Saturday, January 18, 2020

नव्या कलासंचातले संगीत ‘मानापमान’

pawar uddhav cartoon के लिए इमेज परिणाम

हल्ली म्हणजे २०१४ नंतर भारतीय राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात एका नव्या असाध्य आजाराने मोठे थैमान घातलेले आहे. तो आजार नेमका कुठून आला व कसा पसरला; त्याचा मोठमोठ्या राजकीय डॉक्टरांनाही अजून थांगपत्ता लागलेला नाही. पण त्याची विविध लक्षणे ठळकपणे नजरेत भरलेली आहेत. सहज ओळखता येण्यासारखी आहेत. पहिले लक्षण म्हणजे ज्यांना त्याची बाधा होते, ते लोक अकस्मात कुठल्याही क्षुल्लक कारणास्तव संवेदनशील होऊन जातात आणि अचानक एखाद्या तशाच प्रसंगी कमालीचे बधीर होऊन जातात. कधी त्यांना साधी उदबत्तीही स्फ़ोटक आगडोंब उसळल्यासारखी भयभीत करून टाकते. तर कधी खराखुरा आगडोंबही त्यांना तेवणार्‍या समईसारखा मंद प्रकाश वाटतो. सहाजिकच अशा रुग्णावर कोणता उपचार करावा किंवा त्याला कुठली औषधी द्यावी, त्याचा निर्णय डॉक्टरही करायला धजावत नाहीत. आता त्या शिवाजी महाराज विषयक पुस्तकाचे बघा आणि काही काळापुर्वी मध्यप्रदेशातील कॉग्रेसने प्रकाशित केलेल्या सावरकर विषयक पुस्तकाच्या निमीत्ताने उमटलेल्या प्रतिक्रीया बघा. म्हणजे तुम्हाला यातले रुग्ण कोण आहेत आणि त्यांच्या वेळोवेळी उमटलेल्या प्रतिक्रीया कशा आहेत, त्याची आठवण लगेच होऊन जाईल. कोणाचे नाव घ्यायला नको वा कुणाचे तपशील सांगायला नकोत. महाराजांच्या पुस्तकाने शिवसेनेचे नेते संतापले आणि सावरकर पुस्तकामुळे ते संयमी झाले. तसे दोन्ही विषय शिवसेनेला प्रक्षुब्ध करणारे आहेत. पण प्रतिक्रीया किती भिन्न आहेत ना? पुस्तक कोणाचे त्यानुसारच्या प्रतिक्रीया येतात. पुस्तकात काय आहे, त्याकडे कोणाचे लक्ष आहे काय? कशाला लक्ष हवे? आरोपी महत्वाचा त्याचा गुन्हा काय कोणता, त्याला किंचीतही महत्व नाही. मतलबाला किंमत आहे. सावरकर कशाला, शिवरायांचे तरी सेनेला किती कौतुक आहे?

आपण मुख्यमंत्रीपद वा सत्तेसाठी कॉग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतोय, त्यांना पंडीत नेहरू प्रात:स्मरणिय आहेत, याचे तरी शिवसेनेला भान उरले आहे काय? त्या पंडितजींनी भारत नावाचा देश शोधून काढला. अन्यथा पृथ्वीच्या पाठीवर असा कुठला देशच नव्हता. नेहरूंनी डिस्कव्हरी केली म्हणून आयडिया ऑफ़ इंडिया पुरोगामी अभ्यासकांना सापडली. अन्यथा त्याची त्याही लोकांना ‘आयडिया’ नव्हती. तर अशा या डिस्कव्हरी करून शोध लावलेल्या आयडिया ऑफ़ इंडियामध्ये शिवसेनेला प्राणप्रिय असलेले शिवराय कोण होते? पंडीत नेहरूंनी त्यांचे कसे वर्णन केलेले होते? शिवरायांना नेहरूंनी जितके सन्मानित केले, तितके कधी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे वा अन्य शिवशाहीरही बोलायला धजावले नव्हते. महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा पंडीतजी पंतप्रधान म्हणून प्रतापगडावर आलेले होते, त्यांना तिथे काही नतद्रष्टांनी काळे झेंडे दाखवले होते. कारण अशा विघ्नसंतोषी लोकांना पंडितजींनी केलेले शिवरायांचे कौतुक आवडले नव्हते. शिवसेनेला वा त्यांच्या मुखपत्राला तो इतिहास ठाऊक तरी आहे काय? आजकाल शिवसेनाही पुरोगामी होतेय, त्यामुळे त्यांनाही नवनव्या डिस्कव्हरी होत आहेत. सहाजिकच नेहरू वा अन्य गोष्टी त्यांना ठाऊक नसाव्यात. नव्या दृष्टीकोनातून सेना शिवराय, सावरकर इत्यादी गोष्टी शिकून घेत असावी. अन्यथा जयभगवान गोयल नामक कोणी लिहीलेल्या पुस्तकावरून इतका गदारोळ सेनेने कशाला केला असता? नेहरू दुरची गोष्ट झाली, जुन्या भूतकाळातली. सेनेला कालपरवाचा जयभगवान कोण कुठला तेही आठवेनासे झालेले आहे. त्याला उनाड राजकारणाचे ‘बाळकडू’ कोणी पाजले, त्याचेही स्मरण आजच्या शिवसेनेला उरलेले नाही. त्या सेनेकडून नेहरूंची डिस्कव्हरी वा त्यातले शिवरायांचे कौतुक माहिती असण्याची अपेक्षा जरा जास्तच नाही काय?

शरद पवार समजून घेण्यासाठी शंभर जन्म वाया घालवण्यापेक्षा पंडीत नेहरू व त्यांचाच वारसा म्हणजे भारत; अशी ठाम समजूत घेऊन वाटचाल करणार्‍या कॉग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याची घाई करण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा याच जन्मातले दहाबारा महिने नेहरू समजून घेण्यात खर्ची घातले असते, तरी शिवरायांचा सर्वात घोर अपमान करणार्‍यांच्या वारसाच्या मांडीला मांडी लावून बसण्यातल्या मराठी मनाच्या यातना उमजल्या असत्या. नेहरूंनी ‘लुटेरा’ या शब्दात शिवरायांचा गौरव केला होता काय? त्यांच्या डिस्कव्हरीला महाराष्ट्राने चपराक देऊन बदलायला लावलेले आहे. पन्हाळगडावर आलेल्या नेहरूंना मराठी जनतेने पळवून लावलेले होते. तो इतिहास राहूल गांधीना ठाऊक नसेल. पण राऊतांना ठाऊक असायला हवा ना? त्या अपमानाच्या जखमा अजून सुकलेल्या नसताना जयभगवान गोयल याने उधळलेल्या मुक्ताफ़ळांची शिरगणती कशाला? त्यासाठी शिवरायांच्या आजच्या वंशजांना जाब विचारण्यापुर्वी आपल्या मांडीला कोणाची मांडी लागलेली आहे, त्याची शुद्ध आली असती. त्यासाठी कोल्हापुरचे संभाजी राजे व सातारचे उदयन राजे अशा दोन छत्रपतींना बोलण्याची वेळ आली नसती. ज्यांना अपमान करून घेण्यातच धन्यता वाटत आलेली आहे, त्यांनी अपमानाच्या वा सन्मानाच्या गोष्टी करण्यात अर्थ नसतो. पाच वर्षे खिशातले राजिनामे बाहेर काढण्याची बिशाद नसलेल्यांनी मराठी सन्मान वा अभिमानाच्या गोष्टी किती बोलाव्यात? उद्धव ठाकरे यांच्या नावातच युटर्न असल्याची मुक्ताफ़ळे उधळलेल्यांच्या हातात हात देऊन, सत्तेचे मानकरी होणार्‍यांना कमान तोडणार्‍या शिवरायांचे नाव घेण्याचा तरी अधिकार असतो काय? पेशव्यांनी छत्रपतींना वस्त्रे दिली असली मुक्ताफ़ळे उधळलेल्यांना समजून घेण्याइतके शिवराय समजायला सोपे नसतात. जयभगवानची गोष्टही वेगळी नाही.

हा गोयल कालपरवा भाजपात आलाय आणि त्याने शिवरायांची उपमा दिली आहे. अवमान केलेला नाही. अर्थात तुलनाही करायचे कारण नाही. पण तुलनेत अपमान नसतो. लुटेरा शब्दात अवहेलना असते. तशीच तुलना मग शरद पवारांची शिवरायांशी चालते. तेव्हा कुठल्या जन्मात होते, संजय राऊत? पवार कितीही जाणकार राजकीय नेता असले म्हणून त्यांना अजून एकही किल्ला सर करता आलेला नाही. मराठ्यांना अटकेपार घेऊन जाण्यापर्यंत प्रेरीत करणार्‍या महापुरूषाला जाणता राजा अशी उपाधी दिलेली आहे. दुसर्‍यांच्या आघाड्या, युत्या वा पक्षातही फ़ुट पाडून सत्ता बळकावणार्‍यांना जाणता राजा अशी उपाधी समर्थ रामदासांनी दिलेली नाही. ती स्वयंभू राज्य व साम्राज्य उभारण्याचे स्वप्न बघून साकारणार्‍या महान युगपुरूषाला दिलेली उपाधी आहे. त्याच शब्दात पवारांचे रोहच्या रोज गुणगान चालू असताना, राऊत मूक मोर्चाचा मुका मोर्चा लढवण्यात दंग होते ना? ज्या मराठ्यांचा अभिमान म्हणून तीन वर्षापुर्वी अवघा मराठा समाज रस्त्यावर उतरला होता, त्याच्या मूक प्रक्षोभाची टवाळी एका व्यंगचित्रातून करण्यात आली. तेव्हा त्या व्यंगचित्रकारानेही लोकभावना ओळखून क्षमायाचना तात्काळ केलेली होती. पण राऊत मात्र त्यात अविष्कार स्वातंत्र्य शोधत बसलेले होते. अखेरीस संपादक म्हणून पक्षप्रमुखांनाच जातिनिशी माफ़ी मागण्याची नामुष्की आलेली होती. आपल्याला साध्या व्यंगचित्रातून दुखावलेल्या भावना समजत नसतील, त्याने इतरांच्या पुस्तकाला आक्षेप घेणे म्हणजे नवाच विनोद म्हटले पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन त्यावर शिवरायांच्या विद्यमान वंशजांना आव्हान देण्यापर्यंत मजल, म्हणजे औटघटकेच्या सत्तेचा चढलेला माज म्हणावे लागेल. तसा प्रश्न विद्यमान छत्रपतींना विचारण्यापुर्वी त्या जयभगवान गोयलच्या वंशावळीकडेही बघायला सवड काढायला हवी होती ना?

हा गोयल मुळचा शिवसेनेचाच आहे. त्याला असले कुठले ‘बाळकडू’ सामनातून पाजण्यात आले, की त्याच्यातही मूक मोर्चाचा मुका मोर्चा करण्याचे धाडस यावे? ज्याने आपल्या उनाड राजकारणाला उत्तरेत शिवसेना पदाधिकारी म्हणून सुरूवात केली, त्याला सामनाचा गुण वाण लागणारच ना? ते बाळकडू बाळासाहेबांचे असू शकत नाही. ज्यांना कधी जाणता राजा उपाधीसाठी पवारांना जाब विचारता आला नाही, त्यांनी असल्या उद्योगात पडण्याचे कारण नाही. शिवरायांचे विद्यमान वंशज आणि तो वारसा मानणारे लाखो करोडो मराठी लोक आजही हयात आहेत आणि तशा प्रयत्नांना हाणून पाडणारेही उभे आहेत. श्रीमंत कोकाटेंच्या इतिहासाचे धडे गिरवून ‘जाणता राजा’ झालेल्या पवारांकडून राऊतांनी नवा अफ़जलखान समजून घ्यावा. त्याच कोकाट्यांच्या नव्या इतिहास पुस्तकाचे प्रकाशन करताना तथाकथित जाणत्यांनी खान हिंदूना मारायला नव्हेतर आपल्या राज्याच्या सीमा वाढवायला आला होता, अशी बाष्कळ बडबड केलेली होती. मग काश्मिरात घुसून तोयबा काय करायला येतात? मुंबईमध्ये अजमल कसाब तरी कोणाला मारायला आलेला होता? पाकिस्तानची सीमा वाढवायलाच आले होते ना? जाणता म्हणवून घेणार्‍यांची ही इतिहासाची समज आहे. त्यांना समजून घेण्यात शंभर जन्म घालवल्यावर सामनाचे काय व्हायचे? जयभगवान करतो ती तुलना अपमानास्पद आहे, तर जाणता राजा म्हणून केलेली तुलना सन्मानास्पद होती काय? तेव्हा राऊतांनी शिवरायांच्या वंशजांना सवाल कशाला केलेला नव्हता? कुठलीही वर्तमानपत्रे किंवा माध्यमे वाटेल ती बाष्कळ बडबड प्रसिद्ध करतात, म्हणून कोणी चाणक्य होत नाही, किंवा जाणता होत नाही. इतर कुणाला सवाल करण्यापुर्वी पवारांची दादोजी कोंडदेव विषयातली भूमिका जरा राऊतांनी स्पष्ट करून घ्यावी. ती शिवसेनेशी जुळती आहे काय? कारण पवारांच्या टोळीने कोंडदेवाचा पुतळा रातोरात कापून काढला आणि सेनेने तर ठाण्यात त्याच कोंडदेवाच्या नावाने विस्तृत क्रीडांगण उभारलेले आहे.

महायुती मोडून नको तशा आघाड्या करून सत्ता बळकावली; म्हणून जगातले सर्व शहाणपण आपल्याच पायाशी लोळण घेत असल्याच्या थाटात शिवरायांच्या वारसांना शहाणपण शिकवण्याची हिंमत येते कुठून? वाहिन्यांवरचे मुर्ख वाटेल ते ऐकून घेतात, म्हणून सामान्य मराठी जनता तितकी मुर्ख राहिलेली नाही. ती मराठी असो वा कानडी असो, कुमारस्वामीचे भवितव्य समोर आहे आणि राऊतांनी शिवसेनेला त्याच नौकेत बसवलेले आहे. २०१८ च्या जुन महिन्यात कुमारस्वामींना राहुल गांधी पुण्यात्मा वाटलेले होते. चौदा महिन्यांचा राजाश्रय संपल्यावर त्या मुख्यमंत्र्यासह त्यांचे पिताजी सध्या कुठे आहेत? काय करीत आहेत? शिवाजी महाराजांचे पुस्तक बाजूला ठेवा आणि ते तानाजी नावाचे आमदार मंत्रीपद हुकल्याने पिसाळलेत. त्यांची समजूत काढता आली तर बघा. कारण असे अनेकजण सत्ता मिळालेली नसल्याने ‘पिसाळ’लेले आहेत. आता काही बोलणार नाहीत. पण संधीची प्रतिक्षा नक्कीच करत आहेत. त्यांना गोयलच्या पुस्तकाशी कर्तव्य नसून आपण गमावलेल्या सत्तापदाची फ़िकीर जास्त आहे. असेच लोक कधी उद्धवरावांचा कुमारस्वामी करतील, त्याची राऊतांनी फ़िकीर करावी. कारण सेनेची आजवरची सर्व पुण्याई पणाला लावून राऊतांनी उद्धवरावांना ‘मुख्यमंत्री विराजमान’ केलेले आहे. ते तसेच विराजमान रहातील यासाठीचे प्रयत्न महत्वाचे आहेत. सावंतांचा तानाजी उद्या सुर्याजी होऊन ‘पिसाळ’ला, तर काय होईल? इतिहास त्याचाही साक्षीदार आहे. अर्थात तो जगाला ठाऊक असलेला इतिहास आहे. राऊत बहुधा नवा ब्रिगेडी कोकाट्यांचा इतिहास शिकत असू शकतात. त्यांना वास्तव इतिहासाशी कर्तव्य नसावे. अन्यथा त्यांनी समोरच्या भेडसावणार्‍या समस्यांकडे काणाडोळा करून अशी नसती उठाठेव कशाला केली असती? संभाजी राजे ट्वीटरवरून ‘आवरा’ असे उद्धवरावांना सांगतात, त्याचा अर्थ वेळीच सावरा असाही आहे.

याला अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणतात. लोक कॅमेरा घेऊन समोर येतात म्हणजे आपल्याला जगभरचे सर्व ज्ञान प्राप्त झाले आहे, अशी उगाच समजूत होऊन जाते आणि जीभ मोकाट सुटते. त्याला शहाणपणा म्हणत नाही तर चेकाळणे म्हणतात. याही विषयात जयभगवान गोयल याला धरून भाजपाला कैचीत पकडण्यात काहीही गैर वा चुक म्हणता येणार नाही. तो अशा राजकारणाचा भाग असतो. पण त्यात शिवरायांचा विद्यमान वारस वंशजांना हिणवण्याचे काय कारण होते? त्यांना यात ओढण्याची गरजही नव्हती. भले ते वारस आज भाजपामध्ये असतील. पण त्यांना शिवसेनेवर तोफ़ा डागण्यासाठी तोंड उघडण्याची वेळ आणली गेली आणि त्यांनी शिवसेनेचे नाव आणि त्यानंतर विविध बाबतीत सेनेने वापरलेला ‘शिव’ शब्द घेऊन बिनपाण्याने केलीच ना? चेकाळलेले वक्तव्य आले नसते, तर ही नामुष्की कशाला आली असती? पवारांकडून खुप काही शिकण्यासारखे आहे आणि केव्हा कुठे थांबावे, ते अधिक शिकण्याची गरज आहे. त्यासाठी शंभर जन्म घेण्याची गरज नाही. अजितदादांनी एका धरणाच्या विषयातून तो धडा शिकून घेतला. पण काका पुतण्याला शिकवतात, तितके राऊतांना शिकवलेले नसावे. कोल्हापूरच्या संभाजी राजांना पेशव्यांनी वस्त्रे दिल्याचा शब्द तोंडून गेल्यावर पवारांनी पुढे त्याचा बचाव केला नव्हता. याला धडा म्हणतात. पण तो पवार कधी शिकवित नसतात. शिकणार्‍याला शिकता आला पाहिजे. पण ज्यांना एका जन्मात काही शिकायचेच नसेल, त्यांना शंभर जन्म पोरखेळ करीतच बसावे लागणार ना? अगदी थोडक्यात सांगायचे, तर हे नव्या कलाकार संचातले जुनेच संगीत मानापमान नाटक आहे. त्यात नवे काहीच नाही. ते नेहरूंपासून चालत आलेले आहे. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार त्यातला मानापमान शोधत असतो, वापरत असतो. म्हणून वड्यातला शिव विचारला गेला आणि आघाडीतला शिव गायब कशाला झाला; अशीही विचारणा झालीच ना?

15 comments:

  1. असे म्हणतात की, संजय यांच्या भावाला मंत्री केले नाही, म्हणून ते पिसाळलेत. ते तर चांगले झाले.शिवसेना यामुळे कमी होईल, ते त्यांनी ओढवून घेतले आहे. छान लेख. धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. संजय राऊत सारख्या मूर्ख माणसाला फुगणार् या बेडकांची उपमा दिली पाहिजे...आपण वाटेल तसे विशिष्ट आव आणत बरळलो म्हणजे आपण सर्वज्ञ झालो ह्या आवेशात हा बोलत असतो.पण याला शिवसेनेचं नेतृत्व आवरु शकत नाही म्हणजेच काहीतरी नाईलाज असला पाहिजे,जो राऊतला माहित आहे म्हणून त्यांचा तोंडाचा पट्टा चालू आहे पण शिवसेनेतर्फे इतर mass base नेते सूचकरित्या मौन बाळगून आहेत व जनता सूज्ञपणे हे पहाणे आहे.

      Delete
  2. राऊत साहेबांना असे वाटते की या जगातलं सगळं ज्ञान केवळ त्यांच्यापाशी आहे आणि बाकीच्या लोकांना काही कळत नाही.हा त्यांचा अति आत्मविश्वास आहे.

    ReplyDelete
  3. बिन पाण्याने एकदम अनेक जणांची एका वेळी

    ReplyDelete
  4. संगीत वस्त्रहरण

    ReplyDelete
  5. भाऊ, नव्या कलासंचातले संगीत ‘मानापमान’ हा लेख अप्रतिम लिहिला आहे. सध्याच्या राज्यसरकार बद्दल लिहायचेच म्हटलं तर तिघाडी सरकार हे मोदी शहा फडणवीस नको बाकी काहीही चालेल अश्या संकल्पनेने बनले आहे. तिघाडी सरकारमधील एकाही पक्षाला त्यांनीच
    त्यांची त्यांची घोषित केलेली मूल्यप्रणाली आठवत नाहीये
    घोषित मूल्यप्रणाली तिघाडी सरकारमधील कुठल्याच पक्षाकडून गंभीरपणे घेतली जात नाही किंवा संपूर्ण तिघाडी
    सरकार फक्त "मोदी शहा फडणवीस नको बाकी काहीही चालेल अश्या संकल्पनेने बनले असल्याने" गंभीरपणे घेणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे तिघाडी सरकारमधील कुठल्याच पक्षाकडून घोषित मूल्यप्रणालीपेक्षा प्रत्यक्षातली कामगिरी काय आहे? हे पाहणे जरी अगत्याचे असले तरीही
    भाऊ, नव्या कलासंचातले संगीत ‘मानापमान ह्या लेखात तुम्ही जे चित्र उभं केलेलं आहे तेच आता रोजरोज बघावे लागेल. ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत गणपती करून विराजमान करून (कण्हत्या) राजाने नको त्या वयात नकोत्या आघाड्या इनिशिएट करत आपल्या टिनपाट राजकारणात सत्तेला किती महत्व आहे हे लोकांना दाखवले.
    तिघाडी करून
    काठावर पास’ झालेली सरकारे व बाहेरून पाठिंब्यावर अवलंबून असलेली सरकारे, काही लहरी पक्षांच्या दबावाखाली ब्लॅकमेल होत राहिली, तर ती विवेकपूर्ण निर्णय घेऊ शकत नाहीत. कोणताही बदल करण्यात ती असमर्थ ठरतात. हा बेसिक रुल तिघाडी सरकारमधील प्रत्येक पक्ष
    विसरला आहे. एकच मूल्यप्रणाली मानणारे दोन पक्ष असतात. त्यातील एक राष्ट्रीय पक्ष असतो व एक प्रादेशिक पक्ष असतो. निव्वळ सत्तास्पर्धेच्या मोहाने प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षाशी द्रोह करतो आणि फक्त आडवे लावणे एवढेच काम करीत राहतो. हा राज्य सरकारमध्ये सामीलही असतो पण विरोधकांची भूमिका बजावतो! काही ठिकाणी बाहेर राहून वा सरळ विरोधात जाऊन काम करतो. ह्या टप्प्यानंतरचा टप्पा सोनिया सेनेने कण्हत्या राजाची करंगळी धरून अचिव्ह केला. निवडणुकीत तुम्ही जी भूमिका घेऊन उभे राहिलात आणि आघाडीचे फायदे मिळवलेत, ती भूमिका तुम्ही बिनधास्त फिरवू शकता ह्याचे सर्वात धगधगीत उदाहरण उद्धव ठाकरेंनी राज्याच्या जनतेपुढं ठसठशीत पणे अधोरेखित केलेलं आहे. ‘निवडणूकपूर्व’, या गोष्टीचे पावित्र्य जपले गेले पाहिजे होते पण ‘निवडणूकपूर्व’, या गोष्टीचे पावित्र्य जपले गेले नाही हेच सत्य आहे. अश्या स्थितीत भरपूर विसंगती असूनही त्या ‘विसंगती’च न वाटू देणे याला आपण ‘बनचुका/ चॅप्टर’ माणूस म्हणतो अशीच चॅप्टर
    माणसं आता तिघाडी सरकारतर्फे बौद्धिक घेणार. असले
    बौद्धिक घेणारे चॅप्टर लोक आता वाट्टेल ते बोलणार. तिघाडी
    सरकार कशासाठी?’ हा प्रश्न बाजूला राहून ‘कशामुळे याचे खुलासे देणे’ ह्या चॅप्टर माणसांनी सुरू केलं आहे. मतदारांच्या जाणिवेकडे जाणीव म्हणून पाहिलेच जाणारच नाहीये हे भाऊ, नव्या कलासंचातले संगीत ‘मानापमान’ ह्या लेखातून तुम्ही बिंबवलं. ठाकरेंच्या वंशजांना वरच्या दिशेने मोठ्ठी उडी मारायला मिळावी व ज्यांना राज्यातील मतदारांनी
    विरोधी बाकांवर बसा असा स्प्ष्टय आदेश दिला त्या नाकारलेल्या पण भरपूर व्यक्तींना वरच्याच दिशेने पण त्यांच्या आवाक्यातल्या छोटय़ा उडय़ा मारायला मिळाव्यात हेच तिघाडी सरकारचे उद्दिष्ट्य असेल. प्याद्याचा वजीर बनवून कमी जणांना मोठय़ा उडय़ा’ या सूत्राकडून ‘जास्त जणांना छोटय़ा उडय़ा’ कडे राजकारण नेणे हे सध्या जमलेलं सूत्र आहे. जेव्हा असे होते तेव्हा मानापमान नवीन पद्धतीने
    सादर होणारच भाऊ. शेवटी संकट हे संकट असते आणि आपण शहामृगाप्रमाणे मातीत तोंड खूपसून बसलो; म्हणून ते निघून जात नसते. ते विनाशकारीच असते. त्यासाठी सतत जागरूक राहणे आवश्यक आहे एव्हढा जरी धडा बीजेपी ला
    घ्यायचा असला तरी बीजेपी ने भाऊ तुमचे लेख वाचावेत.






























































    ReplyDelete
  6. भाऊ,संजय राऊत आपला ब्लॉग नक्किच वाचत असणार,आपण एवढे परखड वाभाडे काढूनही जर त्यांच्या बोलण्यात वागण्यात फरक पडत नसेल तर ते नक्कीच सूड भावनेने पेटले असणार व शिवसेना झोपवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असेच वाटू लागले आहे.

    ReplyDelete
  7. सुंदर लीखाण..पण सत्तेचा मद व मोदी द्वेषाने आंधळे झालेल्यांना कळणार नाही वा दुर्लक्ष करतील...दोन्ही काँग्रेस ला अनपेक्षितपणे लॉटरी लागलीय..त्याचा पुरेपुर फायदा घेण्यात ते माहीर आहेत..

    ReplyDelete
  8. भाऊ, राऊत तर मर्कटच आहे तशातच तो शिवसेनेचा मुख्यमंत्री येनकेनप्रकारेण करण्यात यशस्वी झालाय त्यामुळे हे मद्य त्याच्या डोक्यात भिनलंय आणि भाजप विरोधाचा विंचू चावलाय. यासर्व परिस्थितीत त्याच्याकडून काय अपेक्षा करणार.

    ReplyDelete
  9. मी कसा श्रेठ?सगळे सारखेच, एक बे धड़क निर्भिड आणि दूसरा ? राउत पन पत्रकार आणि भाऊ पन पत्रकार ?
    लेखनी आहे कशी पन चालउ शकते.

    सिलेक्शन फक्त काळ वेळेचे आहे.

    ReplyDelete
  10. या सगळ्या हरामखोर लोकांची थोबाड बघून भयंकर रागराग होतो, आजकाल बातम्या बघणही बंद केलं आहे, हे असं कुणीतरी परखड बोलणार असेल तर खरंच मजा येईल.

    ReplyDelete
  11. दिल्लीवासिनी देवीच्या पायावर लोटांगण घालून जाणत्या राजाने दोन महिने उपासना केली. देवी अप्रसन्न होती तरी इतर भक्तांच्या इच्छेनुसार वरदान दिले. जाणत्या राजाने एका नवशिक्या शिष्यासाठी बारा हजारी मनसबदारी मागून घेतली. स्वतःसाठी चौदा खास पदे व नैवेद्य म्हणून 12 देवभक्तांना दिली वर राज्याच्या युवराजांना देवीचा भाट म्हणून ओलीस ठेवले. युवराजांना इतिहासात गम्य नाही. भविष्यातील चिंता नाही.
    शिवराय हे चलनी नाणे म्हणून वापरणाऱ्यांकडून शिवरायांचे चरित्र अभ्यासण्याची अपेक्षा कशी ठेवायची? पकडलेल्या लोकांना सोडून देऊन कॅ. पुरोहितांसारख्या बहिर्जी नाईकांवर खोटे आरोप ठेवून हिंदू आतंकवाद म्हणून आवई ज्यांच्या राज्यात उठवली जाते त्यांना जाणता राजा म्हणून उपाधी देणे 'आजके शिवाजी' पेक्षा भयंकर नाही का?

    ReplyDelete