Thursday, April 21, 2016

चिदंबरम नटराजन होतील?

गेल्या वर्षीची गोष्ट आहे. २०१५ च्या आरंभी जयंती नटराजन यांनी कॉग्रेस पक्षाला रामराम ठोकला आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा त्यांनी राहुल गांधी यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. मंत्री असताना राहुल गांधींच्या इशार्‍यावरच आपण पर्यावरणमंत्री म्हणून काही उद्योगांना परवाने नाकारले. पण पुढे उद्योगपती नाराज झाले, तेव्हा त्यांना समाधानी करण्यासाठी आपला बळी दिला गेला. उद्योगपतींच्या मेळाव्यात जाऊन त्याच राहुलनी आपल्यावर नाकर्त्या मंत्री म्हणून दोषारोप केले, असा गंभीर आरोप नटराजन यांनी पत्रकार परिषदेत केला होता. अर्थात थेट पक्षश्रेष्ठींची अब्रु चव्हाट्यावर आणायचा त्यांचा हेतू नव्हता. सव्वा वर्षापुर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांना बोलावून त्यांचा राजिनामा घेतला होता. फ़ार चांगले काम करीत असला, तरी मॅडम तुमच्यावर वेगळी जबाबदारी सोपवणार असल्याचे सांगून सिंग यांनी आपला राजिनामा घेतला, असेही नटराजन यांनी पत्रकारांना तेव्हा सांगितले होते. पण त्यामुळे युपीएच्या काळात कोणाच्या मर्जीवर सरकारी कारभार चालत होता, त्यावर प्रकाश पडू शकतो. कुठल्याही मंत्रालयाच्या कारभारात राहुल व सोनिया हस्तक्षेप करीत होते आणि फ़ार ओरडा झाला मग खापर मात्र त्या मंत्र्यावर फ़ोडले जात होते, इतकाच निष्कर्ष त्यातून निघू शकतो. खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंगही त्याला अपवाद नव्हते. त्यांनाही आपल्या मनाने कुठले निर्णय घेऊ दिले जात नव्हते. तसे झाल्यास त्यांचीही जाहिरपणे बेअब्रू करायला राहुल गांधींनी मागेपुढे बघितले नाही, असा युपीएचा कारभार होता. म्हणूनच इशरत वा समझोता एक्सप्रेस प्रकरणात उलटेसुलटे घातक निर्णय गृहखात्याने तेव्हा घेतलेले असतील, तर त्याला चिदंबरम एकटे जबाबदार असू शकत नाहीत. पण आता खापर मात्र त्यांच्यावर फ़ुटले आहे. कारण कॉग्रेसने चिदंबरम यांना वार्‍यावर सोडून दिले आणि मायलेकरांना वाचवण्याचा पवित्रा घेतला आहे.
गेले दोन दिवस इशरत व समझोता एक्सप्रेस प्रकरणाची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जात असताना, बिचार्‍या चिदंबरम यांना तोंड लपवायची वेळ आलेली आहे. पण पक्षातर्फ़े कोणी त्यांच्या बचावाला पुढे आलेला नाही. त्यांचा निर्णय बरोबर असल्याचे कोणी सांगू शकलेला नाही. विषय इशरतची चकमक खरी की खोटी असा नसून कोर्टाची व देशाची दिशाभूल करण्याचा आहे. त्यासाठी आधीचे प्रतिज्ञापत्र बदलून, दुसरे सादर करण्याचा खोटेपणा झालेला आहे. इशरतची चकमक खोटी असली म्हणून खोटे प्रतिज्ञापत्र कायदेशीर ठरू शकत नाही. म्हणूनच सवाल चकमकीचा नसून सरकारी पातळीवर झालेल्या खोटेपणा व दिशाभूलीचा आहे. पण त्यावर कोणी कॉग्रेस नेता प्रवक्ता अवाक्षर बोलायला राजी नाही. मात्र तेवढ्याने भागणार नाही आणि हे प्रकरण आता तात्कालीन सरकारवर उलटणार, असे स्पष्ट दिसू लागल्यावर त्यातून सोनिया व राहुल यांची कातडी वाचवण्याची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे चिदंबरम यांची नटराजन करण्याच्या प्रक्रियेचा वेग आला आहे. चिदंबरम वा गृहखातेच कशाला, सरकारच्या कुठल्याही कामकाजात गांधी कुटुंबाचा हस्तक्षेप कधी झाला नाही, असा खुलासा कॉग्रेस प्रवक्त्याने बुधवारी केला. पण चिदंबरम यांचे कृत्य बरोबर की चुक, याविषयी मौन धारण केले. याचा अर्थ सरळ आहे, की ज्यांच्या मेहरबानीवर दहा वर्षे सत्ता उपभोगली, त्यांच्यासाठी आता निमूटपणे चिदंबरम यांनी बळी जायचे आहे. जे नटराजन यांचे केले, तेच मायलेकरू मिळून चिदंबरम यांचे करणार असल्याचा हा संकेत आहेत. आता कदाचित चिदंबरम यांनी प्रयत्न केला तरी सोनिया वा राहुल त्यांचा फ़ोनही घेणार नाहीत. हेच नटराजन यांच्या बाबतीत झाले होते. फ़ोनही घेतला जात नाही, भेटही मिळत नाही आणि तपशीलवार पत्र पाठवूनही सव्वा वर्षे काहीच प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा नटराजन यांनी गौप्यस्फ़ोट केला होता. राहुलवर जाहिर आरोप केले होते.
अर्थात ज्यांना त्याची किंमत माहिती असते, त्यांनी तक्रार करायची नसते. खरे तर नटराजन यांनीही तक्रार करण्यात अर्थ नव्हता. कॉग्रेसमध्ये कुठलेही पद किंवा सत्ता हवी असेल, तर सुपारीबाज म्हणून मिळत असते. सुपारी दिली मग गोळ्या घालायच्या आणि किंमत घ्यायची. सुपारी घेण्यापलिकडे आपला गुन्हा नाही, म्हणून खुनातून सुटका होत नसते. तशीच नटराजन यांची दुरावस्था होती आणि चिदंमबरम यांची अवस्था आहे. बिचारे मनमोहन सिंग तरी त्यातून कुठे सुटले होते? लालूंची निवड कोर्टाने रद्द केल्यावर त्यांना वाचवण्यासाठी सोनियांच्याच आदेशानुसार पंतप्रधानांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत एक अध्यादेश मंजूर करून घेतला होता. अंतिम निकाल खालच्या कोर्टाने दोषी ठरवून तीन वर्षापेक्षा अधिक कैदेची शिक्षा दिल्यास, तात्काळ आमदार खासदाराची निवद रद्द करण्याचा निर्णय आला होता. त्यात लालूंचे पद धोक्यात होते. त्यांना वाचवण्यासाठीच तो अध्यादेश राष्ट्रपतींकडे पाठवला होता. त्यावर राष्ट्रपतींची सही होण्यापुर्वीच पंतप्रधान राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी अमेरिकेला निघून गेले होते. त्याच अध्यादेशाला कॉग्रेस प्रवक्ते अजय माकन पत्रकार परिषदेत समर्थन देत होते. इतक्यात तिथे येऊन थडकलेल्या राहुल गांधींनी तोच अध्यादेश केवळ मुर्खपणा असल्याचे जाहिर केले आणि पक्षासह कॉग्रेस सरकारची भूमिका बदलून गेली. राष्ट्रपती सही करायचे थांबले आणि पंतप्रधानांनी मायदेशी आल्यावर तोच अध्यादेश मागे घेतला होता. कुठल्याही एका मंत्रालयाच्या कामकाजात नव्हे; तर संपुर्ण मंत्रीमंडळाच्या निर्णयातही राहुल गांधी हस्तक्षेप ढवळाढवळ करीत, याचा हा इतका मोठा जाहिर पुरावा आहे. तरी पक्ष प्रवक्त्याने गांधी कुटुंबाचा ‘कुठलाही हस्तक्षेप’ नसल्याचा दावा करणे, किती धडधडीत खोटेपणा असू शकतो? पण निर्लंज्जम सदासुखी असल्याखेरीज कोणी कॉग्रेसचा पदाधिकारी होऊ शकत नाही ना?
असो! इतका ताजा व समोर आलेला इतिहास लक्षात घेतला, तर इशरत वा समझोता एक्सप्रेस प्रकरणात हिंदू दहशतवादाचे पिलू सोडण्यासाठी सोनियांनी हस्तक्षेप केलाच नाही, हा दावा शेंबड्या पोरालाही पटणारा नाही. किंबहूना कुठल्याही बाबतीत गांधी मायलेकरांच्या हस्तक्षेपाखेरीज युपीएचा कारभार होऊ शकत नव्हता, हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे, ते कोणी जाहिरपणे मान्य करण्याची स्विकारण्याची अजिबात गरज नाही. आजपुरती एकच गोष्त स्पष्ट आहे. चिदंबरम यांना पक्षाच्या प्रवक्त्याने काही संकेत दिला आहे. पक्ष तुमची पाठराखण करणार नाही. तुमचे तुम्ही बचाव करायचे आहेत आणि त्यातून सुटका नसेल, तर निमूटपणे बळी जायचे आहे. कॉग्रेस आता गांधी-नेहरू घराण्याची अंगरक्षक म्हणून शिल्लक उरली आहे. त्याला कुठली विचारसरणी, भूमिका, तत्वज्ञान उरलेले नाही. कुठल्या कारणासाठी याचा खुलासा अंगरक्षकाने मागायचा नसतो. धन्याच्या अंगावर संकट आले, तर आपला त्यात बळी देऊन धन्याला जगवणे हेच त्याचे काम असते. कॉग्रेसला मागल्या तीनचार दशकात त्यापेक्षा वेगळे काम वा कर्तव्य उरलेले नाही. म्हणून तर रॉबर्ट वाड्रावर आरोप झाले, तेव्हा त्याने कधी खुलासे केले नाहीत, तर कॉग्रेस प्रवक्ते त्याचे समर्थन करायला मैदानात उतरले होते. पण मनमोहन सिंग, नटराजन वा चिदंबरम यांच्यावर संकट आले, तेव्हा पक्षाचे प्रतिनिधी म्हणून कोणीही त्यांच्या बचावाला समोर आलेला नाही. किंचित आरोप झाला तरी विलासराव, अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडायला सांगणार्‍यांनी आपल्यावरच नॅशनल हेराल्डचे समन्स निघाल्यावर काही पदत्याग केला आहे काय? आताही चिदंबरम यांच्यासमोर दोन पर्याय आहेत. मौनमोहन होऊन लाथा खायच्या, पण सत्य बोलायचे नाही. किंवा आपल्या तामीळी सहकारी जयंती नटराजन यांच्याप्रमाणे धाडस दाखवून स्वाभिमानीपणाने सत्य जगाला सांगून टाकायचे.

2 comments:

  1. सत्य सांगण्याचे धाडस चिदंबरमकडे नाही. तो सुपारी किलर ही नाही. तो दारी बांधलेला कुत्रा आहे.
    आता तो खरे बोलला तर त्याचा "अपघाती मृत्यु" होईल.

    ReplyDelete
  2. पाला हुआ पर अब लावारिस हैं।

    ReplyDelete