Wednesday, April 13, 2016

बुंदसे गयी, हौदसे नही आती

गेले दोनचार दिवस सतत लातूरच्या पाणी टंचाईने राष्ट्रीय माध्यमांचा आसमंत गुंजतो आहे. पण यापैकी कितीजणांना लातूर नेमके कुठे आहे आणि तिथे नागरिक आजवर कसे पाणी मिळवतात, याची माहिती आहे? आज असा कल्लोळ चालू आहे, की जणू दोन महिन्यापुर्वी तिथे छानपैकी पाणी मिळत असावे आणि आताच अकस्मात तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य झाले आहे. गेल्या कित्येक वर्षात पावसाचा मोसम सोडला तर कधी आठवड्यात दररोज पाणी पुरवठा होत नाही, असे बहुधा देशातील हे एकमेव महानगर असावे. ज्याला कायद्याने महानगर म्हणून घोषित केले आहे. पण व्यवहारात एक गाववजा विस्तारलेली बकाल वस्ती, अशी लातूरची अवस्था आहे. शहर म्हणायला तिथे कुठला उद्योग नाही की मोठा व्यापार बाजारपेठ नाही. गेल्या काही वर्षात शिक्षणाची एक मोठी बाजारपेठ इथे उभी राहिली आहे. दिवाळी उरकली मग तिथे पंधरा दिवसात पालिकेचे पाणी येईल, तरी दिवाळी म्हणावी अशी स्थिती आहे. ते लातूर म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे गाव आहे. तेच लातूर म्हणजे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा बालेकिल्ला होय. अशा या महानगराची अवस्था अकस्मात अशी झालेली नाही, की मराठवाड्याचे दुर्दैव कुणाच्या शापवाणीने आडवे आलेले नाही कायम दुष्काळाच्या व मागासलेपणाच्या फ़ेर्‍यात फ़सलेल्या प्रदेशाला मराठवाडा म्हणतात. ज्याने राज्याला चार मुख्यमंत्री दिले, तोच हा मराठवाडा! आयपीएल स्पर्धेसाठी मैदानात लाखो लीटर पाण्याचा वापर होणार, अशी आवई उठली आणि मग लातूरचा टाहो अनेकांना ऐकू गेला. आयपीएलचा लक्ष्य करायचे, म्हणून लातूरच्या पाणी दुर्भिक्ष्याला राष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. मग काय त्या कोरड्या गंगेतही हात धुवून घ्यायला प्रत्येकजण धावत सुटला. केजरीवाल तर अशा संधीची स्वप्नातही प्रतिक्षा करीत असतात.
दिल्लीहून प्रतिदिन दहा लाख लिटर्स पाणी लातूरकरांना द्यायच्या गमजा हा माणूस करतो, तेव्हा बदमाश राजकारणी याच्याहीपेक्षा बरे होते असे वाटते. दिल्लीत अजून पुरेसा पाणीसाठा नाही आणि दिल्लीकराला पुरेसा पाणी पुरवठा करू शकलेला नाही. असा हा माणूस दिल्लीच्या पाणीटंचाईवर स्वार होऊन सत्तेपर्यंत पोहोचला. त्याला आपण लोकांच्या वेदना यातनांवर ताव मारतोय, याचेही भान उरलेले नसावे काय? यातून आजचे राजकारणी, पत्रकार वा एकूणच बुद्धीवादी किती रसातळाला गेलेत त्याची प्रचिती येते. कुठलाही गाजावाजा न करता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राजस्थानात चालणारी पाणी एक्सप्रेस मिरज-लातूर अशी फ़िरवली आणि आपले कर्तव्य पार पाडले. त्याचे श्रेय घ्यायला तो माणूस पुढे आला नाही. पण श्रेय प्रभूंना जाते म्हणताच, अनेकांना लातूरकरांचा पुळका आलेला आहे. तुम्ही पाणी देण्याच्या अगोदर हेच लातूरकर कित्येक वर्षे कुठून व कसे पाणी मिळवून जीव जगवत आहेत, त्याची कल्पना तरी असल्या गमजा करणार्‍यांना आहे काय? लातूरकरांना वा मराठवाड्याला कुणाच्या सहानुभूती वा भिकेची गरज नसून दिलासा हवा आहे. आपल्या वेदना व यातना शेजार्‍यालाही कळतात, इतका दिलासाही खुप असतो. ज्यांना त्याचा थांगपत्ता नसतो, ते मग लातूरच्या पाणी पुरवण्याविषयी क्रुर थट्टा करीत असतात. त्यात केजरीवाल आले, तसेच आयपीएल स्पर्धेला नावे ठेवणारेही आले. टंचाईत पुरवठा एक विषय असतो. पण धीर देण्याला जास्त महत्व असते. आज तरी सुविधा व साधने खुप वाढली आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. चाळीस वर्षापुर्वी यातले काहीही हाताशी नव्हते. तेव्हाचा मुख्यमंत्री कसा वागला होता? त्याने कोणता दिलासा त्याच मराठवाड्याला दिला होता? मराठवाड्याला वा लातूरला पाण्यापेक्षा तसा मुख्यमंत्री वा नेता हवा आहे मित्रांनो!
१९७३ च्या दुष्काळात पावसाने अशीच दडी मारली होती आणि एकूणच त्राहीत्राही झालेली होती. तेव्हा सुविधा कमी होत्या. तरी राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक दुष्काळी भागात फ़िरत होते. दौरे करून लोकांच्या दु:खावर फ़ुंकर घालत होते आणि आपण कुठे कमी पडलो, त्याची कबुली देत होते. एका गावात मुख्यमंत्र्यांची गाडी भर दुपारी जाऊन धडकली आणि आडोश्याला बसलेले ओसरीवरले गावकरी गडबडून गेले. त्यांनी उठून मुख्यमंत्री नाईकांचे स्वागत केले आणि नाईक त्याच घोळक्यात खाली बसले. घामाघुम झालेल्या नेत्याला बघून गावचा म्होरक्याही अस्वस्थ झाला. इतक्यात कोणी तरी ग्लासभर प्यायचे पाणी घेऊन आला. त्याने तोच ग्लास नाईक यांच्यासमोर धरला. मातकट असे ते अस्वच्छ पाणी बघून गावचा म्होरक्याची चिडला. पाणी घेऊन आलेल्यावर डाफ़रला. साहेबांसाठी कोकाकोला घेऊन या असे त्याने फ़र्मावले. तर त्याला रोखून नाईक म्हणाले, ‘नको कुठला कोला. या खेड्यात कोकाकोला पोहोचला आणि आम्ही साधे पिण्याचे पाणी पोहोचवू शकलो नाही, याबद्दल तुमची माफ़ी मागायला आलोय.’ या शब्दांनी ते गावकरी सर्द झाले. राज्याचा मुख्यमंत्री एका दुर्गम खेड्यात येऊन पाणीटंचाईसाठी खेडूतांची माफ़ी मागतोय, हे चित्रच थक्क करून सोडणारे होते. मग नाईकांनी गावकर्‍यांना एक दुसरा ग्लास आणायला सांगितले. खिशातून रुमाल काढला. रिकाम्या ग्लासावर पसरून त्यात गढूळ पाणी ओतले आणि गाळलेले पाणी पिवून आपली तहान भागवली. पुढे त्या गावाला पाणी पुरवठा झाला किंवा नाही, हे ठाऊक नाही. पण मुख्यमंत्र्याच्या त्या वागण्यानेच तो गाव सदगदित झाला. आपण पितो तेच पाणी पिणारा मुख्यमंत्री बघून, त्यांच्यात दुष्काळाशी झुंजण्य़ाची जी हिंमत उत्पन्न झाली, त्याला तोड नाही. त्या गढूळ पाण्याचे प्राशन करून नाईकांनी जे साधले, ते नंतर कुठल्या मुख्यमंत्र्याला जमले आहे काय?
त्याच दुष्काळाने महाराष्ट्रात रोजगार हमीला जन्म दिला. ज्याला आज मनरेगा म्हणून ओळखले जाते. ते सोनियाचे कार्टे आम्ही मनरेगा जन्माला घातली म्हणून मिरवत असते. पण कोणी मायका लाल मराठी नेता उठून त्याला रोजगार हमी महाराष्ट्रातल्या द्रष्ट्या नेत्यांच्या प्रतिभेचा अविष्कार आहे, असे ठणकावून सांगायला धजावत नाही. मग त्या दिल्लीतल्या केजरीवालने मर्कटलिला करीत लातूरला पाणी पाठवण्याच्या वल्गना करीत आपल्या जखमेवर मीठ चोळले तर कुठले नवल? या महाराष्ट्राला कुणाची भीक नको की मराठवाड्याला कुणाच्या मेहरबानीची गरज नाही. कित्येक पिढ्या दुष्काळ व अवर्षणाशी झुंजलेला हा प्रदेश आहे आणि तिथल्या समस्या जितक्या निसर्गदत्त आहेत, त्यापेक्षा अधिक मानवनिर्मित आहेत. मानवी मुर्खपणा, बेशिस्त व बेतालपणाने अशी बकाल शहरे उभी केली. पाण्याचे नियोजन केले नाही. त्यातून आधीच गांजलेला मराठवाडा अधिकच केविलवाणा होऊन गेला आहे. त्याला आपल्या पायावर उभा करण्याची गरज आहे. आपल्याच पायावर उभा रहायची प्रेरणा प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्याला मेहरबानी वा उपकाराची भिक नको आहे. आपल्या दु:खातही सोबत असलेले मित्र सहकारी हवे आहेत. तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी टॅन्कर पाठवले नाहीत, की टॅन्करची रेलगाडीही पाठवली नसेल. पण त्या दुर्गम गावात एका ओसरीवर बसून गढूळ पाणी पिण्यातून दिलेली हिंमत खुप मोलाची होती. पाणी किती लिटर असावे, यापेक्षा तहान भागवण्याइतके असावे, याचे भान त्या नेत्याला होते. घोटभर पाण्यातून त्यांनी तहानेला पराभूत केले होते. म्हणून अपुरा पैसा व तोकड्या साधनांनी तेव्हाच्या दुष्काळावर मात होऊ शकली. आजच्या राज्यकर्ते वा राजकारण्यांसह पत्रकारांनाही हे मुख्यमंत्री ठाऊकही नसतील. म्हणून मग घोटभर गढुळ पाणी व पाण्याची रेल यांची तुलना करावी लागते.

3 comments:

  1. भाऊ अशी नालायक माणस जेव्हा कुर गमजा थट्टा करतो तेव्हा नियतीचा सिद्धांत आठवतो अति तिथ माती

    ReplyDelete
  2. भाऊ आत्ता सध्या ज्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच नाव कम्युनिसम सोबत जोडल जात आहे आणि जय भीम कॉम्रेड लाल सलाम हि घोषणा देऊन आंबेडकरी जनतेची दिशाभूल हि लाल मुंगळे करत आहेत • भाऊ आंबेडकर आणि कम्युनिसम या विषयावर एक लेख लिहा ,

    ReplyDelete
  3. मर्मग्राही

    ReplyDelete