Saturday, August 6, 2016

सोनियांची काशीयात्रा



गेली २७ वर्षे उत्तरप्रदेश या देशातल्या सर्वात मोठ्या राज्यातून कॉग्रेस हद्दपार झालेली आहे. स्वबळावर उभे रहायचे, तर पुन्हा तिथेच आपली मुळे रुजवली पाहिजेत हेही त्या पक्षाच्या काही नेत्यांना समजते आहे. इतरांचे कशाला खुद्द सोनिया गांधींनाही त्याचे भान पक्षाची सुत्रे हाती घेतली, तेव्हा होते. म्हणून तर त्यांनी पंचमढी कॉग्रेस अधिवेशनात स्वबळावर नव्याने संघटना उभी करून पक्षाला संजीवनी देण्याची भूमिका मांडली होती. पण अशा घोषणा करणे आणि नव्याने संघटना उभारण्याची मेहनत करणे, यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. मागल्या चार दशकात कॉग्रेसने पक्षात कार्यकर्ते व त्यांची संघटना उभारण्याचे पुर्णपणे थांबवलेले आहे. त्यापेक्षा अन्य पक्षातले उदयोन्मुख नेते व कार्यकर्ते पळवून आपला पक्ष मजबूत करण्यावरच कॉग्रेस निर्भर राहिली होती. अन्य कुठला पक्ष पर्याय म्हणून विकसित होऊ नये आणि सत्ता हातून जाऊ नये, यासाठी कॉग्रेसने हा मार्ग अवलंबिला होता. त्यासाठी जनता पक्ष फ़ोडण्यापासून विविध विरोधी पक्षात तात्विक झगडे निर्माण करून विरोधकांना दुबळे ठेवलेले होते. पण त्यातला एक भाजपा नावाचा पक्ष पर्याय होऊ बघतोय, याचे भान राखले नाही. किंबहूना भाजपाच्या आव्हानाला सेक्युलर मुखवटा लावून नामोहरम करण्याचा सोपा मार्ग शोधला गेला. त्यामुळेच उत्तरप्रदेश हातून निसटला असला, तरी कॉग्रेस दहा वर्ष पुन्हा सत्ता मिळवू शकली व सत्तेत टिकून राहू शकली. आता त्याचाही बोजवारा उडाल्याने नव्याने उत्तरप्रदेश काबीज करण्याचा मनसुबा रचलेला आहे. पण त्याचा आरंभ करतानाच सोनियांना मोठा अपशकून झाला आहे. आपल्या मोहिमेचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारसंघातून करायला सोनिया पोहोचल्या आणि तिथला रोडशो करतानाच आजारी होऊन माघारी परतल्या आहेत. हे आजारपण किती खरे व किती गंभीर आहे, त्याचा फ़ारसा गवगवा झालेला नाही.

मजेची गोष्ट अशी, की सोनियांनी वाराणशी येथून आपल्या पक्षाच्या आगामी विधानसभा मोहिमेचा मुहूर्त करण्याचा पवित्रा घेतला आणि त्याला मोदींच्या बालेकिल्ल्यात सुरूवात असे नाव देण्यात आले. पण दोन वर्षापुर्वी तर मोदी हा माणूस फ़क्त गुजरातपुरता मर्यादित असल्याचा दावा केला जात होता. तो अकस्मात वाराणशी किंवा उत्तरप्रदेशचा राजा कुठून झाला? थेट वाराणशीपर्यंत जाण्यापुर्वी सोनिया व त्यांच्या कॉग्रेसमधील जाणत्यांनी त्याचा विचार केला असता, तर बरे झाले असते. मोदींना वाराणशीत येऊन उभे रहाण्याची हिंमत झाली, तेव्हा त्यांना तिथे पराभूत करण्याचे मनसुबे रचले गेले होते. पण कुणाही दिल्लीकर नेत्याला मोदी विरोधात वाराणशीत उभे राहून शह देण्याची हिंमत झालेली नव्हती. आता तर त्याच वाराणशीला मोदींचा बालेकिल्ला म्हणण्यापर्यंत मजल गेली आहे. म्हणजेच सोनिया तरी उत्तरप्रदेशात मायावती किंवा मुलायम हे आव्हान असल्याचे मानायला राजी दिसत नाहीत. आजही भाजपाचा कोणी उत्तरप्रदेशी मुख्यमंत्री उमेदवार जाहिर झालेला नाही. म्हणूनच स्थानिक पातळीवर विचार केल्यास मायावती किंवा मुलायम हेच खरे आव्हान आहेत. पण सोनियांना तसे वाटलेले नाही. त्यांनी वाराणशीपासून मोहिम छेडण्याचा निर्णय घेतला, तो काही रणनिती आखूनच घेतलेला असणार. ती रणनिती त्यांना मोदींचाच जुना रणनितीकार प्रशांत किशोर याने आखून दिलेली असणार. मोठी रक्कम मोजून त्याला कॉग्रेसने या व्यक्तीला सेवेत रुजू करून घेतले आहे आणि त्यानेही सहा महिन्यात आपण चमत्कार घडवू; अशी भाषा केलेली आहे. त्यानेच जर वाराणशीपासून आरंभ करण्याचा सल्ला सोनियांना दिला असेल, तर आजही त्याच्या मते उत्तरप्रदेशात मोदींचाच प्रभाव कायम असल्याची ती साक्ष ठरते. त्या राज्यात सत्तेसाठी लढायचे असेल तर मुलायम मायावती नव्हेतर मोदींशी लढायचे असाच कॉग्रेसचा मनसुबा त्यातून स्पष्ट होतो.

वाराणशी हा मोदींचा बालेकिल्ला समजून ही आघाडी उघडली गेली असेल तर कॉग्रेसने मतदानापुर्वीच पराभव मान्य केला असे म्हणावे लागेल. कारण मोदी भले वाराणशीतून निवडून आले व त्यांनी तोच मतदारसंघ कायम राखला असेल. पण त्यांनी तोच आपला बालेकिल्ला असल्याचे कधी मानलेले नव्हते. म्हणून तर लोकसभा लढताना त्यांनी बडोदा हा सुरक्षित मतदारसंघही लढवला होता. पण कॉग्रेस त्याला बालेकिल्ला समजून तिथून लढाईत उतरली असेल, तर तिथे जाऊन झुंजण्याची कुवत मोदींपाशी आहे हे विसरता कामा नये. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरल्यावर मोदींनी सुरक्षित अशा गुजरातच्या मतदारसंघात दडी मारून बसण्याचा पवित्रा घेतला नाही, तर वाराणशीत जाऊन आपल्याला पराभूत करण्याचे आव्हान विरोधकांना दिलेले होते. त्याची नक्कल सोनिया करू बघत असतील, तर त्यासाठी पक्षसंघटना आवश्यक आहे. त्याचा मागमूस कॉग्रेसपाशी नाही. १९९३ सालात मध्यावधी निवडणूका झाल्या, त्यातच तात्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी कॉग्रेसचे उत्तरप्रदेशमध्ये दफ़न केलेले आहे. हे उत्तर भारतीय नेते व प्रामुख्याने नेहरू खानदान आपल्याला सुखाने दिल्लीत टिकू देणार नाहीत, याची खात्री असल्याने नेहरू कुटुंबाचा बालेकिल्ला असलेला उत्तरप्रदेश राव यांनी कांशीराम मायावतींना आंदण देऊन टाकला. तेव्हापासून कॉग्रेसला पन्नास आमदारही निवडून आणता आलेले नाहीत किंवा राज्यव्यापी प्रतिमा असलेला नेताही उभा करता आलेला नाही. राहुल वा प्रियंकाला नाचवून मागल्या विधानसभेत चार जागा अधिक मिळवण्यापलिकडे पक्षाची मजल गेलेली नाही. मग वाराणशीत आघाडी उघडण्याने कोणता किल्ला सर होऊ शकेल? सगळी शक्ती पणाला लावून केलेला रोडशो अर्धवट सोडावा लागला; यातच भविष्याची चाहुल लागू शकते. आईसोबत दोन्ही मुले आली असती तर रोडशो अर्धवट सोडावा लागला नसता. ती का आली नव्हती?

मध्यंतरी कॉग्रेसचे अभ्यासू नेता जयराम रमेश यांनी सत्य बोलण्याचे धाडस दाखवले आहे. प्रियंकाला आणून उत्तरप्रदेश जिंकता येणार नाही. इतकेच बोलुन रमेश थांबले नाहीत. कोणाही एका व्यक्तीला कॉग्रेसचा जिर्णोद्धार करता येणार नाही. एका व्यक्तीचा उल्लेख त्यांनी प्रियंका गांधींच्या संदर्भात केला होता. उत्तर प्रदेशात कोणी एक व्यक्ती प्रचाराला उतरली म्हणून राजकीय चमत्कार घडू शकत नाही. कारण कोणाहीकडे जादूची कांडी नाही. हे रमेश यांचे मत सोनियांनाही लागू होते ना? जर प्रियंका वा राहुल चमत्कार घडवू शकणार नसतील, तर सोनिया तरी वाराणशीत जाऊन कुठला पराक्रम करणार होत्या? शिवाय तब्येत बरी नसताना त्यांनी इतका आटापिटा करण्याची तरी काय गरज होती? अर्धवट रोडशो सोडून इस्पितळात दाखल व्हायची पाळी यावी, यातच कुटुंबात त्यांना फ़ारसा आधार उरलेला नाही, याची साक्ष मिळते. खरे तर अठरा वर्षापुर्वीच तशी संधी सोनियांनी गमावली आहे. तेव्हा सीताराम केसरी यांना बाजूला सारून सोनिया पक्षाध्यक्ष झाल्यावर त्यांनी पंचमढी येथील अधिवेशनात संघटना मबजूत करण्यासाठी एन्थनी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तिचा अहवाल अजून धुळ खात पडला आहे. पाच वर्षात सत्ता मिळवण्यासाठी त्यांनीच मिळेल त्यांच्याशी तडजोडी करताना पक्षाची उरलीसुरली संघटना मातीमोल करून टाकली. स्थानिक नेतृत्व जमिनदोस्त करून टाकले. मागल्या खेपेस सत्ता गेली आणि उत्तरप्रदेशात कुटुंबातले मायलेक सोडून तिसरा कोणी लोकसभेत निवडून आला नाही. तेव्हा सोनियांना उत्तरप्रदेशची महत्ता उमजली. पण आता खुप उशीर झाला आहे. पक्षाची संघटना उरलेली नाही आणि गांधी खानदानाची जादू संपलेली आहे. मग असे केविलवाणे रोडशो करून काय साध्य होणार आहे? त्यापेक्षा त्यांनी मोदींचा अभ्यास करावा. २००९ ची गुजरात लोकसभा निवडणूक संपल्यावर मोदींना २०१४ मध्ये राहुल विरुद्ध मोदी, अशी लढत होईल काय हा प्रश्न एका पत्रकाराने विचारला होता. त्यावर मोदी उत्तरले होते. ‘युवराज तर गुजरातमध्ये लढायला उतरणार नाहीत.’ त्याचा अर्थ इतकाच होता, की मलाच राष्ट्रीय पातळीवर मैदानात यावे लागेल. म्हणजे किती दिवसांपासून मोदी तयारी करत होते हे सोनियांच्या लक्षात येईल. मग मोदींशी लढणे सोपे होईल व त्यांची काशीयात्रा कारणी लागू शकेल.

2 comments:

  1. हाहाहा मस्तच भाऊ

    ReplyDelete
  2. Lost before battle, that is correct anylise of congress. May I request you to write on NARSINHA RAO, PRANAB MUKHERJEE AND CONGRESS.....SIRJI PLEASE ELABORATE THIS STORY......

    ReplyDelete