Sunday, May 1, 2016

ज्यांचे डाव त्यांनाच पेच

जसजसे दिवस जात आहेत आणि आरोप झटकण्याचा प्रयास कॉग्रेस नेते करीत आहेत, तितके नवे आरोप त्यांच्या अंगाला येउन चिकटत आहेत. पुर्वीच्या काळी उंदीर पकडण्यासाठी वेगवेगळे पिंजरे असायचे. त्यात काहीतरी चटकदार खाऊ ठेवला, की मोहात सापडून उंदीर त्यात अडकायचा. त्याची योजना साधीच असायची. ज्या तारेला वा कळीला खाऊ चिकटवलेला असे, त्याला उंदराने तोंड लावले, की खटका सूटायचा आणि पिंजर्याचा दरवाजा बंद व्हायचा. उंदिर आत बंदिस्त व्हायचा. दुसरेही काही सापळे असत, जिथे खाण्यात रमलेले उंदीर बेसावध अडकायचे. त्यांच्या शेपट्या पाय चापात पकडले जात आणि पळून जाणे अशक्य होई. सहाजिकच असे बेसावध उंदिर अलगद पकडले जात. हल्ली तंत्रज्ञान बदलले व सुधारले आहे. आजकाल उंदरांना पकडण्यासाठी एक पुठ्ठा विकत मिळतो. त्याच्यावर गडद गोंदाचा थर लावलेला असतो. उंदरांनी त्यावरून बागडावे अशी कल्पना त्यात आहे. खाण्याच्या वा पळण्याच्या नादात उंदिर एकदा त्या पुठ्ठ्य़ावरून धावला तरी पुरेसे असते. त्याला पकडणे आवश्यक नाही. त्या घट्ट गोंदामध्ये त्याचे इवले पाय लागले, की चिकटले समजा. गाळात चिखलात जनावर फ़सावे, तसा उंदिर त्यात गुरफ़टत जातो. त्या चिकटल्या पायांना मुक्त करण्यासाठी उंदिर जितका अन्य अवयवांचा जोर लावतो, तितका अधिकच चिकटत जातो. पाय सोडवण्यासाठी केलेली धडपड त्याच्या शरीराला गोंदामध्ये गुरफ़टून टाकत जाते. सध्या विविध घोटाळे व गफ़लतीमधून निसटण्यासाठी कॉग्रेस व एकूणच गांधी कुटुंब जितकी धडपड करते आहे, तितके ते अधिक गुरफ़टत चालले आहेत. जसा त्या चिकटलेल्या उंदराला कुठलाही पिंजरा अडवत वा बंदिस्त करत नसतो, तरी तो फ़सलेला असतो, तशी सोनिया कॉग्रेसची अवस्था झाली आहे. ते सुटायला बघतात, तितके अधिकच फ़सत चालले आहेत.
ज्यांनी हा गोंदाचा पुठ्ठा घरात वा अन्यत्र वापरलेला असेल व त्यात फ़सलेला उंदिर बघितलेला असेल, त्यांना यातली जीवघेणी तारांबळ नेमकी लक्षात येऊ शकेल. तो फ़सलेला उंदिर एकादुसर्‍या पायाला गोंद लागून चिकटलेला वा फ़सलेला असतो. मग त्यातून सुटण्यासाठी अन्य पायांचा शेपटीचा जोर लावू बघतो, तर तेही अवयव चिकटत जातात. एकातून सुटतो असा भ्रम होतो, पण चिकटलेला गोंद त्यांना सोडत नाही. अधिकाधिक चिकटत तो जायबंदी होऊन जातो. इशरत प्रकरणातील कॉग्रेसी अफ़रातफ़र उघडकीस आल्यापासून खरेतर कॉग्रेसने आपले अंग झटकून माध्यमांना तोंड द्यायला हवे होते. त्याबद्दल सरकारी खुलासा वा स्पष्ट माहिती समोर येत नाही, तोपर्यंत त्याविषयी मौन धारण करणे उपयोगाचे ठरले असते. कारण जी माहिती उघड झाली वा होत राहिली, ती माध्यमांची आतषबाजी होती. त्यावर कुठलाही खुलासा देण्याची गरज नव्हती. पण दुसरीकडे त्यामागचे राजकारण ओळखून मोदी सरकारावरही शेरेबाजी करण्याची गरज नव्हती. एकदा अशी शेरेबाजी झाली, म्हणजे सरकारला हातपाय हलवणे भाग होते. सत्ता तुमच्याकडे आहे, करा खुलासा आणि कायद्याचा बडगा दाखवा, असे प्रतिआव्हान देण्याची काहीही गरज नव्हती. सरकारला जितकी माहिती आहे, तितकीच ही प्रकरणे सत्तेत असताना कॉग्रेस नेत्यांनाही माहिती होती. आपण केलेल्या गफ़लती खरे तर मोदी सरकारपेक्षा सोनियांच्या साथीदार व सवंगड्यांना अधिक माहिती असणार. म्हणजे़च आपण त्यात अधिकाधिक फ़सत जाणार, हे त्यांनी ओळखायला हवे. म्हणूनच माध्यमातून जो धुरळा उडवला गेला होता, त्यापासून अलिप्त रहाणे कॉग्रेसला लाभदायक ठरले असते. पण आपल्या साहसी अहंकारी व अतिरेकी आक्रमकतेतून मोदींवर प्रतिहल्ला करण्याची संधी म्हणून त्याकडे बघितले गेले आणि कॉग्रेसचा उंदिर त्यात अधिकच गुरफ़टत गेला आहे.
दोन वर्षे हे सरकार सत्तेत येऊन झाले. मग इतके दिवस त्याविषयी गप्प कशाला, असा सवाल करण्यात आला. दोन वर्षे सोडा. सत्तेत असताना कॉग्रेसने नॅशनल हेराल्ड विषयातील साधी माहितीही कायदेशीर हक्क असून सुब्रमण्यम स्वामींना नाकारली होती. मोदी सरकार सत्तेत आल्यावर तीन महिन्यात तीच माहिती स्वामींना मिळाली. तेव्हा त्यांच्या रखडलेल्या केसला गती आहे. सोनिया राहुलसह अनेक ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांना कोर्टाकडून समन्स आले. त्याचा राजकारणाशी काय संबंध होता? परंतु त्याही कारवाईला राजकीय सुडबुद्धीची कारवाई म्हणून बोंब ठोकली गेली. त्या व्यवहारात गांधी कुटुंबियांनी आर्थिक घोटाळा केलेला आहे. त्यासाठी एका नागरिकाने कोर्टात दाद मागितली आहे. पण सरकारने आपला अधिकार असून त्यात हात घातलेला नव्हता. तरीही कोर्टाच्या कारवाईला सुडबुद्धी म्हणून बोंबाबोंब झालीच ना? मग इशरत, कर्नल पुरोहित वा हेलीकॉप्टर अशा भानगडी मोदी सरकारने आपल्याच निर्णयानुसार काढल्या, तर त्यांच्यावर काय आरोप झाले असते? सरकार जागरूक असल्याचे प्रमाणपत्र कॉग्रेस वा त्यांच्या बगलबच्च्यांनी दिले असते काय? की राजकीय सुडबुद्धीचा आरोप केला असता? इथेच माध्यमात सध्या गाजणार्‍या प्रकरणांचे वेगळेपण लक्षात येऊ शकते. माध्यमांच्या मदतीने ही प्रकरणे उकरून काढली गेली आहेत आणि त्यांचे खुलासे देताना त्याची शहानिशा करण्याची मागणी कॉग्रेसकडून व्हावी, अशी व्यवस्थाच मोदी सरकारने करून घेतली आहे. सहाजिकच आता त्यातली पापे व पाळेमुळे चव्हाट्यावर आणुन कॉग्रेसच्या श्रेष्ठी व नेत्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडण्याला कोणी सूडबुद्धीची कारवाई म्हणू शकणार नाही. कारण जी कारवाई व्हायची आहे, ती खुद्द कॉग्रेस पक्षाच्याच मागणीनुसार व्हायची आहे. म्हणजे कॉग्रेसने जितके अंग झटकावे, तितकी कॉग्रेसच त्यात फ़सत गुरफ़टत जाणार आहे.
राजकारण हा बुद्धीचा खेळ आहे. तो बुद्धीबळासारखा खेळला जातो. त्यात दोन्हीकडले राजे जपून हाणामारी होत असते. त्यात नुसती प्यादी मोहरे मारून डाव जिंकता येत नाही. प्रत्येकवेळी राजाची कोंडी करायची आणि त्याच्या सुटकेसाठी मग मोहरे किंवा प्यादी मारायची असा धुर्तपणा आवश्यक असतो. उगाच राजावर नेम धरून आपलीच प्यादी मोहरे मारून घेण्यात शहाणपणा नसतो. कारण प्रत्येक प्यादे मोहरे मारले जाताना बचावाचे लढवय्ये गमावले जातात. म्हणूनच राजाला मारायची स्वप्ने बघायची नसतात किंवा तसा डावही घातक असतो. राजाची फ़क्त कोंडी करायची असते. कॉग्रेससह प्रत्येक पुरोगाम्याने मोदींविषयी केलेली मोठी चुक, म्हणजे कुठलेही प्यादे मोहरे मारण्यापेक्षा त्यानी सतत राजालाच मारण्याची खेळी केलेली आहे. पण प्रत्येकवेळी मग मोहर्‍याने वा प्याद्यानेच मात दिली आहे. राजा म्हणजे मोदींना कुठे ओरखडाही उठू शकलेला नाही. उलट मोदींच्या गोटातून खेळल्या गेलेल्या प्रत्येक चालीत सोनियांसह पुरोगाम्यांचा एक एक मोहरा कामी येऊन अधिकाधिक विरोधकच आपला शक्तीक्षय करून घेत गेलेले आहेत. सध्या गाजू लागलेल्या प्रत्येक भानगडी व प्रकरणात मोदी अलिप्त आहेत आणि कॉग्रेसचे एक एक मोहरे बळी जाताना दिसत आहेत. मात्र त्यामुळे सोनिया-राहुल वा पुरोगामी राजकारणाचे अन्य राजे सुरक्षित होताना दिसत नाहीत. आताही अहमद पटेल, मनमोहन सिंग, चिदंबरम, अंथोनी अशा मोहर्‍यांचे बळी जायची वेळ आली आहे. मात्र त्यामुळे सोनिया व राहुल सुरक्षित होतील, याची कुठलीही हमी नाही. जितकी आक्रमक खेळी करावी तितका पुरोगामी बाजूचा पट व घरे मोकळी पडत चाललेली दिसत आहेत. मात्र त्यासाठी मोदींना कोणी दोष देऊ शकत नाही. कारण प्रत्येक आत्मघाती डाव सोनिया व कॉग्रेसच खेळून फ़सत गुरफ़टत चालले आहेत. ज्यांचे डाव त्यांनाच पेच असा चमत्कारीक खेळ चालू आहे.

17 comments:

  1. व्वा भाऊ जबरदस्त समीकरण कॉंग्रेस = उंदीर

    ReplyDelete
  2. Mast.... Earnfromnseoptions.blogspot.in

    ReplyDelete
  3. भाऊ तुमच्या पुढे नतमस्तक झालो. चपखल विश्लेषण.
    इथे पण मिडिया चा दुटप्पी पणा दिसतो. मोदी शहा व सहकारी यांच्या बाबतीत राइचा पर्वत करणार व माईक घेऊन पाठलाग करणारा मिडिया गेला कुठे. व यांचे अॅग्रेशन गेले कुठे?
    एनजीओ/मिडिया पुरस्कृत अंदोलक गेले कुठे. काँग्रेस इतर सरकारच्या भ्रष्टाचारा वर अनेक आंदोलन उभारणारे आण्णा कुठे गेले. यांनी कायम (2011 सोडुन ते पण भ्रष्टाचारा विरोधी आंदोलन करुन लोकपाल नेमला म्हणजे भ्रष्टाचार थांबेल व परत काँग्रेस सत्तेवर येण्यासाठी डाव होता परंतु मोदींच्या झंझावाताने काँग्रेस झाडपाल्या प्रमाणे उखडली) काँग्रेस इतर सरकार विरोधात आंदोलने उभारली व भ्रष्ट काँग्रेसला परत परत सत्तेवर यायला मदत केली.
    आरणव गोस्वामी पण काँग्रेसचा प्रतीनीधी नसले तरी त्यांचेच चमचे घेऊन भाजप प्रवक्ते ला कोंडीत पकडतो आहे.
    ही सरळ सरळ पार्शीलिटी आहे. परंतु एकुण वासरात लंगडी गाय शहाणी.
    Aks
    Pnl

    ReplyDelete
  4. भाऊ, अगस्टा वेस्टलँड मनमोहन सिंगना प्रतिक्रिया विचारल्यावर काँग्रेस देईल असेच काहीतरी त्यांनी सांगितले. जरा समजावून सांगा हे काय आहे.

    ReplyDelete
  5. Saheb tumhi maharastra politics baddal kahi lihat nahi...

    ReplyDelete
  6. भाऊ कुठे आहात. ऑगस्टा बद्दल बऱ्याच बातम्या आहेत पण तुमचे विश्लेषण असल्याशिवाय त्यांना पूर्णत्व नाही...

    ReplyDelete
  7. Bhawu, thik ahat na? Barech diwas zale nawin lekh ethe ala nahi. Ugachach kalaji watali. Apalya lekhachi roj waat pahat asalela ek wachak.

    Dhanywad
    Chaitanya

    ReplyDelete
  8. Bhau,
    10 divas zale tumche kahich likhan nahi blogvar. Amhi sare vat pahtoy.

    ReplyDelete
  9. BHAU NAMASKAR,
    KUTHE AAHAT TUMHI?
    1 TARKHE PASUN TUMACHA NAVIN BLOG NAHI AALA
    VAT PAHATOY.
    LIHA KAHI TARI TUMACHYA SHIVAY AAMACHI SAKAL HOT NAHI.

    ReplyDelete
  10. भाऊ,१ तारखेनंतरा आपल एकही लेख नाही.दिवस खराब जातो हो.चातकासारखी वाट पाहतोय.

    ReplyDelete
  11. भाऊ खूप 10 दिवस झाले एकही लेख नाहि

    ReplyDelete
  12. Bhau, no news for quite a long time. Hope everything is going well.

    ReplyDelete
  13. 1 May nantar lekh band ka ahet

    ReplyDelete
  14. Please kay zalay

    ReplyDelete