Thursday, April 28, 2016

सोनियांविरुद्ध पुरावा कुठे आहे?

दोनचार दिवस ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदी भ्रष्टाचाराचा मामला पुढे आला आहे. तो अर्थातच भाजपाने पुढे आणलेला नाही. तर इटालीच्या एका न्यायालयाने दिलेल्या निकालातून उदभवला आहे. कारण त्या खरेदीत भारतातील काही लोकांना लाच दिली गेली, असा तिथल्या कोर्टाचा निष्कर्ष आहे. काही नावांचा ओझरता उल्लेखही त्यात आहे. सोनिया गांधींसह त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचाही उल्लेख आला आहे. असे काहीही असले तरी सोनिया गांधींवर भाजपासह अन्य कोणी आरोप करणे कितपत शहाणपणाचे आहे? या देशात कोणावरही कसलाही आरोप होऊ शकतो. पण सोनिया किंवा कुणा नेहरू खानदानाच्या व्यक्तीवर कसलाही आरोप होऊ शकत नाही, याचे भान राखले गेले पाहिजे. सोनिया त्याच कुटुंबातील असल्याने त्यांच्यावर संशय शंका घेणे वा कसलाही आरोप करणे गैरलागू असते. जो कोणी असे करील त्याला अक्कल नसते, तो निर्बुद्ध असतो किंवा प्रतिगामी असतो. हा गेल्या सहा दशकातला प्रचलीत व प्रस्थापित सिद्धांत आहे. अर्थात असे आरोप आपल्यापैकी कुणावर झाले, तर त्यासाठी पुरावे पुरेसे असतात. पण नेहरू खानदानावर आरोपाला पुरावा असू शकत नाही. म्हणून तर या हेलिकॉप्टर भानगडीचा उल्लेख होताच सोनियांनी ठणकावून विचारले, ‘पुरावा कुठे आहे?’ त्याचा अर्थ अनेकांना मुळातच समजला नाही. आपण आपल्याच पातळीवर विचार करतो आणि दंडविधान वा अन्य कायद्यानुसार पुरावे देऊ लागतो. तीच आपली चुक असते. या देशावर राज्य करायलाच जन्माला आलेले वा नेहरू खानदानाचे सदस्य असतात, त्यांना देशाचे कायदेच लागू होत नसतील, तर त्यांच्या विरोधातले कुठले कायदेशीर पुरावे असू शकतील? त्यांनी काहीही केले तरी म्हणूनच त्यांच्या विरोधातले पुरावे असत नाहीत. ही बाब लक्षात घेतली तर सोनिया काय म्हणतात, ते समजू शकेल.
पाच वर्षापुर्वी उत्तर प्रदेश पुन्हा जिंकण्याचा मनसुबा बाळगून राहुल गांधींनी तिथे काही महिने मुक्काम ठोकला होता. शेकडो सभा मेळावे घेऊन त्यांनी प्रचाराची धमाल उडवून दिली होती. एकदा तर सुरक्षा रक्षकांना टांग मारून ते मोटरबाईकवरून भट्टा परसोल नावाच्या खेड्यात निघून गेले होते. मग उत्तर प्रदेशात कॉग्रेसचा मुख्यमंत्री झालाच, असा निष्कर्ष पुरोगामी माध्यमांनी काढला होता. आणि तसे यश कॉग्रेसच्या वाट्याला आले तर कोणाचे असेल, असा सवाल दिग्विजय सिंग यांना केलेला होता. अर्थात़च त्यांनी त्याचे बुद्धीवादी उत्तर दिलेले होते. उत्तरप्रदेश जिंकला तर त्याचे सर्व श्रेय राहुलजींचे असेल. मग प्रश्न विचारला गेला, की कॉग्रेस उत्तर प्रदेशात बहूमत मिळवू शकली नाही, तर ते अपयश कोणाचे असेल? त्यावरही सिंग यांनी योग्य उत्तर दिले होते. जिंकलो तर श्रेय राहुलचे आणि हरलो तर नालायकी आम्हा कॉग्रेस कार्यकर्त्यांची असेल. हा निकष आहे. या निकषाने नेहरू खानदान समजून घेतले, तर पुरोगामी भाषा आपल्याला उमजू शकते. झालेही तसेच! उत्तर प्रदेशात कॉग्रेस दणकून आपटली आणि त्यावर सोनियांनी प्रतिक्रीया आजच्यासारखीच दिलेली होती. पक्षाची संघटना तोकडी पडली असे त्या म्हणाल्या होत्या. पण पक्षाची संघटना म्हणजे कोण? कॉग्रेसमध्ये मायलेकरांच्या इच्छेशिवाय इथले पान तिकडे होऊ शकते काय? नेहरू खानदान म्हणजेच कॉग्रेसची संघटना असते. परंतु जिंकतात, तेव्हा ते खानदान संघटना असते आणि त्यांच्यामुळे विजय संपादन झालेला असतो. पण पराभव झाला, मग संघटना म्हणजे भलतेच कोणी असतात. त्याचे पाप कॉग्रेस नेते म्हणून मिरवणार्‍यांनी निमूटपणे आपल्या माथ्यावर घ्यायचे असते. त्यांनी कोणी आपला गुन्हा कोणता किंवा त्यासाठी कुठला पुरावा आहे, असले प्रश्न विचारायचे नसतात. या देशात निर्दोष निरपराध असण्याचे वरदान फ़क्त नेहरू खानदानाला मिळालेले आहे.
अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि २००९ सालची निवडणूक त्यांनी जिंकून दाखवली होती. पण त्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचे बालंट आले आणि निमूट त्यांचा राजिनामा सोनियांनीच घेतला होता ना? त्याच्याही आधी वर्षभर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कसाब टोळीने मुंबईवर हल्ला केला. त्यासाठी देशमुख यांचा बळी घेतला गेला. त्यावेळी कुठला पुरावा विलासरावांच्या विरोधात समोर आला होता? पण त्यांचा बळी घेतला गेलाच ना? अगदी काडीमात्र पुराव्याशिवाय असे बळी घेतले गेले आहेत. पण नेहरू खानदानाचा विषय आला मग लगेच पुरावे कुठे आहेत, असा सवाल येतो. अगदी कालपरवाची गोष्ट घ्या. इशरत जहान चकमकीच्या प्रकरणाचे पितळ उघडे पडते आहे. त्यावरून चार दिवस गदारोळ झाल्यावर कोणी कॉग्रेसजन माजी गृहमंत्र्यांच्या बचावाला समोर आला नाही. चिदंबरम यांना वार्‍यावर सोडून दिले गेले. जेव्हा खुपच गदारोळ झाला, तेव्हा कॉग्रेसचे प्रवक्ते बिळातून बाहेर आले आणि त्यापैकी कोणी चिदंबरम योग्य असल्याचा खुलासा केला नाही. त्यापेक्षा अशा कुठल्याही निर्णयाचा सोनिया किंवा राहुलशी संबंध नाही, असे खुलासे केले जात होते. थोडक्यात सरकार व पोलिसांनी नेहरू कुटुंबियांना अंगरक्षक दिलेले असताना कॉग्रेस संघटना व पक्ष हे आता सोनिया-राहुलचे सुरक्षा रक्षक म्हणून शिल्लक उरले आहेत. इशरत प्रकरणात राहुल-सोनियांचा विषय नव्हता. तरी त्यांचा कुठलाही संबंध नसल्याचा खुलासा करण्याची काय गरज होती? पण तेवढेच तर आता कॉग्रेसचे कर्तव्य उरलेले आहे. राजकीय विचार, भूमिका वा कार्यक्रम असे काहीही शिल्लक उरलेले नाही, चार वर्षापुर्वीही प्रियंकाचा पती रॉबर्ट वाड्रा याच्यावर आरोप होताच, त्याने स्वत: कुठला खुलासा केला नाही. पण कॉग्रेस प्रवक्ते त्याची बाजू मांडत फ़िरत होते. यातून घ्यायचा धडा एकच असतो. भारतात नेहरू खानदानावर कुठले आरोप होऊ शकत नाहीत, किंवा कुठलाही ग्राह्य पुरावा असू शकत नाही.
आता कॉग्रेसचे बळ वाढले आहे. त्यांनी पुरोगामीत्वाची झुल पांघरून नेहरू खानदानाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अन्य सेक्युलर पक्षांनाही सहभागी करून घेतले आहे. इतर पक्ष पुर्वी त्यांच्यावर आरोप करायचे. बोफ़ोर्स प्रकरणाने तर जनता दल नावाच्या पक्षालाच जन्माला घातले होते. आज त्या पक्षाचे विविध गट-तट मिळून सोनियांच्या समर्थनाला उभे ठाकले आहेत. तेव्हा मार्क्सवादीही बोफ़ोर्सच्या विरोधात राजीव गांधींना सवाल करत होते. पण आज त्याच राजीवची पत्नी सोनियांवर तसेच आरोप होत असताना, मार्क्सवादी मूग गिळून गप्प आहेत किंवा आरोपावर शंका घेत आहेत. म्हणजेच आता अशा जुन्यापान्या सेक्युलर पक्षांनीही स्वत:ला सोनिया सुरक्षेत जमा करून घेतले आहे. त्यामुळे लौकरच सीताराम येच्युरी वा प्रकाश कारत सुद्धा दिग्विजय सिंग यांच्या भाषेत बोलू लागले, तर कोणी आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. हळुहळू सेक्युलॅरीझम वा पुरोगामीत्व म्हणजे नेहरू खानदानाच्या सेवेतील निष्ठा, अशी व्याख्या बनत गेली तर नवल वाटण्याचे कारण नाही. हेच करण्यात कॉग्रेसचा बोर्‍या वाजला आणि म्हणूनच पर्यायाने सेक्युलर पक्षांना मोदींसारखा नवखा माणुस पराभूत करू शकला. किंबहूना म्हणूनच की काय, मोदींनी त्यालाच आता रणनिती बनवलेले असावे. मोदीची कोंडी करण्यासाठी तमाम सेक्युलर एकत्र येणार, तर त्यांना देशद्रोही घोषणा देणार्‍यांच्या समर्थनासाठी एकत्र यायला भाग पाडायचे. सोनियांच्या भ्रष्टाचाराच्या बाजून एकजुटीने उभे रहायला भाग पाडायचे, ही एक रणनिती असू शकते. जी प्रकरणे आता युपीएची पापे म्हणून बाहेर काढली जात आहेत, त्यामध्ये संसदीय व्यासपीठावर आपला पराभव झाला तरी बेहत्तर! पण त्यात तमाम सेक्युलर पक्षांनी एकजुटीने सोनिया-राहुलच्या मागे उभे राहिले पाहिजे, ही मोदींची अपेक्षा आहे. कारण त्याचा जनमानसावर पडणारा प्रभाव मोदींची मते वाढवणारा असू शकतो. जोरसे कहो, सोनियांविरोधात पुरावा कुठे आहे?

1 comment: