मंगळवारी कधी नव्हे ते खुद्द शरद पवार नागपूरच्या ‘हल्ला बोल’ मोर्चात आघाडीवर होते आणि जोडीला खासदार सुप्रिया सुळेही पदर खोवून फ़डणवीस सरकारला इशारे व धमक्या देण्यात खुप पुढे होत्या. त्यातून भाजपा सरकार किती हादरले, हा भाग वेगळा! पण विरोधी पक्षात बसलेल्या राष्ट्रावादीच्या अनेक नेत्यांना धडकी भरलेली असेल. कारण साहेब व त्यांची कन्या इतक्या आवेशात येतात, त्यानंतर त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागत असतात. योगायोग असा, की मोर्चाच्या दिवशीच राज्य सरकारने अजितदादा व सुनील तटकरे यांच्या विरोधात आजपर्यंत रोखून धरलेल्या कारवाईला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि त्यानंतर दोघांसह काहीजणांच्या विरोधात एफ़ आय आर दाखल झालेले आहेत. त्यामुळेच इशारा मुख्यमंत्र्यांनी कोणाला दिला की पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला, याविषयी शंका घ्यायला जागा आहे. दोन वर्षापुर्वी अशीच काहीशी चमत्कारीक स्थिती होती. तेव्हाही पवार व कन्या आवेशात आलेले होते. याचे सर्वांनाच विस्मरण झालेले आहे काय? काही दिवसातच साहेब आणि त्यांची कन्या आवेश विसरून गेले. पण दिर्घकाळ लोटला तरी बिचारे छगन भुजबळ तुरूंगात खितपत पडलेले आहेत. त्यांचे कोणालाही स्मरण राहिलेले नाही. पण जेव्हा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला व त्यांना अटक झाली, तेव्हा साहेब काय बोलले होते? सुप्रियाताईंनी कोणता इशारा दिला होता? कोणाला त्यापैकी काही आठवते काय? साहेब म्हणाले होते, आता मला कधी अटक होते त्याची प्रतिक्षा करतोय. सुप्रियाताई गर्जल्या होत्या, कितीही लोकांना पकडा तुरूंगात टाका, आम्ही घाबरत नाही. पुढे छगनभाऊ तुरूंगात गेले आणि ताई व साहेब आपापल्या कामात गर्क होऊन गेले. म्हणून हल्ला बोल मोर्चातल्या इशार्याची चिंता वाटते आहे. तो फ़डणवीसांना इशारा आहे की अजितदादा तटकरेंना दिलेला संकेत आहे?
सिंचन घोटाळा हा मागील आघाडी सरकारच्या कालखंडातील गाजलेला विषय आहे. त्याला तात्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही खतपाणी घातले आणि पुढे तपास करून श्वेतपत्रिकाही काढण्यात आलेली होती. त्यावर पडदा पाडण्यासाठी अजितदादांनी आपल्या पदाचा राजिनामाही दिला होता. तरीही ते प्रकरण संपले नव्हते आणि लाचलुचपत विभागाने त्याची तपासणी केलेली होती. त्यानंतर सत्तांतर झाले आणि दिर्घकाळ हा विभाग गुन्हा नोंदवण्यासाठी सरकारकडे पराअनगी मागून राहिला आहे. पण ती परवानगी मिळत नव्हती आणि अजितदादा व तटकरेंना जीवदान मिळालेले होते. त्यविषयी लोकांनी खुप प्रश्नही विचारून झाले आणि भुजबळांचा बळी देऊन साहेबांनी पुतण्याला वाचवले काय, अशीही टिका होत राहिली. पण पुढे काहीही होत नव्हते. आता अकस्मात त्याच विषयात गुन्हा दाखल झालेला असेल, तर मग सौदा संपलेला आहे काय आणि पुतण्याचाही बळी देण्याची साहेबांनी मानसिक तयारी केलेली आहे काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यात किंचीतही तथ्य असेल तर हा अजितदादांसाठी धोक्याचा इशारा ठरतो. किंबहूना तिकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून हल्ला बोलची गर्जना झालेली आहे काय? म्हणजे तिकडे फ़डणवीसांनी अजितदादांची गठडी वळायची आणि त्यात पक्षाला पडायची वेळ येऊ नये, म्हणून साहेबांनी हल्ला बोलचा गदारोळ उडवून द्यायचा; असा काही बेत शिजलेला होता काय? कारण तसेच झालेले आहे. वर्तमानपत्रात वा माध्यमात गुन्हा दाखल झाल्याची बातमी नगण्य आहे आणि साहेबांच्या इशार्याच्या मोठ्या बातम्या झळकलेल्या आहेत. त्यावर मोर्चात वा नंतरही साहेबांनी अवाक्षर उच्चारलेले नाही. म्हणून यात मिलीभगत वाटते. कालच्या मोर्चात अजितदादाही कुठे फ़ारसे झळकत नव्हते आणि त्यांच्यावरच सरकारची टांगली तलवार कोसळली आहे. पुढे काय व्हायचे? दादा संभाळा बुवा!
अशीच तक्रार भुजबळांच्या बाबतीत नोंदली गेली आणि नंतर त्यावर कारवाई सुरू झाली होती. त्यांना ताब्यात घेण्यात आले, तेव्हा खुप गर्जना झाल्या होत्या. साहेबांसह राष्ट्रवादी पक्षातर्फ़ेही आरोळ्या ठोकल्या गेल्या होत्या. पण कोर्टात वा अन्य लढाया भुजबळ एकाकी लढवत असून राजकीय आघाडीवर त्यांच्याच सहकारी व नेत्यांनी पाठ फ़िरवलेली आहे. हे भुजबळांच्या बाबतीत झाले, तर अजितदादांची काय स्थिती असेल? सुनील तटकरे यांच्या बाबतीत काय होईल? आज एफ़ आय आर दाखल झाला आहे. उद्या कारवाई सुरू होईल. त्यात आरंभी जबानीसाठी बोलावले जाते आणि नंतर ताब्यात घेतले जाते. पुढे आरोपपत्र दाखल होऊन खटला सुरू होतो. पण त्याला राजकीय शह दिला गेला नाही, तर सापळ्यात अडकलेला एकाकी पडत असतो. भुजबळांची तशीच स्थिती झालेली आहे. मागल्या दोन वर्षात राष्ट्रवादी पक्षातर्फ़े त्यांच्या न्यायासाठी वा मुक्तीसाठी कोणी चार शब्दही खर्च करण्याची तसदी घेतलेली नाही. पण त्यांना ताब्यात घेण्यात आले, तेव्हाची सुप्रियाताई व साहेबांची भाषा आठवून बघा. तोच आवेश आणि सूर दोघांनी मंगळवारी वेगळ्या विषयातून लावला. त्याचा इतिहास बघता अजितदादा एकटे पडणार असाच अर्थ काढला जाऊ शकतो. की सुप्रियाताईंसाठी चुलतभाऊ अडचण झाली असल्याने परस्पर त्याचा विषय निकालात निघण्यासाठी सरकारशी काही मिलीभगत झालेली आहे? त्यानुसार महागाई वा कर्जमाफ़ीसाठी पक्षाने आवाज उठवायचा आणि त्यात अजितदादांवर झालेल्या आरोप व गुन्ह्याचा विशय झाकोळून टाकायचा, असा काही बेत आहे काय? नाही तर इतक्या आवेशात बोलण्याची गरज काय होती? मागल्या खेपेस दादांनी राजिनामा दिला, तेव्हाही गुजरातमध्ये योजलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात त्यांचे नाव कुठेही झळकत नव्हते. आताही पक्षातर्फ़े इतका मोठा मोर्चा निघालेला असताना दादांचे नावनिशाण कुठे नाही?
लाचलुचपत विभागाने दिर्घकाळ तपास करून जे अहवाल तयार केला, त्यात काही तथ्ये जरूर असणार आणि त्यात अजितदादा फ़सू शकतात. भुजबळ फ़सले तसेच दादाही कुठेतरी सापळ्यात अडकणार. घोटाळा किती कोटींचा आहे याला महत्व नसते, तर त्यात नियम व कायदाला बगल देऊन काही केलेले असल्यास संबंधित मंत्री नेता गोत्यात येऊ शकत असतो. अहवालाला दिर्घकाळ पुढील कारवाईपासून रोखण्यात आलेले होते. याचा अर्थच काही गंभीर गोष्टी सरकारच्या हाती लागलेल्या असून त्यात अजितदादा व तटकरे नेमके फ़सलेले असू शकतात. तर त्यांचा बळी देऊन मोकळे होण्याची राष्ट्रवादीने तयारी केलेली असू शकते. उपयोग संपला की कुणालाही उचलून उकिरड्यात फ़ेकून देण्याची पवारनिती नवी नाही. आजवर साहेबांनी अशा अनेक सहकारी व नेत्यांना खड्यासारखे बाजूला केलेले आहे. कालच्या जमान्यात सुशीलमुकार शिंदे वा आजच्या जमान्यात भुजबळ दत्ता मेघे अशी अनेक नावे सांगता येतील. पण तितक्या कठोरपणे साहेब पुतण्यालाही वार्यावर सोडतील काय? या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. पण वर्तनातूनही काही इशारे व संकेत मिळत असतात. राज्यात सत्तांतर झाल्यापासून तीन वर्षे दादा व तटकरेंना जीवदान मिळाले. सरकार जीवदान देते असे आरोप झालेले आहेत. मग आजच त्या गुन्हे नोंदण्याला कुठला मुहूर्त लाभला असाही प्रश्न येतो. त्याचे कुठले तर्कशुद्ध उत्तर मिळत नाही. म्हणून अजितदादांच्या भवितव्याची चिंता वाटते. त्यांचा भुजबळ होऊ घातला आहे काय? नसेल तर नेमक्या त्याच मुहूर्तावर साहेब आणि सुप्रियाताई इतक्या आवेशात कशाला बोलत असतील? दादा पक्षाच्या एकूण कामकाजातून बाजूला कशाला पडलेले आहेत? असहकार सरकारशी म्हणजे अजितदादांशीही असाच याचा अर्थ करावा काय? काही असो. अजितदादा व तटकरे यांनी आतापासून सावध रहाण्याची गरज आहे, हे नक्की!
सावध रहाण्याची वेळ आता निघून गेली आहे.
ReplyDeleteधन्यवाद भाऊ जुनी आठवण करून दिल्याबद्दल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे झाले तर दादांचे काही खरे नाही. महाराष्ट्रात नवे पर्व सुरू होईल असे वाटते.
ReplyDeleteतुम्ही खूप छान लिखाण करता आणि मला ते आवडतात पण मला एक कळाले नाही, मी जेंव्हा पण ब्लॉग वाचतो तो नेहमी शरद पवार यांच्या बाबतच असतो.
ReplyDeleteमला अस वाटत इतर लोकांबाबतही मला कळावे
भाऊ,अचूक निरिक्षण! पवारसाहेब कन्येला सेफ झोनमध्ये ठेवू पाहत आहेत.भ्रष्टाचाराचे आरोप असलेले दोन मोहरे बळी देऊन राज्य आणि केंद्र दोन्ही ठिकाणी भाजप सोबत सोयरीक करायची.कारण साहेबांनी कितीही ओरडून राहूल गांधी यांचे कौतुक केले तरी,नव्या कॉंग्रेसमध्ये त्यांना वा सुप्रिया ताईला स्थान मिळणे दुरापास्त वाटते.तीन- साडेतीन वर्ष सत्तेचे कोणतेच पद नाही म्हणजे पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखंच की!
ReplyDeleteकुर्हाडीचा दांडा गणगोतचा काळ
ReplyDeleteभुजबळ साहेब झाले आता,आली दादांची वेळ
सावध होऊन आता काय ऊपयोग होईल आसे वाटत नाही.
ReplyDeleteस्वसंतान प्रेमासाठी एक पुतण्या खर्च झाला तर एवढेच म्हणू होऊ दे खर्च
ReplyDeleteभाऊ,
ReplyDeleteअजित पवारांवरून एक किस्सा आठवला.वैयक्तिक आहे, पण सांगतो. अजीतदादांचा "धरण" प्रताप झाला,तो दिवस... माझ्या घट्ट मित्राचे काका औरंगाबादला आमदार आहेत. आम्ही त्याच्यासोबत होतो. वरील घटनेवरून चर्चा करत असताना आम्ही वाद घालत होतो की नेहमीप्रमाणे जनता सर्व विसरून परत काँग्रेस-राष्ट्रवादीलाच निवडून आणेल. ते हसले आणि म्हणाले,"बेटा, सियासती मामले मे अगर आपने जो कहा उसके लिये आपको माफ़ी मांगनी पडे, तो समझ लो आपकें बुरे दिन शुरु हो गये".आम्हाला तेव्हा विश्वास नव्हता की बाजी इतकी पालटले. पण आज परिस्थिती खरच खूप बिकट आहे.
इतिहास साक्षी आहे
ReplyDelete"काका मला वाचवा" अशी
हाक काकांचे हृदय हेलावू शकली नाही,
राजकारणात तर
पुतण्या हा बळी "जाण्यासाठीच" असतो
तो कुणाचाही असो