Wednesday, August 17, 2016

ओवायसीला चोख उत्तर



स्वातंत्र्यदिनी भारताच्या पंतप्रधानांचे लालकिल्ला येथून देशाला उद्देशून केलेले भाषण, हा आता एक प्रघात बनला आहे. नरेंद्र मोदी यांनी लागोपाठ तिसर्‍या वर्षी चक्क मराठी फ़ेटा बांधून हे भाषण दिले. त्यात नवे काही असेल, तर पाकिस्तानातील लष्करपिडीत जनतेला दाखवलेला आशेचा किरण हे होय. आजवर कधीच भारताने अशा विषयात नाक खुपसलेले नाही. अपवाद केवळ बांगला देशचा! १९७१ सालात भारताने पुर्व पाकिस्तान असलेल्या प्रदेशातील जनतेच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षाना दाद देत तिथे लष्करी हस्तक्षेप केला होता. पण त्याच्याआधी पाकिस्तानच्या अंतर्गत विषयात भारताने कधी नाक खुपसले नाही की टिप्पणी केलेली नव्हती. त्याच्याही नंतर कधी भारताने पाकिस्तानच्या अंतर्गत भानगडींना आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीत वापरले नाही. उलट पाकिस्तान पहिल्या दिवसापासून भारताचा अविभाज्य प्रदेश असलेल्या काश्मिरचा काही भाग गिळंकृत करून बसला आहे आणि आजही भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मिरी प्रदेशातील वादावादीत सतत नाक खुपसत राहिला आहे. अगदी राष्ट्रसंघाच्या अधिवेशनापासून विविध जागतिक मंचावर काश्मिरी स्वातंत्र्याचा आपणच एकमेव पाठीराखा असल्याच्या गमजा पाकिस्तान करत राहिला आहे तिथे होत असलेल्या उचापतींना खतपाणी घालत राहिला आहे. पण भारताने कधीही पाकिस्तानच्या अंतर्गत असलेले वादविवाद किंवा असंतोष यांचा राजकारणी वापर केला नव्हता. फ़ार कशाला त्याबद्दल टिप्पणीही करायचे भारताने टाळलेले आहे. यंदा नरेंद्र मोदी या पहिल्याच पंतप्रधानाने आपल्या राष्ट्रीय संबोधनात पाकच्या या दुखर्‍या जखमेवर बोट ठेवण्याचे आक्रमक पाऊल उचलले आहे. बलुचीस्तान, बाल्टीस्तान, व्याप्त काश्मिर वा अन्य पाक प्रदेशात जी धुसफ़ुस चालू आहे, तिथल्या ग्रासलेल्या नागरिकांविषयी भारताला सहानुभूती असल्याचे मोदींचे वक्तव्य, म्हणूनच मोलाचे नवे वळण आहे.

योगायोग असा, की यंदा काश्मिरात नको इतका हिंसाचार उफ़ाळला आहे. त्यामागे पाकिस्तानची प्रेरणा आहे यात शंका नाही. पण वाटाघाटींनी हा विषय निकालात निघू शकत नाही, हे आता सात दशकांनंतर सिद्ध झाले आहे. शिवाय पाकिस्तान जर काटा टोचल्याप्रमाणेच वागणार असेल, तर काट्याने काटा काढणे भाग होऊन जाते. मात्र त्यासाठी राजकीय धाडस व इच्छाशक्तीची गरज आहे. मोदींनी ती इच्छाशक्ती दाखवली आहे. काश्मिर प्रकरणात पाकिस्तान अघोषित युद्धाच्या म्हणजे जिहादी मार्गानेच वाटचाल करणार असेल, तर त्याच मार्गाने त्याची कोंडी करण्याचा तो इशारा आहे. भारतीय काश्मिरातील मुठभर असंतुष्टाचा बागुलबुवा करीत पाकिस्तान त्याचे राजकारण करू बघतो, तर भारताने तीच रणनिती कशाला वापरू नये? किंबहूना तीच रणनिती खुप आधीपासून राबवणे सुरू झाले आहे आणि त्याचेच पडसाद आता बलुचीस्तान व अन्य पाकिस्तानी प्रदेशात उमटताना दिसत आहेत. तिथल्या असंतोषाला खतपाणी घालून विविध स्वातंत्र्य चळवळींना भारत प्रोत्साहन देऊ लागला आहे. म्हणून तर यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या कानाकोपर्‍यात पाकविरोधी घोषणा दुमदुमल्या. व्याप्त काश्मिरातील अनेक तालुके गावे शहरात थेट भारतीय तिरंगा फ़डकावित लोक रस्त्यावर आले. त्यापैकी अनेकांनी ‘भारतमाताकी जय’ अशा घोषणा देण्यापर्यंत मजल मारली. यात भारताने खेळलेली रणनिती पाक डावपेचांना पुरून उरणारी आहे. पण दुसरीकडे हैद्राबादच्या असाउद्दीन ओवायसींना चोख उत्तर देणारी सुद्धा आहे ना? हा माणूस भारतात जन्माला आला व इथे जगतो आहे. पण गळ्यावर सुरी ठेवली तरी भारतमाताकी जय म्हणणार नाही अशी डरकाळी त्याने फ़ोडली होती. त्याला पाकिस्तानी असंतुष्टांनी सणसणित उत्तर दिले आहे. कारण तिथे घोषणा करणारे ओवायसीचेच धर्मबांधव आहेत.

आपण मुस्लिम आहोत आणि भारतीय संविधानाने आपल्याला धर्मपालनाचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार इस्लामचे पालन आपण करतो आणि अल्लाह सोडून कुणाचा जयजयकार करायला इस्लाम मान्यता देत नाही, अशी पळवाट ओवायसीने काढलेली होती. म्हणूनच आपण मुस्लिम असल्याने गळ्यावर सुरी ठेवली तरीही भारतमाताकी जय म्हणणार नाही, असे त्याने म्हटले होते. मग आता बलुचिस्तान, बाल्टीस्तान या पाकिस्तानी प्रदेशातून जे कोणी भारतमातेचा जयजयकार करीत आहेत, त्यांचा धर्म कोणता? तेही मुस्लिमच आहेत आणि मुस्लिम देशाचे रहिवासी आहेत. मग त्यांचा इस्लाम त्यांना अशा घोषणा देण्याची मुभा कशी देतो? त्यांनी इस्लाम सोडला असे ओवायसी वा तत्सम मुस्लिम नेत्यांना म्हणायचे आहे काय? ओवायसी यांच्यासारख्या नेत्यांचे राजकारण व त्यानुसार चाललेल्या राजकारणाच्या अतिरेकाला व अत्याचारांना कंटाळून या पाकिस्तानी मुस्लिमांनीच भारतमातेचा धावा केला आहे. त्यांना ओवायसी यांच्यासारख्या धार्मिक राजकीय मुस्लिम नेत्यापासून मुक्ती हवी आहे. ती मुक्ती इस्लामी राजकारण देऊ शकत नाही, तर भारतीय राष्ट्राभिमान देऊ शकतो; अशी खात्री पटल्यानेच त्या पाक मुस्लिमांना भारतमातेचा जयजयकार करण्याची बुद्धी झाली आहे. गरज वाटू लागली आहे. नुसता भारतमातेचा जयजयकार करून हे पाक मुस्लिम थांबलेले नाहीत, तर भारताच्या पंतप्रधानाला त्यांनी आपल्या मुक्तीसाठी साकडे घातले आहे. लालकिल्यावरून बोलताना मोदींनी त्यांनाच प्रतिसाद दिला आहे. तो प्रतिसाद स्पष्ट आहे. जागतिक व्यासपीठावर शक्य असेल तिथे पाकमधील पिडीत मुस्लिमांच्या व्यथा व गुलामीची कथा आपण सांगू व आवाज उठवू; असे ते आश्वासन आहे. बांगला देशसारखा प्रखर लढा उभा केला, तर पाकिस्तानातील अनेक प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्र होण्यास मदतीचे दिलेले ते वचन आहे.

लालकिल्ल्यावरून प्रथमच भारताच्या पंतप्रधानाने पाकिस्तानातील पिडीत जनतेला सहानुभूती दाखवली आहे. त्याचा अर्थ असा आहे, की त्यांचे लढे जितके आक्रमक व प्रखर होत जातील, तितके पाकिस्तानी जोखडाखालून मुक्त होण्यासी आशा बळकट होईल. तितके अराजक व अनागोंदी माजवली जाईल, तितके भारतासाठी काम सोपे होईल, असेच मोदींनी सुचवले आहे. त्याची पुढली पायरी म्हणजे आता जगभरातल्या भारतीय वकीलाती तिथे वसलेल्या व पाकिस्तानातून परागंदा झालेल्या अशा चळवळीच्या नेत्यांशी संपर्काने सुसुत्रता आणू लागतील. बलुची, मोहाजिर, काश्मिरी असे अनेक पाकिस्तानी गट बंडखोर आहेत आणि त्यांचे म्होरके पाकिस्तानात मारले जाण्याच्या भयाने परदेशात आश्रय घेऊन आहेत. त्यांना एका सुत्रात बांधण्याला कदचित आतापर्यंत आरंभही झाला असेल, अन्यथा अकस्मात अशा भारतमातेचा जय करणार्‍यांची एकाचवेळी कृती घडताना दिसली नसती. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी लागोपाठ दोन दिवस पाकिस्तानच्या अनेक प्रदेशात हजारो लोक रस्त्यावर येऊन भारताचा जयजयकार व पाक सरकारचा निषेध करीत होते. त्यामागे एक सुत्रबद्ध योजना दिसते आहे. बांगलादेश मुक्तीच्या युद्धापुर्वी वर्षभर तरी अशाच काही घटना लागोपाठ घडत गेल्या होत्या आणि अखेरीस त्याचे पर्यवसान तिथल्या काही नेत्यांनी वेगळ्या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करण्यात झाला होता. त्यानंतर पाकसेनेने त्यांना चिरडून काढण्याचा पवित्रा घेतल्यावर निर्वासितांचा लोंढा भारतीय सीमेवर जमा होऊ लागला. तो भार असह्य झाल्यावर भारतीय सेनेने कुच केले होते. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानात उमटलेल्या घोषणा निव्वळ योगायोग नाहीत, की तात्कालीन प्रसंग नाही. ती जितकी ओवायसीला चपराक आहे, तितकाच त्यामागे खेळलेला दुरगामी डावपेचही आहे. सध्या आपण ओवायसीला उत्तर मिळाल्याचे समाधान मानू.

5 comments:

  1. अभिनंदन भाऊ हे भविष्य आपण २०१५ सालात सांगितले होते मोदी व Parrikar ग्रेट आहेत

    ReplyDelete
  2. फार बोभाटा न करता पाकिस्तानचे तूकडे करणे हेच आवश्यक.पाकिस्तानचे क़बरडे मोडून त्याला नेसतनाबूत करणे भाग आहे.

    ReplyDelete
  3. भाऊ बलुचिसतान वर तुमची लेखक मालिका यावी असे वाटते.

    ReplyDelete
  4. मागेच हे घडायला हवे होते पण परधार्जीणे नेतृत्व असल्याने ते शक्य नव्हते. नवा पंप्र सक्षम आहे.

    ReplyDelete
  5. काट्याने काटा काढणार, पर्रिकरांच्या या सांकेतिक इशारयाचा तर्क आपण अगोदरच मांडला होता, तो अगदी शतप्रतिशत साकार होतोय.

    ReplyDelete