गुजरातच्या विधानसभा निवडणूका चालू असताना मणिशंकर अय्यर यांच्या घरात पाकिस्तानी अधिकारी व माजी मंत्र्याला मेजवानी देण्यात येते आणि तिथे पाकचे भारतातले राजदूत उपस्थित असताना माजी पंतप्रधान कशाला हजेरी लावतात? मनमोहन सिंग तिथे गेल्याचा व खलबते झाल्याचा नरेंद्र मोदींनी जाहिरसभेत उल्लेख केला, तर ही मंडळी कशाला खवळली होती? नंतर त्यासाठी मोदींनी माफ़ी मागावी म्हणून ते़च तमासगीर संसदेतही धुमाकुळ घालून कामकाज बंद पाडण्यात पुढाकार घेत होते. जेव्हा छुपा प्रकार उघडकीस आला, तेव्हा त्याला दुय्यम वर्गातील मुत्सद्देगिरी असेही साळसूद नाव देण्यात आलेले होते. पण देशाच्या सरकारलाच अंधारात ठेवून कुठली मुत्सद्देगिरी होऊ शकते? परदेशाशी थेट बोलणी करणार्यांना देशात घटना व निवडून आलेले सरकार अस्तित्वात असल्याचे दहा वर्षे पंतप्रधान राहुनही कळत नसते काय? अर्थात मनमोहन यांना त्याचा गंधही नसावा. त्यांना स्पेक्ट्रम घोटाळ्यात व कोळसा घोटाळ्यात तसे प्रमाणपत्रच न्यायालयाने दिलेले आहे. दोन्ही बाबतीत मनमोहन यांना अंधारात ठेवून निर्णय घेतले गेले, असे कोर्टानेच म्हटलेले आहे. त्यामुळे मनमोहन यांना राज्यकारभाराचे काडीमात्र ज्ञान नसावे, याबद्दल जाब विचारण्याची सोय नाही. पण ती मेजवानी व चर्चा दोन देशातील संबंधाविषयी असेल, तर त्यात आपला एक कुलभूषण जाधव नावाचा निवृत्त सैनिक पाकिस्तानात खितपत पडलेला असल्याचेही किमान भान असायला हवे ना? तिथे अय्यरच्या घरी जे कोणी दिवटे महान ‘माजी’ जमलेले होते, त्यापैकी कोणाला तरी त्याची जाणिव असल्याचे दिसले आहे काय? असती तर त्यांनीच आपल्या परीने पाक राजदूत वा माजी मंत्र्याला कुलभूषणसाठी रदबदली करण्यात पुढाकार घेतला असता आणि त्या शूरवीराच्या आई व पत्नीला शत्रू देशात अपमानित व्हावे लागले नसते.
मोदींनी प्रचारसभेत त्या मेजवानीचा उल्लेख केला, तेव्हा तिथे माजी लष्करप्रमुख दीपक कपूर उपस्थित असल्याचाही दावा करण्यात आला. त्यांची नेमणूक पदावर झालेली असल्याने ते लष्करप्रमुख नक्की होते. पण त्यांच्यामध्ये कितीसे देशप्रेम वा आपल्या भारतीय सैनिकांविषयी आस्था होती वा आहे? असती तर किमान त्यांनी पाकच्या राजदूताकडे कुलभूषणसाठी शब्द टाकला असता. कसुरी हे पाकचे माजी परराष्ट्रमंत्री तिथे आलेले होते. त्यांच्या शब्दाला पाकिस्तानात खुप वजन असू शकते. त्यांना कुलभूषणसाठी काही करा, असे कोणी सांगितले काय? अशा हालचाली केल्यास दोन देशातील संबंध सुधारण्यास मदत होऊ शकते. आमचे मित्र म्हणून पाकिस्तानात तुम्ही कुलभूषणसाघी रदबदली करा. इथे मग तुमच्या चांगुलपणाचे दाखले देऊन आम्ही भारतीय जनतेला संबंध सुधारण्यासाठी प्रवृत्त करू शकतो, असे मनमोहन व दीपक कपूर यांनी सांगितले होते काय? नसेल तर ही मंडळी काय नुसती मेजवानी झोडायला जमलेली होती? की भारतातील मोदी सरकारच्या विरोधातील डावपेच आखायला जमलेली होती? कारण यापुर्वीच पाकिस्तानच्या एका वाहिनीवर अय्यर यांनी जाहिरपणे मोदी हटावसाठी पाकिस्तानची खुलेआम मदत मागितलेली आहे. मग अशा माणसाच्या घरी योजलेल्या मेजवानी व चर्चेत अन्य कुठली खलबते होऊ शकतात? त्याच्या दुसर्याच दिवशी जो माणूस देशाच्या पंतप्रधानाला नीच म्हणतो, त्याच्याकडून कुठली मुत्सद्देगिरी होऊ शकते? आणि माजी लष्करप्रमुख म्हणून दीपक कपूर काय दिवे लावत असतात? ज्यांना आपल्या कारकिर्दीत कर्नल पुरोहितचा स्वदेशी पोलिसांकडून नुसत्या संशयावरून चाललेल्या छळवादाला पायबंद घालता आला नाही, त्याच्याकडून कुलभूषणसाठी पाकिस्तानातला छळवाद संपवण्यासाठी शब्द टाकला जाण्याची अपेक्षा कोणी करावी? काय नमूने जमलेले होते तिथे?
जेव्हा मोदींनी या बैठकीचा उल्लेख केला, तेव्हा चोराच्या उलट्या बोंबा चालू झाल्या. कसुरी वा अन्य कोणी पाकिस्तानी दिल्लीत मेजवानीला आले असतील, तर त्यांना व्हिसा कोणी दिला होता, असाही उलटा प्रश्न विचारला गेला. त्यालाच मोदी सरकारची सभ्यता म्हणातात. ज्याला हे पुरोगामी शहाणे अन्याय्य राजवट म्हणत असतात. ती मोदी सरकारची भारतीय सभ्यता आहे आणि त्याचाच गैरफ़ायदा पाकिस्तान राजरोस उचलत राहिला आहे. कारण त्याला मायदेशी खाऊनपिवून राष्ट्रवादालाही शिव्या मोजणारे मित्र भारतात मिळालेले आहेत. जशास तसे वागायची भारताला व सरकारला मुभा असती, तर कसुरी वा पाक राजदूताला इतक्या उजळमाथ्याने इथे मस्ती करता आली नसती. किमान भारतीय सभ्यतेचे दोनचार लोक पाकिस्तानात असते, तरी कुलभूषणच्या आई व पत्नीची इतकी अवहेलना तिथे होऊ शकली नसती. अय्यर सारखे मस्तवाल वा मनमोहन यांच्यासारखे नेभळट तिथे कोणी भारताला दोस्त मिळाले असते, तर कुलभूषणला चोरट्यासारखी आपल्याच आई वा पत्नीची भेट घेण्याची नामुष्की आली नसती. तिथे भेटीच्या इमारतीत त्या दोघींचे कपडे बदलण्याची सक्ती झाली, त्यांच्या वहाणा बदलल्या गेल्या. कपाळावरचे कुंकू व गळ्यातले मंगळसुत्र बाजूला काढून ठेवावे लागले. ही अवहेलना जिथे राजशिष्टाचार म्हणून केली जाते, त्यांच्याशी मैत्री वा जिव्हाळ्याचे संबंध असणार्यांची लायकी कळू शकते. मग ते दीपक कपूर असोत किंवा मनमोहन सिंग असोत. त्यांनी पुर्वी कुठलीही पदे भूषवलेली असोत. आताही हा तपशील उघडकीस आल्यानंतर मेजवानीला उपस्थित राहिलेल्या कोणाची दातखिळी उघडलेली नाही. पाकिस्तानचा निषेध करण्याची हिंमत त्यापैकी कोणाला झालेली नाही. किमान दीपक कपूर यांनी आपल्या गणवेशाला साजेशी प्रतिक्रीया द्यायला हवी होती. देता येत नसेल तर त्यांनी जनरल पदाचाच अवमान केलेला नाही काय?
खरे तर ह्या अनुभवातून गेलेल्या मनमोहन सिंग या माणसाची कींव करावी असे वाटते. इतके शिक्षण व जगभरची मान्यता असलेल्या या माणसाला काही किमान इज्जत वा प्रतिष्ठा तरी उरली आहे काय? संसदेच्या अधिवेशनात आपल्या अपमानासाठी पंतप्रधानाकडे माफ़ीची मागणी करणार्या पक्ष सहकार्यांना कुठली प्रतिष्ठा, असे तरी मनमोहन सिंग यांनी विचारले असते, तरी पुरे झाले असते. कुलभूषणच्या आई व पत्नीला ज्याप्रकारे पाकिस्तानात वागवले गेले, त्यातून अवघ्या देशाची प्रतिष्ठाच उधळली गेली आहे. ते मनमोहन व तत्सम लोकांना कळत नसेल, तर ते कुठल्या प्रतिष्ठेविषयी बोलत असतात? त्यापैकी कोणालाही पाकिस्तानचा निषेध करण्याची बुद्धी झालेली नसेल, तर त्यांच्याविषयी कुठल्याही भारतीयाला शरमच वाटेल. कुलभूषणवर कसलेही गंभीर आरोप असतील. पण त्याची आई व पत्नी यांना सन्मानाने वागवण्य़ात पाकिस्तान तोकडा पडलेला असेल, तर आपली तथाकथित मैत्री पणाला लावण्याची हिंमत मनमोहन व अय्यर यांना दाखवता आली पाहिजे. अर्थात भारतीय असल्याचा स्वाभिमान त्यासाठी आवश्यक असतो. त्याचाच ज्यांच्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे, अशांकडून कोणी कसली अपेक्षा करावी? त्यांनीही भारतीयांनी त्यांची प्रतिष्ठा राखावी वा सन्मान देण्याची अपेक्षा बाळगू नये. अशा लोकांवर गुजरातच्या प्रचारसभेत संशय व्यक्त करून मोदींनी अपमान केलेला असेल, तर मोदींनी नालायकांचा उल्लेख तोंडून झाला म्हणून जरूर माफ़ी मागावी. कारण असे लोक सन्मानाच्या लायकीचे नसतातच, पण अपमानाच्याही लायकीचे नसतात. त्यांच्या लाखोपटीने कुलभूषणची आई व पत्नी प्रतिष्ठीत आहेत आणि देशाचा गौरव म्हणून त्यांचा कोणाही भारतीयाला अभिमानच वाटेल. असली कीड ज्या देशाला व समाजाला लागलेली आहे, त्यापासून सुटका झाल्याशिवाय भारताला भवितव्य असू शकत नाही.
हे स्वतःला समजतात कोण सरकार अस्तित्वात आहे, लोकानी बहुमताने निवडून दिलेले आहे मग हे कशी काय मीटिंग घेऊ शकतात, यांच्या धोरणाला जनतेचा विरोध होता म्हणून सत्ता बदलली तरी यांचे आपले चालूच आहे. खरोखर बंदी घातली पाहिजे.
ReplyDeleteभाऊ .................मस्त लेख !! शीर्षक तर एकदम मनाला भिडणारे !!
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteभारतात लोकशाही आहे हि खूप चांगलीच गोष्ट आहे... गेल्या ७० वर्षात आपल्याकडे लोकशाही नीट टिकून आहे हे सुद्धा कौतुकास्पद आहे...
परंतु आज असा वाटत कि, अगदी अल्पशा प्रमाणात संविधानात मिलेट्री ला अजून काही अधिकार द्यावेत...
जे कोणी पार्लमेंट चालूनच ना देणे, सर्जिकल कारवाई चे पुरावे मागतात आणि तत्सम गुह्यांना मिलेट्री ने आपल्या पद्धातीने कडक शासन देऊन निकालात काढले पाहिजे.
पार्लमेंट मध्ये तुम्ही सरकार ला धारेवर धरा, टीका करा पण हे जे बॅकमेलिंग करणं चालू आहे ते ताबडतोप बंद झाला पाहिजे
जनतेच्या पैशावर अशे धंदे केले नाही पाहिजेत
ते अशासाठी कि, आपल्या देशात देशविघातक शक्ती वाढल्या आहेत...
"भारत तेरे तुकडे होंगे" अशा घोषणा ऐकण्यासाठी का थोर पुरुषांनी जीव दिला आपला? हे ऐकण्यासाठी का भगत सिंग, राजगुरू, सुखदेव हे हसत हसत फासावर चढले?
आज रोज जवान सीमेवर जीवाची पर्वा न करता रक्षण करतात त्यांचा जीव स्वस्त आहे का आपल्याला ?
वाह!!! जबरदस्त भाऊ!!!!
ReplyDeleteसडेतोड विवेचन......
नेहमी प्रमाणेच अतिशय सडेतोड!
ReplyDeleteभाऊ हा लेख मी शेअर करीत आहे तरी कृपया परवानगी द्यावी ही विनंती
ReplyDelete