Thursday, August 18, 2016

‘अम्नेस्टी’वरच बंदी घाला

श्रीलंकेचे तात्कालीन राष्ट्रप्रमुख राजपक्षे आणि लष्करप्रमुख फ़ोन्सेका मोहिम फ़त्ते झाल्यानंतरअम्नेस्टी इंटरनॅशनल नावाची एक सर्वात घातक संस्था जगभर बोकाळली आहे. खरे तर मानवी हक्क संरक्षणासाठी व जागतिक शांतीसाठी सुरू झालेल्या संस्थेला आता पुरती अवकळा आलेली असून, तो एक जागतिक दहशतवादाचा अड्डा बनला आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर युद्धाचे प्रसंग टाळण्यासाठी व नागरी जीवनातील शांती जपण्यासाठी अनेक संघटना सुरू झाल्या. त्यात या संस्थेचा समावेश होतो. पण मध्यंतरीच्या काळात त्याला सुरुंग लावून जगभरचे दहशतवादी विचारसरणीचे म्होरके त्यात एकत्र आले आणि आता तर त्यांनी ही संस्थाच काबीज केली आहे. जगभरच्या दहशतवादी व घातपाती संघटना गटांची एक शिखर संस्था, असे तिचे स्वरूप होऊन बसले आहे. जिथे म्हणून दहशतवादाचे कंबरडे मोडण्याची वेळ येते, तिथे धाव घेऊन त्या दहशतवादी गटाला संरक्षण देणे आणि त्यांना पुन्हा सावरण्यास हातभार लावणे, असेच या संस्थेचे स्वरूप बनलेले आहे. गेल्या चार दशकात एकाच देशाला दहशतवाद संपवणे शक्य झाले आणि त्याचे एकमेव कारण त्याने अम्नेस्टी नामक संघटनेला आपल्या भूमीवर प्रतिबंधित केले आहे. तो देश फ़ार कुठे दुर वसलेला नाही, तर भारताचा दक्षिणेकडला शेजारी श्रीलंका हाच आहे. त्याने यशस्वीरित्या तामिळी वाघांच्या दहशतवादाचा बिमोड केला आणि त्यात अडथळे आणणार्‍या अम्नेस्टीला श्रीलंकेत पाय ठेवण्याचीही संधी नाकारलेली आहे. जोवर अम्नेस्टी तिथे लुडबुड करीत होती, तोवर तीन दशके हजारोच्या संख्येने निरपराधांचे बळी पडत होते. या संस्थेला श्रीलंकेने प्रतिबंधित केले आणि श्रीलंकेत कायमची शांतता नांदू लागली आहे. भारतात सध्या या संस्थेच्या विरोधात वादळ उठलेले आहे आणि तीच संधी साधून तिच्यावर कायमचा प्रतिबंध लागू केला, तर भारताला दहशतवादाशी समर्थपणे लढणे शक्य होईल.

१९८० च्या दशकात श्रीलंकेत व भारतीय उपखंडाच्या अनेक प्रदेशात दहशतवादाने डोके वर काढले. श्रीलंकेतील तामिळी वाघांचा लष्करी कारवाईने बंदोबस्त करण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि त्यात सफ़लता येऊ शकली नाही. याचे कारण समजून घेतले पाहिजे. जेव्हा या वाघांच्या कारवायांनी अतिरेक केला, तेव्हा लष्कराला हस्तक्षेप करावा लागला होता. पण त्यात वाघांचे अस्तित्व संपण्याची वेळ आलेली दिसली, मग अम्नेस्टी त्यात हस्तक्षेप करायची आणि तिसर्‍या देशात कुठे तरी वाटाघाटी सुरू करीत असे. तोपर्यंत श्रीलंकेत सरकारला कारवाई थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागे. काही महिन्यात उध्वस्त झालेले वाघांचे संघटन नव्याने सज्ज व्हायचे. मग त्या वाटाघाटी फ़िसकटत असायच्या आणि नव्या हल्ल्यातून संघर्षाला तोंड फ़ुटत होते. तीन दशके व कित्येक हजार लोकांचा बळी गेल्यावर तिथल्या राज्यकर्त्यांना जाग आली आणि त्यांनी अम्नेस्टीला बाजूला करून शांतता आपल्या बळावर प्रस्थापित करण्याचा कठोर निर्णय घेतला. त्यानुसार वाघांना एक ठराविक मुदत देण्यात आली. वाघांचा प्रभाव असलेल्या प्रदेशातून जे अतिरेकी नाहीत, त्यांना सुरक्षित जागी येण्यास बजावण्यात आले. मात्र मुदत संपल्यावर असतील त्यांना अतिरेकी समजून ठार मारले जाईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यात बहुतांश वाघ व त्यांचे सहकारी मारले गेले. दोनतीन हजार लोकांचा त्यात बळी गेला. काही निरपराध असतीलही. पण तिथेच वाघांची संघटना नेस्तनाबुत झाली आणि श्रीलंकेतील हत्याकांड व ते माजवणारा दहशतवाद कायमचा संपून गेला. गेल्या सात वर्षात तिथे कुठली घातपाती घटना घडल्याची वार्ता नाही. थोडक्यात जे अम्नेस्टीच्या मध्यस्थीने अवघड जागीचे प्राणघातक दुखणे बनले होते, त्यातून श्रीलंकेला कायमची मुक्ती मिळून गेली. मग अम्नेस्टीने काय करावे? त्यांनी श्रीलंकन लष्करावर मानवी हत्याकांडाचे आरोप केले. जे आज काश्मिरात भारतीय सेनेवर होत असतात.

दहशतवादी, जिहादी ज्या सामान्य नागरिकांचे हत्याकांड करतात, त्याविषयी अम्नेस्टी सहसा बोलत नाही, की तक्रार करत नाही. पण सरकारी वा लष्करी कारवाईत घातपाती मारले जातात, त्यांना निरपराध नागरिक ठरवून गळा काढणे, हे अम्नेस्टीचे काम होऊन बसले आहे. मात्र त्याला श्रीलंकेने भीक घातली नाही. तामिळी वाघ संघटनेच्या बंदोबस्ताची चौकशी व तपास करायला आलेल्या अम्नेस्टीच्या शिष्टमंडळाला त्या देशाने आपल्या भूमीवर पाय ठेवू दिला नाही. सहाजिकच त्यांच्या अहवाल वा अन्य कुठल्या गोष्टीला किंमत देण्याचा विषयच आला नाही. पण सात वर्षे होत आली, श्रीलंकेला दहशतवादातून कायमची मुक्ती मिळाली आहे. त्यातला तो लष्करी कठोर कारवाईचा निर्णय दुय्यम होता. कारण तशा कारवाया आधी तीन दशके अखंड चालू होत्या. सात वर्षापुर्वी तिथल्या नव्या राज्यकर्त्यानी कठोर कारवाईचा कौलच मतदानातून मिळवला होता आणि तो मिळाल्यावर त्यांनी वाघांना अम्नेस्टीकडून जी रसद मिळत होती, ती तोडून टाकली. त्यामुळे पुढली लष्करी कारवाई यश मिळवू शकली. दहशत माजवणारे व घातपात करणारे प्रशिक्षित सेनेसमोर टिकत नसतात. त्यांचे सर्वात मोठे सुरक्षा कवच सामान्य निरपराध जनता असते. ते नेहमी नागरी वस्त्यांमध्ये दबा धरून बसतात. त्यामुळेच पोलिस वा लष्करी कारवाई करू गेल्यास त्यात हकनाक काही नागरिकांचा मृत्यू संभवतो. मग त्या बळींचा आडोसा घेऊन अम्नेस्टी व त्यांचे स्थानिक हस्तक सरकारच्या विरोधात मानवी हक्क पायदळी तुडवले गेल्याचे आरोप करून सेनेला हतोत्साहीत करून टाकतात. ही आजच्या जागतिक दजशतवादाची रणनिती झालेली आहे. त्यात नेहरू विद्यापीठातला कन्हैया, उमर खालीद असतो, तसेच बंगलोरला आझादीच्या घोषणा देणारेही असतात. त्यांना अम्नेस्टी एकत्र करते, प्रोत्साहन देते. पण जबाबदारी मात्र घेत नाही.

आताही अम्नेस्टीने बंगलोर येथे आयोजित केलेल्या परिसंवादात अशा घोषणा झाल्यावर या संस्थेने जबाबदारी झटकलेली आहे. तिथे कोणीही येऊ शकत होते आणि अशा आगंतुकांनी देशविरोधी घोषणा दिल्याचा खुलासा अम्नेस्टीच्या इथल्या हस्तकांनी केला आहे. मग अशा आगंतुकांना रोखायचे कोणी? पोलिसांनी तिथे येणार्‍यांना तपासण्याचा पवित्रा घेतला असता, तर यांनीच स्वातंत्र्याची गळचेपी केल्याचा कल्लोळ सुरू होणार. थोडक्यात अम्नेस्टी हा निव्वळ कांगावखोरांचा जागतिक अड्डा झालेला आहे. तिथे आपल्या दहशतवादी हस्तकांना सुरक्षा कवच देण्यासाठी मानवी हक्कांचे अवडंबर माजवले जाते. जगातल्या कुठल्याही देशात हकनाक मारल्या जाणार्‍या सामान्य नागरिकांसाठी अम्नेस्टीचे कांगावखोर उर बडवायला पुढे येताना दिसणार नाहीत. पण जिथे म्हणून दहशतवादी वा अतिरेकी जिहादींचे निर्दालन यशस्वी होऊ लागेल, तिथे त्यांच्या कांगावा सुरू होत असतो. त्यासाठी फ़ार पुर्वीपासून बुद्धीवादी वर्ग, विद्यापीठे, ज्ञानसंस्था, साहित्य कलाक्षेत्रातील संस्था, माध्यमे अशा जागी त्यांनी आपले हस्तक मोठ्या खुबीने आणून बसवलेले आहेत. त्यांना जगातून पैसा आणून पुरवलेला आहे. किंबहूना अशा प्रतिष्ठीतांचे खास हितसंबंध आपल्या संघटनेत निर्माण करून ठेवलेले आहेत. त्यामुळे या जगाला वा कुठल्याही देशाला दहशतवाद, जिहाद वा हिंसाचारापासून मुक्ती हवी असेल, त्यांनी प्रथम आपल्या देशातील अम्नेस्टीला उखडून टाकले पाहिजे. त्यांना कुठल्याही सवलती देणे दुर, त्यांना कुठलेही स्थान असू देता कामा नये. जितक्या लौकर अम्नेस्टी ही संस्था नामशेष होईल, तितकी जागतिक शांतता लौकर प्रस्थापित होईल. परिणामी लाखो निरपराधांचे प्राण वाचविल्याचे पुण्य त्या देशातील सरकार व राज्यकर्त्यांना मिळू शकेल. कारण अम्नेस्टी आता दहशतवादाचे नेतृत्व करू लागली आहे.

3 comments:

  1. भाऊ अम्नेस्टी isis Isi Taliban हे एका माळेचे मणि आहेत यांना संपवणे गरजेचे आहे

    ReplyDelete
  2. भाऊ तुम्ही अगदी योग्य जागी बोट ठेवलात, ह्या विषयी आणखीन जनजागृती व्हायला पाहिजे जेणे करून अम्नेस्टी चा खरा मुखवटा जनते सामोर येईल.

    ReplyDelete
  3. मानवतावादिच्या बुरख्याखाली जिहादि पाढिंबा देणाराच्या वाभाङे काढले आहेत.

    ReplyDelete