Saturday, April 2, 2016

बोल-बोल-बोल बोलबच्चन

२००४ नंतरच्या राष्ट्रीय राजकारणात उत्तरप्रदेशातील मुलायमसिंग आणि मायावती ही दोन राजकीय पात्रे पुढे आली. त्यातल्या एकाला, म्हणजे मुलायमना त्यांच्या अनेक सहकार्‍यांनी व नातलगांनीच डबघाईला आणले. यातली महत्वाची भूमिका अमरसिंग यांनी बजावली होती. कधीकाळी कॉग्रेसमध्ये दुय्यम दर्जाचा नेता म्हणून काम करणारे अमर सिंग, विसाव्या शतकाच्या अखरेच्या काळात मुलायमना चिकटले आणि आपल्या मध्यस्थ दलालीच्या कलेमुळे त्या पक्षातले एक प्रमुख नेता होऊन बसले. मुलायमच्या आर्थिक व व्यावसायिक कामात अमरसिंग यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आणि बदल्यात आपले स्वत:चे राजकीय स्थान राष्ट्रीय राजकारणात उभे केले. कुठल्याही पक्षात आणि कुठल्याही क्षेत्रात अमरसिंग यांची उठबस नाही, असे शक्य नव्हते. अमिताभ बच्चन ह्याच्यासारखा शतकातला नायकही अमरसिंग यांच्या जाळ्यात फ़सला होता. त्या काळात अमिताभच्या कंपनीला आयकराची मोठी रक्कम तातडीने भरायला अमरसिंग यांनी उपलब्ध करून दिली आणि बदल्यात हा माणूस बिगबीचा छोटा भय्या म्हणून मिरवू लागला. अभिषेक बच्चनचे ऐश्वर्याशी लग्न असो किंवा अमिताभची तिरूपतीला दिलेली भेट असो, त्यात अमरसिंग बगलेत असायचाच. अमिताभच्या वतीने वाटेल ते बोलण्याचा मक्ता जणू या गृहस्थांनी मिळवला होता. तेव्हा मुलायम उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि देशातल्या या सर्वात मोठ्या राज्याचे व्यवहारही अमरसिंग यांच्या हाती आल्यासारखी त्यांची वागणूक होती. अनेक चित्रपट कलावंत समाजवादी पक्षाच्या दावणीला आणून बांधण्याची किमयाही अमरसिंग यांनी करून दाखवली होती. पण मध्यस्थ आणि नेता यातला फ़रक विसरून हा माणूस इतका अतिरेक करू लागला, की एकामागून एकाने त्याला दुर ठेवणे पसंत केले आणि अमरसिंग पडद्याआड गेले होते. आता अमिताभला राष्ट्रपती बनवण्याचा घाट घालून ते पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.
पुढल्या वर्षी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची मुदत संपते आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस पुढल्या राष्ट्रपती निवडणूकीचे वेध लागतील. गेल्यावेळी मुलायम-ममतांनी आधी संयुक्तपणे अब्दुल कलाम यांचे नाव सुचवले होते. पण सोनियांनी त्यांना किंमत दिली नाही आणि प्रणबदांचे नाव पुढे केल्यावर ही जोडगोळी बारगळली होती. अखेरीस त्यांनीही प्रणबदांना पाठींबा देत माघार घेतली होती. मात्र तेव्हा अमरसिंग झोकात होते आणि मुलायमच्या वतीने विविध सौदे करण्यात आघाडीवर होते. त्यांच्यामुळेच मग डाव्यांनी दगाबाजी केल्यावर २००८ सालात मनमोहन सरकार बचावले होते. केंद्रीय सत्तेत तेव्हा मुलायमना समावून घेण्याच्या बोलीवर मुलायमनी सरकारला पाठींबा दिला होता आणि त्यासाठी खासदार जमवण्यातही अमरसिंग पुढे होते. पैसे देवून खासदार खरे़दी प्रकरणात अमरसिंग यांना अटकही झालेली होती. तीन भाजपा खासदारांना त्यांच्याच घरातून दिड कोटी रुपयांची रोख रक्कम दिल्याचे स्टींग चित्रण तेव्हा खुप गाजले होते. त्याच्या चौकशीत बालंट अमरसिंग यांच्यावर आले आणि केंद्रातील मंत्रीपदेही मिळाली नाहीत. त्यामुळे मुलायम व अमरसिंग यांच्यात दुरावा निर्माण होत गेला. दरम्यान मुलायमचे दुसरे निकटवर्ति आझमखान अमरसिंगमुळे नाराज होऊन समाजवादी पक्षापासून बाजूला पडले होते. विधानसभा निवडणूक जवळ आली तसे मुलायमनी अमरसिंग यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर हे गृहस्थ बेवारस झाल्यासारखे कुठेही भटकत होते. आधी त्यांनी कॉग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तिथे डाळ शिजली नाही; तेव्हा स्वतंत्र पक्ष काढून उत्तरप्रदेशाच्या निवडणूकाही लढवून बघितल्या. पण त्याचा उपयोग झाला नाही. मग लोकसभेत अजित सिंग या दुसर्‍या दिवाळखोराच्या पक्षात सहभागी होऊन लढत दिली. अखेरीस पुन्हा लौटके बुद्दू घरको आये म्हणतात, तसे काही महिन्यापुर्वी अमरसिंग मुलायमच्या आश्रयाला आले आहेत.
मात्र इतके करूनही त्यांना पुर्वीप्रमाणे प्रसिद्धीच्या झोतात रहाणे शक्य झालेले नाही. कारण समाजवादी पक्षात त्यांना पुन्हा प्रवेश मिळाला असला, तरी महत्वाचे असे कुठलेही स्थान वा पद मिळालेले नाही. मग आपल्याकडे लोकांचे लक्ष जाण्यासाठी त्यांना काहीतरी धडपड करणे भाग आहे. आयुष्यभर कुणातरी मोठ्याच्या प्रभावळीला राहून स्वत:चे महत्व वाढवणार्‍यांची हीच अवस्था असते. सध्या त्यांना कोणी विचारत नाही. अगदी अमिताभनेही त्यांना जवळ फ़िरकू दिलेले नाही. त्यामुळे नव्याने आपले महत्व प्रस्थापित करण्याची संधी अमरसिंग शोधत असल्यास नवल नाही. त्यातूनच मग त्यांनी अमिताभला राष्ट्रपती बनवण्याचा चंग बांधला असावा. ते खरे वाटावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने आवई पिकवणे त्यांना भाग पडले असावे. पण त्यात किंचितही तथ्य असण्याची शक्यता नाही. याची अनेक कारणे आहेत. राष्ट्रपती व्हायचे तर अमिताभला आपले सर्व व्यवसाय सोडून बंदिस्त व्हावे लागेल. नंतरही अभिनयाला रामराम ठोकावा लागेल. कारण ते सत्तापद नाही तर घटनात्मक पद आहे. आजही नव्या पिढीतल्या कलावंतांशी स्पर्धा करणारा हा सुपरहिरो अजून तरी निवृत्तीच्या विचारात दिसत नाही. मग केवळ प्रतिष्ठेसाठी तो अशा पदाचा विचारही करण्याची शक्यता नाही. त्याने तसे करूही नये. इंदिरा हत्येनंतर राजीव गांधी यांच्या आग्रहास्तव लोकसभेत निवडून आलेल्या अमिताभने अवघ्या तीन वर्षात राजिनामा दिलेला होता. त्यानंतर राजकारण आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही, याची जाहिर कबुली दिलेली आहे. सार्वजनिक जीवन व सत्तापद यांच्यामुळे येणार्‍या मर्यादांमध्ये रहाण्याचा त्याचा स्वभाव नाही, याची कबुलीच स्पष्ट आहे. अमरसिंग यांच्यासाठी अमिताभ असे काही करण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणूनच ही लोणकढी थाप समजायला हरकत नसावी.
यातला भंपकपणा लपून रहात नाही. अमिताभने गुजरात सरकारसाठी जाहिराती केल्या, तेव्हा मुख्यम्रंत्री असलेल्या मोदींशी त्याची भेट अमरसिंग यांनी करून दिलेली असल्यास नवल नाही. तेव्हा अमरसिंग यांच्या तालावर अमिताभ नाचत होता. कारण आर्थिक गोत्यातून बाहेर पडायला त्यांनीच बच्चन कुटुंबाला मदत केली होती. पण आज तशी स्थिती नाही. अमिताभ वा मोदी यांना एकमेकांना भेटण्यासाठी अमरसिंग यांच्यासारख्या मध्यस्थाची गरज उरलेली नाही. एक साधा फ़ोन फ़िरवून दोघेही परस्परांशी संवाद साधू शकतात. त्यासाठी अर्थमंत्री जेटलींकरवी अमरसिंग यांना मध्ये घालण्याची मोदींना गरज नाही. पण अशी नावे आपल्या संपर्कात आहेत, अशा गमजा केल्याने अमरसिंग यांचा बाजारभाव वधारतो ना? अमिताभच्या नावाने खळबळ माजते आणि बाकीच्या नावामुळे अमरसिंग यांच्या प्रतिष्ठेत भर पडू शकते. हेच त्यातले रहस्य आहे. अर्थात जेटली वा तत्सम कुणाशी अशा गप्पा अमरसिंग यांनी मारलेल्या असू शकतात. पण अमिताभशी हा माणूस याविषयावर बोललेलाही नसेल याबद्दल खात्री बाळगावी. आधीच विरोधकांच्या विविध आरोपांनी गांजलेले पंतप्रधान अमरसिंग याच्यासारख्या वादग्रस्त माणसाला इतक्या महत्वाच्या निर्णयात साधे समाविष्ट करूनही घेण्याची शक्यता नाही. खरे तर मुलायमसारख्यांनी खड्यासारखे बाजूला केल्यावर तरी असला थिल्लरपणा अमरसिंग यांनी सोडायला हवा होता. पण जित्याची खोड म्हणतात, तशी या लोकांची हौस असते. त्यांना उचापती आणि महत्वाची कामगिरी यातला फ़रक उमजत नाही. त्यामुळे मग कुठल्याही कामाचा चुथडा होऊन जात असतो. आधीच मोदींना भाजपातले काही उचापतखोर भंडावत आहेत, त्यात आणखी अमरसिंग यांच्यासारखी डोकेदुखी कोण जवळ करील? अमिताभलाही त्याचा खुलासा करावासे वाटलेले नाही, यातच कोण नुसता बोलबच्चन आहे त्याचा निकाल लागून जातो ना?

1 comment: