Saturday, August 20, 2016

पाकचे भारतीय हितचिंतककाही वर्षापुर्वी काश्मिरातील हिंसाचारामुळे भारत-पाक यांच्यातली बोलणी व वाटाघाटी थंडावल्या होत्या. त्या नव्याने सुरू कराव्यात म्हणून जगातून पकिस्तानवर दबाव आलेला होता. पण भारतामध्ये त्याला अनुकुल वातावरण नव्हते. म्हणूनच मनमोहन सिंग तशा हालचाली करायलाही बिचकत होते अशावेळी इजिप्तच्या शर्म अल शेख या पर्यटनस्थळी एक आंतरराष्ट्रीय समारंभ झाला होता. त्यात भारत पाक यांचे नेतेही सहभागी झालेले होते. त्यात सवड काढून पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी मनमोहन सिंग यांना गाठले आणि गप्पा केल्या. त्यात काश्मिरातील उचापतींविषयी त्यांना ठणकावणे, ही भारतीय पंतप्रधानांची जबाबदारी होती. पण बिचार्‍या सिंगना आपले परराष्ट्र वा देशांतर्गत धोरण नेमके काय आहे, तेच ठाऊक नसायचे. त्यांचा कुठला मंत्री कुठल्या खात्यात काय दिवे लावतो, याचाही पंतप्रधानांना पत्ता नव्हता. सोनियांनी खुर्चीवर बसवले, म्हणून ते पंतप्रधान पदाची जबाबदारी ओझे घेतल्यासारखी पार पाडत होते. मग परराष्ट्र नितीशी त्यांना काय कर्तव्य असेल? तेच नसेल तर भारत-पाक संबंधाविषयी तरी त्यांच्याकडून काही ठोस होण्याची अपेक्षा कशी करता येईल? अशा स्थितीतल्या भारतीय पंतप्रधानांना शरीफ़ यांनी गाठले आणि भारताचे हेरखाते बलुचिस्तानात उचापती करत असल्याचे सांगून टाकले. मनमोहन सिंग यांनीही सरकारी कर्मचार्‍याप्रमाणे (तक्रार द्या, लक्ष घालतो) शरीफ़ यांना पुरावे दिल्यास चौकशी करण्याचे आश्वासन देऊन टाकले. त्यात आपली काय चुक झाली, तेही त्यांना कित्येक दिवस उमजलेले नव्हते. त्याच पंतप्रधानाच्या हाताखाली काम केलेले चिदंबरम बलुचिस्तानचा विषय मोदींनी काढला, म्हणून विचलीत झाले असतील तर नवल नाही. युपीए सरकारला काश्मिरमधील पाकच्या उचापती खटकत नव्हत्या आणि बलुचीस्तानातील हिंसेची चिंता होती, त्याच सरकारचे गृहमंत्री चिदंबरम होते ना?

आताही काश्मिरची चिंता चिदंबरम यांना अजिबात नाही. उलट बलुची स्वातंत्र्य लढ्याला भारतीय पंतप्रधानाने समर्थन दिल्याने हे चिदुबाबा विचलीत झाले आहेत. त्यांचे वागणे सुसंगत आहे. चिदंबरम यांनी गृहमंत्री म्हणून लावलेले दिवे काही महिन्यांपुर्वी जगासमोर आलेले आहेत. त्यांना देशाच्या सुरक्षेची, म्हणजे गृहखात्याची जबाबदारी मिळण्याच्याही आधी गुजरातमध्ये एक चकमक झाली होती. त्यात इशरत जहान नावाची ठाणे जिल्ह्यातील मुलगी तोयबाची हस्तक म्हणून मारली गेली होती. त्याचे सज्जड पुरावेही होते. तात्कालीन युपीए़चे गृहमंत्री शिवराज पाटिल यांनीही त्याची संसदेतच ग्वाही दिलेली होती. पण गृहखाते हाती आल्यावर चिदंबरम यांनी त्या चकमकीला खोटी पाडून भारतीय हेरखाते, पोलिस व मोदी यांना त्यातले गुन्हेफ़ार ठरवण्यासाठी कागदोपत्री कसरती केल्या. त्याचे पितळ काही महिन्यापुर्वीच उघडे पडलेले आहे. चिदंबरम हे भारताचे गृहमंत्री असण्यापेक्षा पाक हेरसंस्थेचे कोणी वरीष्ठ अधिकारी असल्यासारखे वागले व त्यांनी इशरत जहानला हुतात्मा ठरवत भारतीय प्रशासन यंत्रणेलाच गुन्हेगार ठरवण्याचा घाट घातला होता. अशा माणसाकडून काश्मिरवर भारताचा हक्क असल्याची भाषा कशी बोलली जाऊ शकते? उलट त्यांनी बलुचीस्तानच्या स्वातंत्र्याविषयी शरीफ़ यांच्या सुरात सुर मिसळून पाकिस्तानच्या एकात्मतेची चिंता करणेच तर्कसंगत नाही काय? तोयबा इशरत निरपराध हुतात्मा ठरवण्यासाठी भारत सरकारच्या कागदपत्रात हेराफ़ेरी करणारा माणूस, आज बलुचिस्तान पाकिस्तानातून फ़ुटण्याच्या कल्पनेने चिंतातूर झाल्यास नवल कुठले? नाहीतरी त्यांच्याच मणिशंकर अय्यर या सहकार्‍याने दिड वर्षापुर्वी मोदींना हटवण्य़ाची मागणी मुशर्रफ़ यांच्यासह एकाच व्यासपीठावरून केलेली नव्हती का? मग त्यांच्याच पक्षबंधू चिदंबरम यांचे ताजे विधान त्याच दिशेने टाकलेले पाऊल आहे ना?

काश्मिरातील स्थितीला पाकिस्तान जबाबदार आहे, ही दिर्घकाळ भारत सरकारची जाहिर भूमिका राहिलेली आहे आणि प्रत्येक जागतिक व्यासपीठावर त्याच्या पुनरुच्चार झालेला आहे. मग भारतात कुठल्याही पक्षाचे सरकार सत्तेत असो. पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेत आणि त्यांना विरोध करताना अगदी पाकिस्तानशी वा कुणाही जिहादी संघटनेशी हातमिळवणी करायची, अशी एक सेक्युलर मानसिकता तयार झालेली आहे. म्हणून मग नेहरू विद्यापीठातील कन्हैयाकुमार किंवा उमर खालीद यांनी भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा दिल्या, तर त्याचेही समर्थन करायला कपील सिब्बल यांच्यासारखे कॉग्रेसचे माजी मंत्री कोर्टात हजेरी लावतात. राहुल गांधी त्या कन्हैयाची पाठ थोपटायला विद्यापीठात जातात. पक्षिय वा व्यक्तीविरोध किती टोकाला गेला आहे, त्याचीच त्यातून साक्ष मिळत असते. म्हणून मोदींनी बलुचिस्तान स्वातंत्र्याच्या चळवळीविषयी सहानुभूती जाहिर केल्यावर पाकिस्तानी नेत्यांइतकेच चिदंबरम वा अन्य काही सेक्युलर नेतेही संतापले आहेत. त्यांना काश्मिरच्या प्रश्नाचा विचका झाला असेही वाटू लागले आहे. पण त्यांचेच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे शरीफ़ यांनी त्याच बलुची स्वातंत्र्याला भारताचे हेरखाते मदत करते अशी तक्रार केली, तेव्हा त्यांना आनंद झाला होता काय? पाकिस्तान जगात कुठेही भारताच्या काश्मिर धोरणावर टिकेची झोड उठवतो. पण भारताने बलुचींबद्दल आत्मियता दाखवणे हा भारतातच गुन्हा मानला जाणार असेल, तर हे लोक पाकिस्तानातच कशाला जात नाहीत? कारण त्यांना भारताची सुरक्षा किंवा काश्मिरातील शांततेपेक्षा पाकिस्तानच्या एकात्मतेची अधिक चिंता आहे. बलुचिस्तानला सहानुभूती दाखवल्याने काश्मिरचा प्रश्न चिघळला असे चिदंबरम म्हणतात, ती भाषा कुणा भारतीयापेक्षा पाकिस्तानी राजकारण्याला शोभणारी आहे.

पण ती चिदंबरम यांच्या दिर्घकालीन वर्तनाशी सुसंगत आहे. समझोता एक्सप्रेस गाडीतला बॉम्बस्फ़ोट पाकिस्तानी व सीमीच्या हस्तकांनी घडवल्याचे पुरावे कोर्टातही सादर झालेले होते. आरोपींनीही त्याची कबुली दिलेली होती. अमेरिकन हेरखात्यानेही त्याची पुष्टी केलेली होती. पण चिदंबरम यांनी भारतातील हिंदूत्ववादी संघटनांना त्यात आरोपी बनवण्यासाठी वाटेल तशा खोट्यानाट्या नोंदी अधिकार्‍यांकडून करून घेतल्या होत्या. त्याला वजन आणण्यासाठी अजमेर व हैद्राबादच्या मक्का मशिद स्फ़ोटातही पुरोहित व साध्वी प्रज्ञा यांना गोवण्याचे कारस्थान चिदंबरम यांनीच केल्याचे आता उघड झालेले आहे. हा माणुस मोदी विरोधात पाकिस्तानला व तोयबाला सर्वतोपरी मदत करायलाच गृहमंत्री झाला होता, अशी शंका घेण्यास वाव आहे. मग पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांच्यापेक्षाही बलुचिस्तान पाकिस्तानातून फ़ुटण्याची चिंता चिदंबरम मणिशंकर यांना ग्रासत असेल, तर नवल नाही. दिड वर्षापुर्वी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी डीप असेट शब्दाचा वापर केला होता. भारताचे पाकच्या प्रदेशातील डीप असेट निकालात काढले गेले, त्यामुळे भारताला पाकला आवरणे अवघड झाले, असे त्यांचे विधान होते. पण नुसते तिथले भारतीय डीप असेट निकालात काढले गेले नाहीत, तर भारतात मात्र पाकिस्तानचे डीप असेट मोक्याच्या सत्तापदावर आणून बसवले गेले, असेच आता म्हणावे लागते. अन्यथा तोयबापासून पाकच्या हेरखात्याला पाठीशी घालायला चिदंबरम सारख्यांनी इतक्या हिरीरीने पुढे येण्याचे काय कारण होते? त्यांना काश्मिरातील शांततेपेक्षा बलुचिस्तान फ़ुटण्याच्या चिंतेने कशाला भयभीत केले असते? चिदंबरम इशरतच्या पुढला अध्याय सध्या लिहीत आहेत. अर्थात त्यामुळे भारतीयांना इथले पाक हस्तक समजण्यास मदतच होते आहे. मोदी क्रमाक्रमाने अशा हस्तकांचे मुखवटे फ़ाडत चालले आहेत.

5 comments:

 1. काही लोकांची पाकधार्जिणी भुमिका लोकांना कळून चुकलीये पण त्यामागचे गुपित काही उमगत नाही. त्या भुमिकेमागे पुरवला जाणारा पैसा असे त्याचे ऊत्तर तर नसेल?

  ReplyDelete
 2. पण लोकांना तर काॅग्रेसलाच निवड़ून देतात त्याला काय करायच?

  ReplyDelete
 3. परत अभिनंदन भाऊ आपण हे २०१५ साली सांगितले होते

  ReplyDelete
 4. भाऊ हे नालायक..... पाक डीप असेट आहेत

  ReplyDelete