Monday, December 11, 2017

मन की बात, जन की बात

EVMs के लिए इमेज परिणाम

हा लेख लिहायला बसलो असतानाच गुजरात विधानसभेच्या पहिल्या फ़ेरीचे मतदान चार दिवसांवर आलेले आहे आणि अखेरची मतचाचणी एका वाहिनीने सादर केलेली आहे. या ताज्या चाचणीनुसार गुजरातमध्ये कॉग्रेस आणि भाजपा यांना प्रत्येकी ४३ टक्के मते मिळण्याची शक्यता असून किंचीत फ़रकाने भाजपाला बहूमताची लक्ष्मणरेषा ओलांडणे शक्य होणार आहे. म्हणजेच काठावर बहूमत मिळवून भाजपा आपली सत्ता टिकवणार, असा त्या चाचणीचा निष्कर्ष आहे. अर्थात तोच मागल्या महिनाभर चाललेल्या गदारोळाशी जुळणारा असल्याने बहुतांश बातमीदार व राजकीय अभ्यासकांना पटून जाणारा असा आकडा आहे. पण मागल्या तीनचार वर्षातल्या अशा चाचण्या वा त्यांची भाकिते बघितली, तर हल्ली कोणी फ़ारसा चाचण्यांवर विश्वास ठेवत नाही. कारण यावेळी एकाचे आकडे बरोबर येतात, तर पुढल्या वेळी तोच भाकितकर्ता पुरता तोंडघशी पडलेला बघायला मिळत असतो. यासंदर्भात चाचण्यांचा भारतातील जनक प्रणय रॉय याची कबुली निर्णायक मानावी लागेल. उत्तरप्रदेश विधानसभा मतदान चालू असताना त्यानेही त्या राज्याचा दौरा केलेला होता आणि नंतर मतदान संपल्यावर भाकितही केलेले होते. मात्र ते भाकित आपल्या वाहिनीवर जाहिर करतानाच रॉयने तिथे हजर असलेल्या भाजपा प्रवक्त्याला एका कागदावर मनातला आकडा लिहून दिलेला होता. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी त्याने भाजपाच्या त्याच प्रवक्त्याला तोच कागद समोर दाखवायला सांगीतले. तर त्यात ३०९ असा आकडा लिहीलेला होता. मात्र मोजणीपुर्व भाकित करताना रॉयने भाजपाला बहूमतही देण्याचे टाळलेले होते. म्हणजे त्याने खोटाच अंदाज व्यक्त केला होता काय? आणि केला असेल, तर कशाला खोटेपणा केलेला होता? या विषयातली भाकिते समजून घ्यायची असतील तर खुद्द प्रणय रॉयचाच त्याबद्दलचा खुलासा समजून घेतला पाहिजे.

मनात उगाच आकडा धरण्याइतका प्रणय रॉय कोणी बुद्दू माणूस नाही. भारतात मतचाचण्यांचे युग आणणारा तो जनक आहे. म्हणूनच त्या विषयातला जाणकार आहे. सहाजिकच त्याने जाहिर न केलेला पण भाजपा प्रवक्त्याला दिलेला आकडा नेमका व खरा होता. पण तो इथे वाहिनीवरच्या चर्चेत खुलेआम सांगण्याची आपल्याला हिंमत झाली नाही, अशी त्याची कबुली होती. अर्थात तशी वेळ त्याच्यावर प्रथमच आलेली नाही. लोकसभा निवडणुका रंगात आल्या असताना जे आकडे सादर केले जात होते, तेव्हाही प्रणय रॉयने भाजपा व एनडीए यांना एकत्रित बहूमताच्या दारात आणून उभे केलेले होते. २८३ जागा त्याने एनडीएला दाखवल्या होत्या. पण प्रत्यक्षात भाजपाला तितक्या जागा मिळाल्या व एनडीएने ३४० चा पल्ला पार केला होता. मग या दोन्ही वेळी प्रणय रॉय खोटा बोलला होता काय? अजिबात नाही. तो ज्या माध्यमांच्या जगात जगतो आणि ज्या तथाकथित उच्चभ्रू वर्गात त्याला वावरावे लागते, तिथे आपल्या मनातले किंवा सत्य बोलण्याला पाप मानले जाते. जे काही एकत्रितपणे सत्य म्हणून निश्चीत केलेले असते, तितकेच बोलायची मुभा असते. अन्यथा तुमची त्या उच्चभ्रू वर्तूळातून हाकालपट्टी केली जात असते. अगोदर बातमीदारीत असे चालत होते, आता कुठल्याही बाबतीत हेच चालते. त्यामुळेच मग अशा चाचण्या होतात. पण त्याविषयीच्या शास्त्रामध्ये जे निष्कर्ष हाती येतात, ते कोणाला झुकते आहेत, तसे कथन केले जात नाहीत. तर उच्चभ्रू वर्तूळाला काय मान्य असेल, त्याप्रमाणे त्याची मांडणी केली जात असते. मग प्रत्यक्ष निकाल व मतमोजणीत ते खोटे पडले तरी बेहत्तर; अशी एकूण राजकीय वस्तुस्थिती झालेली आहे. सहाजिकच आता गुजरातसंबंधी आलेल्या बातम्या किंवा चाचण्यांची आकडेवारी बघता कशावर विश्वास ठेवावा, हे ज्याचे त्याने आपल्या मनाशी पक्के केले पाहिजे. बाकी कशावर विश्वास ठेवून भागणार नाही.

सचिन तेंडूलकर किंवा शाहरुख खान जेव्हा लोकांना फ़ारसे ठाऊक नव्हते, तेव्हा त्यांना कोणी जाहिरातीमध्ये वापरत नव्हता. त्यांच्याकडून टॉनिक वा कुठल्या उत्पादन वस्तुंच्या जाहिराती करून घेतल्या जात नव्हत्या. पण आपापल्या क्षेत्रात त्यांनी यश मिळवले व नाव कमावल्यानंतर त्यांचा विविध कंपन्या जाहिरातीचे मॉडेल म्हणून वापर करू लागल्या. अलिकडल्या काळात निवडणूकीत मते मिळवण्यासाठी राजकीय पक्षही असेच विविध मतचाचण्यांचा उपयोग मते फ़िरवण्यासाठी करू लागले आहेत. त्यामुळेच चाचण्या करणार्‍या कंपन्यांचा उपयोग दिशाभूल करण्यासाठीही होऊ लागलेला आहे. परिणामी अनेक चाचण्या व त्यांची भाकिते तोंडघशी पडण्याचे प्रमाण सातत्याने वाढू लागलेले आहे. अशा चावण्या घेण्याचे एक शास्त्र आहे आणि त्यात नमूना चुकीचा निघाला वा चुकीचा घेतला, तर भाकितेही पुर्णपणेच चुकीची निघणे अपरिहार्य असते. ही झाली एक बाजू! पण त्याहीखेरीज आणखी एक गोष्ट नव्याने पुढे आलेली आहे, ती मतदानाच्या टक्केवारीची! सर्वसाधारणपणे मतचाचण्यांचे अंदाज हे जुन्या निवडणूकांच्या आकड्यांवर विसंबून असतात आणि त्यातली घट वा वाढ यानुसार निष्कर्ष काढले जात असतात. गेल्या किती निवडणूका त्या राज्यात एकूण मतदानाचे प्रमाण किती होते, त्याला पायाभूत मानून हे निष्कर्ष काढले जात असतात. तेव्हा सरासरी मतदान करणारा मतदारच गृहीत धरलेला असतो. जो मतदार उदासिन रहातो वा मतदान केंद्राकडे फ़िरकत नाही, त्याचा विचार अशा चाचण्यांच्या हिशोबात नसतो. त्यामुळेच त्या मतदाराने पुढाकार घेतला, तर मतचाचण्यांची एकूण समिकरणे पुरते विस्कटून जातात. प्रामुख्याने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीपासून हे घडलेले आहे. सतत मतदानाची टक्केवारी सरासरीपेक्षा वाढल्याने चाचण्यांचे अंदाज फ़सत गेलेले आहेत आणि त्याचेही कारण समजून घेतले पाहिजे.

जो मतदार अगत्याने प्रत्येकवेळी मतदान करतो, त्यातला बहुतांश कुठल्या ना कुठल्या पक्षाला बांधील असतो. सहाजिकच त्यातला जो दहाबारा टक्के मतदार सातत्याने आपले मत बदलत असतो, तोच खरा निकालाचा कौल बदलून टाकत असतो. उदाहरणार्थ केरळात अर्धा एक टक्का मतदार इकडून तिकडे झुकला, म्हणजे सत्ताधारी पराभूत होतात आणि विरोधी पक्ष सत्तेत येऊन बसत असतो. उत्तरप्रदेशात नेहमी ३० टक्केच्या आतला हिस्सा मते मिळवणारा बहूमताने सत्तेत येऊन बसला आहे. बाकी पराभूत झालेले तीन पक्ष त्याच्यापेक्षा फ़ारसे मागे नसतात. गुजरातचीच गोष्ट घ्या. गेली २२ वर्षे तिथे भाजपाने सातत्याने निवडणूका जिंकलेल्या आहेत. पण भाजपा व कॉग्रेस यांच्या मतांची टक्केवारी बघितल्यास आठदहा टक्के इतकाच त्यात फ़रक राहिलेला आहे. हे दहा टक्के भाजपाला दुपटीहून अधिक जागा जिंकून देत राहिले आहेत. तर कॉग्रेसला कितीही आटापिटा करून ती आठदहा टक्क्यांची दरी पार करता आलेली नाही. फ़ार कशाला कॉग्रेसने आपल्या ३८-३९ टक्के मतांमध्ये सहासात टक्के भर घातली असती, तरी भाजपाला सहजगत्या इतका काळ सत्ता उपभोगता आली नसती. अगदी मोदींनाही निर्विवादपणे ५० टक्के मतांचा पल्ला कधीही पार करता आलेला नाही. मात्र जागा ६५-७० टक्के त्यांनी जिंकलेल्या आहेत. मग यावेळी काय होईल? खरेच ताज्या चाचणीत दाखवल्याप्रमाणे दोन्ही पक्ष समसमान म्हणजे ४३ टक्के मतांपर्यंत जाऊन भिडतील काय? आजवरच्या पद्धतीने मतदान झाले, तर तसे होऊ शकेल. मग त्यात भाजपाला बहूमत गमावणे शक्य आहे, तसेच कॉग्रेसला बहूमताचा पल्ला गाठणेही शक्य होऊ शकेल. पण हे बोलण्याइतके सोपे काम नाही. किंबहूना तशी स्थिती शक्य असल्याचे लक्षात घेऊनच भाजपाने आधीच भरपाईची तयारी केलेली आहे. त्यात तो पक्ष किती यशस्वी होते, ते पुढल्या सोमवारी मतमोजणीतूनच स्पष्ट होईल.

खरी लढाई प्रचारसभेची नाही, तर आपला मतदार ओळखून त्याला गोळा करण्याची झाली आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदी व अमित शहांनी मागल्या सतरा वर्षात सतत निवडणूका जिंकलेल्या नाहीत की सत्ता राखलेली नाही. त्यांनी आपल्या पक्षाला सत्ता मिळवून देणार्‍या मतांचा बारकाईने अभ्यास केला आहे. प्रामुख्याने त्यातल्या त्रुटींचा काळजीपुर्वक अभ्यास केलेला आहे. तसे नसते तर त्यांना इतका काळ गुजरातमध्ये टिकून रहाणे शक्य झाले नसते. निव्वळ हिंदूत्व किंवा गुजरातचा स्वाभिमान अधिक विकास या बळावर सतत सत्ता मिळणे शक्य नव्हते. कारण कॉग्रेस कितीही सातत्याने पराभूत झालेली असली, तरी तिला ३०-४० टक्के या परिघात मते मिळत राहिलेली आहेत. तशा स्थितीत सतत निवडणूका जिंकणे भाजपाला अशक्य होते. कितीही विकास केला म्हणून सर मतदाराला खुश करता येत नाही किंवा आपल्याच बाजूने कायम राखता येत नाही. काही प्रमाणात नाराजी येतच असते आणि तिच्यावर मात करण्याची सज्जता प्रत्येक मतदानापुर्वी राखावी लागते. शहा मोदींनी त्याची सतत पुरेपुर काळजी घेतली म्हणून ते सत्ता टिकवू शकले आणि नंतर त्यांनी तोच प्रयोग लोकसभेत अखिल भारतीय पातळीवर केला, म्हणून त्यांना राजकीय पंडितांना चक्रावून टाकणे शक्य झालेले होते. याहीवेळी गुजरात भाजपासाठी सोपा नव्हता व नाही. किंबहूना पाटिदार समाज विरोधात आंदोलन पुकारून उभा राहिल्यावर होणार्‍या नुकसानाची भरपाई करण्याची तयारी अपरिहार्य होती. म्हणूनच शहा खुप आधीपासून कामाला लागलेले होते आणि त्यांनी यावेळी आपले लक्ष उदासिन मतदाराकडे वळवलेले होते. किंबहूना मागल्या खेपेसच त्यांनी ती किमया करून दाखवलेली होती. गुजरातचा इतिहास ६०-६५ टक्के मतदानाचा होता आणि मागल्या खेपेस ७० टक्केपर्यंत मतदान झाले, ते झाले नसते तर मोदींना तिसर्‍या खेपेस विजय संपादन करणे सोपे नव्हते..

गुजरातमध्ये भाजपा वा मोदींच्या लोकप्रियतेचा प्रचार जितका झाला, तितकी ही लोकप्रियता अफ़ाट नाही. तिथे दोन पक्षात राजकारण विभागले गेलेले असल्याचा पुरेसा लाभ गेल्या पाव शतकात कॉग्रेसने कधी उठवला नाही. अन्यथा केरळप्रमाणे एकदोन निवडणूकात कॉग्रेसला मोदींना पराभूत करणे शक्य झाले असते. पण आता मोदी शहांनी निवडणुका जिंकण्याचे तंत्र व संघटनारुपी यंत्र उभारलेले आहे. शिवाय कॉग्रेसपाशी प्रथमच कोणीही नाव घेण्यासारखा राज्यातला नेता नाही. ही आज मोदींसाठी जमेची बाजू आहे. त्यावर मात करण्यासाठी कॉग्रेसने तीन तरूणांना हाताशी धरलेले आहे. पण ही रणनिती नवी अजिबात नाही. आपण काय करू हे सांगण्यापेक्षा कॉग्रेस नाराजीच्या बळावर स्वार होऊन सत्ता मिळवण्यास उत्सुक आहे. म्हणून त्यांनी अल्पेश, हार्दिक व जिग्नेश अशा तरूणांना हाताशी धरले आहे. पण हा प्रयोग जुनाच आहे. दहा वर्षापुर्वी म्हणजे २००७ सालात खेळून झालेला आहे. तेव्हा भाजपातल्या नाराजांना हाताशी धरून कॉग्रेसने त्यांनाही उमेदवारी दिली व जागावाटप केले होते. त्याचा कुठलाही तोटा मोदी वा भाजपाला झालेला नव्हता. आज ते बहुतांश बंडखोर पुन्हा भाजपात परतलेले आहेत. २०१२ सालात तर भाजपाची मतविभागणी करायला मोदींचे गुरू केशूभाई पटेल मैदानात उतरले होते आणि ते पटेलांचे खंदे नेता मानले जात होते. त्यांचा रोष पत्करूनही मोदींनी सत्ता संपादन केलेली होतीच. हार्दिकपेक्षा केशूभाई पटेलांचे छोटा नेता आहेत, असे कोणाला म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी. अल्पेश तर मागल्या खेपेसच शंकरसिंग वाघेला यांचा सहकारी म्हणून कॉग्रेस उमेदवार होता. अशा रितीने मोदी व भाजपा विरोधात फ़ुटू शकणार्‍या मतांचे प्रयोग आधीच्या दोन निवडणुकात पार पडलेले आहेत. त्यामुळे यावेळीच भाजपाला खुप मोठा फ़टका त्याच रणनितीने बसणार, अशा भ्रमात ज्यांना रहायचे त्यांनी खुशाल रहावे.

गुजरात व भाजपाचा मोठा पाठीराखा व्यापारीवर्ग आहे आणि तोच नोटाबंदी व जीएसटीमुळे नाराज आहे, यात शंका नाही. पण त्यालाही नाराज करण्यापर्यंत खंबीरपणे निर्णय घेण्याची हिंमत मोदींनी दाखवली हे कोणी नाकारू शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की कितीही नाराज असला तरी हा पाठीराखा कॉग्रेसच्या गोटात जाणार असे समजणे योग्य होणार नाही. राग ही एक गोष्ट असते आणि त्यासाठी बसलेली घडी विस्कटून टाकण्यापर्यंत टोकाला जाण्याचा पर्याय वेगळी गोष्ट असते. कॉग्रेसपाशी पर्याय देण्याइतकी संघटना नाही किंवा कार्यक्रमही नाही. आपण आलो मग सर्वकाही ठिक करू, अशी आश्वासने देणे सोपी गोष्ट असते. पण ती प्रत्यक्षात पुर्णत्वास नेणे अवघड असते आणि हे उमजण्याइतका गुजराती मतदार सुबुद्ध नक्कीच आहे. राहिला विषय होऊ घातलेल्या मतदानाचा आहे. जर पुर्वीप्रमाणेच मतदान झाले तर त्यात भाजपाशी कॉग्रेसची बरोबरी होऊ शकते हे नाकारता येणार नाही. पण उदासिन रहाणार्‍या मतदाराला बाहेर काढण्यात भाजपा यशस्वी झाला तर समसमान दिसत असलेली मतांची टक्केवारी बदलून जाते. मतदान ७५ टक्केपर्यंत वाढवण्याची योजना घेऊन भाजपाने मागल्या सहा महिन्यापासून कंबर कसलेली आहे. त्यात भाजपा यशस्वी झाला, तर समसमान दिसणारी मते बदलून दोन पक्षात मोठी खोल दरी पडू शकते आणि तिथेच सगळा नूर बदलून जाऊ शकतो. मागल्या तीन वर्षात अनेक राज्यात सत्ता मिळवताना भाजपाने केलेली ती सर्वात मोठी निर्णायक खेळी ठरलेली आहे. प्रत्येक राज्यात मतदानाची टक्केवारी वाढवून भाजपाने आपला मतांचा हिस्सा वाढवून घेतला व बाजी मारलेली आहे. गुजरातमध्ये त्याच बाबतीत शहा मोदी गाफ़ील रहातील अशी कोणाची समजूत असेल तर गोष्ट वेगळी. त्याची समजूत घालायला निकालाच्या दिवसापर्यंत थांबावे लागेल. अर्थात तेव्हाही मतदान यंत्रात गफ़लत झाल्याचा आरोप करायची मोकळीक आहेच. कारण राजकीय विश्लेषण ही मन की बात असते आणि मतांचा कौल ही जन की बात असते.

12 comments:

  1. Enter your comment...भाउ या वेळेस मतदान कमी झाले आहे....
    याचा अर्थ काय असेन?

    ReplyDelete
  2. अमित शहा,मोदीजी जितके मुरब्बी राजकारणी तितकेच मुरब्बी पत्रकार आपण आहात भाऊ.

    ReplyDelete
  3. एबीपीच्या चाचणीविषयी मी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर लिहिले होते तेच इथे लिहित आहे.

    एबीपी ने गुजरात जनमतचाचणी प्रसिध्द केली आणि त्यात भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना ४३% मते मिळतील आणि भाजपला ९५ तर काँग्रेसला ८२ जागा मिळतील असे अनुमान काढले आहे. या मतांच्या टक्केवारीचे अंदाज बरोबर आहेत असे गृहित धरले आणि जर दोन्ही पक्षांना साधारण सारखीच मतांची टक्केवारी (४३%) मिळणार असेल तर एबीपीवाल्यांनी मतांच्या टक्केवारीचे जागांमध्ये रूपांतर करताना मोठी चूक केली आहे. माझा दावा आहे की दोन्ही पक्षांना साधारण सारखीच मते मिळाली तर काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त जागा मिळतील. जर दोन्ही पक्षांना ४३% मते मिळणार असतील तर काँग्रेस १०० पण ओलांडू शकेल.

    याचे कारण भाजपचे काहीकाही बालेकिल्ले आहेत. त्या बालेकिल्ल्यांमधून भाजपला जोरदार यश मिळते. उदाहरणार्थ अहमदाबाद शहर आणि परिसरात एलिसब्रिज, घाटलोडिया, मणीनगर, नारणपुरा (पूर्वीचा सरखेज) असे काही मतदारसंघ आहेत त्यात भाजप प्रचंड बलिष्ठ आहे. २०१२ मध्ये घाटलोडियामधून आनंदीबेन पटेल ५३% मताधिक्याने तर एलिसब्रीजमधून भाजप उमेदवार अतुल शाह ५०% मताधिक्याने निवडून गेले होते. देशातील कित्येक मतदारसंघात विजयी उमेदवाराला ५०% मते नसतात. आपण इथे ५०-५३% मते नाही तर मताधिक्याविषयी बोलत आहोत. अहमदाबादमध्ये आणि वडोदरा, सुरतमध्ये भाजप उमेदवाराने ३०% पेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळवला असे अनेक मतदारसंघ आहेत. यावेळीही भाजपचे हे बालेकिल्ले ढासळतील याची शक्यता फारच थोडी. त्यामुळे भाजप अशा बालेकिल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मते घेईल आणि काँग्रेसला या भागात बरीच कमी मते मिळतील. जर पूर्ण राज्यात दोन्ही पक्षांना सारखीच मतांची टक्केवारी असेल तर राज्याच्या इतर भागात काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त मते मिळतील आणि अर्थातच त्यामुळे जागाही जास्त मिळतील.

    याविषयी सर्वात उत्तम उदाहरण २००४ च्या लोकसभा निवडणुकांचे आहे. या निवडणुकांमध्ये भाजपला ४७.४% आणि काँग्रेसला ४३.९% मते होती. पण १८२ पैकी ९० मतदारसंघात भाजपला तर ९२ मतदारसंघात काँग्रेसला आघाडी होती. भाजपला काँग्रेसपेक्षा ४ लाख ३३ हजार मते जास्त मिळूनही दोन कमी मतदारसंघात आघाडी मिळाली होती. हे का झाले? सरखेज आणि एलिसब्रीज हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ अडवाणींच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात होते. त्यापैकी सरखेजमध्ये अडवाणींना १ लाख २६ हजार मतांची तर एलिसब्रीजमध्ये ४८ हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्याचप्रमाणे सुरत लोकसभा मतदारसंघात येणार्‍या चोरासी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या काशीराम राणांना सुमारे ९० हजार मतांची आघाडी मिळाली होती. पूर्ण राज्यात भाजपला काँग्रेसपेक्षा ४ लाख ३३ हजार मते जास्त होती त्यापैकी २ लाख ६४ हजार मतांची आघाडी केवळ या तीन मतदारसंघांमधून होती. त्याउलट काँग्रेसची मते बर्‍यापैकी विखुरलेली होती. त्यामुळे राज्याच्या इतर भागातून काँग्रेसला जास्त मतदारसंघांमध्ये आघाडी मिळविणे शक्य झाले.

    गुजरात निवडणुकांमध्ये अंदाज बांधताना हे गणित लक्षात ठेवलेच पाहिजे. २००४ मध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा ३.५% मते जास्त होती तरीही आघाडी दोन कमी मतदारसंघात मिळाली होती. यावरून भाजपला गुजरातमध्ये काठावरचे बहुमत हवे असेल तरी काँग्रेसपेक्षा किमान ४.५% मते जास्त हवीत असे मला वाटते. आणि जर भाजपला आरामात विजय मिळवायचा असेल तर काँग्रेसपेक्षा किमान १०% मते जास्त हवीत. या लेखात मी भाजपला १३०-१३५ जागांचा अंदाज बांधला आहे त्यात भाजपला ५०% तर काँग्रेसला ४०% मते मिळतील हे गृहितक आहे. २०१२ मध्ये भाजपला ४७.९% तर केशुभाई पटेलांच्या गुपपला ३.६% मते होती. म्हणजे या दोन पक्षांच्या मतांची बेरीज ५१.५% होती. तर काँग्रेसला ३८.९% मते मिळाली होती. नुसत्या भाजपला काँग्रेसपेक्षा ९% (आणि गुपपची मते विचारात घेतली तर १२.६%) मते जास्त होती. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला ६०.१% तर काँग्रेसला ३४.४% मते होती. राष्ट्रीय पक्षांना विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकांपेक्षा कमी टक्के मते मिळतात तेव्हा २०१४ च्या त्सुमानीपासून भाजपची १०% मते कमी झाली त्यापैकी ५.५% काँग्रेसला तर ४.५% अपक्ष आणि इतरांना मिळतील हे गृहितक आहे. त्यातून भाजप १३०-१३५ जागा मिळवू शकेल. पण भाजपच्या विरोधात आणि काँग्रेसच्या बाजूने आणखी ३% चा स्विंग असेल तर मात्र या सर्वेक्षणात दिल्याप्रमाणे अटीतटीची लढत होईल. आणि दोन्ही पक्षांना ४३% मते मिळाल्यास काँग्रेस शंभरी पण ओलांडेल.

    मला वाटते की या सर्वेक्षण करणार्‍यांनी हा महत्वाचा मुद्दा लक्षात न घेता धोपट मार्गाने जागांचे अंदाज बांधले आहेत.

    ReplyDelete
  4. भाऊ
    छान लेख
    पहिल्या टप्प्यात 68% मतदान झाले आहे जे मागील आकडेवारी पेक्षा कमी आहे.हे काँग्रेससाठी फायदेशीर ठरू शकेल का ? करण या वेळेस anti incumbacy factor जास्त प्रमाणात भाजप विरुद्ध आहे,,यावर विश्लेषण कराल का???

    ReplyDelete
  5. जबरदस्त लेख. शेवटचे वाक्य आणखी जबरदस्त ! भाऊंच्या लेखाला पर्याय नाही कारण त्यातून शिकायला मिळते.

    ReplyDelete
  6. First round 69%. Equal to last elections.

    ReplyDelete
  7. नमस्कार भाऊ काका,

    एकूणच माध्यमातील वातावरण बघता मला एक प्रश्न पडला आहे. कि लोक काँग्रेस ची कोणतीही फालतू गोष्ट खूप मोठा सकारात्मक बदल म्हणून पेश करून काँग्रेस ला परत सत्तेत आणायला उत्सुक वाटत आहेत, म्हणजे एक मोठा वर्ग तसा आहे. (राहुल गांधींनी थोडेसे ताळतंत्र ठेवून बोलले म्हणजे ते देश चालवण्याइतके परिपकव आणि पात्र कसे होतात हे कोडे मला तरी उलगडत नाही). ६५ वर्षांचे घोटाळे, देश विकणारे देशद्रोही निर्णय हे इतके अक्षम्य गुन्हे ह्या छोट्या सकारात्मक परंतु अत्यंत निरुपयोगी बदलांमुळे कसे काय माफ केले जाऊ शकतात? किंवा भाजप सरकारने ३ वर्षात दूरदृष्टीने घेतलेले परंतु तात्कालिक स्वरूपाचे कठोर वाटणारे निर्णय आणि केलेले भरीव काम हे देखील ह्या छोट्या निरुपयोगी बदलांपुढे कसे काय मातीमोल होते?

    ReplyDelete
  8. भाऊ पहिल्या फेरीत मतदान फक्त 67% झाले. 2012 ला 71% झाले होते.

    ReplyDelete
  9. Bhau, it seems you too have sensed that BJP might loose in Gujarat. Today's article is replete with all such things.

    ReplyDelete
  10. भाऊ सही विश्लेषण असे लेख तुमचा अभ्यास नुसताच खोलवर नाही तर प्रत्येक घटनांची खाच खळग्या सकट विश्लेषण अप्रतिमच..
    म्हणुनच तुमच्या प्रत्येक लेखाची चातका प्रमाणे वाट पहात असतो.
    यातील आपला जिएसटी, नोटबंदी यातुन नाराज व्यापारी केवळ त्यामुळे काँग्रेसला मते देतील असे वाटत नाही हा मुद्दा अत्यंत महत्वाचा.
    मिडियावाले कोल्हेकुई करुन अनेक वरवरचे विचार करणार्या मध्यम वर्गाला जणु अमेरिकेच्या ट्रम्फ विरुध्द हिलरी क्लिंटन प्रमाणे हिन लेव्हलला प्रचार गेला आहे असे गळी ऊतवण्यात यशस्वी होतोय. व यातुन मोदी शहांच्या जोडगोळी ला धसका बसलाय असे दाखवण्यात मिडियावाले यशस्वी झाले आहेत.
    परंतु हे सर्व मिडियाची कोल्हेकुई अती सामान्य गरीब लोक पहात नाहीत. हा वर्ग आपल्या दैनंदिन समस्या कोण सोडवतो व कोण कमीत कमी लागणार्या गरजा कमी दरात सातत्याने पुरवतो या वर च मतदान करतो. नाहीतर गुजराथी लोकांचा प्रभाव असलेल्या मुंबई मध्ये पण भाजपला दणका बसला असता.
    शेवट लोकल नेतृत्व पण बघीतलं जात.
    मोदी जरी गुजरात मध्ये मुख्यमंत्री नसले हा जर मायनस पाॅइंट मिडियावाले परत परत दाखवुन गुमराह करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. व मोदींचा भाजप हरणार असे दाखवत आहेत.
    परंतु ज्यावेळी जहाज बुडणार असा अंदाज येतो तेव्हा सामान्य उंदीर सुध्दा जाणतात व उड्या मारुन पाळतात. पण साक्षात गुजरात मध्ये माणसांनी पण भाजपचे जहाज गुजरातमध्ये बुडतय असा कोणताही संकेत भाजपला रामराम ठोकुन दिला नाही. हे भाजपच्या निर्विवाद विजयाचे द्योतक आहे.
    सुमारे 68% मतदान पहिल्यां फेरीत झाले आपक्षा 72-75% धरली तर मग वरिल 4-6% कमी का झाले हे बुथ मॅनेजरना नक्की समजू शकते.
    जर मोदी वर नाराज मतदार मतदानाला बाहेर पडला नसेल तरीही भाजपचा फायदा आहे.
    बरं राहुल गांधीच्या कोणत्या कर्तबगारी वर फिदा होऊन मतदार काँग्रेसला मतदान करतील हा एक प्रश्नच आहे.
    परंतु मिडियावाले हा प्रश्न राहुल च्या काँग्रेस ला विचारत नाहीत यातच त्यांची पार्शीलिटी दाखवते.
    सशक्त स्थानिक नेतृत्व काँग्रेस कडे नाही.
    परत 2G 3G, ऑगस्टा, कोल घोटाळे यावरुन लक्ष उडवण्यात मिडियावाले यशस्वी झालेत.
    राहुल नी प्रेस काॅन्फरंस घेऊन या मिडियावाले मार्फत मतदारांना आपले करण्याचा प्रयत्न केला आहे.
    परंतु दशकानु दशके भारताला गरिबीत व मागासलेपणा मध्ये खितपत ठेवणार्या काँग्रेस ला जणु गुजरात मध्ये संजीवनी मिळेल असे दाखवले जाते आहे.
    मिडियावाले बुमर वरुन गुजरात जनतेची मुलाखत घेत फिरत आहेत पण मोदींच्या भाजप च्या बाजुनी कोणी बोलायला लागले की स्टुडिओतुन अँकर प्रक्षेपण फिरवून जनतेला गुमराह का करत आहेत? हि पारर्शीलीटी का केली जाते हे समजत नाही आणि कुणी समजून घेण्यात इंटरेस्टेड पण नाही.
    पण भारतीय मतदार प्रलभग्धदता दाखवून मतदान करतोय हा योगायोग की वास्तव्य हे समजणे सामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहे.
    गुजरात मध्ये काहीही होवो पण भारतीय मोदींच्या पाठीशी खंबीर पणे ऊभे आहेत हे निश्चित.
    एकेएस

    ReplyDelete
  11. भाऊ गेली अनेक वर्षे काँग्रेसने सत्ता भोगली याचे कारण म्हणजे अल्पसंख्याक गठ्ठा मते,झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये निवडणूकीच्या आदल्या दिवशी पैसे वाटून मते विकत घेणे. या प्रक्रियेत सुशिक्षित हिंदु मतदान न करता निवडणुकीच्या दिवशी सुट्टी घेऊन ट्रिपला बाहेर जात असे 2014 साली सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी शत प्रतिशत मतदानाचे आवाहन केले आणि संघ यंत्रणेतून जास्तीत जास्त हिंदूना मतदानासाठी बाहेर काढण्यात आले आणि पहिल्यांदा भाजपला बहुमत आणि काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत मोदी शहांनी हाच प्रयोग देशभर केला आणि काँग्रेसला सगळीकडून हद्दपार केले मात्र हा प्रयोग मोदी गुजरात मध्ये 2002 पासून करत आहेत त्यामुळे गुजरात मधून भाजपला उखडणे काँग्रेस साठी खुप कठीण काम आहे

    ReplyDelete