीय चुल मांडल्यावरही पवारांना आपला राज्यातला प्रभाव दाखवता आलेला नव्हता. शिवसेना-भाजपा युती सोडा, नवख्या सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली लढणार्या कॉग्रेसला राज्यात जितक्या जागा मिळवता आल्या; त्याच्या निम्मे जागा जिंकतानाही पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसची दमछाक झाली होती. अशा पवारांनी मोदी लाटेत वाहून गेलेला कॉग्रेस व राष्ट्रवादीचा गड संभाळावा, ही अपेक्षा करणे म्हणूनच चुकीचे आहे. पण बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तशीच काही लोकांची अपेक्षा असते. त्यातच युतीला गोपिनाथ मुंडे यांच्यासारख्या मैदानी नेत्याला ऐनवेळी पारखे व्हावे लागल्याने पवार समर्थकांना आशा वाटल्या, तर गैर मानता येणार नाही. असलेली सत्ता संभाळणे सोडा, पण निदान पक्षाची बेअब्रू होऊ नये, इतक्या जागा तरी पवार राखू शकतील; अशी त्यांच्याच पाठीराख्यांची अपेक्षा योग्यच म्हणावी लागेल. पण ते कितपत शक्य आहे? तशी संधी तरी पवारांना आहे काय? असेल तर त्यांनी पुढल्या चार महिन्यात काय करायला हवे होते? आतापर्यंत गेल्या चार आठवड्यात काय केले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. आता इथे राज्य करायला मोदी येणार नाही, असला इशारा पवार देतात, तेव्हा म्हणूनच हसू येते. त्यांचा राजकीय वास्तवाशी संपर्क साफ़ तुटला आहे काय?
लोकसभा निवडणूकीचे निकाल अभ्यासले, तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येऊ शकते. राज्यातला महायुतीचा विजय लहानसहान वा योगायोगाचा नाही. तो निव्वळ केंद्रातील सत्तेच्या विरोधात दिलेला कौल नाही. तो अतिशय निर्णायक असा राज्यातील सत्ताधार्यांच्या विरोधात दिलेला कौल आहे. जे सहा खासदार आघडीतर्फ़े निवडून आले, त्यातले सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले सोडल्यास, कुणालाही लाखाच्या फ़रकाने विजय मिळवता आलेला नाही. पवारांच्या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळेंना अवघ्या ७० हजाराच्या फ़रकाने जिंकता आले आणि नांदेडला अशोकराव चव्हाण ८२ हजाराच्या फ़रकाने जिंकले. महायुतीचे अनंत गीते रायगडमधून अवघ्या दोन हजार मतांच्या फ़रकाने बचावले. तेवढा अपवाद करता महायुतीचा प्रत्येक उमेदवार लाखापासून तीन लाखापर्यंतच्या फ़रकाने जिंकलेला आहे. त्यामागे महायुतीच्या कुणा नेत्याचा करिष्मा असण्यापेक्षा पंधरा वर्षे सत्ता राबवणार्या राज्यातील आघाडीचे पापकर्म अधिक आहे. कुठल्याही धोंड्याला यु्तीने शेंदूर फ़ासायची खोटी होती, लोकांनी त्याला भरभरून मते दिली. बारामतीतही राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हट्टाने वेगळी निशाणी घेण्याऐवजी कमळ वा धनुष्यबाण निशाणी घेऊन उभे राहिले असते; तर सुप्रियाताईंना लढत महागात पडू शकली असती. अशा स्थितीत निव्वळ मोदी लाटेने राज्यात कौल विरोधात गेला अशा समजुतीत पवार साहेब असतील, तर त्यांचा राजकीय वास्तवाशी संपर्क तुटलाय असेच म्हणावे लागते. कारण जवळपास ३०हून अधिक मतदारसंघात पन्नास टक्केहून अधिक मतदाराने सत्ताधारी आघाडीला साफ़ नाकारलेले आहे. म्हणूनच युतीने एकूण राज्यात ४७ टक्के मतांपर्यंत मजल मारली आहे आणि आघाडीच्या मतांचा पल्ला ३३ टक्केपर्यंत घसरला आहे. त्याचाच अर्थ मोदी लाटेने राज्यात राष्ट्रवादी व कॉग्रेस पराभूत झाली नसून आपल्याच पापकर्माने त्यांनी पराभव ओढवून आणला आहे.
कित्येक निवडणूका मागल्या चार दशकात लढवलेल्या व त्यांचा बारकाईने अभ्यास केलेल्या शरद पवारांना यावेळच्या लोकसभा निवडणूक निकालाचे आकडे कळलेच नाहीत; यावर निदान आमचा विश्वास नाही. म्हणूनच मोदी महाराष्ट्रात राज्य करायला येणार नाहीत, ही त्यांची भाषा फ़सवी आहे. पण त्याहीपेक्षा नंतरच्या घडामोडी थक्क करून सोडणार्या आहेत. पवारांनी विधानसभा निवडणूकीतला पराभव आतापासूनच स्विकारला आहे काय, याची म्हणूनच शंका येते. अन्यथा त्यांनी एक रिकामी झालेली मंत्र्याची जागा विनाविलंब भरून घेतली नसती, की सिंचन घोटाळ्याचा गवगवा झालेला असताना पुन्हा विधानसभेत चितळे समितीचा अहवाल गोलमाल सादर करून लोकक्षोभाला आमंत्रण दिलेच नसते. राज्यातला पराभव हा मागल्या काही वर्षातल्या अनागोंदी व भ्रष्टाचार घोटाळ्याच्या विरोधात प्रकट झालेले जनमानस आहे. त्यापासून स्वत:ला व पक्षाला अलिप्त करण्याची अपुर्व संधी पवारांनी घ्यायला हवी होती. १९८९ सालात राजीव गांधींचा दारूण पराभव झाल्यावर विधानसभेत येऊ घातलेला धोका ओळखून पवार यांनी मोठ्या धुर्तपणे रिपाईच्या आठवले गटाला हाताशी धरले होते. तेव्हा तर आजच्या तुलनेत कॉग्रेसचे नगण्य नुकसान लोकसभेच्या निवडणूकीत झालेले होते. निम्मेहून अधिक जागा कॉग्रेस राखू शकली होती. तरीही चार महिन्यांनी येणार्या विधानसभा निवडणूकीत सत्ता वाचवण्यासाठी पवारांनी किती आटापिटा केला होता. रामदास आठवले यांना सोबत घेऊन बारा जागाही दिल्या होत्या. मग यावेळी युतीचे आव्हान किती मोठे आहे? ४८ पैकी ४२ जागा युतीने जिंकल्या आहेत आणि त्याही बहुतांश अफ़ाट मताधिक्याने जिंकलेल्या आहेत. मग त्यातून पवार कॉग्रेस व राष्ट्रवादीला कसे वाचवू शकले असते? चितळे समितीचा अहवाल पुढे करून अजितदादांना क्लिनचीट देण्याला मतदार कसा प्रतिसाद देईल?
अशावेळी पुर्वीचे पवार असते, तर त्यांनी धडाक्यात निवडणूकीत उमेदवारी करून पडलेल्या सर्वच मंत्र्यांना डच्चू दिला असता. अधिक सिंचन घोटाळ्यामुळे पक्षाला बोजा झालेल्या पुतण्यालाही आपण क्षमा करीत नाही, हे दाखवण्यासाठी बाजूला केले असते. नाकर्तेपणाने हास्यास्पद झालेल्या गृहमंत्र्याला हाकलून लावले असते आणि अजून पक्षावर आपलीच पकड असल्याचे प्रथम मतदार व पाठीराख्यांना दाखवून दिले असते. त्यामुळे रातोरात मतदार बदलला असता असे अजिबात नाही. पण पवारांविषयी सहानुभूती असलेला जो वर्ग मराठी प्रांतामध्ये आहे, त्याला तरी पुन्हा सत्ताधारी आघाडी व राष्ट्रवादी पक्षाकडे आशेने बघायला भाग पाडणे शक्य झाले असते. परंतु विधानसभेच्या अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी चर्चेविना चितळे अहवाल मांडून जी चौकशीच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयोग झाला, त्यातून आधीच रागावलेल्या आणि दुरावलेल्या मतदाराचा रोष मात्र वाढवण्याचे पाप झाले आहे. जो काही सावळागोंधळ राज्यात अजितदादांच्या नेतृत्वाखाली मागली चार वर्षे चालला आहे, त्याला फ़क्त पवार साहेबच पायबंद घालू शकतात, हीच अपेक्षा होती आणि तिथेही लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळेच चार महिन्याने दुसर्या निवडणूकीत मतदाराला सामोरे जाण्याची संधी पवार घेतील; ही अपेक्षा फ़ोल ठरली आहे. जे व्हायचे ते होईल आणि अजितदादांना हवे ते करायची आपण मोकळीक दिलीय, असेच चित्र त्यातून तयार झाले आहे. त्यामुळेच मग येऊ घातलेला दारूण पराभव स्विकारण्याची त्यांनीही मनाशी तयारी केली असेच वाटते. की यातून आता सरकार वा राष्ट्रवादी पक्षाला सावरणे अजिबात शक्यच राहिले नाही, इतक्या निराशेने पवारांनाही ग्रासले आहे? चितळे समिती अहवाल आणि सिंचन घोटाळ्याविषयी सत्ताधार्यांकडून चालू असलेली सारवासारव, त्याचा निवाडा मतदारावरच सोपवणारी दिसते. कोरड्या धरण व कालव्यात जेव्हा त्या जनरोषाची वादळी लाट चार महिन्याने येई,ल तेव्हाच क्लिनचीट कशाला म्हणतात, त्याचा अर्थ अनेकांना उमगणार आहे.
No comments:
Post a Comment