Sunday, August 14, 2016

कुठला झेंडा फ़डकावणार?गेल्या गुरूवारची गोष्ट आहे. सकाळ झाल्यापासून इंग्रजी वृत्तवाहिन्या दिल्लीतील एक चित्रण दाखवत होत्या. दक्षिण दिल्लीतील रस्त्यावर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका अपघाताचे सीसीटीव्ही कॅमेराने केलेले ते चित्रण होते. त्यात रस्त्याने चाललेल्या एका पादचार्‍याला मागून येणारा टेम्पो उडवून देतो आणि थोडा पुढे जाऊन थांबतो. त्याचा चालक खाली उतरतो आणि माघारी येऊन जखमी पादचार्‍यावर नजर टाकून तसाच मागे वळतो. काहीच न करता तसाच पुढे निघून जातो. त्याच दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या त्या व्यक्तीच्या बाजूने एक सायकलस्वारही पुढे निघून जातो. मग काही वेळाने तिथून एक सायकल रिक्षा चाललेला असतो. थोडा पुढे जाऊन थांबतो आणि त्याचा चालक मागे चालत येऊन जखमीच्या बाजूला पडलेले मोबाईल फ़ोनचे तुकडे गोळा करून निघून जातो. उजाडत आलेले असते आणि त्याच रस्त्याने अनेक पादचारी येजा करू लागलेले असतात. कोणी क्षणभर थांबून निरीक्षण करतात व पुढे निघून जातात. तर काहीजण नुसतीच नजर टाकून आपल्या कामाला निघून जातात. तब्बल दिड तास म्हणजे नव्वद मिनीटे ही व्यक्ती तिथे रक्तबंबाळ अवस्थेत पडून आहे आणि त्याच्यावर वेळीच उपचार झाल्यास त्याचे प्राण वाचू शकतील, असा विचारही तिथून फ़िरकणार्‍या कोणाच्या मनाला शिवत नाही. त्यानंतर कोणाला अशी सदबुद्धी होते आणि पोलिसांना पहिला संदेश जाऊन पोहोचतो. तिथून त्या अपघातग्रस्त व्यक्तीची दखल घेण्याच्या हालचालींना आरंभ होतो. तोपर्यंत त्याचा जीव गेलेला असतो. त्याला मृत्यूच्या जबड्याने गिळून टाकलेले असते. ही घटना देशाची राजधानी दिल्लीतली आहे. जिथे एकोणसत्तर वर्षापुर्वी देशाला स्वातंत्र मिळाल्याची व देश स्वतंत्र सार्वभौम झाल्याची डरकाळी फ़ोडली गेली होती. आणि तिथेच दिल्लीच्या रस्त्यावर एक भारतीय स्वतंत्र नागरिक किडामुंगीप्रमाणे चिरडला गेला. त्याची कोणाला दादफ़िर्याद नव्हती.

तो जसा एक स्वातंत्र भारताचा नागरिक होता, तसेच त्याला चिरडून ढकलून पुढे निघून जाणाराही भारतीय नागरिकच होता. त्याच्या रक्तलांच्छित देहाकडे काणाडोळा करून येजा करणारे त्याच स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक होते आणि त्याचा मोबाईल उचलून आपल्या खिशात टाकणाराही नागरिकच होता. यापैकी कोणालाही आपल्या एका देशबांधवाला मृत्यूच्या सापळ्यातून खेचून आणायला हालचाल करायची इच्छाही होऊ नये का? माणूसकी म्हणजे यापेक्षा आणखी काय वेगळे असू शकते? आपल्यासारख्या मानवी प्राण्याला जखमांनी रक्तलांच्छित होऊन पडलेला बघून ज्यांचे काळीज पिळवटून येत नाही, किंवा त्याच्या मदतीला धावून जाण्याचा विचारही मनाला शिवत नाही, त्यांना माणूस तरी म्हणता येईल काय? कारण माणूस हा नागरिक होऊ शकतो आणि नागरी समाज वा राष्ट्रामध्ये माणूस हा प्राथमिक घटक असतो. दुसर्‍या कुणाच्या वेदना व यातनांनी, अगतिकतेने अस्वस्थ होण्याची भावनिक क्षमता म्हणजे माणूसकी असते. अन्यथा बाजूला कापलेल्या बोकडाला यातना व प्राणांतिक वेदनेने लाथा झाडताना बघूनही आपल्या समोरचा चारा निर्लेपपणे चरणार्‍या पशूला कोणी माणूस म्हणत नाहीत. किंवा त्यांना नागरिक म्हणून हिशोबात धरले जात नाही. दिल्लीची ही घटना देशाचा सत्तरावा स्वातंत्रदिन साजरा होण्याच्या चार दिवस आधीची आहे. कुठून आपल्यात इतकी निष्क्रीयता अलिप्तता आलेली आहे? त्यात कोणी आपलाच आप्तस्वकीय असेल, तर न्यायाच्या वल्गना करणारेच हे सर्व नव्हते काय? तो टेम्पोवाला, सायकलस्वार वा सायकल रिक्षावाला किंवा ते पादचारी, यापैकी कुणी आपल्याच निकटवर्तियाला तशा अवस्थेत बघून पुढे निघून गेले असते का? आणि तशी स्थिती असती, तर टाहो फ़ोडून न्यायाची मागणी करणारे त्यांचेच चेहरे आपल्याला वाहिन्यांनी दाखवले नसते काय?

सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी आपण देश व समाज म्हणून कुठवर येऊन पोहोचलो, त्याचे अंतर दाखवणारा हा मैलाचा दगड आहे. आपण अजून नागरी समाज होऊ शकलेलो नाही किंवा जबाबदार नागरिक म्हणूनही आपण मजल मारू शकलो नाही. इतकाच निष्कर्ष यातून मिळू शकतो. आज मोठ्या थाटामाटात देशभर स्वातंत्र्यदिन साजरा होईल आणि आपण कसे महान देश आहोत, याची ग्वाही देणारी भाषणे होतील. चर्चा व प्रवचने होतील. पण एक नागरिक दुसर्‍या नागरिकासाठी किंचीत मदत करायला पुढे येणार नाही, ही आपली वास्तविकता आहे. ती आजची नाही किंवा ह्या दोनचार वर्षातली नाही. गोरक्षक म्हणून हिंसाचार करणार्‍यांना रोखायला तरी कोण पुढे आला होता? चार वर्षापुर्वी दिल्लीच्याच रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन अंधारात पडलेल्या निर्भया व तिच्या मित्राला मदतीचा हात द्यायला तरी कितीजण पुढे सरसावले होते? त्याच रस्त्याने कित्येक वहाने पळत होती, माणसे जात होती. पण तासभर तरी कोणी साधी पोलिसांना वर्दी देण्याची तसदी घेतली नव्हती. मात्र त्याच्या बातम्या झळकल्या आणि जंतरमंतरपासून देशाच्या कानाकोपर्‍यात मेणबत्त्या पेटवण्यासाठी झुंबड उडाली होती. निर्भयाला किंवा कालच्या त्या पादचार्‍याला मेणबत्त्यांची उब नको होती. त्यांना तात्काळ उपचाराची गरज होती. आसपास वावरणार्‍यांपैकी कुणा एकाने पोलिसांना नुसती फ़ोनवरून वर्दी दिली, तरी त्यांच्यावर मृत्यू झडप घालू शकला नसता. पण तसे होऊ शकले नाही. तसे घडत नाही आणि व्हायचे ते होऊन गेल्यावर तमाशा मांडण्यासाठी झुंबड उडते. त्या आपल्याच देशबांधवांना वाचवायाला योग्य क्षणी कोणी पुढाकार घेत नाही. पण त्यांना न्याय मिळावा म्हणून मेणबत्त्या पेटवण्यापासून निदर्शने धरणे व मुलाखती देण्यापर्यंत सर्व प्रगती आपण केलेली आहे. सरकार कायदा व प्रशासनावर आरोप ठेवण्यासाठी आपली बुद्धी शाबुत असते. पण मदतीला पुढे होण्याची सदबुद्धी मात्र झोपा काढते आहे.

स्वतंत्र देश व समाजाचा प्रत्येक माणूस आपल्याला जबाबदार समजतो आणि वेळप्रसंगी तत्परतेने गरजूच्या मदतीला धावून जातो. त्याला लोकशाही समाज म्हणतात. एका दिवशी आपले मत देऊन शासक निवडतो आणि मग आपल्या सर्व जबाबदार्‍या त्या निवडलेल्या सरकार वा त्याच्या प्रशासनावर टाकून पळ काढतो, त्याला माणुस म्हणता येत नाही. मग लोकशाहीतला नागरिक कसे म्हणता येईल? आपली ही मानसिकता आली कुठून? कालपरवा महाड येथे गोवा महामार्गावर पुल कोसळला तेव्हा तळकोकणातील काही कोळीबांधव पाणबुडे अगत्याने मृतांचा शोध घेण्याच्या कामात हातभार लावण्यासाठी स्वेच्छेने येऊन दाखल झाले. त्यांच्याच देशात रस्त्यावर अखेरच्या घटका मोजणार्‍याकडे पाठ फ़िरवून निघून जाणारी ही मानसिकता कशी असू शकते? कोकणातील त्या कोळ्यांची उत्स्फ़ुर्तता ही उपजत मानवी प्रवृत्ती आहे. कुठल्याही दुर्गम खेड्यात गेलात, तर त्याची प्रचिती आजही येते. पण वेगाने नागरीकरण होत असलेल्या भारतामध्ये त्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. शहरात लोकसंख्येची घनता अधिक आहे. माणसे खुप जवळ सान्निध्यात रहातात. पण एकमेकांपासून किती हजारो मैल दूर असतात, त्याचा हा दाखला आहे. शहरीकरणाने आपल्याला माणुसकीपासून किती वंचित केले आहे, त्याचा हा नमूना आहे. पण तो अकस्मात आलेला नाही. तीच नागरिकता झालेली आहे. आपल्यातली उपजत सहानुभूतीची प्रेरणा पद्धतशीरपणे मारून टाकली गेलेली आहे. त्याचा हा परिणाम आहे. मत देणे वा मेणबत्त्या पेटवणे आणि जबाबदारी झटकणे, ही आपली आधुनिक संस्कृती झाली आहे. कारण आपल्या कानीकपाळी ओरडून सतत एकच गोष्ट शिकवली जात असते. सरकार काय करते आहे? पोलिस झोपलेत काय? प्रशासनाची जबाबदारी आहे. नागरिक म्हणून आपली काहीही जबाबदारी नाही, की उत्तरदायित्व नाही. हेच आपण सातत्याने बुद्धीवादी चर्चेतून शिकत असतो.

जगण्यातल्या भूगोलात किंवा व्यवहारात प्रत्येक जागी प्रत्येक क्षणी सरकारी यंत्रणा किंवा पोलिस हजर असू शकत नाहीत. पण माहिती मिळाल्यास ती यंत्रणा धावून येऊ शकते. तोपर्यंत संकटप्रसंगी माणूस म्हणून आपण पुढाकार घेतला पाहिजे, हे नागरिकत्व असते. माणुसकी म्हणजे नागरिकत्व! माणुस म्हणून जिथे अमानुषता दिसेल त्यात हस्तक्षेप करण्याची इच्छाशक्ती म्ह्णजे नागरिकत्व! ही स्वतंत्र सार्वभौम समाजाची पायाभूत मानसिकता आपण पुरती विसरून गेलो आहोत. कारण अशा प्रसंगी आपण काही हस्तक्षेप केला नाही, हा माणुस वा नागरिक म्हणून आपला गुन्हा आहे, याची शिकवण आपल्याला कोणी दिलीच नाही. उलट आपल्या नाकर्तेपणाला झाकण्यासाठी सगळा दोष प्रशासनाच्या माथी मारण्याची शिकवण आपल्याला सतत दिली जात असते. कुठल्या गावात वस्तीवर गल्लीबोळात कुणी एकदोन गुंड कुणा मुलीची छेड काढत असतात, त्यांच्या अनेकपटीने वसलेले तिथले नागरिक त्यात ह्स्तक्षेप करीत नाहीत. म्हणून त्या मुलीवर एसीड फ़ेकण्याचे वा बलात्काराचे हल्ले होऊ शकतात. त्यातला मुख्य गुन्हेगार तिच्या जवळपास असूनही तिच्या मदतीला धावण्यात कुचराई करणारे रहिवासी असतात. पण त्यांचा तोच नाकर्तेपणा गुन्हा असल्याचे त्यांना कोणी शिकवत नाही. जीवनातल्या अनेक समस्या संकटांना पहिली मदत जवळच्याने करायची असते, ही माणुसकीच आपण क्रमाक्रमाने विसरून गेलोत. त्यासाठी आपल्याला तोंड झाकणारा बुरखा मिळालाय! सरकार झोपलेय का? असे त्या मुखवट्याचे नाव आहे. याचे सोपे कारण मागल्या सत्तर वर्षात आपण स्वतंत्र झालो म्हणजे जबाबदारी झटकण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाल्याची एक धारणा निर्माण करण्यात आलेली आहे. कचरा आपण करणार आणि पालिकेने स्वच्छता राखली पाहिजे. पण कचरा नेमक्या जागी टाकण्याची आपली काहीच जबाबदारी नसते ना?

सत्तर वर्षात आपण कुठे येऊन पोहोचलोत? माणुस म्हणून जगण्यातल्या बहुतांश जबाबदार्‍या झटकण्यात आपण पारंगत झालो आहोत. सरकारने पाणी पुरवठा केला पाहिजे. पण तेच दुरवरून आणलेले पाणी जपून वापरण्याची जबाबदारी कोणाची असते? रस्ते रुंद व चांगले असायला हवेत. पण त्यवर अतिक्रमण होऊ नये म्हणून पुढाकार घेण्याची जबाबदारी नागरिकांची नाही काय? रस्ता व्यापून बसणार्‍या फ़ेरीवाल्यावर बहिष्कार टाकून त्याला पळवून लावण्याची कामगिरी ग्राहक नागरिक जास्त चांगली पार पाडू शकत नाहीत काय? तिथे पालिकेने आपले अधिकार वापरण्याची गरजच नाही ना उरणार? पण तसे होत नाही. आपण अतिक्रमण करणार्‍या त्याच फ़ेरीवाल्याचे आश्रयदाते असणार आणि त्याला तिथून हाकलून लावण्याचे काम पालिकेने करायला हवे. ही आपली लोकशाही झाली आहे. ज्या स्वातंत्र्य व लोकशाहीमध्ये अधिकार असतात आणि जबाबदारी नसते, ती लोकशाही नव्हेतर बेबंदशाही असते. मग अशी लोकशाही यंत्रणाही ज्यांच्या हाती जाते, त्यांना मनमानी करण्याचा खास अधिकार मिळत असतो आणि त्या अधिकाराचे वाटे घालून अधिक किंमतीला विकण्याचा भ्रष्टाचार माजत जातो. कुठल्याही समाजात निवडून आलेल्या राज्यकर्त्यांपेक्षा सामान्य नागरिकाच्या इच्छाशक्तीची ताकद मोठी असते. त्याच्या जबाबदार वागण्यापेक्षा कायदे व प्रशासनाचा धाक अधिक असू शकत नाही. नागरिकाची जागरूकता कुठल्याही लोकशाहीला व समाजाला प्रगत बनवत असते. ती जागरुकता प्रसंगावधान राखून हस्तक्षेप करण्यातून सिद्ध होत असते. राज्यघटना वा कायदे व त्यानुसार चालणारे सरकार; म्हणजे स्वतंत्र देश वा लोकशाही समाज नसतो. निर्भयावर ओढवलेल्या प्रसंगात पुढाकार घेण्यात आणि पादचार्‍याला जखमी बघून धाव घेण्यामध्ये स्वातंत्र्याची महत्ता सामावलेली असते. स्वातंत्र्य कोणी दान म्हणून देत नसते, स्वातंत्र्य घेण्यात व त्याचा अवलंब कृतीतून करण्याने स्वातंत्र्याचा सोहळा साजरा होत असतो. नुसते झेंडे तर कुठल्याही मिरवणूकीत वा क्रीडा सोहळ्यातही फ़डकावले जातात. झेंडा हा कापडाचा तुकडा नसतो. तर मानवी कर्तबगारी व जबाबदारीचे प्रतिक असते. तो झेंडा आपण आज फ़डकावणार आहोत काय?


10 comments:

 1. भाऊ राजधानीतच नाही महाराष्ट्रातील पुरोगामी व महाराज शाहूंची राजधानी KOLHPUR येथे अशिच घटना ५ वर्षा पाठीमागे अनुभवली आहे

  ReplyDelete
 2. भाऊ परेश रावल यांचा फेमस डायलॅाग आठवला "भारत माता तुझे कुछ नहीं आता" "वंदे मातरम" सगळेच सुधारलेनाहीत तर देश खरच मातरम होईल including me सगळेच सुधारतील अशी अपेक्षा "जय हिंद"

  ReplyDelete
 3. It's abolutely right. When we are not perform our responsibility at individual level then we can't ask the questions to government about their responsibilitys .we lost the right of suggestions &making questions mark on the gov't actions. Now we frequently says that the India is becoming a new world power,but we have to shuar about the our currents position .their are no of countries in world got independence near about us,but these countries achieved great development till now.&it is not only bcoz of the government but also becoz of the concern individuals.
  We elected the government and relaxing.every country has problems like corruption, scams but the government affection defends upon us.
  Lastly what is government? ??government is the community of people's selected from us,they are not comes from other countries. if our childrens Are developed physically as well as morally then leaders developing in future are best.
  We have to start form ourselves to make next-generation which makes.....INDIA AS THE MOST POWERFUL COUNTRY IN WORLD (WORLD'S LEADER).
  Thank you.

  ReplyDelete
 4. खूपच सुंदर भाऊ...मनाला भिडणारा आणि आपले सत्व जागे करून एक जबाबदार नागरिक म्हणू पुढे येण्याची आत्मभान जागृत करणारा तुमचा लेख नाही पेटती मशाल आहे आणि या पेटत्या मशाली मुळे आमच्यासारखी विझलेली मशाली पेटवण्यास हा तुमचा लेख नक्कीच हातभार लावेल.

  ReplyDelete
 5. भाऊ अत्यंत परखड लेख आम्हा नागरिक म्हणून समजणार्‍यांची कान उघडणी बद्दल धन्यवाद.
  भाऊ आपल्या देशात लाॅज मध्ये राहिल्या प्रमाणे भाडे म्हणजे टॅक्स व मते देणे एवढेच नागरिकत्व राहिले आहे. येथे खेड्यात असणाऱ्या खाप पंचायत या ( काही व काही ठिकाणच्या अतिरेका मुळे) टारगेट झाल्या आहेत. परंतु याच समाजाला एकत्रीत ठेवणार्‍या आहेत. व या सातत्याने मिडियाच्या टारगेट झाल्या आहेत. परंतु एका बाजूला करोडो खटले प्रलंबित ठेवणारी न्याय (अ )व्यवस्था (त्यांच्या सुट्टय़ा बघा व किती वेळ न्यायाधीश त्यांच्या खुर्चीत बसुन खटले चालवतात हे तपासणे आवश्यक आहे.)
  आपण म्हणालात त्याप्रमाणे मिडिया सातत्याने सरकार वर टिका करत नागरिकांना निष्क्रिय करत आहे. त्यामुळे देशाची लुट करणे सहज शक्य होते.
  व मिडियाला पाहिजे ते सरकार आले की विरोधी पक्षाला टारगेट करते.
  आज देखिल मोदि सारख्या मुरब्बी नेत्याला पण केवळ Times Now ला मुलाखत देऊन इतर मिडिया पासुन वेगळा पाडण्यात यश मिळविले आहे. हिच वाहिनी व अरणब गोस्वामी सरकारीपक्षाच्या प्रवक्त्याची पिसे काढण्याची ऐक हि संधी सोडत नाही व अशा प्रवक्त्या वर पाशवी अत्याचार करत आहे व याच वाहिनी चा टिआरपी सर्वात जास्त आहे. हिच नागरिकता भारतात मिडियाने रुजवलेली आहे.
  प्रथम मतदाना पासुन परावृत्त करण्यात मिडिया यशस्वी झाला परंतु आता सोशल नेटवर्किंग मुळे परत मतदान करु लागल्या वर गुमराह करण्यात यशस्वी होत आहे.
  ही नागरिकांची निष्क्रियता फारच घातक आहे.
  आता निर्भया बाबतीतही घटणा झाल्या नंतर मिडियाचे अश्रु मगरिचे होते कारण गुजरात राज्यातील 2012 निवडणूकीत भाजपची एक जरि सिट कमी निवडुन आली तर तो मोदिंचा पराभव असेल व लोकसभा निवडणूक जिंकणे भाजपला अशक्य होइल हे वारंवार म्हणत होता हे किती जणांना आठवते. परंतु 19 डिसेंबर ला मोदी बहुमताने निवडून आल्यावर मिडिया 20-21 तारखेपासून निर्भया इश्यू हातात घेतला व मेणबत्त्या पेटवण्यास याच दिल्लीतील तरुणाई ला भुरळ घातली. परंतु हि एक मोदींच्या यशा पासुन डोळे झाक करण्याची व यशाची चर्चा न व्हावी म्हणून चाल होती. मी त्या वेळी या मिडियाच्या चिफना मेल द्वारे विचारले तेव्हा मिरच्या झोंबल्या होत्या.
  मिडिया हि कोणाची डिप अॅसेट आहे हे या व अण्णां च्या आंदोलनातुन लक्षात येईल. व मोदी इतक्या प्रतिकुल परिस्थितीत कशी कामगिरी करतात हे व पुढील निवडणुकीत कसे सामोरे जातात हे फारच रोमहर्षक राहिल. धन्यवाद भाऊ.
  अमुल

  ReplyDelete
 6. आता तर न्याय (अ) व्यवस्था ( यांची नियुक्ती प्रमोशन हे कुणी केले व खाल्या अन्नाला हे जागत आहेत का?) मोदि सरकार विरोधात उतरली आहे हि आवहाने मोदि सरकार कशी पेलते हे केवळ नियती च जाणे.

  ReplyDelete
 7. अगदी योग्य शब्दात तूम्ही आजची परिस्थिती मांडली आहे. खरेच कोणता झेंडा आपण फडकवणार आहोत

  ReplyDelete
 8. झेंडा वंदन नसतं तर स्वातंत्र्यदिनही आपण विसरलो असतो. मदत न करता तेथून निघून जायचं 'स्वातंत्र्य' सगळ्यांना पाहिजे आहे.

  ReplyDelete