Tuesday, August 30, 2016

तुम्ही कुठल्या सीटवर आहात?

shobha de cartoon के लिए चित्र परिणाम

अविष्कार स्वातंत्र्य, सहिष्णूता किंवा आझादी हे शब्द ऐकायला खुप बरे वाटतात. शाळा किंवा तत्सम संस्थांच्या भिंतीवर वर्गात अनेक सुविचार लिहीलेले असतात. पण त्यानुसार किती कारभार चालतो? असे सुविचार भारावून टाकणारे असतात. मात्र व्यवहारात त्याकडे बहुतांशी पाठ फ़िरवली जाते. कारण व्यवहार ही मुळातच तडजोड असते. तुम्ही अशा व्यवहारात कुठे आहात, यानुसारच तुमची त्यातली भूमिका ठरत असते. कारण घटना वा विचार एकच असला तरी त्याचे स्थानानुसारचे परिणाम बदलत असतात. उदाहरणार्थ तुम्ही बसने प्रवास करीत असाल तर ड्रायव्हर आणि बसच्या अगदी शेवटच्या बाकावर बसलेल्या प्रवाशाला येणारे अनुभव एकदम भिन्न असतात. तीच बस कुठल्या गतिरोधकावरून जात असेल तर ड्रायव्हरला त्याचा जितका हादरा बसतो, त्याच्या अनेकपटीने शेवटच्या बाकावर बसलेल्या प्रवाश्याला दणका बसत असतो. असे प्रवासी सीटपासून काही फ़ुट हवेत उडवले जातात आणि त्यांचा तोल जाऊन दुखापतही होऊ शकत असते. म्हणूनच ड्रायव्हर आणि बाकी प्रवासी यांच्या अनुभवात फ़रक पडत असतो. बस व हादरा एकच असूनही असे भिन्न अनुभव येतात, म्हणूनच त्यावरच्या प्रतिक्रीयाही वेगवेगळ्या असतात. जी गोष्ट सामान्य बसच्या बाबतीत असते तीच नेहमीच्या जगण्यातही तितकीच खरी असते. तुम्ही कुठल्या सामाजिक आर्थिक स्तरामध्ये असता, त्यानुसार प्रसंगाचे फ़टके सहन करावे लागत असतात. मग विषय आझादी वा कुठल्या अधिकार वा स्वातंत्र्याचा असो. मोर्चाचे नेतृत्व करणार्‍या नेत्याला पोलिसांच्या लाठ्य़ा खाव्या लागत नाहीत. पण त्यात सहभागी झालेल्या सामान्य कार्यकर्ता निदर्शकाला रक्तबंबाळही व्हावे लागत असते. उलट अटकेतील नेता मात्र केबिनमध्ये बसुन शीतपेय वा चहाही पिताना दिसु शकतो. त्याला स्थानमहात्म्य म्हणतात.

आपण रोजच्या जगण्याने व त्यातील समस्यांनी बेजार झालेले असतो. त्यात कुठे भाषणाला लेखनाला बंदी आहे, याच्याशी आपल्याला कर्तव्य नसते. कारण अशा कुठल्याही स्वातंत्र्याने वा अधिकाराने आपल्या घरातली चुल रात्री पेटणार नसते. पोटातल्या भूकेच्या आगीला शांतता मिळणार नसते. उलट ज्यांना अशा चुल पेटण्याची कुठलीही समस्या भेडसावत नसते आणि घरी परतल्यावर आयते ताट समोर येते, त्यांना अशा विविध स्वातंत्र्याच्या भुकांनी व्याकुळ केलेले असते. त्यांना कुठल्या दर्ग्यात वा मंदिरात प्रवेश करण्याचे अधिकार मोलाचे वाटत असतात. त्यासाठी आकाशपाताळ एक केले जात असते. पण दिल्लीची ती बिचारी निर्भया किंवा जवखेडा वा कोपर्डी अशा गावातल्या मुलींना नुसते घराबाहेर पडून मोकळे श्वास घ्यायची संधीही खुप दुर्मिळ असते. त्यासाठी त्यांना बलात्कार हत्यांना सामोरे जावे लागत असते आणि त्यांच्यासाठी कुठलाही आधार नसतो. कोणाची मदत नसते. त्यांच्या मोकळे श्वास वा मुक्त फ़िरण्याच्या अपेक्षाही पुर्ण करण्यासाठी कुठला कायदा मदतीला येत नाही किंवा कुठले न्यायालय त्यांच्या अधिकारासाठी उभे रहात नाही. त्यांनी निमूटपणे अशा किरकोळ अपेक्षांसाठी जिवानिशी जायचे असते आणि मगच त्यांच्या हक्कांवर गदा आली, म्हणून गाजावाजा होतो. बाकी भरपेट जगणार्‍यांसाठी हक्काच्या लढाया अखंड चालू असतात. गाजत असतात. त्यांचे अधिकार सिद्ध झाले, मग तमाम महिलांना गरीबांना अधिकार मिळाल्याचे उत्सवही साजरे होतात. पण आपल्याला कोणते हक्क मिळाले, त्याचा कोपर्डी वा जवखेड्याच्या अशा मुलीमहिलांना थांगपत्ता लागलेला नसतो. कारण अशा मुली महिला वा त्या थरातील माणसे मागल्या शेवटच्या सीटवर बसलेली असतात. पुढला ड्रायव्हर जशी गाडी हाकेल, त्याचे होणारे परिणाम त्यांनी निमूटपणे भोगायचे असतात. तक्रारही करायची सोय नसते.

थोडक्यात समाजाची देशाची वा माणसाची तशी विभागणी झालेली आहे. त्यात सर्वांना सर्व हक्क असतात आणि ते सिद्ध करून अनुभवण्यासाठी मात्र त्यांना ठराविक सामाजिक स्तरात आपल्या शक्तीवर येऊन पोहोचणे भाग असते. व्यवस्था त्या मोजक्या स्तरासाठी असते. ऑलिंपिकचे पदक जिंकलात, मग तुमचे जागोजागी सत्कार होत असतात. तुमच्यावर बक्षिसांची व पैशाची बरसात सुरू होते. पण तो मुक्काम गाठण्यापर्यंत तुमचे हाल कुत्राही खाणार नसतो. साक्षी सिंधू यांच्या पदक विजयाचे सोहळे चालू असताना जैशा नावाच्या धावपटूचा आवाज कोणापर्यंत पोहोचू शकला? कित्येक किलोमीटर्स धावण्याच्या स्पर्धेत ठराविक अंतरावर पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय झाली नाही, म्हणून जैशाच्या घशाला शोष पडला. शेवटचा पल्ला गाठून ती कोसळली. तिला थेट इस्पितळात भरती करावे लागले. तिची दखल कोणी घेतली काय? कशी घेतली जाईल? तिला कुठले पदक मिळवता आले नाही, की आपला स्तर उंचावता आला नाही. मोठी दौड करताना वाटेत तहान भागवण्यासाठी पेय मिळणे हा तिचाही अधिकार होता. तो अधिकार नाकारला गेला. कोणाला फ़िकीर आहे त्याची? किती माध्यमांनी जैशाचा अधिकार पायदळी तुडवला जाण्याची दखल घेतली? त्यापेक्षा काही महिलांनी शनिशिंगणापुर मंदिरात वा हाजीअली दर्ग्यात जाणे मोलाचे असते. जैशा हुशार धावपटू असेल, पण अजून तिला उंच स्तरापर्यंत येणे साधलेले नाही. त्यापेक्षा शोभा डे हिच्या बाष्कळ बडबडीचे अधिकार अधिक मोलाचे असतात. त्यासाठी माध्यमे थुंकी झेलायलाही सज्ज असतात. जैशाला अजून तरी शोभा डे हिच्या सामाजिक स्तरापर्यंत मजल मारता आलेली नाही. मग ती पाण्याविना रिओच्या रस्त्यावर तडफ़डून मेली तर काय बिघडणार होते? पाठीमागच्या सीटवर बसलेल्यांचा तितकाच अधिकार असतो ना?

आपल्या मुलीला ठार मारून, खोटी कागदपत्रे बनवून उजळमाथ्याने इंद्राणी मुखर्जी प्रतिष्ठीतांच्या पार्टीत मिरवत होती, कारण ती व्यवस्था नावाच्या वाहनाची ड्रायव्हर असते. तिचा दुसरा किंवा तिसरा पती अशा व्यवस्थेचा ड्रायव्हर असतो. आधीचा पती तितका उच्चस्तरीय घटकातला व्यवस्थेचा ड्रायव्हर नव्हता, तर इंद्राणीने ड्रायव्हर बदलून घेतला आणि शेवटच्या सीटवरून थेट पहिल्या रांगेत येऊन बसण्यापर्यंत मजल मारली. तिला कुठला कायदा, पोलिस हात लावायला धजले नाहीत. त्यांनी तिला खुनातून सहीसलामत निसटण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. कोणा शिपायाला शिना बोराचे प्रेत मिळाले, तर उकरलेला मृतदेह अपघाती मृत्यू म्हणून नोंद करून पुन्हा गाडून टाकला. कारण इंद्राणी नेमक्या मोक्याच्या जागी आधीपासून बसलेली होती. पण कुठल्या तरी बसमध्ये पत्नी मेली म्हणून तिच्या पतीला कंडक्टरही प्रेतासह हाकलून लावतो. दाना मांझीला मृतदेह वाहून न्यायला रुग्णवाहिका मिळू शकत नाही. ह्याला व्यवस्था म्हणतात. त्यात सर्वांसाठी सर्वकाही असल्याचे आपण नेहमीच ऐकत असतो. पण आपली जागा चुकलेली असते. आपण बसायला सीट आहे म्हणून सुखावलेले असतो आणि शेवटच्या सीटवर बसुन हिंदकळत असतो. दुखापती करून घेण्याचा अधिकार आपल्याला व्यवस्थेने दिलेला असतो. म्हणून कुणाच्या आंदोलनकारी उपोषणाची सरकार दखल घेते आणि कुपोषित मरणार्‍या लाखो नागरिकांच्या तोंडी घास घालण्याची कुणालाही गरज वाटत नाही. ह्याला म्हणतात व्यवस्था! कालबाह्य जुन्या पठडीतले लोक त्यालाच ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ असे म्हणायचे तर हिंदीत ‘जिसकी लाठी उसकी भैस’ असे म्हणायची परंपरा होती. आजकाल आपण पुढारलो आहोत आणि त्याला आपण व्यवस्था, कायद्याचे राज्य वगैरे अशी नवी आधुनिक नावे शोधून काढली आहेत. सीटांची समता आली आणि त्यातून दुखापती करून घेण्याचा अधिकार आपण मिळवला आहे.

रोजनिशी (दै, जनशक्ति)

1 comment:

  1. बरोबर भाऊ परंतु हिंदुस्तानात लाठी खांग्रेसने नोकरीत लावलेले भ्रष्टाचारी लोकांकडेच आहे व मीडिया परदेशींना विकला गेला आहे !!!

    ReplyDelete