Monday, August 29, 2016

नंगेसे खुदा भी डरता है!

tarun sagar के लिए चित्र परिणाम

हरयाणा विधानसभेत जैन दिगंबर पंथाचे धर्मगुरू तरूण सागरजी महाराज यांना आमंत्रण देण्यात आलेले होते. त्यांनी तिथे उच्चस्थानावर बसून आपले विचार आमदारांसमोर मांडले. त्यांनी कुठले विचार मांडले यावर चर्चा व्हायला हरकत नाही. मात्र ते निमीत्त साधून त्या संन्याशी व्यक्तीविषयी राळ उडवण्याचे कोणाला काही कारण नव्हते. पण अलिकडे आपल्या देशात इतके शहाणे पैदा झाले आहेत, की भाजीपाल्यापेक्षाही स्वस्तात ते उपलब्ध असतात. म्हणून की काय तरूण सागर यांच्यावर प्रवचन देणार्‍यांनी आपापल्या पद्धतीने मल्लीनाथी केली. त्यात अर्थातच नेहमीच्या विचारवंत आणि बोलघेवड्यांचा भरणा होता. काहीजणांनी आपली धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी या संधीच उपयोग करून घेतला. तर काहीजणांनी आपल्या बुद्धीचे प्रदर्शन मांडण्यासाठी त्याचा लाभ उठवला. असे प्रसंग नवे राहिलेले नाहीत. अविष्कार स्वातंत्र्य या नावाखाली काहीही बाष्कळ बडबड करण्याचा जन्मसिद्ध अधिकार गाजवायला लोक उतावळे असल्यावर अशा गोष्टी व्हायच्याच. सहाजिकच या महारांजांवरून टिकाटिप्पणी झाली. पण ती करताना त्यांच्यावर व्यक्तीगत चिखलफ़ेक झाली. त्यांच्या व्यक्तीमत्वाची टवाळी करण्याची जी स्पर्धा झाली. ती अनेकदा होत असते. त्यात जे अनेकजण आघाडीवर असतात, त्यामध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांचा नेहमीच पुढाकार असतो. म्हणूनच त्या पक्षाचे संगीतकार विशाल दादलानी यांनीही आपला सुर आळवून घेतला. मात्र असे करताना आपल्या पक्षाच्या पोकळपणाचे भान त्यांना राहिलेले नव्हते. म्हणून की काय, त्यांना पक्षीय राजकारणातून संन्यास घ्यायची वेळ आली. तरूण सागर यांची माफ़ी मागूनही भागले नाही, तेव्हा संगीतकाराला आपला राजकीय संसार गुंडाळावा लागला. किंबहूना पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीच तो गुंडाळण्याचे आदेश दिलेले असणार. काय झाले केजरीवाल यांना?

तरूण सागर महाराज हे संन्यासी असले तरी त्यांना आमंत्रित करणारे किंवा त्याच्या विरोधात असलेले तमाम राजकारणी, शेवटी मतांचे लाचार असतात. सहाजिकच त्यांना तत्वापेक्षाही मतांची अधिक गरज असते. त्यामुळेच मतदार दुखावेल असे काही करून चालत नाही. प्रसंगी तत्वाची अडचण होत असेल, तर तत्व किंवा विचारांना तिलांजली देण्याची तयारी ठेवावी लागते. तरूण सागर हे काय बोलले व त्याचा जनमानसावर किती परिणाम होतो, ही बाब दुय्यम असते. पण त्यांची खिल्ली उडवली मग त्यांना मानणारा अनुयायी असतो, त्याची नाराजी ओढवून घ्यावी लागते. हे महाराज विद्यमान काळात दिगंबर जैन समाजाचे एक महत्वाचे मुनिवर्य आहेत. मग त्यांची खिल्ली कोणी उडवली, तर जैन समाज नाराज होणे स्वाभाविक आहे. तसे करणार्‍याला संघटितपणे धडा शिकवण्यासाठी असा समाज एकवटला तर नवल नाही. झालेही तसेच! बाकीच्या राजकारण्यांनी व्यवहारी शहाणपणाने या आमंत्रण वा व्याख्यानाविषयी मौन पाळण्यात धन्यता मानली होती. कारण त्यांना तरूण सागर यांचे महात्म्य ठाऊक नसले तरी त्यांच्या अनुयायांच्या मतांचे महात्म्य पक्के ठाऊक आहे. त्याला दुखावण्यापेक्षा सागर यांच्या त्या प्रवचनाविषयी गप्प रहाणे, बहुतेक पक्षांनी पत्करले. पण जगातले सर्व राजकीय शहाणपण आपल्याच कवटीत भरून राहिले आहे, अशी समजूत करून घेतलेल्यांचाच भरणा आम आदमी पक्षात असल्याने, त्याच्या एका उथळ नेत्याने आपली अक्कल पाजळली. विशाल दादलानी असे त्याचे नाव आहे. रियालिटी शो किंवा तत्सम वाहिन्यांवरच्या उथळ कार्यक्रमाने अशा अनेक उपटसुंभाना विख्यात करून ठेवलेले आहे. सहाजिकच आपण जनमानसाचे प्रवक्ते असल्याच्या थाटात ते वाटेल तसे बरळत असतात. इथेही तेच झाले. सोशल माध्यमात दादलानी यांनी तशी मुक्ताफ़ळे उधळली आणि केजरीवाल यांनाच लोटांगण घालण्याची पाळी आली.

दिल्लीत आपच्या यशात मोठ्या प्रमाणात जैन मतदारांचा उपयोग झाला होता. त्यांनाच दुखावणे केजरीवालना परवडणारे नव्हते. पण सोबतीला एकाहून एक नग गोळा करून ठेवलेले असल्यावर दुसरे काय व्हायचे? तिकडे पंजाबात स्टींग ऑपरेशनचे महामेरू आशिष खेतान यांनी अशीच घाण केलेली होती. निवडणूकीला दहा महिने असताना आधीच घाईगर्दीने जारी केलेल्या जाहिरनाम्यात त्यांनी शिखांचे सर्वाधिक पवित्र स्थान असलेल्या सुवर्ण मंदिराच्या चित्रावर झाडू छापला होता. त्यामुळे शीख समाज खवळला आणि पाया पडून भागले नाही, तर केजरीवाल यांना तिथे जाऊन खरकटी भांडी घासण्याचे नाटक रंगवावे लागले होते. मुळात असला शहाणपणा सुचण्याचे कारणच उतावळेपणा व उथळपणात दडलेले आहे. ज्यांच्यापाशी सामान्य विचारबुद्धी नाही, त्यांनी उचलली जीभ लावली टाळ्याला, अशा पद्धतीने मतप्रदर्शन करण्याच्या रोगातून ही पाळी आलेली आहे. इतके आक्रमक विधान सोशल माध्यमात विशाल नावाचा फ़डतूस माणूस करू शकला. कारण त्याच्या नेत्यानेही पंतप्रधानाला सायकोपाथ म्हणण्यापर्यंत ताळतंत्र सोडलेले होते. इतरही अनेक पक्षात वा तथाकथित बुद्धीमंतांमध्ये आजकाल याच रोगाची भयंकर बाधा झालेली आहे. त्यातूनच मग अशी वक्तव्ये येत असतात आणि त्याचा आधार घेऊन पराचे कावळे करून उडवले जात असतात. सार्वजनिक जीवनाला अशा नागडेपणाने पुरते प्रदुषित करून टाकलेले आहे. त्याचेच हे दुष्परिणाम असतात. मग केजरीवाल यांच्या सत्येंद्र जैन नावाच्या मंत्र्याला महाराजांची क्षमायाचना करायला धाव घ्यावी लागली. तर त्यांनी आपण अशा प्रतिक्रीयांची दखलही घेत नसल्याचे सांगून त्यांना माघारी पाठवून दिले. त्या मुनिवर्यांच्या मोठेपणाची तीच साक्ष म्हणता येईल. त्यांचे विचार वा तत्वज्ञान मान्य नसले तरी त्याचाही आदर राखायला विसरलेले स्वत:ला सहिष्णू म्हणवतात, ही अजब गोष्ट आहे.
आपल्या देशातले तमाम पुरोगामी आज गप्प कसे, याची मोठी गंमत वाटते. कारण खरे तर भाजपाच्या राज्य सरकारने या मुनिवर्यांना विधानसभेत आमंत्रित केलेले होते. त्याचा आधार घेऊन राजकीय शेरेबाजी व्हायला हरकत नव्हती. पण त्यात कुठलाही व्यवहारी राजकारणी शिरला नाही. कारण जैन समाज संघटित असून, अशा टिकाटिप्पणीच्या विरोधात मतदानाच्या बहिष्काराचा बडगा उगारू शकतो. हीच इथल्या पुरोगामीत्वाची खरी शोकांतिका आहे. कुठल्याही प्रतिकुल प्रतिक्रीया वा मतप्रदर्शनावर समजूतदारपणे गप्प बसणार्‍यांना इथे धडे शिकवले जातात आणि संघटितपणे धर्माची अस्मिता जपणार्‍यांपुढे इथले पुरोगामीत्व माथा टेकते. युक्तीवाद करून अविष्कार स्वातंत्र्याच्या गप्पा ठोकल्या जातात. पण खरेच जेव्हा धार्मिक अस्मिता मैदानात येते, तिथे सगळे पुरोगामी अवसान गळुन जाते. दिगंबर जैन साधू नेहमीच विवस्त्र जगलेले आहेत आणि त्याविषयी त्यांच्या कोणा अनुयायांची तक्रार नाही. अन्य कुणाच्या वस्त्र प्रावरणाबद्दल आग्रह धरण्याला आवेशात विरोध करणार्‍यांनीच या साधूची नग्न म्हणून टिंगल करण्यात काय हशील होते? असे साधू आपल्या इच्छा व निवडीनुसार विवस्त्र जगतात. त्यांनी इतरांच्या आग्रहाला कशाला झुकावे? कपडे कसे असावेत यासाठीचा आग्रह चुकीचा असेल, तर कपडे असायलाच हवेत, अशी सक्ती किती योग्य ठरू शकते? पारदर्शकतेचे आग्रही कपड्यात वावरून चारित्र्याने नग्न असतात ना? मग त्यांनी कुणाच्या नग्नतेवर इतके सोवळे पांघरण्याची गरज काय? कोणीतरी ही वस्तुस्थिती अशा कपड्यात झाकलेल्या शहाण्यांना ठणकावून सांगण्याची खुप गरज होती. एका नग्न साधूने तेच केले असेल, तर त्याचे अभिनंदनच करायला हवे. शेकडो पिढ्यांनी सांगितलेले एक सत्य आज त्यांनी खरे करून दाखवले. ‘नंगेसे खुदा भी डरता है! तिथे या किरकोळ निरीश्वरवादी निधर्मवाद्यांची काय कथा? तरूण सागरजी महाराज तुम्हाला त्रिवार नमन!


2 comments:

  1. हे आपिये येडे आहेत

    ReplyDelete
  2. श्रीकृष्णाने आज जर आपल्या विभूती सांगितल्या असत्या तर नक्कीच तो , ' जैनोSस्मि अल्पसंख्यानाम् ' असे म्हणायला विसरला नसता इतका जैनांचा प्रभाव राज्यात व देशात दिसत आहे . पर्युषण काळात मांसविक्रीला बंदी करणे हा चर्चेचा विषय आताच का बनला ?संथारा बद्दल न्यायालयाने त्वरित निकाल देणे हेपण जैनांचा वाढत प्रभाव दर्शवते .मुख्यतः व्यापारउदीम करणारे जैन लोक राजकारण्यांना खेळवण्यात कुशल आहेत . निवडणुकांच्या आधी पैसे देऊन राजकीय पक्षांना ओशाळे करून नंतर त्यांना ,"नाच मेरे बुलबुल के पैसे मिलेगा ' म्हणत आपल्या तालावर नाचवायचे या त्यांच्या कौशल्याला दाद द्यायलाच हवी .मुसलमान ,ख्रिश्चन किंवा इतर अल्पसंख्य लोकांपेक्षा वेगळे तंत्र जैनांनी विकसित केले आहे हे लक्षणीय नाही काय ?

    ReplyDelete