Monday, August 1, 2016

गुजरात हातून निसटतोय




१९८० च्या दशकात गुजरातमध्ये माधवसिंग सोलंकी यांनी क्षत्रिय, हरीजन, आदिवासी आणि मुस्लिम ज्याला ‘खाम’ म्हणून ओळखले जाई, अशी एक मोट बांधली आणि कॉग्रेसी सत्तेचे बस्तान पक्के केले. त्यानंतर त्यांना शह देणे अन्य पक्षांना अवघड झाले होते. तेव्हा तिथे भाजपा नगण्य होता आणि प्रजासमाजवादी पक्ष अधिक पुर्वाश्रमीची संघटना कॉग्रेस मिळून झालेल्या जनता पक्षाकडे पर्यायी पक्ष म्हणून बघितले जात होते. त्यांच्याच सोबतीने बिगरकॉग्रेस पक्ष म्हणून भाजपा आपले हातओआय पसरत होता. कॉग्रेसच्या त्या राजकारणात गुजरातमधला सुखवस्तु शेतकरी जमिनदार वर्ग असलेला पटेल समाज एकाकी पडला होता. भाजपाने आपला जम बसवताना त्याच पटेल समाजाला चुचकारून आपला पाया मजबुत केला. ह्या प्रमुख समाजघटकाला घेऊन अन्य लहानसहान जातींचे कडबोळे हिंदूत्ववादी म्हणून उभे करण्यात भाजपाला यश आले. त्यातच जनता म्हणून जो गट कार्यरत होता, त्याच्या धरसोड वृत्तीने कॉग्रेसला राजकीय पर्याय उभा रहात नव्हता. सहाजिकच बिगर कॉग्रेसी मतांचा ओढा भाजपाकडे येत गेला. अशा रितीने १९९५ सालात भाजपाने स्वबळावर बहूमत मिळवण्यापर्यंत मजल मारली. सोळंकी यांच्यानंतर कॉग्रेसला तितका समर्थ नेता गुजरातमध्ये उभा करता आला नाही आणि अन्य पक्षातून उसनवारी करण्यावरच कॉग्रेस तग धरून राहिली. पण आज भाजपाला अन्य राजकीय पर्याय नसल्यानेच कॉग्रेस अजून टिकून आहे. त्याला आता दोन दशके उलटून गेली आहेत आणि भाजपाची नवलाई इतक्या काळानंतर ओसरत गेली आहे. त्यातच पटेल समाज दुरावला आणि पाठोपाठ दलित चवताळून उठला आहे. त्यामुळे दिर्घकाळ मोदींचा बालेकिल्ला मानला जाणारा गुजरात, डळमळू लागला आहे. ज्या बळावर दिल्ली पादाक्रांत केली, तोच पाया खचू लागल्याची चिन्हे गंभीर इशारा आहेत. अर्थात ती मोदीभक्तांना नावडती गोष्ट असल्याने इतक्यात पटणारी नाही.

गेल्या लोकसभेत मोदी यांनी सर्व जागा जिंकताना गुजरातमध्ये ५६ टक्के मते मिळवली होती. पण गेल्या विधानसभेत भाजपाने मिळवलेली मते पन्नास टक्केहून कमी आहेत. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे कॉग्रेस दोन दशके सत्तेपासून दूर असली, तरी गुजरातमध्ये तोच राजकीय पर्याय आहे. भाजपा नको असेल तर लोकांना कॉग्रेसकडेच बघावे लागणार. जशी कर्नाटकात भाजपाने येदीयुरप्पा यांना बंड करायला भाग पाडून मतविभागणी केली आणि पुन्हा कॉग्रेस सत्तेवर आली, त्यापेक्षा गुजरातची स्थिती भिन्न नाही. कारण ज्या पायावर गुजरात भाजपा उभी राहिली, तो पटेल हा बहुसंख्य समाज आज दुखावला आहे. हार्दिक पटेल त्यातले निमीत्त आहे. त्याच्यामागे कॉग्रेस असेल, नव्हे आहेच. पण आरक्षणाच्या नावाने पटेलांची मोठी संख्या भाजपा सरकारला आव्हान देते आहे. त्याचा प्रभाव राजकीय व्यवहारात दिसून येतो. नितीन पटेल व सौरभ पटेल असे दोन तरूण भाजपानेते मंत्री जाहिर कार्यक्रमात गेल्यास पटेल मंडळी त्यांना पळवून लावतात. समाजाच्या कार्यक्रमातून त्यांना बहिष्कृत केलेले आहे. आनंदीबेन पटेल भले मुख्यमंत्री असतील. पण केशूभाई यांच्या इतका त्यांचा सामाजिक प्रभाव नाही. त्यातच दलित समाजाला उना येथील घटना दुखावून गेली आहे. आता गेल्या दोन आठवड्यात गुजरातच्या बहुतेक जिल्ह्यात व तालूका शहरात दलितांचे मेळावे आणि मोर्चे निघाले. त्याला मिळालेला प्रतिसाद नजरेत भरणारा होता. त्यामागे अर्थातच हार्दिकचे काही समर्थक व कॉग्रेसचे छुपे हस्तकही सहभागी होते. पण याचा एकूण जनमानसावर होणारा परिणाम नंतर येणार्‍या मतदानावर पडू शकतो. काही महिन्यांपुर्वी झालेल्या नगरपालिका व महापालिका मतदानात त्याचा दणका भाजपाला जाणवला आहे. आता दलितांच्या मोर्च्यात दिसणारे मुस्लिम पुढल्या मतदानात काय घडवू शकतील, त्याचा विचार कोणी केला आहे काय?

तिरंगी वा चौरंगी, बहुरंगी लढतीमध्ये ३० टक्के मतेही निर्णायक असतात. पण गुजरातमध्ये तशी स्थिती नाही. म्हणूनच २००१ मध्ये बहुतांश जिल्हा परिषदा, तालुका पंचायती व नगरपालिकात भाजपाला मोठा दणका बसला होता. त्यातून सावरण्यासाठीच अकस्मात दिल्लीत सरचिटणिस असलेल्या नरेंद्र मोदींना सत्तेच्या राजकारणात आणले गेले. पक्षाची विस्कटलेली घडी त्यांनी पुन्हा बसवावी, अशा अपेक्षेने मोदींना सत्तेत आणून बसवले गेले. त्यांनी सत्तेची घडी बसवतानाच दंगल उसळली आणि नवख्या मोदींना दंगल आवरता आली नाही. त्याचा गैरफ़ायदा कॉग्रेसने उठवण्याचा प्रयास केला आणि मोदींना लक्ष्य करून दिल्लीतील वाजपेयी सरकारचा बळी घेतला गेला. पण त्यातून गुजराती दुखावला गेला आणि त्याच भावनेचा लाभ उठवून मोदींनी गुजरात अस्मितेच्या नावाखाली आपले बस्तान बसवले. आपल्यावरचा प्रत्येक आरोप गुजरातची बदनामी ठरवून गुजराती अस्मितेला चेतवले आणि त्यातून त्यांची गुजरातवर पकड निर्माण झाली. एकीकडे गुजरात अस्मिता व दुसरीकडे हिंदूत्वाची पताका घेऊन, मग बारा वर्षांनी मोदी राष्ट्रीय नेतृत्व करायला पुढे सरसावले. त्यांना लोकांनी प्रतिसादही दिला. पण तो प्रतिसाद मोदी नावाच्या नेत्याला होता, तितका भाजपा या पक्षाला नव्हता. याचे भान सोडून पुढले राजकारण असे खेळले गेले, की भाजपा प्रत्येक प्रादेशिक अस्मिताच खच्ची करू बघतोय. दोन गुजराती मिळून अवघा देश मुठीत ठेवायला निघाल्याची धारणा करून देण्याला त्यातून हातभार लागला. त्याचा पहिला फ़टका मग दिल्ली व पुढे बिहारमध्ये बसला. ज्या गुजराती अस्मितेवर मोदी-शहा उदयास आले तेच प्रादेशिक अस्मितेचे शत्रू बनू लागल्यावर भाजपा जुन्या कॉग्रेसचे रुप धारण करू लागला. त्याचा अन्य प्रांतात फ़टका बसत असताना मूळ पाया असलेली गुजराती अस्मिताही खचू लागली आहे. अशात उत्तरप्रदेश गेला तर गुजरात अवघड होऊन जाईल.

बारा वर्षे मोदींनी अन्य कुठले नेतृत्व गुजरातमध्ये उभे राहू दिले नाही. पण भाजपातले नवे नेतृत्व उभे केले. त्यामुळे वाघेला, केशूभाई हे भाजपातले तर सोळंकी इत्यादी गुजरातचे अन्य नेतेही अस्तंगत होऊन गेले. पण मोदींच्या गैरहजेरीत ती जबाबदारी आनंदीबेन पार पाडू शकलेल्या नाहीत. अमित शहा पक्षाध्यक्ष होऊन देशभर गुजरात पॅटर्न राबवताना अन्य पक्ष फ़ोडण्यात गर्क आहेत. त्यातून असलेले मित्र शत्रू बनवणे व असलेल्या शत्रूंना एकजुट व्हायला भाग पाडणे; अशी अजब रणनिती राबवलेली आहे. त्यामुळे दिवसेदिवस भाजपाला विविध प्रांतामध्ये निवडणूका अवघड होत चालल्या आहेत. आसाममध्ये हेमंत बिश्वशर्मा हा कॉग्रेसला कंटाळलेला नेता भाजपात आल्याने मोठा फ़रक पडला. पण अन्यत्र सत्तेसाठी गोळा केलेले उसनवारीचे मांझीसारखे नेते भाजपाला बुडवायला कारण झालेले आहेत. त्यामुळे दिवसेदिवस पुढली लोकसभा निवडणूक मोदींना अवघड कशी होईल; त्याची तयारी खुद्द भाजपातूनच चालली आहे असेच वाटू लागते. अन्यथा मोदींच्या गुजरातमध्ये पक्षाची इतकी वाईट परिस्थिती आलीच नसती. मराठी किंवा इंग्रजी हिंदीत गुजरातच्या बातम्या फ़ारशा बघायला मिळत नाहीत. पण गुजराती वर्तमानपत्रे बघितली, तर तिथे स्थिती कशी क्रमाक्रमाने बिघडते आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. साडेपाच करोड गुजराती हा त्या गुजरात अस्मितेचा पाया होता आणि पर्यायाने मोदींच्या पंतप्रधान पदाची शिडी होती. तिचेच एक एक खुंट निखळून पडताना दिसत आहेत. पटेलांसह मुस्लिम दलित एकगठ्ठा कॉग्रेसने आपल्याकडे वळवले, तर दिड वर्षांनी होणारी गुजरातची विधानसभा निवडणूक भाजपाला महागात पडू शकते. अर्थात हे शुद्धीवर असलेल्यांनी विचार करण्यासाठी आहे. जे लोकसभा व मोदीलाटेच्या नशेत चूर आहेत, त्यांनी या इशार्‍याची दखलही घेण्याची गरज नाही.

( हा लेख शुक्रवार २९ जुलै रोजी लिहून झाला होता. नेट अभावी टाकायला विलंब झाला)

3 comments:

  1. छान भाऊ मस्तच

    ReplyDelete
  2. खरे आहे, अजुनहि वेळ गेली नाही, दीड वर्शात सुधार् करावा लागेल, पटेल एकत्र करावे

    ReplyDelete
  3. Entire BJP became FGP (Feel Good Party) . So that they deserves lost. Arrogant is their problem n they digging their own house or vote bank....

    ReplyDelete