Thursday, August 4, 2016

भाऊ आजोबा, डेंजर आजोबा (जोपासनापर्व - ७)


मिकु ही चिमुरडी अतिशय चलाख आहे. कौटुंबिक गोतावळ्यातली आहे. अतिशय खट्याळ आणि आपल्या बोबड्या बोलांनी सर्वांना घायाळ करणारी. पण तिच्या बोबड्या बोलांनी घायाळ झालेल्यांना चतुराईने हाताळणारी. दोन अडीच वर्षाची होईपर्यंत एकदोनदा भेटलेली. त्यामुळे माझ्याशी तिचा परिचय नव्हता. बाकीच्या गोतावळ्यात अतिशय लोकप्रिय. पण हट्टी म्हणून प्रसिद्ध. तुम्ही बोलाल त्याचे प्रत्युत्तर चोख तयार! पक्के तर्कशास्त्र असल्यावर काय हवे? सर्व आज्या आजोबा, मावश्या, काकूंना निरूत्तर करून टाकते. मी हे सर्व ऐकून होतो. पण माझ्या वाट्याला ती आलेली नव्हती. म्हणून मी तिला अनोळखी होतो. माझी आई गेली, तेव्हा नातेवाईकांनी भेटायला आठवडाभर गर्दी केली होती. तेव्हा मिकूची आणि माझी पहिली थेट ओळख झाली. तिच्यासाठी मी नवा असलो, तरी मी तिला पक्की ओळखून होतो. म्हणूनच संधी सोडली नाही. डोक्याचे केस भादरलेला माझा अवतारच तिला गोंधळात पाडून गेला होता. त्यातच मी तिला छळायला सुरूवात केली. फ़्रॉक ओढ, केस ओढ, असा खेळ तिला अजिबात पसंत नव्हता आणि अनोळखी म्हातार्‍याची सलगी बिलकुल नको होती. तिचा त्रागा चालू होता आणि तिची आई मावशी आज्या आजोबा कोणीच हस्तक्षेप करून मला रोखत नव्हते. म्हणून मिकू चिडचिडलेली होती. अखेरीस अति झाले आणि तिची आई दिपाने मला थोपवण्यासाठी म्हटले ‘जाऊ देरे भाऊकाका, नको सतावू माझ्या पोरीला’. मुलीला थोडे हायसे वाटले. नेहमी तिचे कौतुक करणारे कोणीही पुढे येत नसताना, निदान आई मदतीला धावली याचे समाधान होते. मी रागवल्याचे दाखवून दिपाच्या पाठीत धपाटा घातला आणि म्हटले, ‘मघापासून ही माझ्या भाचीला (म्हणजे दिपालाच) त्रास देतेय, त्याचे काय? माझ्या भाचीला कोणी त्रास दिलेला मला चालत नाही. मला मग राग येतो.’ हे सर्व तर्क-युक्तीवाद मिकूसाठी नवे होते.

माझा पवित्रा लक्षात आलेले बाकीचे गप्प झाले. दिपाच उलटून मिकूला म्हणाली, ‘बाळा काय करू, भाऊकाका मला पण मारतोय बघ.’ मग तिने आजोबा आज्यांचा आश्रय घेऊन बघितला. पण कोणीच मला थांबवायचे धाडस करीत नाही म्हटल्यावर मिकू भयंकर अस्वस्थ झाली. असहाय झाल्यासारखी जाऊन आईला बिलगली. तिने जरा हालचाल करायची खोटी, की मी तिचे केस वा फ़्रॉक ओढत होतो. सगळा प्रकार तिच्यासाठी असह्य झाला होता आणि उपाय तर काही सापडत नव्हता. ती घरी जाण्याचा हट्ट करू लागली. तर मी तिला माझ्याकडे ठेवून निघा, म्हणून सर्वांना फ़र्मावले. ती कुतुहलाने माझे चोरटे निरीक्षण करीत होती. तिच्या आजवरच्या भावविश्वाला तडा गेला होता. हा कोण इसम आहे ज्याच्यापुढे आपले सर्व कुटुंबिय हताश प्रभावशून्य होऊन गेलेत आणि कशाला? तिला याचे उत्तर सापडत नव्हते. अखेर मीच तिला माझी ओळख करून दिली. ‘मी डेंजर आजोबा आहे. कोणी रडले किंवा वेड्यासारखे वागले, मग मला ख्प राग येतो.’ बाकी सगळे निमूट माना हलवून माझ्या विधानाला दुजोरा देत होते. तेव्हा ती दिपाच्या कानात कुजबुजली, ‘मिकू पण शहाणी आहे. मस्ती करत नाही. रडत नाही. वेडेपणा करत नाही.’ हे शब्द मलाही ऐकू यावेत, याची तिने काळजी घेतली होती. माझ्या घरून निघाल्यापासून आपल्या घरी पोहोचेपर्यंत तिने आई मावश्या आजी आजोबा सर्वांना भंडावून सोडले. प्रत्येक व्यक्तीकडे ती माझ्याविषयी मिळेल तो तपशील गोळा करीत होती. हे मला नंतर कळले. कोणीतरी भयंकर माणूस आहे आणि आपल्याला त्याच्यापासून वाचवायला घरातले कोणी उपयोगाचे नाही, इतकेच त्यातून तिच्या डोक्यात शिरलेले होते. पुढे दोनतीन दिवस आई व मावश्यांकडून तिने अधिक माहिती काढून घेतली. त्यांनाही अंदाज आला असल्याने त्यांनी माझी अधिक भयंकर प्रतिमा तिच्या डोक्यात भरवली.

एकूण मिकूसाठी मी कोणी भयंकर राक्षस असल्याचे मस्त चित्र तयार झाले होते. काही महिन्यांनी तिच्या मावशीकडे तिचा तिसरा वाढदिवस साजरा व्हायचा होता. तिथे मी असेन असे तिच्या स्वप्नातही नव्हते. पण अकस्मात मी तिथे अवतिर्ण झालो आणि तिची बोलती तात्काळ बंद झाली. पण मी तिला अजिबात त्रास दिला नाही. तिथे जाताना बसमध्ये एकांत असताना तिचाच विचार डोक्यात असल्याने, एक मजेशीर विडंबन तयार झाले होते. दादा कोंडक्यांचे जुने गीत ‘काय ग सखू’ बघता बघता रुपांतर करून ‘काय ग मिकू’ हे गाणे मी रचले होते. तिच्या वाढदिवसासाठी तेच म्हणून दाखवले आणि मिकू अचंबित झाली. इतके मजेशीर गाणे इतका राक्षसी माणुस कसे म्हणू शकतो? त्यानेच बनवले कसे? आपल्याविषयीचे गाणे आपल्याला ठाऊक नाही, तर या भलत्याच माणसाला कसे ठाऊक? अशा कित्येक प्रश्नांनी मिकू थक्क होऊन गेली होती. तितकेच नाही. पहिल्या भेटीनंतर माझ्याविषयी ऐकलेल्या सर्व भयंकर गोष्टीचा मागमुस दुसर्‍या भेटीत कुठे आढळत नव्हता. मिकू चक्रावून गेली होती. पहिल्या भेटीतला डेंजर आजोबा खरा की आता गाणी गुणगुणणारा मजेशीर आजोबा खरा? ती अतिशय सावधपणे परिस्थिती हाताळत होती. माझ्याविषयी मत बनवणेच तिला अशक्य होऊन गेले होते. किंबहूना तीच तर माझी योजना होती. यावेळी तिला मस्ती करण्यापासून रोखणार्‍या आई मावश्या आज्या सर्वांना मीच दम भरत होतो आणि मुलांना कसे मोकळे खेळू द्यावे, असे बोल ऐकवत होतो. परिणामी माझ्याविषयी कुठलाही तर्क किंवा मत बनवणे मिकूसाठी अशक्य करून टाकलेले होते. तिच्या मनाचा पुरता गोंधळ उडवला होता. ती माझ्याशी हसत, पण सावधपणे संवादही करत होती. मिकू आता कशी शहाणी झाली आहे आणि मस्ती करत नाही, त्याचाही हवाला मला देत होती. उलट घरच्यांच्या तक्रारी माझ्याकडे करत होती.

या दुसर्‍या भेटीनंतर मिकूमध्ये एक नवा फ़रक पडला होता. आता ती घरच्यांना कोणालाही माझ्या वतीने दम देऊ लागली होती. कोणी काही ऐकले नाही, तर थेट भाऊ आजोबाला नाव सांगण्याचे इशारे मिकू देऊ लागली होती. त्याला फ़ोन करून सांगु काय, असेही इशारे येऊ लागले होते. थोडक्यात भाऊ आजोबाला खुश ठेवले, की अन्य कोणाला भिक घालण्याची गरज नाही, अशी तिची समजूत झालेली होती. इतर कोणी त्याला रोखू शकत नाहीत म्हणजे भाऊ आजोबाचा दरारा आहे, असा तर्क तिने बांधला होता. त्याचा चतुराईने वापरही सुरू केला होता. पण दुसरीकडे घरच्यांनाही एक सुविधा उपलब्ध झाली होती. ते फ़ोन उचलून मला तिच्याविषयी काही सांगण्याचे नाटक करू लागले, की भराभर कामे होऊ लागत. एकदोनदा खरेच तिच्या आईने दिपाने फ़ोन केल्यावर पलिकडून ती मोठ्या आवाजात ओरडली, मिकू शहाण्यासारखी वागते आहे. पुढल्या प्रत्येक भेटीत मी एकच खेळ करत होतो. माझ्याविषयी तिचे निश्चीत मत होऊ द्यायचे नाही. भाऊ आजोबा अनाकलनीय असणे ही त्यातली गोम होती. दोन अडीच वर्षाची अशी मुले बहुतांश चतुर व लबाड असतात. आपण समजतो तशी बावळट अजिबात नसतात. पालक कुटुंबियांना नेमके कुठे कसे वापरायचे, याविषयी मुले तयार असतात. मिकू त्यातलाच खास नमूना! परिस्थिती व व्यक्ती यांचा, आपला मतलब साधण्यासाठी नेमका वापर करण्यातले कसब अशा वयातल्या मुलांपाशी पुरेसे असते. म्हणूनच त्यांना हाताळण्यात पालकांना अधिक कुशलता दाखवावी लागते. मुलांच्या तर्कबुद्धीच्या आवाक्यात येणार नाही, अशी खेळी करता आली, तरच त्यांच्यावर नियंत्रण राखता येते. मिकूला मी कधी चापटी मारलेली नाही की दमदाटी केलेली नाही. पण एक अनाकलनीय वचक सहजगत्या तिच्या मनात निर्माण करून ठेवला आहे. तिच्या संगतीने त्याच वयाचा मावसभाऊ आदू काहीही न करता मला वचकून असतो. दोन्ही मुले मला घाबरत नाहीत. पण अतिशय सावध असतात. हे कसे साध्य करता येते?

1 comment: