Wednesday, December 20, 2017

खरी परिक्षा पुढेच आहे

senior congressmen के लिए इमेज परिणाम

गुजरातच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने कसेबसे आपले बहूमत टिकवले, म्हणून अनेक मोदी विरोधक सुखावले आहेत. त्यांना आता भाजपाचा विजयरथ वा मोदी लाट ओसरू लागल्याचा आत्मविश्वास आलेला असेल, तर लोकशाहीसाठी उत्तमच गोष्ट आहे. पण यातला सापळा असा असतो, की तुटपुंज्या यशाने झिंगतात, त्यांना पुढल्या लढाईचे भान रहात नाही. गुजरातमध्ये कॉग्रेसला मिळालेले यश हे राहुल गांधींचे आहे; अशी ज्यांनी समजूत करून घेतलेली आहे, त्यांनी खुश रहाण्यात मोदी वा शहांना कुठला आक्षेप असेल, असे अजिबात वाटत नाही. कारण गुजरातची निवडणूक त्यांच्यासाठी अवघडच होती. देशातली काही राज्ये अशी आहेत, तिथे भाजपा आणि कॉग्रेस हेच दोन प्रमुख पक्ष आहेत. तिथे कॉग्रेसला कितीही अपयश आले तरी फ़लकावर काही जागा त्यांनी जिंकलेल्या दिसणारच. पण उत्तरप्रदेश बिहार अशा राज्यात दुहेरी लढत नसल्याने खरी कसोटी तिथे लागत असते. बिहारमधल्या यशाचा डंका राहुल गांधी पिटत असतात. तिथे त्यांच्या यशाला लालू नितीशच्या मतांच्या कुबड्या मिळाल्या होत्या आणि गुजरातमध्ये तीन तरूण नेत्यांच्या बळावर कॉग्रेस इतकी बाजी मारू शकलेली आहे. त्याला राहुल वा त्यांचे चहाते आपले मोठे यश मानणार असतील, तर खरी कसोटी कर्नाटकात लौकरच लागणार आहे. कारण मागल्या खेपेसही तिथे कॉग्रेसला सत्ता मिळाली तरी प्रत्यक्षात तिथे भाजपाने आत्महत्या केल्याचा तो परिणाम होता. तरीही प्रत्येक निष्ठावंताने त्याचे श्रेय राहुलनाच दिलेले होते. त्याचे पितळ लोकसभेत उघडे पडले. भाजपाचे दोन्ही गट एकत्र आले आणि बहुसंख्य जागा भाजपा जिंकून गेला. म्हणूनच खरी कसोटी आता कर्नाटकात लागणार आहे. त्यातही देवेगौडा यांच्या पक्षाला सोबत घेऊन राहुल गांधी जाऊ शकतात वा नाही, ही कसोटी आहे. तरच भाजपाशी कॉग्रेसला यशस्वी टक्कर देता येईल.

कर्नाटक विधानसभा पुढील वर्षाच्या पुर्वार्धात व्हायची असून वर्ष अखेरीस तीन अन्य विधानसभा निवडणूका व्हायच्या आहेत. ह्या पुढल्या लोकसभा मतदानापुर्वीच्या महत्वाच्या निवडणूका आहेत. कारण तिथूनच लोकसभेचे वेध लागणार आहेत आणि मोदींच्याही प्रतिष्ठेला तेच खरे आव्हान आहे. गेली लोकसभा जिंकल्यानंतर मोदी यांनी लोकसभेत पहिले भाषण करताना एक विधान केलेले होते. पुढली चार वर्षे आपण एकत्रितपणे देशाचा कारभार हाकूया आणि अखेरच्या वर्षात निवडणुकीचे काही असेल ते राजकारण करूया, असे त्यांचे आवाहन होते. पण विरोधकांनी त्यांना जुमानले नाही आणि साडेतीन वर्षे उलटून गेली तरी मोदी निवडणुका जिंकण्याच्या मनस्थितीतून बाहेर येऊ शकलेले नाहीत. किंबहूना त्यांना विरोधकांनीच बाहेर येऊ दिलेले नाही. त्याचा परिणाम असा झालेला आहे, की विरोधकांनाच अधिकाधिक हानी पत्करावी लागलेली आहे. अनेक नव्या राज्यातील सत्ता भाजपाने मिळवलेली आहे आणि हातात होती तिथली सत्ता टिकवलेली आहे. सहाजिकच पुढल्या वर्षात होणार्‍या चारही प्रमुख राज्यातील विधानसभा निवडणूका प्रामुख्याने कॉग्रेस आणि भाजपा यांच्यातहीच लढाई आहे. त्यात भाजपाने तीन राज्यात असलेली सत्ता टिकवली आणि कर्नाटकात गमावलेली सत्ता हिसकावून घेतली, तर २०१९ च्या लोकसभेचा निकाल मतदानापुर्वीच लागलेला असेल. म्हणूनच राहुल गांधी यांच्यासाठी खरी परिक्षा पुढेच आहे. पण त्यांचे दुर्दैव असे आहे, की त्यांचे चहाते व समर्थक राहुलना परिक्षेच्या मानसिकतेतच येऊ देत नाहीत. सर्व काही इतके सोपे असल्याचा आभास निर्माण केला जातो, की राहुल कुठल्याही परिक्षेला गंभीरपणे सामोरे जाऊ शकत नाहीत आणि निकालाच्या वेळी त्यांचा पप्पू होण्याला पर्याय उरत नाही. गुजरातच्या निकालाने तेच सिद्ध केले आहे आणि राहुल पराभवा़च्या नशेत झिंगून गेलेले आहेत.

गुजरात प्रचारात आणि निकाल लागल्यानंतरची राहुल गांधी यांची भाषा व विधाने काळजीपुर्वक तपासली, तर त्यांना विजय पराजयातला फ़रक कळतो किंवा नाही, अशी शंका येते. कुणा खुळ्याने त्यांना नैतिक विजयाचे ज्ञान दिले आणि हा नवा नेता काही महान शोध लागल्यासारखा आपल्या नैतिक विजयाच्या गमजा करत बसला आहे. याचा इतकाच अर्थ होतो, की निकालाची कुठलीही गंभीर दखल राहुल गांधींनी घेतलेली नाही. आपण काही जागा गमावल्याचा खेद व खंत निकालानंतर पक्षाच्या मुख्यालयात बोलणार्‍या मोदींच्या चेहर्‍यावर साफ़ दिसत होती. पण हातातोंडाशी आलेला विजय निसटल्याची कुठलीही वेदना राहुलच्या देहबोलीत सापडणार नसेल, तर त्यांच्यापेक्षाही त्यांच्या चहाते व समर्थकांची कींव येते. नुकत्याच संपलेल्या एकदिवशीय मालिकेत पहिलाच सामना भारताला हरवून श्रीलंकेने बाजी मारली होती. कुणा खेळाडू वा संघनायकाच्या हलगर्जीपणाने तो विजय हुकला असता, तर त्याला नैतिक विजय म्हणता आले असते काय? कारण नंतर पुन्हा भारतीय संघाने दणदणित कामगिरी करून श्रीलंकेचा धुव्वा उडवला. म्हणजेच हाती आलेली प्रत्येक संधी ओळखून तिथे पुर्ण शक्तीनिशी झोकून देणे अगत्याचे असते. राहुल गांधींमध्ये नेमका त्याच भावनेचा वा समजूतीचा अभाव आहे. गोव्यात वा मणिपुरमध्ये कॉग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेला असतानाही, सरकार स्थापन करण्यात कालापव्यय झाला आणि बाजी उलटली होती. त्यातली तटस्थता वा गुजरात निकालानंतरचा राहुलचा अलिप्तपणा, यात तसूभर फ़रक नाही. वेळाकाळाचे व परिस्थितीचे कुठलेही भान नसलेल्या अशा व्यक्तीकडून मोदी वा भाजपाचा पराभव करण्याची अपेक्षा, म्हणजे चमत्काराचीच अपेक्षा असू शकते. म्हणून राहुल समर्थकांची दया येते. राहुल नाही तरी अशा समर्थकांना त्यातल्या अडचणी वा समस्या दिसत नसतील काय?

एक गोष्ट स्वच्छ व स्पष्ट आहे. मोदी कितीही मेहनती असले वा शहा कितीही मुरब्बी असले, म्हणून ते अजिंक्य नाहीत. त्यांना कोणी हरवू शकत नाही, असेही कोणी म्हणू शकत नाही. पण त्यांच्यातली चिकाटी व इर्षा बघितली, तर त्यांना जिंकण्याची अतीव इच्छा कार्यरत करताना दिसेल. त्यासाठी आवश्यक ते सर्व कष्ट उपसण्याची मानसिक तयारी त्यांना विजयाकडे घेऊन जाते. त्याहीपेक्षा ही लढाई कृतीवीर व वाचाळवीर यांच्यातली होत चालल्याने, मोदी अजिंक्य भासू लागलेले आहेत. परंतु त्यांच्या इतके कष्ट उपसण्याची वा झोकून देण्याच्या कुवतीचा कोणी नेता विरोधकांनी आखाड्यात आणला, तर अजिंक्य मोदी या भ्रमाचा भोपळाही फ़ुटू शकतो. दुर्दैव असे आहे, की तसा कोणीही नेता विरोधकांच्या गोटात आजतरी दिसत नाही. तशी कुठलीही कुवत वा क्षमता राहुलमध्ये नसताना विरोधक त्यांच्यावरच आशा लावून बसलेले आहेत. साधी दोन उदाहरणे इथे त्याच गोटातली देता येतील. जिग्नेश वा अल्पेश या दोन तरूणांनी आपापल्या मतदारसंघात भाजपाला झोपवून दाखवले. पण राहुलचे निकटवर्ति व खरे कॉग्रेसी शक्तीसिंग गोहील व अर्जुन मोडवाडीया आपल्याच पारंपारिक जागी पराभूत झाले आहेत. त्या दोन तरूणांना जिंकण्याची अतीव इच्छा होती व त्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व झोकून दिलेले होते. तर कॉग्रेस नेते राहुलच चमत्कार घडवणार म्हणून आशाळभूत होते. भाजपा बाजूला ठेवून कॉग्रेसला आपल्याच गोटातील ह्या फ़रकाचा अभ्यास करायला हरकत नाही. जिग्नेश अल्पेश यांच्यामुळे किती मते येतील, त्याचा हिशोब करण्यापेक्षा त्यांच्यातल्या जिंकण्याच्या इर्षेला कॉग्रेसने वा मोदी विरोधकांनी आत्मसात केले, तरच मोदींना पराभूत करता येईल. नैतिक विजयाचे मुखवटे लावण्याची गरज उरणार नाही. म्हणूनच म्हटले खरी परिक्षा येत्या वर्षात म्हणजे २०१८ च्या चार विधानसभा निवडणूकीत व्हायची आहे.

No comments:

Post a Comment