Wednesday, August 3, 2016

मोदींची मोठी राजकीय चुकलोकसभेच्या शेवटच्या फ़ेरीतले मतदान संपले आणि तीन दिवस मोजणीला बाकी होते. तेव्हा बहुतांश वाहिन्यांनी आपापल्या मतचाचण्यांचे अहवाल लोकांसमोर मांडले होते. पण त्यापैकी दोन अपवाद करता बाकी कोणी भाजपाला बहूमत द्यायला राजी नव्हता. चाणक्य या संस्थेने भाजपाला बहूमत देऊन एनडीए आघाडीला ३४० जागा देऊ केल्या, तो अंदाज खरा ठरला. तर या तंत्राचा भारतीय जनक प्रणय रॉय याने अखेरच्या सादरीकरणात एनडीएला बहुमताच्या जवळ आणून ठेवलेले होते. त्याचवेळी ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीनेही आपले अंदाज व्यक्त केले होते आणि त्यात प्रथमच सहभागी होताना अमित शहा यांनी केलेले विधान अविस्मरणीय होते. तेव्हा अमित शहा उत्तरप्रदेशचे प्रभारी म्हणून काम करत होते आणि त्यांनी अतिशय शिस्तबद्ध रितीने तिथे प्रचाराची आघाडी राबवली होती. भाजपाला त्याच एका राज्यातून ६०हून अधिक जागा मिळतील असे शहा यांनी त्यावेळी नमूद केले होते. त्याहीपेक्षा अधिक यश त्यांच्या श्रमाला मिळाले होते. पण त्याला महत्व नाही, इतके राजकीय आकलन करताना तेव्हा शहांनी उच्चारलेले विधान मोलाचे आहे. कार्यक्रमात सहभागी असलेल्या अन्य पक्ष प्रवक्ते व समालोचक पत्रकरांनीही शहांच्या आकड्याची खिल्ली उडवली होती. तेव्हा शहा म्हणाले, ‘इनको अभीभी पता नकी है, की ये क्यु हार रहे है.’ हे वाक्य अशासाठी मोलाचे आहे, की त्याची दुसरीही बाजू आहे, ज्याचा उच्चार शहांनी केलेला नव्हता. ती दुसरी बाजू भाजपा तेव्हा कशाला जिंकणार होता, किंवा कोणत्या कारणाने जिंकणार होता? तेव्हा त्याचा विचार भाजपाच्या विरोधकांनी केला नाही, हे सत्यच आहे. पण आपण का जिंकलो, ते जाणून घेण्य़ाचा प्रयास भाजपाने तरी किती केला? नंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झालेल्या अमित शहांनी तरी आपल्याच त्या विधानाची दुसरी बाजू कधी समजून घेतली काय?

८० पैकी ७१ जागा भाजपाला मिळवून देण्यात अमित शहा यांचा मोठा हातभार होता, हे कोणी नाकारू शकत नाही. कारण हा माणूस नेमून दिलेले काम नेमके पार पाडण्यात वाकबगार आहे. पण कुठले काम आणि कसे करायचे, त्याचे डावपेच आखण्याची त्याच्यात कुवत नाही. पण असाच माणूस स्वत:ला चाणक्य समजू लागला मग तो चंद्र्गुप्ताला कुणा सोन्यागोम्याकडूनही पराभूत करण्याची पाळी आणू शकतो. लोकसभेत किंवा उत्तरप्रदेशात मोदींना प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याचे पहिले कारण अन्य पक्षातली अंधाधुंदी हेच होते. दुसरे कारण मोदींच्या मागे जनमानसात प्रचंड सदिच्छा होत्या. अशा सदिच्छांचा वापर करून कुठलाही पक्ष आपली जनतेतील पकड भक्कम करीत जातो. त्याला अन्य पक्षांच्या विनाशाचे मनसुबे करण्याची गरज नसते. त्यांच्यात फ़ाटाफ़ुट घडवण्याचेही कारण नसते. लोकांना कॉग्रेसी अराजकाचा कंटाळा आला होता आणि अन्य कुठला पक्ष त्यातून पर्याय देत नव्हता. तो पर्याय म्हणून भाजपा व मोदी पुढे सरसावले, त्याचे लोकांनी बाहू पसरून स्वागत केले होते. त्याचा अर्थ कॉग्रेस पक्षाला संपवणे किंवा देशाच्या कानाकोपर्‍यात प्रत्येक पातळीवर भाजपाचीच एक हाती सत्ता प्रस्थापित करणे; अशी लोकांची अपेक्षा नव्हती. अमित शहांना ही दुसरी बाजू कधीच कळली नाही. म्हणून पक्षाध्यक्ष होताच त्यांनी देशात सर्वत्र आपलाच पक्ष असावा आणि अन्य कुठल्या पक्षाला पाय ठेवायलाही जागा नसावी, अशी स्वप्ने पडू लागली. त्यातून त्यांनी एकपक्षीय राजवटीचा कार्यक्रम हाती घेतला. ‘पंचायत टू पार्लमेन्ट’ सर्व सत्ता भाजपाला. त्यासाठी देशातलाच नव्हेतर जगातला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी शहांनी सदस्य मोहिम राबवली. मित्र पक्षांना दुखावून पळवून शत्रू गोटात धाडले किंवा शत्रू म्हणून उभे केले. याचा अर्थ आपला पक्ष कशामुळे जिंकला, त्याचा शहांना कधी विचारच करावा असे वाटले नाही.

आपण एकूण मतदानातील ३१ टक्के मते मिळवली आणि तेवढ्या मतांवर आपले बहूमत मिळवणे अशक्य आहे, हे शहांना नक्कीच कळू शकले असते. पण १२ टक्के मित्रपक्षांच्या मतांमुळे भाजपाला २८२ इतका बहूमताचा पल्ला गाठता आला. तसे नसते तर भाजपा १५०-१८० पर्यंत येऊन थबकला असता. सहाजिकच आपल्या मागे ज्या शुभेच्छा गोळा झाल्या आहेत, त्याचा पाया भक्कम करून जिथे खुप मागे पडलो, अशा राज्यात पक्ष विस्ताराची मोहिम शहांनी हाती घ्यायला हवी होती. पण फ़क्त सहा महिन्यात त्यांनी हरयाणा व महाराष्ट्रात दोन मित्रांना दुखावले आणि विरोधात उभे केले. त्याचा तात्कालीन लाभ मिळाला आणि काही महिन्यांनी बिहार दिल्लीत त्याचा जबरदस्त फ़टकाही बसला. मग नवे मित्र गोळा करून आसाममध्ये सत्तेपर्यंत मजल मारावी लागली. मात्र दरम्यान कॉग्रेसमुक्त भारतची नशा इतकी भिनली होती, की भाजपायुक्त भारत करण्याच्या नादात अनेक भाजपावाले मिळेल त्याला शत्रू बनवायला धडपडू लागले. किंचित टिका वा चुका दाखवणार्‍याला देशद्रोही ठरवण्यापर्यंत मजल गेली आणि त्यातून शुभेच्छा मातीमोल व्हायला आरंभ झाला. आणखी एक बाब अशी असते की बाहेर कोणी शत्रू राहिला नाही असे वाटू लागले, मग घरातच एकमेकांना शत्रू ठरवून उरावर बसण्याला वेग येत असतो. गुजरातमध्ये तेच होताना दिसते आहे. पंधरा वर्षापुर्वी़च्या दंगलीत मुस्लिम विरोधात जो दलित समाज भाजपाशी एकरूप झालेला होता, त्याला झोडपण्यापर्यंत मजल गेली. आधीच पटेल समाज केशूभाईंना बाजूला पडावे लागल्याने नाराज होता, त्यात दलितांची भर घालण्याचे काम उतावळ्यांनी पार पाडले. आज गुजरात धुमसतो आहे, त्याला शत-प्रतिशतची मस्ती कारणीभूत झाली आहे. आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी नाही आणि असलाच तर त्याला शिल्लक ठेवायचा नाही, अशा मस्तवालपणातून गुजरात गडबडला आहे.

विरोधक व शत्रूंना विभागलेले दुभंगलेले ठेवण्यात खरे राजकारण असते. तशा डावपेचांमुळे लढाई शिवायही विजय संपादन करता येत असतो. कारण विभागलेले शत्रू दुबळेच रहातात. गुजरातमध्ये मोदींनी तेच केले आणि कॉग्रेस सहा दशके तेच देशात करत राहिली होती. पण शहांनी अध्यक्ष झाल्यावर प्रथम मित्रांना शत्रू केले आणि शत-प्रतिशतचा घोषा लावून विरोधकांना अस्तित्वाची लढाई म्हणून एकत्र येण्यास भाग पाडले. त्यातूनच आपल्या मस्तवालपणाचे प्रदर्शन मांडत जनतेच्या मनातल्या सदिच्छांना तिलांजली देऊन टाकली. कारण लोकसभेतील विजय हे आपले कर्तॄत्व नसून जनतेच्या सदिच्छा आहेत, याचेच भान पक्षाध्यक्ष म्हणून अमित शहांना उरले नाही. एकदा शत्रूंना संपवले आणि मित्रांना नामोहरम केले, मग लढायचे कोणाशी अशी समस्या उभी रहाते. कारण विजयाची नशा लढण्याची खुमखुमी निर्माण करत असते आणि ती भागवण्यासाठी कोणाशी तरी लढणेच भाग असते. मग आपलेच आप्तस्वकीय, सगेसोयरे यांच्याशी भांडणे उकरून काढण्याला पर्याय उरत नाही. आज गुजरातमध्ये भाजपाची संघटना खिळखिळी होताना दिसते आहे, त्याचे हेच एकमेव कारण आहे. ज्या पटेल समाजाच्या भक्कम पायावर भाजपा तिथे उभा राहिला, तोच पाया उखडला जातो आहे. उत्तरप्रदेशात बहूमत मिळवणे अगत्याचे असताना गुजरातच्या घडामोडी अपशकून करीत आहेत. शत-प्रतिशतच्या भुलभुलैयामागे धावण्यापेक्षा असलेले मित्र टिकवून नवे मित्र या दोन वर्षात आणले गेले असते, तर भाजपा आज अधिक मजबूत झालेला दिसला असता. पण अमित शहांनी मागल्या दोन वर्षात मोदींच्या लोकसभेतील यशावरून पुरता बोळा फ़िरवला आहे. मित्रांना शत्रू करून विरोधकांच्या हाती कोलित दिले आहे. आणि त्यांच्याच भाषेत सांगयचे तर गुजरातमध्ये अशी दुर्दशा कशामुळे व्हायची वेळ आली ते शहांनाही अजून उमगलेले नाही. अमित शहांना पक्षाध्यक्षपदी बसवणे, ही मोदींची राजकीय कारकिर्दीतली सर्वात मोठी चुक ठरणार यात शंकाच नाही.

3 comments:

  1. खरे आहे भाऊ.विनाश काले विपरीत बुद्धि

    ReplyDelete
  2. भाऊ परखड विश्लेषण . परतुं मनाला यातना देणारे आहे .

    ReplyDelete
  3. Amit shah will be next Devkant Barua in BJP soon we will be witness to it, he will definitely declare BJP is India n India is BJP. Or else only Modi n Modi. That will be real downfall will start.

    ReplyDelete