Sunday, December 24, 2017

युपीएसाठी खरी कसोटी

rahul mamta lalu के लिए इमेज परिणाम

राहुल गांधी आता युवा नेता राहिलेले नसून शतायुषी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यातच गुजरातमध्ये एकहाती प्रचार संभाळताना विधानसभा निवडणूकात अधिक जागा जिंकून आल्यामुळे त्यांची राजकीय पत पुरोगामी वर्तुळात वाढलेली आहे. तब्बल दोन वर्षांनी म्हणजे बिहार दिल्लीनंतर भाजपाला निदान अपशकून करणारे निकाल आल्यामुळे त्याचा तुरा राहुलच्या मुकूटामध्ये खोवला गेल्यास गैर मानता येणार नाही. पण ही सुरूवात आहे आणि पुढे दिड वर्षात खरीखुरी लढाई होऊ घातलेली आहे. त्यात राहुलची खरी कसोटी लागायची आहे. कारण कॉग्रेस स्वबळावर सर्व देशभरच्या जागा लढवण्याच्या कुवतीची राहिलेली नसून, त्यामध्ये अन्य पक्षांची व नेत्यांची मदत घ्यावी लागणार आहे. ह्या प्रत्येक लहानमोठ्या व प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांचे अहंकार व रागलोभ संभाळणे सोपे काम नाही. सोनियांनी ते करून दाखवले असले तरी सत्ता गेल्यापासून युपीएमधले अनेक पक्ष बाजूला झालेले आहेत. त्यातून नितीशसारखे लोकही बाजूला झालेले आहेत. त्यामुळेच आगामी लोकसभा निवडणूकीत अशा दोन डझन राजकीय पक्षांची मोट बांधणे व त्यांच्यात समतोल राखणे, ही कॉग्रेस अध्यक्षासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. राहुलपाशी त्यासाठी किती संयम व लवचिकता उपलब्ध आहे, त्यावरच त्यात यश मिळवणे अवलंबून आहे. लालू व ममता यांच्या तर्‍हेवाईक राजकारणापासुन डाव्यांच्या तात्विक राजकारणाची सांगड घालणे, म्हणजे तारेवरची कसरत आहे. खेरीज कॉग्रेसमधील जुनी खोडे व ज्येष्ठ नेत्यांना हाताळणेही अखंड राजकारणाचा विषय आहे. राहुलनी तशी कुवत असे प्रसंग ओढवले, तेव्हा कितपत दाखवलेली आहे? नसेल तर अशा प्रसंगी राहुल काय करू शकतील? नुसती पदे बळकावून किंवा आपल्या घराण्याच्या निष्ठावान लोकांचे कुर्निसात स्विकारून लोकशाहीतले किल्ले जिंकता येत नसतात.

या वर्षाच्या मध्यास बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली. तशी तिथे आधीपासूनच कुरबुर चालू होती. लालूंनी दोन सुपुत्रांना मंत्रिमंडळात घुसवले होते आणि त्यातल्या एकाला उपमुख्यमंत्री बनवले होते. पण आपलेच आमदार अधिक असल्याने लालू सतत नितीशवर कुरघोडी करीत होते. त्याला वैतागून नितीश बिहारमधली आघाडी मोडण्यापर्यंत येऊन पोहोचले होते. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी दिल्लीत येऊन राहुलची भेट घेतली होती व लालुंना आवरण्यासाठी साकडे घातलेले होते. पण राहुल त्यात पडले नाहीत आणि बिहारचे महागठबंधन निकालात निघाले. राहुलनी पुढाकार घेऊन लालूपुत्र तेजस्वी याला राजिनामा द्यायला भाग पाडले असते, तर बिहारच्या महागठबंधनातून बाहेर पडण्याचा नितीशचा मार्ग मोकळा राहिला नसता. पण राहुलनी तो विषय गंभीरपणे घेतला नाही आणि एका रात्रीत नितीश युपीएला रामराम ठोकून एनडीएत दाखल झाले. गहन राजकारणाला इतक्या थिल्लर पद्धतीने घेण्याची राहुलची क्षमताच कॉग्रेसला महागात पडत गेली आहे. त्यांच्याकडून युपीएचे नेतृत्व केले जाण्याने त्या आघाडीचे काय होईल? नोटाबंदीनंतर विरोधी पक्षांनी संसदेत काहुर माजवले होते. सरकारची सगळीकडून कोंडी केलेली होती आणि थेट राष्ट्रपतींकडे त्याची दाद मागण्यापर्यंत मजल मारली होती. अशा पेचप्रसंगी राष्ट्रपती भवनात जाण्याच्या दिवशीच राहुल गांधी यांनी अकस्मात पंतप्रधानांची कॉग्रेस शिष्टमंडळासह भेट घेतली आणि विरोधी पक्षाला तोंडघशी पडावे लागलेले होते. विरोधी पक्ष इतके संतापले, की त्यांनी कॉग्रेससोबत राष्ट्रपती भवनात येण्यालाही नकार दिला. अखेर सोनियांना प्रकृती बरी नसतानाही राष्ट्रपती भवनात जावे लागलेले होते आणि त्यापासून राहुलना अजिबात बाजूला ठेवावे लागलेले होते. आपण राजपुत्र असलो तरी बाकीचे पक्ष कॉग्रेसवाल्यांसारखे निष्ठावान चाकर नाहीत, हे राहुल यांच्या लक्षात कधी येणार आहे?

या वर्षाच्या आरंभी उत्तरप्रदेशची निवडणूक स्वबळावर लढणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यावर सोनिया व प्रियंका यांनी समाजवादी पक्षाचा तरूण नेता अखिलेश यादव याच्याशी आघाडीचा पर्याय निवडला होता. ठरल्याप्रमाणे राहुलनी अखिलेशच्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून युतीची घोषणा करायची होती. पण अखिलेशच्या पत्रकार परिषदेत जाणे राजपुत्राला कमीपणाचे वाटले आणि चिडलेल्या अखिलेशने परस्पर आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादीच जाहिर करून टाकली. त्यामुळे कॉग्रेसच्या गोटात तारांबळ उडाली. सोनियांनी अहमद पटेल यांना लखनौला धाडले आणि प्रियंका रात्रभर अखिलेशला मोबाईल मेसेज पाठवत राहिलेली होती. त्यात मतदानाचे दिवस जवळ आले आणि युती होऊनही जागावाटप व उमेदवारांचा विचका झाला. त्याचा परिणाम मग निकालावरही झाला. आताही गुजरातचे निकाल आल्यावर शरद पवार यांचे निकटवर्तिय प्रफ़ुल्ल पटेल म्हणाले, की राष्ट्रवादी युतीला व जागावाटपाला तयार होती. पण राहुलनी आम्हाला किंमतच दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उभे करावे लागले आणि निदान डझनभर जागी तरी कॉग्रेस उमेदवार पराभूत झाले. शंभर उमेदवार पराभूत होण्यापेक्षा राहुलने दहा जागा राष्ट्रवादीला देऊन आपले डझनभर उमेदवार विजयी केले असते तर? गुजरातचे चित्र आज निकालानंतर दिसते, त्यापेक्षा वेगळे दिसले असते ना? नैतिक विजयाच्या गमजा करण्याची गरज भासली नसती. तर राहुलने अध्यक्ष होताच मोदींचे राज्य जिंकल्याचा धक्का भारतीय राजकारणाला बसला असता. पण तीच लवचिकता राहुल वागण्यात दाखवू शकत नाहीत की निर्णयात दाखवू शकलेले नाहीत. अशी अनेक उदाहरणे दाखवता येतील. पण त्याची गरज नाही. अध्यक्ष झाल्यानंतर मित्रपक्षांना व सहकार्‍यांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता व नम्रता राहुलमध्ये कितपत आली आहे?

आगामी राजकारणात राहुलसाठी तीच खरी कसोटी आहे. २००४ सालात सोनियांनी लोकसभेचे वेध लागल्यावर मायावती यांच्या वाढदिवसाचे निमीत्त साधून त्यांच्या घरी पुष्पगुच्छ देण्यासाठी जाण्याची लवचिकता दाखवली होती. त्याच पद्धतीने त्यांनी कटूता संपवण्यासाठी शरद पवार यांचा उंबरठा झिजवला होता आणि रामविलास पासवान यांच्याकडेही जाण्यात कमीपणा मानलेला नव्हता. राहुलच्या एकाही कृतीमध्ये तसा समजूतदार मुरब्बीपणा दिसलेला नाही. काही मोठे मिळवण्यासाठी थोडा कमीपणा घेण्याची समयसूचकता आवश्यक असते. राहुल गांधी त्याची कधीही कृतीतून साक्ष देऊ शकलेले नाहीत. आजवर ती जबाबदारी सोनियांनी पार पाडलेली होती. आता राहुल गांधीच अध्यक्ष असल्याने हे सर्व त्यांनाच करावे लागणार आहे. म्हणूनच ती खरी सत्वपरिक्षा आहे. राहुल गांधी जितके नवखे आहेत, तितकेच मित्रपक्षाचे नेते अनुभवी व मुरब्बी आहेत. त्यांना नेहमीच्या लाचार कॉग्रेस नेते सहकारी यांच्यासारखे तुच्छतेने वागवून भागणार नाही. आसामचे मंत्री व माजी कॉग्रेसनेने हेमंत विश्वसर्मा यांनी त्याबाबतीत सांगितला अनुभव महत्वाचा ठरावा. ते आपल्या पक्षीय अडचणी सांगायला राहुलकडे गेलेले होते. तर त्यांचे दुखणे ऐकून घेण्यापेक्षा राहुल आपल्या लाडक्या कुत्र्याला बिस्कीटे खाऊ घालण्यात रमलेले होते. अन्य कॉग्रेसजन ते सहन करीत असले तरी मित्र पक्षाचे नेते ते मान्य करतील असे नाही. मग पुढील राजकारण वा लोकसभा निवडणूकीत कॉग्रेस मोदी वा भाजपाला आव्हान कसे उभे करणार? कारण आता कॉग्रेस अध्यक्ष म्हणून ते ससंदेतील कॉग्रेस पक्षाचेहॊ नेता झालेले आहेत आणि पर्यायाने त्यांनाच युपीए आघाडीचेही नेतृत्व करायचे आहे. थोडक्यात त्यांना अन्य मित्र पक्षांचा विश्वास संपादन करायचा असून, त्यांच्याकडून सन्मानही मिळवणे भाग आहे. ते काम कॉग्रेसचे अध्यक्षपद मिळवण्याइतके सोपे आहे काय?

गतवर्षी याच कालखंडात नोटाबंदीचा विषय खुप गाजत होता आणि राहुल गांधी यांनी आपली संसदेत गळचेपी होत असल्याचे मोठे काहूर माजवलेले होते. संसदेत आपण बोललो तर भूकंप होईल अशी धमकीही दिलेली होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. नंतर अधिवेशन संपल्यावर त्याची टवाळी करताना शरद पवार काय म्हणालेले होते? संसदेतले बहुतांश खासदार भूकंपाच्या भयाने जीव मूठीत धरूनच कामकाजात भाग घेत होते. त्यातून पवार किंवा तत्सम राजकीय नेते व सहकार्‍यांची राहुल विषयक मनस्थिती लक्षात येऊ शकते. अशा नेत्यांना विश्वासात घेणे वा त्यांचा विश्वास संपादन करणे, नैतिक विजय मिळवण्याइतके सोपे काम नाही. पहिली गोष्ट म्हणजे राहुल गांधी त्या भूमिकेत गेल्याशिवाय मोदींना आव्हान देता येणार नाही. आजतरी कॉग्रेस हाच देशातला बिगर भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे आणि अनेक राज्यात त्याचीच संघटनात्मक ताकद आहे. सहाजिकच भाजपा व मोदींना आव्हान देण्यासाठी कॉग्रेसच्याच नेतृत्वाखाली अन्य पुरोगामी पक्षांना एकजुट करावी लागणार आहे. या एकजुटीचे राहुल किती चतुराईने व समतोल नेतृत्व करू शकतात, यावरच भाजपा विरोधी राजकारणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मोजके बोलून व हिशोबात वागून राहुल अन्य मित्र पक्षांना आपल्या मागे किती ठामपणे उभे करू शकतात, याला महत्व आहे. कारण चार टाळ्या जास्त मिळाल्या तरी बेभान होऊन बेताल बोलण्याची राहूलची क्षमता कॉग्रेसला अनेकदा महागात पडलेली आहे. तत्वज्ञाच्या अविर्भावात जगाला ज्ञान पाजण्याच्या हव्यासातून त्यांनी अनेक समस्या उभ्या केलेल्या आहेत. आताही नैतिक विजयाचा पोरकट आवेश आणून त्यांनी आपण अजून बदललो नसल्याचीच ग्वाही दिलेली आहे. युपीएसाठी म्हणूनच ती अधिक चिंतेची बाब आहे. कॉग्रेसविषयी न बोललेले बरे.

10 comments:

  1. भाऊ
    तेवढी परिपक्वता राजीव गांधी यांच्या मध्ये यायला बराच कालावधी लागेल. 2024 पर्यंत ते कदाचित त्यांना जमेल. ते सुद्धा कदाचित कारण मुळात तो पिंडच नाही सगळाच अंधार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार आपल्याला राहुल गांधी असे म्हणायचे आहे का ?

      Delete
  2. छान विश्लेषण भाऊ. परंतु गुजरात विधानसभेच्या निकालांनी वातावरण काही प्रमाणात का होईना पण नक्कीच बदललंय. 2019 ची निवडणूक मोदींसाठी जेवढी सोपी वाटत होती तेवढी सोपी नक्कीच नसणार.

    ReplyDelete
    Replies
    1. Gujarat manjhe desh nahi... media ne ubha keleli strategy ahe ki gujarat results warati sagla tharel..
      BJP cha vote share vadhala hyala apan kasa baghayacha ?

      Delete
  3. Bhau, please let us know your thoughts on recent UN vote on Jerusalem. Only 8 countries like Guatemala voted for Jerusalem as Israeli capital. 35 countries abstained from voting and 128 countries, including India, voted against it. Surprisingly, US allies like Japan, France too voted against US' decision. What do you think about Russia-China-Iran-Pakistan nexus? Where do we, as a country, stand in this geopolitics? Was India's decision right?

    ReplyDelete
  4. आधी होता वाघ्या। मग झाला पाग्या।
    त्याचा येळकोट राहिना। मूळ स्वभाव जाईना।।

    ReplyDelete
  5. भाऊ खुपच सुंदर
    काँग्रेस राज्य म्हणजे सारे मिळुन खाऊ..परत ए राजा प्रमाणे सहकारी पक्षाला भ्रष्टाचार करायला लाऊन आपण मोठा पक्ष म्हणुन लोणी खायचे. मग त्याला पाठिंबा द्यायला सर्व एकत्र येणारच व बरोबर भागीदारी मिडियावाले आहेतच..
    बरं नुसत्या प्रचार सभांना गर्दी करुन मतदानात कनव्हर्ट होतं नाही हे बिहार च्या निवडणूकांनी दाखवून दिले आहे.
    तसेच शेतकरी वर्ग जरी युरीया मिळु लागल्याने समाधानी असला तरी कमी शिक्षणा मुळे जाती नोटांची पाती या वर सहज फिरवता येतो हे पण गुजरात व राजस्थान इलेक्शनने दाखवून दिले कारण शेतकरी पाणी विज प्रश्न मोदीनी गुजरातमध्ये पहिल्या 5-7 वर्षांत सोडवला असे अनेक वेळा ऐकले आहे. परंतु ह्यच ग्रामीण भागात मोदींची गुजरात मध्ये पिछेहाट झाली व हे सिद्ध झाले की जातं पात या स्वार्थासाठी राष्ट्रभक्त सरकारला पण हरावे लागते हा डेमो गुजरात निवडणूकीत यशस्वी झालाय व मोदी कितीही मेहनती, प्रामाणिक, आतंराष्टीय पातळी वर यशस्वी, स्वतः गुजराथी, काश्मिर प्रश्न व तेथील अतिरेकी हल्ले जरी पलटऊन अनेक (200 हुन जास्त अतिरेकी काश्मिर मध्ये गेल्या वर्ष सहा महिन्यात लष्कराने मारले जे आज पर्यंत लष्करावर व नागरिकांन वर हल्ले करत होते), चिनला डोकलाम प्रश्नात माघार घ्यायला भाग पाडले याचा काही ही परिणाम गुजरातच्या ग्रामीण व काही प्रमाणात व्यापारी मतदारावर झाला नाही व जेमतेम जिंकली हे सामान्यांच्या अकले बाहेर चे अत व वरिल विश्लेषण जरी केलं तरी मिडियावाले याचे क्रेडिट मोदींना देत नाहीत/ किंवा याबद्दल 4 शब्द चांगले बोलत नाहीत. आज तक चॅनल वरिल गेल्या 2 महिन्यातील चर्चा, विश्लेषण, बातम्या पाहिल्यात तर मोदी वर किती टीका केली/ व टिका करणार्यानाच मोठ्या प्रमाणात दाखवलं गेलं हे समजेल ( मी 2010 पासुन बरेचसे असे चॅनेल वरिल प्रोग्रॅम रेकॉर्ड करुन ठेवतो आहे ). तसेच शिक्षणाचा खर्च वाढला याला कारण 1975 साली घेण्यात खाजगीकरण्याचा निर्णय पण याला जबाबदार मोदी सरकारन असे चित्र प्रसुन वाजपेयी व टीम वारंवार दाखवत होती.
    त्याच बरोबर जातं पात, जिएसटी, नोटबंदी, गोरक्षक यातुन मोदीना डिफेम करण्याचा मिडियावाल्याचा डाव कमालीचा यशस्वी झाला ( राहुल सारखे पप्पु नेतृत्व याचाच हा पराजय असला तरी विजय आहे हे दाखवल जातय).
    2012 गुजरात निवडणूकीत पण मोदींना (भाजपला) पाडण्याचा मोठा प्रयत्न झाला. त्यावेळी गुजरात मध्ये एक जरी सिट कमी निवडणुन आली तरी तो मोदींचा पराभव असेल असे वारंवार दाखवत होते. पण 16 डिसेंबर ला निर्भया रेप प्रकरण घडले आणि असाच गुजरात निवडणूक निर्णय 19 डिसेंबर ला लागला. तो पर्यंत तमाम मिडियावाले गुजरात वर चर्चा करत होते परंतु 19 डिसेंबर 2012 पासुन मोदी पुर्ण बहुमताने आल्यावर गुजरात चर्चा बंद झाल्या व निर्भया प्रकरणाला एकदम प्रकाश झोतात आणले गेले. हे हेतुपुरस्करच होते. कारण ता 16 ते 19 डिसेंबर 3 दिवस सर्व मिडियावाले या रेप प्रकरणा बाबत गप्प होते.
    या सर्वा मागे एक निश्चित अजेंडा मिडियावाले राबवत असतात. पण या मिडियावाले, पत्रकार व त्यांचे सरकारी जावई पुरोगामी, शासन यंत्रणा अ न्याय एकत्र काम करत असतात व भाऊ आपण वारंवार खाटीका समोरच्या बोकडाचे चपखल उदाहरण दिले आहे समोर बोकड बळी जात असतात पण दुसरे बोकड निवांत रवंथ करत असतात. तसेच जंगल सफारी मध्ये हजारो म्हशी समोर दोन तीन वाघांची टोळी सहज म्हशीला ओढुन जमावा समोर मारत असतात व एकटा जिव तरफडत मरतो परंतु म्हशींचा जमाव निवांत पहात असतो किंवा पळुन जातों. अशा वाघांचा सहज नुसते चालत गेले तरी चेंदा मेंदा होऊ शकतो परंतु हे कधीही होत नाही तसेच या भारतीय मिडियांच्या वाघा विषयी झाले आहे. म्हशी प्रमाणे बळी जात असतात. व भारत देश असाच गरीबी दु व्यवस्था यात पिचत राहिला आहे व राहिल. कारण म्हशीच्या समुदया प्रमाणे कोणीही या कसाई, पार्शीलिटी करणार्या मिडियावाल्याना तुडवण्याची हिम्मत कोणीही भारतीय समुदाय करणार नाही तो पर्यंत अशीच भारतमातेची लुट चालू रहाणार....एके एस 1

    ReplyDelete
  6. 2..प्रत्येक न्युज, विषय, चर्चा भाजपच्या (कोणत्याही देशभक्त नेतृत्वाच्या) विरोधात पेश केल्या जातात.
    आता असेच कॅगचे बिनोद राय हे टिकेचे केंद बिंदू झालेले आहेत. असेच रिबेरो यांच्या गृपला PLI पासुन रोखण्यासाठी न्यायालयाने नुसताच विरुध्द निकाल दिला नाहीतर लाखो रुपयांचा दंड पण दिला. त्यामुळे असे देशभक्त स्वातंत्र्याच्या पुर्वी पण व नंतर पण ठेचुन काढले गेले आहेत.. जात रहातील.
    भाऊ आपण अनेक लेख अशा ल्युटियन मिडियावाले विरोधात लिहित आला आहात तसेच शिंगावर पण घेत आहात... तसाच आता आर्णब गोस्वामी पण खुले आम आवाहन करत आहे.. हेच आशेचे किरण आहेत..
    आता मिडियावाले मोदींना जानेवारी 2019 मध्ये राज्य सरकार व लोकसभा निवडणूका एकदम, तर अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा प्रयत्न पण करत आहेत.. यात ते यशस्वी झाले तर एक मोठ्या दरित हा अशिक्षीत, गरिब, भ्रष्ट देश लोटला जाईल. भाऊ अशा अत्यंत मोक्याच्या वेळी तुम्हीच एक आशेचे किरण आहात.
    एकेएस

    ReplyDelete
  7. भाऊ अशा दि बेस्ट अॅनॅलेसिस बद्दल धन्यवाद

    ReplyDelete