Tuesday, August 23, 2016

शिवसेना पुरस्कृत वडापाव

वडापाव डे असे काही असल्याचे ऐकले आणि दोन वर्षापुर्वीचा (२०१४) जुना लेख शोधून काढला.
Image result for vadapav


दोन दिवसांपुर्वी एका झकपक खाऊ गाडीवर गरमागरम भजी-वडे बघितले आणि मोहात पडलो. सहज विचारले, तर वडापावचे बारा रुपये बोलला. मी बघतच राहिलो. किंमती व महागाई वाढलीय हे ठाऊक आहे. पण तरीही दहा रुपये वडापाव अधूमधून खातो. एकदम १२ रुपये? माझ्या चेहर्‍यावरचा अचंबा व अबोल होण्याने गाडीवाला गोंधळला. त्याने दोन शब्द ऐकवले. महागाई, पोलिसांचे हप्ते, बरेच काही. मी त्याची समजूत घातली. तो लूटमार करतोय असे मला अजिबात वाटलेले नाही, याबद्दल त्याची खात्री पटावी म्हणून समजावले. अखेरीस त्याचे समाधान व्हावे म्हणून त्याला मी खाल्लेल्या पहिल्या वडापावची किंमत सांगितली आणि माझ्या थोबड्यावरचा अचंबा उडी मारून त्याच्या चेहर्‍यावर जाऊन चिकटला. पहिल्या वडापावपासून आज शंभरपट किंमत झाली म्हणून मी गडबडलो होतो. ते ऐकताच त्याने आपले टेकायचे टेबल समोर केले आणि म्हणाला काका बसा, आपल्या खात्यात खावा, पण ती पहिल्या वडापावची गोष्ट सांगा. तळणार्‍याला माझ्यासाठी खास ताजा वडा तळायची आर्डर देऊन त्याने माझ्याकडे मोर्चा वळवला.

वडापावचा जन्म होण्याआधी मुंबईत उसळपाव किंवा मिसळपाव यांची सद्दी होती. पण शिवसेनेचा उदय झाला आणि तिने उडीपी हॉटेलवर आक्रमण केल्यानंतर वडापाव उदयास आला. सेना-उडीपी संघर्षानंतर सेनेने पहिल्या महापालिका निवडणूका लढवल्या. त्यात भायखळा भागातून चंद्रकांत आळेकर नावाचा शाखाप्रमुख लढलेला होता. पण त्याला पराभवाची चव चाखावी लागली. त्याच काळात लुंगीवाल्यांच्या तावडीतून मुंबई मुक्त करण्याचे पर्याय अनेक शिवसैनिक शोधू लागले होते. लालबागच्या बंडू शिंगरेने शहाळी सोलून विकणारे तरूण समोर आणले; तर आळेकरने उडीपीला पर्याय म्हणून बटाटेवडा पाव असा स्वस्तातला खाद्यपदार्थ शोधून काढला. महापालिकेचा उमेदवार म्हणून आळेकरचा आपल्या भागात गवगवा झालेला होता. त्याने भायखळा स्थानकाच्या पश्चिमेला एक ढकलगाडी उभी केली आणि त्यावरच भजी वडे तळणारी कढई मांडून खाद्यपदार्थाचा स्टॉल सुरू केला. त्यावर पालिका पथकाची धाड येऊ नये, म्हणून एक फ़लक लावला. ‘शिवसेना पुरस्कृत वडापाव’. त्या काळात सेनेचा इतका दबदबा होता, की पालिकेची गाडी अशा फ़लकाला हात लावायला धजावत नसे. सहाजिकच विनापरवाना तिथे आळेकरचा धंदा सुरू झाला. हॉटेलात तेव्हा उसळपाव मिसळपाव २५ ते ३० पैशात मिळायचे. तुलनेने १२ पैशातला वडापाव ही अवाढव्य स्वस्ताई होती. भायखळा स्थानकात येणारे-जाणारे दहापंधरा पैसे वाचवून खाऊ घालणार्‍या आळेकरला दुवा देऊ लागले आणि बघता बघता त्याच्या गाडीभोवती अहोरात्र गर्दी-झुंबड दिसू लागली. अर्थात तेव्हाचा १२ पैशातला वडापाव एक खाल्लातरी पोटभर व्हायचा. आता दोन खावे लागतात, तेव्हा तितके पोट भरते.

आळेकरांच्या त्या यशाने सभोवारच्या भागात वडापावची साथ पसरू लागली आणि पुढल्या दोनतीन वर्षात मुंबईभर ‘शिवसेना पुरस्कृत वडापाव’ असे फ़लक झळकणार्‍या गाड्यांचे पेव फ़ुटले. एका बाजूला बेकार मराठी मुलांना अल्प भांडवलात त्यातून रोजगार मिळाला होता. पण त्याचवेळी मुंबईतल्या कष्टकरी लोकांना स्वस्तातली अन्न सुरक्षा मिळू लागली होती. शिवसेना आणि वडापाव हे एक समिकरण होऊन गेले. मात्र तेव्हा शिवसेना राजकारणात थेट उतरली नव्हती. लौकरच आलेल्या १९७१ च्या लोकसभा निवडणूकीत मग सेनेने उडी घेतली आणि इंदिरा लाटेत मार खाल्ला. तेव्हा त्याच सेनेच्या वडापावची खुप राजकीय टवाळी झाली होती. कारण तेव्हा सेनेने निवडणूक चिन्ह म्हणून ढाल-तलवार हे चित्र निवडले होते. तिचे उमेदवार पराभूत झाल्यावर त्याच चिन्हाला ‘वडा मिरची’ म्हणून हिणवायची स्पर्धाच लागली होती. पण वडापावच्या लोकप्रियतेला कधी ओहोटी लागली नाही. गेल्या अर्धशतकात वडापाव देशभर पसतला आणि एक मराठी खाद्यपदार्थ म्हणून मान्यता पावला. आरंभी दहा पैशातला वडा आणि दोन पैशाचा पाव होता. मग तेलाची महागाई वा टंचाई यामुळे वडा महागला आणि बारा, मग पंधरा पैसे होऊन एकूण वडापावची किंमत वीस पैशावर गेली. त्यालाही दोनचार वर्षे लागली होती.

१९७८ सालात विधानसभा निवडणूका संपल्यावर आपल्या चांगल्या परिचयाचे काही आमदार असल्याने मंत्रालयाकडे जाणेयेणे व्हायचे. तेव्हा आमदार निवासाखाली एक टेबल मांडून वडापाव विकणारे चौघेजण होते. टेबलावर फ़ळी ठेवून मांडलेल्या दुकानात एकजण सर्व तळणे वगैरे करायचा आणि तिघे ग्राहकांना माल द्यायचे. तेव्हापर्यंत पन्नास पैशात बिनपावाचे तीन वडे त्यांनी दिलेले आठवतात. तेव्हा विकासाची गती गोगलगाईसारखी मंद होतीच. पण महागाई सुद्धा किती मागसलेली संथगतीने चालणारी होती त्या काळात, असे आता वाटते. दोनपाच पैशाने किंमती वाढायला वर्ष दीडदोन वर्षे खर्ची पडायची. पावाचा आकार लहान होत गेला, तरी दिर्घकाळ पाव पाच पैशालाच मिळायचा. वडा महाग होत गेला तरी पावाच्या किंमती कितीतरी वर्षे स्थीर होत्या म्हणायला हरकत नाही. खरे सांगायचे तर वडापाव विकणारे किंवा कुठलाही धंदा व्यापार करणारेही नुसती कमाई करायला व्याप मांडायचे नाहीत. आपल्याला रोजगार मिळावा, त्यातून आपल्या घरातली चुल वेळच्या वेळी पेटावी आणि ग्राहक म्हणून आपल्याकडे येणार्‍यांना अभिमानाने पोटभर खाता यावे अशी धारणा असावी. तेव्हा अन्न सुरक्षा हा जागतिक विषय झालेला नव्हता. १९८५-९० पर्यंत तरी महागाई अशीच संथगतीने चालली होती. मग आर्थिक सुधारणा आल्या, अर्थकारण मुक्त झाले आणि माणसा माणसातले नातेच इतके महाग होत गेले, की बाकीच्या किंमती कितीही वाढल्याचे कुणाला सोयरसुतक राहिले नाही. एका बाजूला सरकार व राजकारणी लोकांना काहीतरी फ़ुकट किंवा स्वस्त देण्याची भाषा वापरू लागले आणि दुसरीकडे सामान्य जनता घोटभर पाणी वा पोटभर अन्नाला महाग होत गेली. १९९५ सालात शिवसेनेची सत्ता आल्यावर अवघ्या एका रुपयातली मनोहर जोशींची झुणका भाकर आली आणि चंद्रकांत आळेकरचा वडापावही गरीबाला परवडणारा राहिला नाही.

3 comments:

  1. सुंदरच भाऊ मस्तच

    ReplyDelete
  2. मुंबईच्या वङापाव मीही चाखलेला आहे .चद्रंकांत आळेकरच्या गाडीचे पुण्यातसैनिकांना सांगितले होते.जुन्या गोष्टी आढवले जसेच्या तसे. जबरदस्त इर्शा शिवसैनिकाची त्याला तोड नाही .अप्रतिम लेख .........

    ReplyDelete
  3. आपण काळाच्या पुढे आहात हे या लेखातून आणि चालू घडामोडींवरून ध्यानात येते..

    ReplyDelete