Wednesday, May 20, 2015

मर्यादित षटकांच्या सामन्यासारखे राजकारण



क्रिकेटच्या खेळाला आता भारतात वेड म्हणावे अशी लोकप्रियता लाभलेली आहे. पण म्हणून त्यातल्या कितीजणांना तो खेळ व त्यातले डावपेच कळतात, हा प्रश्नच आहे. कारण जेव्हा यातले अटीतटीचे सामने रंगतात, तेव्हा क्रिकेटवेड्यांच्या अपेक्षा व गर्जना चक्रावून सोडणार्‍या असतात. जर तुमच्या लाडक्या संघाची फ़लंदाजी असेल तर प्रत्येक चेंडूवर षटकार वा चौकार मारलाच पाहिजे; अशी अपेक्षा शौकिनाची असते. किमान एकदोन धावा निघतील असा फ़टका हाणलाच पाहिजे, असे त्यांना वाटत असते. आणि ती अपेक्षा पुर्ण झाली नाही, मग ते आपल्या त्याच त्या लाडक्या खेळाडूची हुर्यो उडवायलाही कमी करत नाहीत. दुसरीकडे गोलंदाजी असेल तर आपल्या लाडक्या गोलंदाजाने प्रत्येक चेंडूवर बळी घ्यावा किंवा निर्धाव षटक टाकावे, अशी अपेक्षा असते. त्याच्या चेंडूवर चौकार षटकार लागलेला चहात्यांना सहन होत नाही. जाणत्यांना खेळातले बारकावे ठाऊक असल्याने त्यांच्या तशा अपेक्षा नसतात. पण कुठल्याही क्रिकेट सामन्यात दोन्हीकडल्या शौकीन चहात्यांच्या अपेक्षा नेमक्या अशाच असतात. मजेची गोष्ट अशी, की त्यांच्या आपसातल्या चर्चेत जरी आवडत्या खेळाडूची हुर्यो उडवली जात असली, तरी विरोधातल्या संघाचे चहाते समोर आले तर त्याच आपल्या लाडक्या संघांच्या चुकांचेही समर्थन केले जात असते. काहीशी तीच अवस्था आपल्या देशातील राजकीय कार्यकर्ते व समर्थक विरोधकांची दिसून येते. त्यांना वास्तवाचे कधीच भान नसते. ज्याची पाठराखण ते करत असतात, त्या नेता वा पक्षाच्या चुकांवर पांघरूण घालणे व त्याच्याकडून अनाठायी अपेक्षा करण्याचा प्रकार सर्रास आढळतो. गेल्या दिडदोन वर्षात अटीतटीच्या निवडणूका झाल्या आणि त्यातून हा वेडसरपणा मोठ्या प्रकर्षाने समोर आला. लाडक्यांचे अपयश समर्थनीय ठरवताना नावडत्यांचे यश फ़सवे असल्याचेही दावे झालेले आहेत.

अशा निवडणूकातून जे सत्तांतर होते, त्यानंतर मग अपेक्षांचे ओझे घेऊनच सरकार व सत्ताधार्‍यांना काम करावे लागत असते. पण त्यापैकी कुठल्या व किती अपेक्षांची पुर्ती लगेच व विलंबाने होऊ शकेल, याचे भान सत्ता राबवणार्‍यांना ठेवावे लागते. पण चहाते व विरोधकांना त्याचे सोयरसुतक नसते. म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी देशात इतके मोठे ऐतिहासिक सत्तांतर घडवल्यानंतर महिनाभरातच त्यांनी कोणती आश्वासने पुर्ण केली, त्याची झाडाझडती काही लोकांनी सुरू केली, तर काहीजण नरेंद्र मोदींच्या त्रुटीतही रणनिती दाखवण्यापर्यंत मजल मारू लागले. क्रिकेटच्या सामन्यात षटके ठरलेली असतात आणि आधी खेळणारा संघ अधिकाधिक धावसंख्या उभारून प्रतिस्पर्ध्याला अशक्य होईल असा डोंगर उभा करायला धडपडत असतो. पण नंतर फ़लंदाजी करणार्‍या संघाला षटकामागे किती धावांचा वेग राखावा, याचा हिशोब मांडून खेळायचे असते. आरंभी खेळणार्‍यांनाही नुसता धावांचा डोंगर उभा करण्याच्या मागे धावता येत नाही. त्यात पटापट बळी पडले तर मोजक्या धावाही जमवणे अशक्य होणार असते. म्हणून क्षेत्रव्युह आणि समोरच्या गोलंदाजाचे चेंडू, यांचा विचार करूनच फ़लंदाजीही होत असते. विकेट राखून धावा गोळा करायच्या असतात. विकेट फ़ेकून धावा जमवण्याचा आत्मघातकी खेळ करता येत नसतो. म्हणूनच हाताशी असलेल्या षटकांच्या समिकरणानुसार खेळ सरकत असतो. कधी वेगाने धावा जमतात तर कधी भेदक गोलंदाज बाजूला होईपर्यंत संथगतीने धावा जमवल्या जातात. मात्र त्याचे भान मनोरंजन साधायला आलेल्या चहात्यांना नसते. आतषबाजी नसली की शौकीनांना खेळ होतच नसल्यासारखे भासू लागते. मोदी सरकारच्या वर्षभरातल्या कारभाराचे आकलन तशाच मानसिकतेचा नमूना म्हणता येईल. त्यात भारतीयांना थक्क करून सोडणारे काहीच नसल्याने अनेकजणांना नैराश्य आलेले आहे.

सत्तापालट झाला, की विनाविलंब भ्रष्ट युपीए सरकारच्या मंत्री व नेत्यांना गजाआड डांबले जाणार. एकामागून एक भ्रष्टाचार व गैरकारभाराच्या भानगडी बाहेर काढून अगदी सोनिया व इतर कॉग्रेसवाल्यांना मोदी पळता भूई थोडी करणार, अशा अपेक्षा अनेकांना होत्या. काळा पैसा परदेशी बॅन्का मोजून सज्ज बसल्यात आणि मोदींनी नुसती मागणी केली म्हणजे त्यांना नोटांच्या थप्प्या हातात दिल्या जाणार; अशा काहीशा अपेक्षांचा डोंगर वर्षभरापुर्वी उभा राहिला होता. त्याला अर्थातच मोदींसह अनेक भाजपा नेत्यांचा प्रचार कारणीभूत झाला आहे. अधिक त्यात माध्यमातल्या उथळ भाषेचीही जोड मिळाली होती. पण कुठलीही कायदेशीर कारवाई इतक्या सोप्या व वेगवान पद्धतीने होत नसते. क्रिकेटचा सामना ५० षटकांचा असतो आणि त्यात पहिल्या दहा षटकातला धावांचा वेग आणि शेवटच्या पाच दहा षटकातल्या धावांचा वेग भिन्न असतात, तसेच इथेही असते. आधी विकेट राखून जमवलेल्या धावसंख्येच्या पायावर शेवटच्या खेळात हाणामारी करीत विकेट फ़ेकूनही धावा मिळवल्या जात असतात. म्हणजेच शेवटच्या षटकातील धावांच्या वेगाची अपेक्षा आरंभीच्या षटकातून करता येत नाही. तसेच कुठल्याही नव्या सरकारच्या कामाचे असते. त्याला सत्तेवर मांड ठोकून बसायलाच काही अवधी लागत असतो. एकदा मांड ठोकली, मग घोडदौड शक्य असते. एखाद्या चित्रपटातला हिरो धावत्या घोड्यावर उडी मारून स्वार होतो असे बघायला रोमांचक वाटत असले तरी तसे वास्तवात होत नसते वा शक्य नसते. त्याला मोदीही अपवाद नाहीत. म्हणूनच देशाचा पंतप्रधान झाल्यावर प्रशासनावर मांड ठोकणे व कामकाज आवाक्यात येणे, याला खुप वेळ जातो. त्याऐवजी लोकांचे मनोरंजन होईल अशा कसरती केल्याने टाळ्या जरूर पिटल्या जातील, जशा युवराज सिंगला एकाच षटकात सहा षटकार ठोकल्याने मिळाल्या होत्या. पण आज तो कुठे आहे?

आठ वर्षापुर्वी युवराज धोनीपेक्षा लोकप्रिय झाला होता आणि आज त्याला संघात स्थान मिळवताना मारामारी आहे. अतिशय आक्रमक फ़लंदाजीमुळे धोनीही लोकप्रिय ठरला. पण क्रिकेटमध्ये आपले बस्तान बसवताना त्याने आक्रमकतेला मुरड घालून खेळाला शिस्त लावली आणि देशाचा सर्वात यशस्वी कर्णधार होईपर्यंत मजल मारली. २०-२० षटकांच्या स्पर्धेत देशाचे नेतृत्व करून उदय झालेल्या धोनीने सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवली. पण प्रत्येक सामन्यात व प्रकारात त्याने अद्वितीय खेळाडू असल्याचे दाखवण्याचा हव्यास सोडला होता. पहिल्याच वर्षात लोकांच्या सर्व अपेक्षा पुर्ण करण्याच्या नादात सरकारचे स्थैर्य गमावले जाण्याचा धोका विसरून मोदींनी कारभार करावा; अशी एकूण अपेक्षा आहे आणि तशी अपेक्षा एकच माणूस पुर्ण करू शकतो. अरविंद केजरीवाल. अल्पावधीत राजकारणात येऊन मोठे यश मिळवल्यानंतर ते पचवण्याची कुवत त्यांना दाखवता आलेली नाही. काही करून दाखवण्यापेक्षा कुरापती काढणे व लोकांचे लक्ष वेधून घेणे, यातच रमलेला हा नेता संधी कशी मातीमोल करतोय, ते उदाहरण समोर आहे. उलट मोदींकडे बघता येईल. नेत्रदिपक म्हणावे असे मोदी एका वर्षात काहीही करू शकलेले नाहीत. पण पुढे चार वर्षात जे करायचे आहे, त्याचा भक्कम पाया घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. जगभरात दौरे करून त्यांनी देशाची प्रतिमा उंचावली आहे. एकूणच बोकाळलेला भ्रष्टाचार रोखण्यात यश मिळवले आहे. वर्षभरात सरकारवर कुठलाही घोटाळा वा गंभीर आरोप होऊ शकला नाही. भारत-पाक सीमेवर सैनिकांच्या मुंड्य़ा कापल्या जात होत्या. वर्षभरात देशात एकही मोठी जिहादी घातपाती घटना घडलेली नाही. पण पाकमध्ये भारतच उत्पात घडवतो, अशी उलटी तक्रार सुरू झाली आहे. घसरगुंडी चालू होती, ती रोखली गेली आहे. आरंभीच्या षटकात इतक्याच गतीने धावा होऊ शकतात, त्यापेक्षा वेगाने जाण्याची गरजही नसते.

4 comments:

  1. काका- सुंदर, अप्रतिम.... अरविंद केजरीवाल सारखेच त्याचे काही भक्त आहेत ते पण फ़क़्त कुरापती काढण्यातच धन्यता मानतात... तुमचे उदाहरणासहीत असलेले स्पष्टीकरण अशा भक्तांच्या कानशिलात देण्यासाठी मस्त हत्यार आहे माझे... धन्यवाद smile emoticon

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर लेख आहे. लेख म्हणण्यापेक्षा याला वास्तव म्हणता येईल.
    भारतीय राजकारणाची आणि क्रिकेटची मस्त सांगड घातलीये.
    प्रेक्षक दोन्हीकडे सारखाच विचार करतात.
    पण माननीय मोदी असो व धोनी यांना कोणी थांबू शकत नाही.

    ReplyDelete
  3. आपण नेहमीच कठोर पण मनाला पटणारे लिहीतात ! सत्य काही वेळा आवडणारे, पटणारे नसते. सत्याला त्याच्याशी काही कर्तव्य नसते, 'सत्य हे अंतिमतः सत्यच असते'.

    कित्येक वेळा मी 'आवडले' असे सांगण्याचे देखील (माझ्या थोड्या आळसाने) टाळतो, पण किती वेळा टाळणार ? काही वेळा माझा थोडा असलेला आळस बाजूला ठेवावा लागतो, तसे करणे भाग पडते.

    ReplyDelete
  4. अप्रतिम विश्लेषन. शेवटच्या षटकातील मोदी सरकार ची धाव गती नक्कीच 11% टक्के असेल अशी आशा आनी विश्वास आहे.

    ReplyDelete