Thursday, August 25, 2016

बेअक्कलपणाचे नमूने

 jawdekar के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशातली गोष्ट आहे. तिथल्या एका गावातील एक मुलगा आणि त्याच्या शिक्षकांनी पालकांना पटवून दिले, की मुलगा खुप हुशार आहे. त्याच्या गुणवत्तेला खतपाणी घातले पाहिजे. मग पालकांनी जमीन विकून त्या मुलाच्या उच्चशिक्षणाची सोय लावण्यासाठी त्याला राजस्थानात पाठवले. कोटा ही त्या भागातली शैक्षणिक राजधानी मानली जाते. तिथे विविध ट्युशन क्लासेस व वसतीगृहांचे पेव फ़ुटलेले आहे. तिथे जाऊन काही महिन्यांनी परतलेल्या त्या दोघांनी आपल्या पराक्रमाची कथा गावाला कथन केली. ती अशी, की त्या गुणी मुलाची निवड थेट अमेरिकेतील नासा या अवकाश संशोधन संस्थेच्या शिष्यवृत्तीसाठी झालेली आहे. मग काय हरयाणा वा तेलंगणात आज प्रत्येकाला सिंधू-साक्षीचा जसा अभिमान वाटतोय, तशीच त्या गावाची स्थिती झाली. आपल्या गावात आईनस्टाईन जन्माला आलाय, याचा अभिमान कोणाला वाटणार नाही? गावातले लोक जमले आणि आनंदोत्सव साजरा करू लागले. त्याची बातमी हळुहळू गावाबाहेर पोहोचली आणि स्थानिक वार्ताहरापर्यंत जाऊन पोहोचली. त्यानेही हा चमत्कार आपल्या कुठल्या जिल्हापत्राला कळवला आणि त्यांनी दणदणित हेडलाईन टाकूनच बातमी झळकवली. त्यावरून अन्य माध्यमांनी बातमी उचलली. इतके झाल्यावर गावकर्‍यांना चेव आला नसता तरच नवल ना? त्यांच्यासह आसपासच्या ग्रामिणांनी जवळचा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आणि आपल्या गावातल्या या आईनस्टाईनला राष्ट्रीय सन्मान मिळण्यासाठी आंदोलन छेडले. त्याची हवा वाहिन्यांपर्यंत पोहोचली आणि दिल्लीतल्या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी ती गावची बातमी खळबळजनक करून टाकली. इंग्रजी-हिंदी अशा तमाम माध्यमात त्या गावाला प्रसिद्धी मिळाली. गावातल्या कुणाही सामान्य माणसापासून त्या मुलापर्यंत प्रत्येकाच्या मुलाखती प्रक्षेपित करण्यासाठी झुंबड उडाली.

आता इतकी मोठी घटना असेल तर त्याचे संदर्भही तितकेच मोठे असतात ना? त्यापासून सार्वजनिक जीवनात वावरणारे कसे बाजूला राहू शकतील? त्यांनाही गावाच्या व राज्याच्या महत्तेचा हिस्सा हवाच असतो. माध्यमेही या कोवळ्या मुलाने केलेल्या पराक्रमाचे संदर्भ शोधू लागली आणि नेमकी तीच तशी परिक्षा राष्ट्रपतीपदी असलेले भारताचे रॉकेटमॅन डॉ. अब्दुल कलाम यांनीही त्यांच्या शाळकरी वयात दिलेली असल्याचा शोध कुणा पत्रकाराने लावला. मग राजकारण्यांना मागे राहून चालणार नव्हते. तेव्हा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव होते. कुणीतरी तो विषय विधानसभेत आणला आणि मुलायमनी त्या मुलाला काही लाखाचे अनुदान जाहिर करून टाकले. त्यांचेच बंधू प्रा. राजगोपाल यादव राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी या गुणी प्रतिभावंत मुलासाठी राष्ट्रपती भवनाला फ़ोन करून कलाम यांच्या भेटीची वेळ मागितली. सहाजिकच कलामांपर्यंत हा विषय जाऊन पोहोचला. हा प्रतिभावंत राष्ट्रपती शास्त्रज्ञ हैराण होऊन गेला. कारण अशी काही अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेची परिक्षा असते आणि आपणही कोवळ्या वयात तशी परिक्षा उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळवली होती, याचा कलामांनाही प्रथमच शोध लागला. त्यांनी आपल्या स्मृती चाळून बघितल्या. पण तशी कुठलीही परिक्षा आपण कोवळ्या शाळकरी वयात किंवा पुढल्या प्रौढ वयात दिल्याचे त्यांना स्मरेना. सहाजिकच त्यांनी तात्काळ राष्ट्रपती भवनाच्या प्रवक्त्याला बोलावून आपण ‘तितके प्रतिभावान नव्हतो’ असा खुलासा केला. या उत्तरप्रदेशी गावातल्या मुलाने जी नासाची परिक्षा दिलेली आहे, ती आपण कधीच दिलेली नसल्याचा कलामांचा खुलासा आला आणि त्या बातमीदारीला एकदम खिळ बसली. सर्व माध्यमे ह्या प्रतिभावान मुलाने नासाची कुठली परिक्षा दिली व ती कधी-कुठे योजली जाते, त्याचा शोध सुरू केला.

त्यापैकी एका माध्यमाने नासामध्येच काम करणार्‍या एका भारतीयाला फ़ोन करून विचारणा केली, तेव्हा तो थक्क झाला. कारण नासा अशी कुठलीही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणारी परिक्षा घेत नसल्याचा खुलासा, तिथे काम करणार्‍यानेच केलेला होता. जी परिक्षा डॉ. कलामांनी दिल्याचा हवाला माध्यमे देत होती आणि उत्तरप्रदेशी गावातल्या मुलाने ती शिष्यवृत्ती मिळवल्याचा गवगवा चालू होता, तशी परिक्षाच नसल्याचा बॉम्बगोळा माध्यमांच्या माथ्यावर पडला होता. त्यापासून पळ काढणेही शक्य नव्हते. म्हणून मग त्या मुलाचा व त्याची परिक्षा घेणार्‍या वा त्याला ट्युशन देणार्‍या संस्थेचा शोध सुरू झाला. त्यातून भलतीच माहिती उजेडात येत गेली. तर गोष्ट अशी होती, की या मुलाने व त्याच्या छचोर शिक्षकाने पालकांचे पैसे डान्सबारमध्ये उडवले. कुठल्याही क्लासला जाऊन अभ्यास केला नव्हता, की परिक्षाही दिलेली नव्हती. पण पैशाचा हिशोब देताना सारवासारव म्हणून त्यांनी नासाच्या शिष्यवृत्तीची लोणकढी थाप गावठी पालकांना ठोकलेली हो्ती. स्थानिक बातमीदार आणि राष्ट्रीय माध्यमे या राईचा इतका मोठा पर्वत करून टाकतील, अशी त्या बिचार्‍यांना कल्पनाही नव्हती. पण यातून माध्यमांची जादू समजते. माध्यमांनी मनात अणले तर ते राईचा पर्वत करू शकतात आणि नसलेल्या गोष्टींवरही किती गदारोळ माजवू शकतात, त्याची आलेली ही प्रचिती होती. त्यात विवेकी बुद्धी शाबुत असलेल्या राष्ट्रपती कलामांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता, तर कदाचित संसदेतही या प्रतिभावंताचा सत्कार करण्यापर्यंत मजल गेली असती. एका उनाड पोराच्या नालायकीला देशाचा सन्मान ठरवण्यापर्यंतचा मुर्खपणा इतक्या सहज होऊ शकत असेल, तर अर्थाचा अनर्थ नित्यनेमाने होऊ लागला तर आश्चर्य कसले? केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विधानावरून चालू असलेल्या गदारोळामुळे ही पंधरा वर्षे जुनी घटना आठवली.

मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील एका कार्यक्रमात जावडेकर नेमके काय म्हणाले, ते कोणाला कितपत ठाऊक आहे? ते काय म्हणाले, याची जी बातमी माध्यमातून झळकली. त्यावरून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास चघळला जात आहे. नेहरू सावरकर फ़ाशी गेले, असे खरोखर जावडेकर म्हणाले आहेत काय, तेही तपासून बघावे असे पुढल्या माध्यमातील संपादक विश्लेषकांना वाटलेले नाही. आधीच्या पत्रकाराने बातमीदाराने त्याला काय वाटले वा समजले, त्यावर आधारीत बातमी दिली आणि तमाम माध्यमे जावडेकर यांच्यावर तुटून पडली. जावडेकर काय बोलले त्यापेक्षा त्याचा संबंधित पत्रकाराला काय अर्थ लागला, त्यावरून कल्लोळ सुरू झाला. पण त्यांचे मुळ वक्तव्य तपासण्याची कोणालाही गरज भासू नये, ही भीषण स्थिती आहे. भाषा हे संपर्काचे साधन आहे आणि त्यात एका माणसाला काहीतरी सांगायचे असते. ते दुसर्‍याने समजून घेणे अगत्याचे असते. याचाच विसर पडलेले लोक माध्यमात वावरत असल्याचा हा पुरावा आहे. समोरचा काय सांगू इच्छीतो, ते समजून घेण्याची गरजच उरलेली नाही. मुर्ख आहे आणि बोलला म्हणजेच चुकीचे मुर्खासारखे बरळला असणार, याची इतकी पक्की खात्री अशा लोकांना झालेली आहे. अशा कुणा नेत्याने बोलण्याचीही आता गरज उरलेली नाही. कोणाही पत्रकाराने भागवत, मोदी, जावडेकर. राहुल गांधी वा केजरीवाल यांच्या नावावर कुठलेही बोलले नाहीत असे विधान टाकले, तरी त्यावर वाहिन्यांच्या चर्चा होऊ शकतात वा अग्रलेख खरडले जाऊ शकतात. याला कल्पनेच्या भ्रामक जगात जगणे म्हणतात. माध्यमांचा वास्तवाशी किती संबंध तुटला आहे आणि खळबळ माजवण्याच्या नादात किती भरकटणे चालले आहे, त्याची प्रचिती यातून येते. कारण जावडेकर यांचे मूळ विधान ऐकले तर पुढीलप्रमाणे आहे. त्यातून माध्यमे म्हणतात, तसा विपरीत अर्थ निघतो काय, हे सामान्य वाचकाने आपल्या विवेकबुद्धीनुसार ठरवावे.

"कितने वीर…नेताजी सुभाष चंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू……भगतसिंग, राजगुरू…सभी जो फांसीपर चढे…क्रांतिवीर सावरकरजी…बाकी महान स्वातंत्र्यसेनानी…कितनी लाठीया खायी, कितनी गोलिया खायी…"
यात "सभी जो फाँसीपर चढे हे" शब्द भगतसिंग, राजगुरू यांच्यानंतर आले आहेत. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की इतर जे फासावर चढले ते !! त्यांचा सरसकट उल्लेख केला आहे.

http://www.asiantribune.com/news/2005/03/01/nasa-boy-turns-out-be-fraud

4 comments:

 1. हे खोटे पत्रकार देशाच वाटोळ करतायत.भाऊ TV NEWS channel बघायचे बंद कलेत सगळेच देशद्रोहींचा उदोउदो करतायत आता पेपरही वाचायचे बंद केलेत भाऊ आपण लिहीता केवळ यासाठी पुढारी चे संपादकीय वाचतो बाकी काहीही वाचत नाही social media ठीक आहे असे वाटते

  ReplyDelete
 2. भाऊ अतिशय मार्मिक विश्लेषण.... जावडेकरांसारखा अभ्यासू व्यक्ती असं बोलूच शकत नाही हा विश्वास होता, माध्यमांनी विपर्यास केला, तो तुमची अचूक शब्दात मांडलात शब्दप्रभू !

  ReplyDelete
 3. Mediya kade jasti lakhya nahi deta yet...TRP sathi te kahihi kartayet

  ReplyDelete
 4. जावडेकर अभ्यासू व सुसंस्कृत आहेत,माध्यम टीआरपी साठी उद्योग करतात

  ReplyDelete