Sunday, December 10, 2017

जनरल जानेवारी आणि फ़ेब्रुवारी

russian winter के लिए इमेज परिणाम

दुसर्‍या महायुद्धाच्या कालखंडात जगातल्या बहुतेक देशांची विभागणी दोन गटात झालेली होती. त्यात हिटलरच्या समर्थनाला वा मदतीला उभे राहिलेले देश होते, तसेच त्याच्या विरोधातही उभे राहिलेले देश होते. आरंभी अनेक देशांच्या नेत्यांनी हिटलर वा जर्मनीशी वैर नको, म्हणून त्याचाशी दोस्ती केलेली होती. इंग्लंड व फ़्रान्स यांचाही अशा देशांमध्ये समावेश होता. पुढल्या काळात रशियाच्या स्टालीननेही त्याच्याशी दोस्ती केलेली होती. पण हिटलर विश्वासार्ह माणूस नव्हता आणि एके दिवशी त्याने सोवियत युनियनवरही हल्ला केलाच. त्याच्याशी दोन हात करण्यापेक्षा स्टालीनने येणार्‍या जर्मन सेनेला आपला प्रदेश मोकळा करून देण्याची चमत्कारीक रणनिती योजलेली होती. कुठलीही गोळी झाडल्याशिवाय आणि तोफ़ डागल्या शिवाय जर्मन फ़ौजा खुप खोलवर सोवियत प्रदेशात मुसंडी मारू शकल्या होत्या. अशावेळी कोणीतरी स्टालीनला विचारले तू अशी माघार कशाला घेतो आहेस? तर स्टालीनने त्याला समर्पक उत्तर देताना म्हटले होत, माझ्यापाशी आणखी दोन सेनापती आहेत. जनरल जानेवारी व जनरल फ़ेब्रुवारी अशी त्यांची नावे आहेत. वास्तविक ही शब्दावली रशियातील खुप जुनी आहे आणि तिथल्या असह्य जीवघेण्या हिवाळ्याशी त्यांचा संबंध आहे. रशियातील हिवाळा इतका भयंकर असतो, की त्यात पुरेशी उबेची व्यवस्था नसेल तर माणूस नुसत्या थंडीने गोठूनच मरू शकतो. जानेवारी फ़ेब्रुवारी या महिन्यातली रशियन थंडी म्हणजे साक्षात यमराजच असतो. स्टालीनला त्याच असह्य जीवघेण्या थंडीची प्रतिक्षा होती आणि ती थंडीच गोळी न झाडता जर्मनीच्या सैन्याची कत्तल करणार, याची त्याला खात्री होती आणि झालेही तसेच! गुजरातच्या निवडणूक निमीत्ताने स्टालीनच्या त्या वक्तव्याचे स्मरण झाले. तिथे भाजपाची सत्ता निकालात काढायला गेलेल्या राहुल गांधी व अन्य लोकांना तिथले राजकारण किती ठाऊक आहे?

आज तो जुना दुसर्‍या महायुद्धाचा इतिहास तपासला तर लक्षात येऊ शकते, की जितक्या उत्साहात व वेगाने जर्मन फ़ौजा रशियात घुसल्या व खोलवर मुसंडी मारत गेल्या; त्या जणु यमराजालाच मिठी मारायला धावत सुटलेल्या होत्या. कारण त्यांना रशियन प्रदेश मोकळा मिळाला. पण त्यातला सापळा उमजला नव्हता. म्हणूनच धोका ओळखण्याची त्यांना गरजही वाटली नाही. जितके जर्मन सैन्य आत घुसत गेले, तितकी त्यांना दुरवर रसद पोहोचवणे जर्मनीला अशक्य होत गेलेले होते आणि जानेवारी व फ़ेब्रुवारी महिन्यात पडणार्‍या बर्फ़ व थंडीने त्यांचा जीव व्याकुळ झाला. तेव्हा त्यांना कोणी मारण्याची गरजही राहिलेली नव्हती. नुसत्या त्या गोठवणार्‍या थंडीने साडेसात लाख जर्मन फ़ौजेला ठार मारलेले होते. तेव्हा स्टालीनच्या त्या शब्दाचा अर्थ जर्मनीच्या सेनापतींनी समजून घेतला असता, तर मोकळा प्रदेश मिळाला म्हणून इतकी मोठी मजल जर्मन फ़ौजांना मारू देण्याचा धोका त्यांनी पत्करला नसता. गुजरातमध्ये दिर्घकाळ नरेंद्र मोदी व त्यांचा निकटवर्ति पक्षाध्यक्ष अमित शहा काही राजकारण करत असतील, तर त्यांच्या यशाची आधी कारणमिमांसा करणे अगत्याचे असते. सलग २२ वर्षे पाच निवडणूका भाजपाने जिंकलेल्या असतील आणि त्या पक्षात वारंवार फ़ाटाफ़ुट घडवूनही त्याला चिकटून मतदार राहिलेला असेल, तर त्याची कारणे आधी शोधली पाहिजेत. मगच त्यावर मात करून भाजपाला पराभूत करण्याची रणनिती आखली पाहिजे. केवळ कोणी त्याला हिंदूत्वाची प्रयोगशाळा म्हटले, म्हणून आपणही शेंडी वा जानवे परिधान करून भाजपाची मते फ़ोडू शकतो अशा भ्रमात राजकारण करणे म्हणजे आत्महत्याच असू शकते. त्यात पुन्हा तुमच्या गोटात एकाहून एक नमूने जमलेले असतील, तर प्रदेश पादाक्रांत करणे सोडा, आपल्यावर आत्महत्येची वेळ येण्याच्या धोक्याला ते आमंत्रण असते.

नरेंद्र मोदी वा अमित शहा हे संघटनात्मक बळावर निवडणुका लढतात आणि जिंकतात. पण त्याचवेळी ते आपल्या शत्रूला कधी कमी लेखत नाहीत. शक्य तितका अशा शत्रू वा प्रतिस्पर्धी लोकांचाही आपल्या रणनितीमध्ये उपयोग करून घेत असतात. आपल्या शहाणपणापेक्षाही अधिक ह्या दोघांचा आपल्या शत्रूंच्या मुर्खपणावर जास्त भरवसा असल्याचे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालेले आहे. किंबहूना शक्य तितक्या शत्रूने चुका कराव्यात आणि त्या करायला त्याला पुरेपुर संधी द्यावी, याकडे या दोघांचा नेमका कल असतो. त्याचा एक भाग म्हणून जो कोणी प्रतिस्पर्धी उत्साहाच्या भरात अंगावर येईल, त्याला रोखण्यापेक्षा प्रोत्साहन देताना मोदी दिसतात. ते कुणाही उत्साही शत्रूला कधी नाराज करीत नाहीत. उलट त्याला अधिक आवेशात अंगावर येण्य़ास प्रवृत्त मात्र करत असतात. त्यामुळेच दोन महिन्यांपुर्वी राहुल गांधींनी गुजरात दौर्‍याचा सपाटा लावला, त्यामुळे मोदी शहा अजिबात विचलीत झाले नाहीत. त्यांच्या पक्ष सहकार्‍यांनी राहुल गांधींच्या मंदिर जाण्यावर कितीही टिकेची झोड उठवली, तरी मोदी शहांनी त्याचे स्वागतच केले. उलट नेह्मी राहुलनी मंदिरात जाण्याचा सल्लाही देऊन टाकला. अशा नाटकातून आपला हिंदू समर्थक कमी होणार नाही, पण कॉग्रेसचा पुरोगामी वा बिगर हिंदू पाठीराखा अस्वस्थ होणार; याची य दोघांना पक्की खात्री होती. त्याच्याही पुढे जाऊन असे हिंदूत्ववादी नाटक राहुलना खुप काळ चालविता येणार नाही व कॉग्रेसच त्यांना तोंडघशी पाडणार; याविषयी शंका नव्हती. म्हणून तर राहुलच्या या मंदिर भेटीवर मोदी शहांनी कधी प्रश्नचिन्ह लावलेले नव्हते. राहुलपेक्षाही त्यांच्या पक्षातील कपील सिब्बल, मणिशंकर अय्यर वा दिग्विजयसिंग अशा लढवय्यांवर मोदींचा अधिक विश्वास आहे. ते आपल्या रणनितीमध्ये महत्वाचे मोहरे असल्याचे त्यांनी खुप आधीपासून निश्चीत केलेले आहे. झालेही तसेच.

राहुल यांच्या सोमनाथ भेटीच्या वेळी त्यांच्या नावाची नोंद त्यांच्याच एका सहकार्‍याने अहिंदू म्हणून केली आणि त्यावरून गदारोळ सुरू झाला. अशी नोंद होण्याचे काही कारण नव्हते. पण ती चुक जाणिवपुर्वक अहमदभाई पटेल यांनी केली काय? राहुलच्या कुणा सहकार्‍यानेच तशी नोंद केली. त्याला तशी नोंद करायला अहमद पटेलांनी सांगितलेले असेल, तर त्याविषयी राहुल पुर्णपणे गाफ़ील होते. पटेल हे मुस्लिम असल्याने त्या सहकार्‍याने त्यांच्या नोंदीसोबतच राहुलचेही नाव अहिंदू पुस्तकात करून टाकले आणि वादळ उठले. यावरून भाजपावाल्यांनी गदारोळ करणे ही रणनिती होती. कारण तसा गोंधळ घातला, मग खुलासा देताना अतिशहाणे कॉग्रेसवाले आणखीन चुका करणार व नवे मुद्दे हाती लागणार, याची खात्री होतीच. झालेही तसेच. सुरजेवाला किंवा कपील सिब्बल यांच्यासारख्या अतिशहाण्यांनी राहुलना जानवेधारी ब्राह्मण हिंदू सिद्ध करण्याचा वि्डा उचलला. जुनेपाने फोटो पोतडीतून काढून मोठीच बाजी मारली. सुरजेवाला यांच्यापेक्षा सिब्बल अधिक निष्ठावान म्हणून त्यांनी मोदींना अहिंदू ठरवण्यापर्यंत मजल मारली. मोदी कुठे रोज मंदिरात जातात? गांधी खानदान जुने शिवभक्त असल्याची साक्षही त्यांनी दिली. थोडक्यात कॉग्रेसने हिंदू मतपेढीला हात घातला होता आणि आता बाजी मारली, अशी प्रत्येकाला खात्री पटली होती. इतक्यात अयोध्येची केस सुप्रिम कोर्टात आली आणि तिथे कपील सिब्बल यांनी आपल्या खर्‍या गुणाची साक्ष दिली. तिथे असे काही युक्तीवाद व वक्तव्य केले, की मागल्या दोन महिन्यात राहुलनी गुजरातच्या सर्व मंदिरांना दिलेल्या भेटी क्षणात मातीमोल होऊन गेल्या. २०१९ ची लोकसभा निवडणूक होईपर्यंत ह्या प्रकरणाची सुनावणीच होऊ नये, असा युक्तीवाद सिब्बल यांनी मांडला आणि राहुलच्या सर्व मंदिरातील पुजा भक्तीचा बोर्‍या वाजला. याला म्हणतात शत्रू गोटातला सेनापती.

कपील सिब्बल कमी होते म्हणून की काय मणिशंकर अय्यर पुढे सरसावले. दिल्लीत कुठल्या समारंभात मोदींनी केलेल्या भाषणातील मोदींचे मुद्दे खोडून काढण्याच्या नादात अय्यर यांनी पंतप्रधानांना ‘नीच माणुस’ संबोधले. मग राहुलना तडकाफ़डकी आपल्या या विश्वासू नेत्याची पक्षातून हाकालपट्टी करण्याची नामुष्की ओढवली. म्हणजे मागल्या दोन महिन्यापासून जे समिकरण राहुल गुजरातसाठी जुळवत होते, ते दोन दिवसात या दोन खंद्या लढवय्यांनी पुरते जमिनदोस्त करून टाकले. मग काय; विकास वेडा झालाय, नोटाबंदी वा जीएसटी असे विषय कुठल्या कुठे फ़ेकले गेले आणि ‘नीच माणूस’ एकदम झळाळू लागला. तिथल्या तिथे अय्यरना निलंबित करून राहुलनी तो विषय संपवायला हवा होता. पण त्यांनी अय्यरना माफ़ी मागण्याचे आवाहन केले आणि त्या मुर्खनाम शिरोमणीने अधिक अक्कल पाजळून कॉग्रेसला आरोपीच्या पिंजर्‍यात आणून उभे केले. अशा चुका नव्या नाहीत. सिब्बल असोत किंवा अय्यर असोत, त्यांना सामान्य लोकांची मने व सहानुभूती जिंकण्याचा कुठलाही अनुभव नाही. ते आपल्या परीने खुप विद्वान व बुद्दीमान आहेत. पण ते जी अक्कल पाजळतात, ती सामान्य लोकांच्या आवाक्यातली नाही. सामान्य लोकांना समजणारी भाषा सोपी व सहज असते. त्यात शब्दांची कसरत उपयोगाची नसते. म्हणूनच युक्तीवादाने लोकांना जिंकता येत नाही. राष्ट्रसंघाच्या सभेत अथवा बुद्धीमंताच्या गोतावळ्यातली ही भाषा सामान्य लोकांना जिंकू शकत नसते. त्यात मोदी चतूर व कुशल आहेत. म्हणूनच त्यांच्याशी त्या पातळीवर येऊन सिब्बल अय्यर स्पर्धा करू शकत नाहीत. उत्तरप्रदेशच्या प्रचारात अखिलेश यादवने गुजरातच्या गाढवांचा उल्लेख केला, तर मोदींनी ते अंगावर ओढवून घेतले आणि गाढवच मालकाशी प्रामाणिक असते. म्हणूनच अठरा तास काम करू शकते असे म्हणत बाजी मारलेली होती.

लोकांना गाढवाची गुणवत्ता कळली व मोदींनी कमीपणा घेऊन लोकांना जिंकले होते. तुम्ही शिव्या घाला, मोदी त्याचा अलंकार बनवून परिधान करतात, हे विसरता कामा नये. राहुलना त्याचे भान नाही की अय्यर सिब्बलना त्याची अक्कल नाही. म्हणूनच हे अतिशहाणे मोदी शहांच्या सापळ्यात आयते फ़सत जातात. भाजपाच्या त्या दोन्ही नेत्यांनाही अशाच मुर्खपणाची शत्रूकडून अपेक्षा असते. किंबहूना आपल्या गोटातील जमेच्या बाजूपेक्षा मोदी शहा शत्रू गोटातील मुर्खपणावर अधिक विसंबून असतात, म्हटल्यास वावगे ठरू नये. आताही गुजरात विधानसभेच्या आखाड्यात उतरल्यावर पटेल आरक्षण वा नोटाबंदी इत्यादी विषय आपल्याला जड जाणार आहेत, याची मोदी शहांना खात्री असणार. त्याला तांत्रिक उत्तरे देऊन भागणार नव्हते. त्यामुळेच लोकांचे लक्ष अशा गंभीर विषयावरून अन्यत्र जाण्यासाठी काहीतरी व्हायचीच गरज होती. अशी संधी आपल्याला राहुलचे निकटवर्तियच पुरवतील, याची मोदी शहांना खात्री असणार. स्टालीन जसा निसर्गाने थंडी व बर्फ़ाचे रौद्ररूप धारण करावे म्हणून प्रतिक्षा करीत होता, तसे मोदी शहा मागले दोन महिने चातकाप्रमाणे कॉग्रेसकडून मुर्खपणा होण्याच्या प्रतिक्षेत होते. आपले खरे लढवय्ये सेनापती राहुलच्याच गोटात बसलेले आहेत, हेही त्यांना ठाऊक होते. अखेरीस हे दोन्ही सेनापती मोक्याच्या वेळी बाहेर पडले आणि त्यांनी कॉग्रेससह राहुल गांधींना तोंडघशी पाडलेले आहे. कुठलेही कारण नसताना गुजरातची अस्मिता वा अपमान हे मुद्दे या लोकांनी मोदींना पुरवले. नेमक्या शेवटच्या दिवसात मोदींनी त्यांचा पुरेपुर वापर करून घेतला आहे. अय्यर व सिब्बल यांनी राहुलच्या मोहिमेला किती दणका दिला, ते पुढल्या कारवाईतूनच स्पष्ट झाले. अशा विधाने व वर्तनाने कॉग्रेसला फ़टका बसणार नसता, तर राहुलनी अय्यरना पक्षातून निलंबित केले नसते, की सिब्बलना गप्प बसवले नसते.

निवडणूकीच्या आखाड्यात आपण शत्रूला कसे पाणी पाजणार याला महत्व असतेच. त्यानुसारच युद्धनिती रणनिती आखलेली असते. पण आपला शत्रू वा प्रतिस्पर्धी काय रणनिती आखून लढणार, याचाही अंदाज महत्वाचा असतो. एकमेकांना शह काटशह देत युद्ध खेळले जात असते. म्हणूनच शत्रूच्या रणनितीतील चुकांचे भांडवल करून घेण्यात खरी यशस्वी रणनिती सामावलेली असते. त्यात मग शत्रूला विजयाची खात्री होणे व त्याच्याकडून चुका होण्याला प्राधान्य असते. एकदा शत्रूमध्ये खोटा आत्मविश्वास निर्माण झाला, मग त्याला चुकण्यापासून कोणी रोखू शकत नाही. म्हणूनच स्टालीनने प्रदेश मोकळा करून हिटलरच्या फ़ौजेला खुप खोलवर मुसंडी मारू दिलेली होती. नंतर त्यांना तिथून माघारी जाणेही शक्य राहिलेले नव्हते. उत्साह व उतावळेपणाने जी मजल मारली, तोच जर्मन फ़ौजेसाठी मृत्यूचा सापळा बनून गेला होता. दोन महिन्यांपुर्वी राहुलनी गुजरातमध्ये मुलूखगिरी सुरू केली, तेव्हा भाजपा किंवा मोदी शहांनी त्यांच्याशी दोन हात करण्याचे टाळलेले होते. तीन तरूण नेत्यांच्या सोबत राहुलना गमजा करू दिलेल्या होत्या आणि आपले संघटनात्मक काम जोरात चालू ठेवलेले होते. जसजसे मतदानाचे दिवस जवळ येत गेले, तसतशी कॉग्रेसची रणनिती त्यांच्यावरच उलटत गेली आणि तिन्ही तथाकथित तरूणांचा आधार मिळण्यापेक्षाही अधिकधिक अडचणींना कॉग्रेसला सामोरे जावे लागते आहे. त्यातच आपल्याच गोटातले दोन मोदींचे लढवय्ये राहुलना अडचणीत घेऊन गेलेले आहेत. राहुलनिती वा कॉग्रेसी युद्धनिती कशी त्यांच्याच पराभवाचे कारण झाली, त्याचा पुरावा पुढल्या सोमवारी मतमोजणीनंतर निकालाच्या स्वरूपात समोर येणार आहे. मात्र तो मोदींच्या लोकप्रियतेचा वा भाजपाच्या दिग्विजयाचा पुरावा नक्कीच नसेल. कॉग्रेसी राजकीय आत्महत्येचे ते प्रात्यक्षिक असेल.

12 comments:

  1. येथे माननीय फिल्ड मार्शल सर सॅम माणेकशॉ यांचं War Quote आठवलं,"शत्रूला,शत्रुच्याच हत्यारांनीं,शत्रुच्याच भूमीवर हरवायचं असतं.

    मोदी-शहा जोडी तेच करतायत...

    जनरल अय्यर, जनरल सिब्बल यांचा विजय असो!

    ReplyDelete
    Replies
    1. व्वा! जनरल अय्यर आणि सिब्बल!!!! चपखल!

      Delete
  2. भाऊ उत्तम विश्लेषण! आमच्या कल्पनेबाहेरचे आहे हे!दिवसेंदिवस आमच्याही ज्ञानात भर पदर आहे!

    ReplyDelete
  3. अबकी बार, . . . . . . . . . . अंतिम संस्कार।

    ReplyDelete
  4. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
    Replies
    1. मीडिया ने अमेरिकेत पण हिलरीच जिंकतील असं चित्र उभे केले होते...
      आणि निकाल के लागला.?

      Delete
    2. काँग्रेस अजून 10 वर्षे तरी नाही येत.

      Delete
  5. BJP should honor Manishankar Aiyyar for delivering "full toss and NO-ball" together in the last over of the match and that too when Chris Gayle is on the strike !!;)

    ReplyDelete
  6. विश्लेषण विजयी होवो. . .

    ReplyDelete
  7. भाऊ खूपच समर्पक उदाहरण दिले रशियाच्या थंडीचे, खूपच छान

    ReplyDelete