Wednesday, December 20, 2017

बालीश आणि फ़ुलीश

hardika alpesh jegnesh के लिए इमेज परिणाम

मागल्या लोकसभेच्या निवडणूकांचे वेध लागले असताना एकच ज्येष्ठ पत्रकार सावधानतेचा इशारा देत होता, त्याचे नाव ‘नई दुनिया’चा संपादक शाहिद सिद्दीकी! नरेंद्र मोदी यांची जितकी बदनामी करायला जाल, तितका तो माणूस त्याचा अधिक लाभ उठवतो; असा त्याचा इशारा होता. पण शब्दाचा मार शहाण्यासाठी उपयोगी असतो. जे अतिशहाणे असतात, त्यांना आपणच भाषाप्रभू वाटत असल्याने ते शब्दातले इशारे समजू शकत नाहीत. म्हणून असेल मोदींवरची टिकाटिप्पणी चालूच राहिली आणि त्याचा पुरेपुर लाभ उठवित मोदींनी आपली प्रचार मोहिम पुढे रेटलेली होती. मात्र त्याचे इतके परिणाम बघूनही कोणी शहाणा व्हायला तयार नाही. धडा हा शिकण्यासाठी असतो. पण ज्यांना शिकायचेच नसते, त्यांना कुठलेही धडे देऊन उपयोग नसतो. गुजरात निवडणूक त्याच मार्गाने निघालेली दिसते आहे. अन्यथा पुन्हा गुजरातच प्रचार वा मोहिमा मोदी या व्यक्तीच्या विरोधात कशाला भरकटल्या असत्या? वाटेल ते खोटे मोदी विरोधात बडबडून मागल्या पंधरा वर्षात माध्यमांनी अणि राजकीय विरोधकांनी मोदींना मोठे करून ठेवलेले आहे, वास्तवात मोदी हे तितके मोठे आव्हान नाही. पण त्यांच्याविषयी जे खोटेनाटे पसरवण्यात आले, त्याच्या खोट्या पडण्यातून मोदी हेच सत्याचा पुतळा होऊन गेलेले आहेत. आताही राहुल गांधी यांनी दोन महिने गुजरात प्रचारात मोदींच्या अखंड व्यक्तीमत्वाभोवती आपल्या प्रचाराची सीमा रेखा आखून घेतलेली होती आणि त्यांचीच री ओढताना बहुतेक विरोधकांनी मोदींला लक्ष्य बनवण्यात धन्यता मानली त्याचा परिणाम असा झाला, की आपापल्या परीने प्रत्येकजण अधिक भडक व उथळ विधाने करण्यात रमला आणि मोदी त्याचा लाभ उठवित पुढे गेले,. शेवटच्या काळात मोदींच्या मश्रूमची कहाणी अशीच अत्यंत बालीश व मुर्खपणाचा नमूना होता.

निवडणूकीच्या दोन महिने आधी कॉग्रेसने ओबीसी नेता म्हणून गणला जाणार्‍या अल्पेश ठाकूर या तरूणाला हाताशी धरलेले होते. त्याला पक्षात घेऊन उमेदवारीही दिली. त्याने अखेरच्या दिवशी प्रचार करताना मोदी तैवानी मश्रूम खातात, म्हणून त्यांची कांती गोरी झाली असल्याचा शोध लावला. किंबहूना त्या तैवानी मश्रूमची प्रत्येकी किंमत ८० हजार रुपये असून प्रतिदिन मोदी पाच म्हणजे ४ लाख रुपयांची मश्रूम खातात, असा बेछूट आरोप करून टाकला. कुणाही व्यक्तीचे डोके ठिकाणावर असेल, तर त्याला यातला फ़ोलपणा लगेच कळू शकतो. त्यासाठी फ़ार मोठी बुद्धी असायची गरज नाही. तैवानी मश्रूम इतके महाग व गुणकारी असते, तर जगात त्याचा खुप पुर्वीपासून गवगवा झाला असता. गोरेपणासाठी भलत्यासलत्या क्रीमचे लेप अंगावर चढणार्‍या श्रीमंत महिला वा पुरूषांनी तेच मश्रूम खाल्ले असते आणि त्याच्या भल्याथोरल्या जाहिराती क्रीमपेक्षाही झळकल्या असत्या. पण असे कधी कोणी कुठे ऐकले नाही किंवा कुठल्या जाहिरातीतही त्याचा उल्लेख आला नाही. मग अल्पेश सारख्या अल्पमतीच्या मुर्खाने हा शोध कुठून लावला? असा भन्नाट आरोप करण्यापर्यंत त्याची मजल कशाला गेली? कोणीतरी हा विषय इंटरनेटवर टाकला आणि तो बघून तैवानच्या काही तरूणींनी हे धडधडीत खोटे असल्याचा खुलासा आपल्या परीने केला. म्हणजे झाले काय? मोदींची बदनामी कॉग्रेसच्या एका दिवट्याने करण्यासाठी खुळ्यासारखे विधान केले आणि त्याला भाजपा नव्हेतर जगाच्या भलत्याच कोपर्‍यातून सणसणित उत्तर मिळाले. अशा खुळ्या अपप्रचाराने मोदींना पराभूत करणे शक्य असते, तर मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकले नसते. त्यांनी कधीच राजकारण सोडून संन्यास घेतला असता. पण कारभार वा विकासात काही मोठी मजल मारण्यापेक्षा मुर्खांचा खुळेपणा उघड करण्यातूनच मोदींचा कार्यभाग नेहमी साधला गेलेला आहे.

राहुल गांधी यांनी विकास कुठे आहे, असा प्रश्न मागल्या दोन महिन्यात प्रत्येक सभेतून विचारला. ज्या गुजराती जनतेला चोविस तास वीजपुरवठा होतो आहे आणि रस्ते उत्तम असल्याने हिंडता फ़िरता येते आहे, तिला विकास कुठे असा प्रश्न विचारणार्‍या राहुलनी बारा वर्षात अमेठी या आपल्या मतदारसंघात काय दिवे लावले? त्यांच्या अमेठीतल्या कहाण्या गुजरातच्या ता प्रचारात भाजपावाल्यांनी सविस्तर कथन केलेल्या आहेत. वाहिन्यांवरही त्याची चर्चा झालेली आहे. केंद्रातील सत्ता सलग कित्येक वर्षे कुटुंबाकडे असताना अमेठीत राहुल गांधी साधा हायवे किंवा जिल्हा मुख्यालयाची इमारत अर्धशतकात उभी करू शकले नसतील, तर त्यांनी असे विषय आपल्या प्रचारात निदान गुजरातमध्ये टाळायला हवे होते. आकडे व काही उदाहरणे देऊन मोदी वा भाजपा हे आरोप उध्वस्त करून टाकू शकत असतील, तर तसे आरोप करणेच शुद्ध मुर्खपणा असतो. जी पोपटपंची राहुलनी गुजरातमध्ये मागल्या दोन महिन्यात केली, ती गतवर्षी याच कालखंडात उत्तरप्रदेशात चालविली होती. ‘२७ साल युपी बेहाल’ अशी त्यांची घोषणा होती. ती दुर्दशा ज्यांनी केली असा राहुलचा आरोप होता, त्याच्याशीच त्यांनी अखेरच्या टप्प्यात युती केली आणि आपल्यासह समाजवादी पक्ष व अखिलेश यादव यांनाही बुडवले होते. जो आरोप उत्तरप्रदेश विधानसभेत फ़सलेला होता, त्याचीच पुनरावृत्ती गुजरातमध्ये करून नेमका काय चमत्कार राहुल घडवू बघत होते? त्यांनाच ठाऊक! कॉग्रेसची सत्ता असेपर्यंत प्रत्येक राज्यात लोक गुण्यागोविंदाने नांदत होते आणि नंतरच त्या राज्यांचा विध्वंस झाला, असला आरोप मान्य करण्याइतके मतदार आता निर्बुद्ध राहिलेले नाहीत. हे राहुलना कोणी पटवून द्यायचे? पण राहुलच इतके बेताल बेछूट आरोप करीत असतील व त्यालाच माध्यमे मोठी प्रसिद्धी देणार असतील, तर अल्पेशने मुर्खपणा करण्याला पर्याय उरत नाही.

अल्पेश इतके बालीश व फ़ुलीश आरोप का करू शकला? त्याला त्यासाठी कुठून प्रेरणा मिळाली? राहुल गांधी उत्तरप्रदेश प्रचारात काय बडबडत होते? जौनपूरला गेल्यावर म्हणाले ओबामांच्या व्हाईट हाऊसमध्ये गेलो तर तिथल्या स्वैपाकघरातल्या पातेल्यावर मेड इन जौनपूर उत्तरप्रदेश असे मला वाचायचे आहे. त्यांच्या बेडरूममध्ये गेलो तर तिथल्या चादरीवर मेड इन वाराणशी उत्तरप्रदेश असे वाचायला मिळाले पाहिजे, असे राहुलनी वाराणशीच्या प्रचारसभेत सांगितले. प्रत्यक्षात तेव्हा ओबामा निवृत्तही झालेले होते. गुजरातमध्ये ते म्हणतात, तुम्ही एक सेल्फ़ी खेचता तेव्हा चिनी तरूणाला रोजगार मिळत असतो. तेच त्यांनी हिमाचलच्या प्रचारसभेत सांगितले. सेल्फ़ी घेतल्यावर चिनी माणसाला त्या मोबाईलच्या मागे मेड इन हिमाचल वाचायला मिळाले पाहिजे. ही मुक्ताफ़ळे चक्क खुळेपणाचे नमूने होते. माध्यमातील दिड शहाण्यांनी त्यावर कधीतरी बोट ठेवले काय? खरेच राहुलची इतकी महत्वाकांक्षा होती, तर मोबाईलचा जमाना इतका तेजीत आला, तेव्हा त्यांचीच सत्ता देशात व अनेक राज्यात होती. तसे कारखाने भारतात आणून मोबाईल उत्पादनाचे भारताला आगर बनवण्यापासून त्यांना कोणी रोखले होते? तीन वर्षे देशाची सत्ता हाती घेतलेल्या नरेंद्र मोदींनी राहुलच्या एकाहून एक खुळचट इच्छा आकांक्षा अल्पावधीत पुर्ण केल्या पाहिजेत. राहुल व त्यांची जन्मदाती दहा वर्षे देशाची सत्ता उपभोगत होते, तेव्हा त्यांनी त्याच इच्छा आकांक्षा तळघरात दडपून ठेवल्या होत्या काय? त्यांना असली महान अर्थक्रांती करण्यापासून गुजरातच्या तात्कालीन मुख्यमंत्री मोदींनी रोखले होते काय? आज जागेपणी राहुल अनेक दिवास्वप्ने बघत आहेत आणि सत्ता हाती असताना मस्त झोपा काढत होते. मात्र झोपेतही त्यांना इतकी महान अदभूतरम्य स्वप्ने पडत नव्हती काय? सामान्य बुधीच्या माणसालाही यातला बालीशपणा कळतो. पण त्याचेच नेतृत्व पत्करल्यावर अल्पेशने शहाण्यासारखे कसे बोलावे?

राहुल थोडे खुळचट बोलले तर त्याला प्रसिद्धी मिळताना बघून अल्पेश वा हार्दिकने आणखी सवाई खोटेपणा वा वेडगळपणा केल्यास नवल कुठले? त्यातून मग ऐंशी हजार रुपयांचा एक एक मश्रूम ही चित्तचक्षू चमत्कारीक वेडगळ कल्पना उदयास येत असते. माध्यमातले मोदी विरोधाची कावीळ झालेले त्यालाच लाट ठरवू बघत असतील, तर त्याला सामान्य जनता फ़सत नसते. दुसर्‍या फ़ेरीतले मतदान चालू असताना मरगळून गेलेला हार्दिक व अल्पेश यांचे चेहरेच मतदान यंत्रात जमा होणार्‍या मतांचे प्रतिक दाखवत होते. त्यांचा आवेश संपला होता आणि यापुढे आपल्या थापा किंवा बेताल आरोप उपयोगाचे राहिलेले नाहीत, याचे भान आलेले दिसत होते. मुद्दा इतकाच आहे, की अशा खोटेपणाने वा बेताल आरोपांनी मोदींना पराभूत करणे शक्य नाही. पण म्हणून भाजपाचे दिर्घकालीन सरकार फ़ारच कल्याणकारी व लोकांच्या जीवनात सुखसमाधान घेऊन आलेले आहे; असेही कोणी म्हणू शकणार नाही. म्हणूनच दोन दशकाच्या सत्ताकाळात भाजपाला काय काय करणे शक्य होते, ते सांगून त्यात भाजपा अपयशी ठरल्याचे जनमानसात रुजवण्याला प्राधान्य देण्याची गरज होती. काहीच विकास झाला नाही व फ़क्त गुजरातचे नुकसानच झाले, यावर कोण कशाला विश्वास ठेवणार? त्यातून आपल्या अज्ञानाचीच प्रसिद्धी होत असते आणि अशा अडाण्यापेक्षा थोडा कामचुकार कारभारी परवडला अशी लोकांची धारणा होते. किंबहूना मागल्या दोन दशकात भाजपा किंवा मोदी यांची तीच जमेची बाजू झालेली आहे. भाजपा उत्तम कारभार वा कल्याणकारी सरकार देऊ शकलेल नसेल. पण त्यातल्या त्यात सुसह्य कारभार मात्र ते देऊ शकलेले आहेत. त्याचीही जाण ज्यांना नाही, त्यांच्या हाती राज्याची सत्ता सोपवणे म्हणजे आत्महत्या ठरेल, असेच गुजराथी समाजाला भय वाटले तर नवल नाही. बालीशपणापेक्षा किमान व्यवहारी अक्कल असलेला घरगडीही लोकांना स्विकारणे भाग पडत असते.

3 comments:

  1. गुजरात निकालावर शिवसेनेने केलेल्या टिकेला काही उत्तर आहे का

    ReplyDelete
  2. "बालीशपणापेक्षा किमान व्यवहारी अक्कल असलेला घरगडीही लोकांना स्विकारणे भाग पडत असते."
    bhau barobar bolalat... khup abhyasu analysis!

    ReplyDelete
  3. मी कोणी मोदी भक्त नाही, पण देशहितासाठी मोदींनी जे निर्णय गेल्या 3 वर्ष्यात घेतले, त्यापैकी 10 टक्के जरी निर्णय काँग्रेस ने गेल्या 60 वर्ष्यात घेतले असते तर आज भारत महासत्ता असता ।

    ReplyDelete