Sunday, December 24, 2017

नैतिक विजयाचा कपाळमोक्ष

lalu rahul के लिए इमेज परिणाम

चारा घोटाळ्याच्या दुसर्‍या खटल्यातही लालू दोषी ठरलेत आणि त्यांना तसेच कोर्टातून तुरूंगात आणले गेले. त्यामुळे आता त्यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षात गोंधळ माजल्याच्या बातम्या तात्काळ वाहिन्यांनी दिल्या. पण त्यापेक्षा मोठा गोंधळ कॉग्रेसच्या व पुरोगामी गोटात उडाला, त्याकडे कोणाचेच लक्ष गेलेले नाही. गुजरात निकाल व २ जी, आदर्शच्या निकालानंतर फ़ुशारलेल्या पुरोगामी गोटात लालूंच्या निकालाने सन्नाटा पसरलेला आहे. कारण लालूंचे कुठल्या तोंडाने समर्थन करावे आणि त्याचे परिणाम काय संभवतात, त्याविषयी कमालीचा गोधळ आहे. लालूंचे समर्थन करायचे तर न्यायप्रक्रीयेला दोषी मानावे लागणार आणि ती प्रक्रीया दोषी असेल, तर २ जी निकालावरही प्रश्नचिन्ह लागणार. म्हणूनच कुठली बाजू घ्यावी, याविषयी पुरोगामी गोट गडबडून गेला आहे. याचे आणखी एक कारण चारा घोटाळा निकाल जितका साफ़ व स्पष्ट आहे, तितका २ जी वा आदर्श निकाल स्पष्ट नाही. या दोन्ही निकालाचे पारडे वरच्या कोर्टात पलटू शकते. पण पहिल्या चारा घोटाळा निकालावर सुप्रिम कोर्टात शिक्कामोर्तब झालेले असल्याने, लालूंच्या बाबतीत समर्थनाला जाणे म्हणजे आत्महत्याच ठरू शकण्याचा धोका आहे. शिवाय लालूंनी आपला पुरोगामी मुखवटा चढवून पुन्हा नेहमीचीच टकळी चालविलेली आहे. हे आपल्या विरोधातले राजकीय कारस्थान असल्याचा लालूंचा दावा आहे. ते मान्य करून कॉग्रेस वा तिचे पाठीराखे लालूंच्या बाजूने आखाड्यात उतरले, तर उद्या पुन्हा राहुलच गोत्यात येण्याचाही धोका आहे. कारण पहिल्या निकालानंतर राहुलनीच लालूंना वाचवणारा अध्यादेश फ़ाडून टाकला होता. मग तो मुर्खपणा होता काय, त्याचेही उत्तर द्यावे लागेल. थोडक्यात गुजरातचा नैतिक विजय आणि नंतरच्या दोन कोर्ट निकालानंतर पुरोगाम्यांनी विजयी घोडदौड आरंभलेली होती, तिला लालूंच्या दोषी ठरण्याने खीळ बसलेली आहे.

पहिली गोष्ट लालूंचा हा निकाल पुरोगाम्यांच्या दिर्घकालीन आत्महत्येचा सर्वोत्तम नमूना आहे. लालूंनी घोटाळे वा भ्रष्टाचार करावेत आणि तोंडावर पुरोगामी सेक्युलर असे मुखवटे चढवून सामान्य माणसाची दिशाभूल करावी, यात नवे काहीच नाही. त्याने बुद्धीमंतांची दिशाभूल होत असली तरी सामान्य जनता वारंवार खोट्या गोष्टींना बळी पडत नसते. किंबहूना म्हणूनच २०१० सालात बिहार विधानसभेत लालूंच्या पक्षाचा पुरता सुपदा साफ़ झालेला होता. नितीशनी व्यक्तीगत अहंकाराच्या नादी लागून त्यांना सोबत घेण्यापर्यंत मोदीद्वेष केला नसता, तर मध्यंतरीच्या काळात लालूंचे पुनर्वसन झाले नसते, की आजच्या इतका मस्तवालपणा लालू दाखवू शकले नसते. गेल्या लोकसभेतच लालूंचे बिहारमध्ये नामोनिशाण पुसले असत्ते आणि विधानसभेत त्यावर शिक्कामोर्तब झाले असते. पण मुळच्या पुरोगामी स्वभावाला बळी पडून नितीशकुमार यांनी या भूताला जीवदान दिले आणि नंतर आपले मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी त्याच लालूंसमोर शरणागती पत्करली. पुरोगामी खुळचटपणाचे हे पहिले उदाहरण नाही. कॉग्रेसलाही असेच नवजीवन देण्यातच पुरोगाम्यांची हयात गेली आहे. म्हणून तो कालबाह्य झालेला पक्ष जीवंत राहिला आहे. लालू त्याचे दुसरे उदाहरण म्हणता येईल. अर्थात मध्यंतरीच्या दोनतीन दशकात पुरोगामी व प्रामुख्याने सेक्युलर शहाण्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीने अनेक राजकीय विकृती भारतामध्ये उदयास आल्या. लालू त्यापैकी एक होत. चार वर्षापुर्वी तरूण तेजपाल व त्याच्यासारख्या काही भुरट्या भामट्यांनी बदनामीच्या मोहिमा राबवून जे चाळे केले, त्यालाही पुरोगामी आशीर्वाद होता. पण त्यातूनच पुरोगामी भूमिका वा विचारधारेची विश्वासार्हता लयास गेली. एका बलात्काराच्या प्रकरणात फ़सलेल्या तेजपालनेही पुरोगामीत्वाचा मुखवटा चढवून बलात्कारावर पांघरूण घालण्याचा युक्तीवाद केलाच होता ना? मग लालूंचे आज काय चुकले?

पंधरा वर्षे लालूंनी आपल्या जातीच्या भावनेचा लाभ उठवत बिहारमध्ये उच्छाद मांडला होता. त्यांच्या निकटवर्ति सहकार्‍यांमध्ये एकाहून एक कुख्यात गुंडाचा सहभाग होता. त्यांनी खंडणी, अपहरण व मुडदे पाडण्याला तिथला प्रमुख उद्योग बनवून टाकलेले होते. तरीही पुरोगामीत्वाच्या नावाखाली त्यांची पाठराखण करण्यापर्यंत पुरोगामी घसरत गेले. तिथून मग गुंड गुन्हेगारांसाठी पुरोगामीत्व हे सुरक्षा कवच बनत गेले. लोकांचा हळुहळू पुरोगामी शब्दावरचा किंवा विचारावरचा विश्वास उडत गेला. आता तर अशा भुरट्या बदमाशांनीच पुरोगामी शब्दाचा व भूमिकेलाच ताबा घेतला असून, खर्‍याखुर्‍या चारित्र्यवान पुरोगाम्यांना त्या भामट्यांच्या मागे फ़रफ़टावे लागते आहे. दुसर्‍यांदा दोषी ठरूनही लालूंचे म्हणून पुरोगामी समर्थन होण्यापर्यंत मजल गेली आहे. हा निकाल लागल्यावर डावे किंवा पुरोगामी बुद्धीमंत ज्याप्रकारे चर्चांमध्ये शब्दांची कसरत करत होते, त्यातून पुरोगामी लाचारी स्पष्ट दिसत होती. तितक्याच उत्साहात ही मंडळी मागला आठवडाभर नैतिक विजयाच्या गमजा करीत होती. पण तीच पुरोगाम्यांची शोकांतिका होऊन बसलेली आहे. त्यातून तात्पुरते लाभ नक्की मिळतात. पण दिर्घकालीन तोटेही अपरिहार्य असतात. तेव्हा आपल्याला भ्रष्ट राजकारण अमान्य असल्याचे दाखवण्यासाठी राहुलनी लालूंना वाचवणारा अध्यादेश फ़ाडून टाकला होता. आता त्यांनाच लालूंचे समर्थन करण्याची हिंमत झालेली नाही. मग त्याच लालूंना पुढल्या काळात मोदी विरोधी आघाडीत सोबत घेताना राहुलसाठी काम सोपे राहिले आहे काय? एकूण राजकारणात पुरोगाम्यांची अशी दुर्दशा म्हणून होऊन गेलेली आहे. लालू हा म्हणूनच आगामी राजकारणातील मोठा गडबड करणारा विषय आहे. जितक्या सोप्या पद्धतीने विविध निकालाचे अर्थ लावले गेले आहेत, तितका हा मामला सोपा नाही, सरळ नाही.

मोदीद्वेष वा भाजपाचा खुळा विरोध यातून पुरोगाम्यांना आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्या्ची वेळ सातत्याने येत असते. नरेंद्र मोदी यांनी चिकाटीने लढत देऊन लोकसभेत बहूमत मिळवले आहे आणि कोट्यावधी लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. त्याला खरी मदत पुरोगामी खोटारडेपणाची झालेली असेल, तर त्या अपयशी दुष्टचक्रातून बाहेर पडण्याच मार्ग आणखी खोटेपणा नसून, प्रामाणिकपणाचे अनुकरण हाच कष्टप्रद मार्ग असू शकतो. त्यात लालूंचे समर्थन वा राहुलचा फ़ुटणारा फ़ुगा कामाचा नाही. कुठल्या तरी न्यायालयीन निकालाचा आडोसा घेऊन मोदींना पराभूत करता येणार नाही. लालूंवर चारा घोटाळ्याचा आरोप झाला, तेव्हा तेच बिहारचे मुख्यमंत्री होते आणि संसदेत भाजपा विरोधी पक्षात बसलेला होता. लालूंनी राजिनामा देऊन तपास सुरू झाला, तेव्हा लालूपत्नी मुख्यमंत्री होती आणि त्यात आरोपपत्र दाखल झाले तेव्हाही भाजपा सत्तेत नव्हता. मग भाजपाने सूडबुद्धीने लालूंना छळण्याचा विषय कुठे येतो? न्यायालयाचा निकाल सरकारच्या दबावाखाली होत असता, तर २ जी घोटाळ्याचा निकालही भाजपाला हवा तसा विरोधात गेला असता. पण पुरोगामी म्हणजे दुटप्पीपणा अशीच स्थिती झालेली असल्याने पुरोगामी जिंकले, मग इव्हीएम मशीन चांगली असतात आणि पुरोगामी हरले तर मशीनमध्ये गडबड असते, हा युक्तीवाद आहे. तो तर्क लक्षात घेतला तर पुरोगामी बुद्धी तशीच चालणार हेही लक्षात येऊ शकते. कुठल्याही घटनात्मक संस्था वा व्यवस्थेलाही या लोकांनी पक्षीय भूमिकेतून दोष देण्यास मागेपुढे पाहिलेले नाही. यालाच बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात. पण त्यातून बाहेर पडण्याचीच इच्छा नसेल, तर कपाळमोक्ष हाच एकमेव पर्याय शिल्लक रहातो. तसे नसते तर अवघ्या चार दिवसात राहुलच्या नैतिक विजयाचा कपाळमोक्ष कशाला झाला असता? लालूंचा निकाल बघून राहुलची बोलती कशाला बंद झाली असती?

3 comments:

  1. पुरोगामी आणि कॉंग्रेस दोघांचे दुर्दैव की 2G चा आनंद साजरा करता येणार नाही.

    ReplyDelete
  2. आज शेखर गुप्ताचा लेख व राजदिपचे ट्विट बरेच काही सांगुन जाते पुरोगामी किती हतबल झालेत ते.

    ReplyDelete
  3. भाऊ ह्या पुरोगाम्यांना नका देऊ इतकं महत्व...गेले ते आता...संपले...इथून पुढे भारतीय राजकारण फक्त हिंदू ह्या एका शब्दा भवती फिरणार आहे... एकतर हिंदुसमर्थक अथवा हिंदू विरोधी अधले मधले फेकुलर कुठेच दिसणार नाहीत भविष्यात...त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे...

    ReplyDelete