Tuesday, April 5, 2016

पाक इतका मुर्ख आहे काय?



पाकिस्तानने इथे पठाणकोट हल्ल्याच्या चौकशी व तपासासाठी एक खास पथक पाठवले आणि त्याने माघारी परतल्यावर जे कथन केले, त्यामुळे इथले पाकप्रेमी इतके कशाला नाराज झालेत? म्हणजे असे, की पठाणकोटचा हल्ला हा भारतानेच घडवून आणला आणि निव्वळ पाकिस्तानला जगभर बदनाम करण्यासाठीच तो हल्ला घडवून आणला गेला, असा निष्कर्ष पाक तपास पथकाने काढला आहे. खरे तर त्यासाठी इथे खास तपास पथक तरी कशाला पाठवायचे होते? ते काम इथे भारतात बसलेले अनेक पाकप्रेमी सहज करू शकले असते. किंबहूना हे पाकप्रेमी नेहमीच असा निष्कर्ष काढत असतात. इतक्या फ़ालतू कामासाठी खास पथक इथवर पाठवायला पाकिस्तान मुर्ख झाला आहे काय? भारतातल्या बहुतेक सर्व घातपाती घटना मुद्दाम भारतीय हेरखाते घडवत असते आणि त्यावर इथल्या सेक्युलर बुद्धीमंतांचे कायम एकमत झालेले आहे. मग तोच निष्कर्ष पाकच्या या पहिल्यावहिल्या तपासपथकाने काढला, तर या पाकप्रेमींनी स्वत:ची पाठ थोपटून घ्यायला नको काय? पण कॉग्रेसपासून बहुसंख्य सेक्युलर मोदी सरकारवर दुगाण्या झाडत सुटले आहेत. म्हणूनच त्यांचे हे वर्तन रहस्यमय वाटणे स्वाभाविक आहे. मुंबईवर २००८ मध्ये झालेला हल्ला असो किंवा १९९९ सालात भारतीय संसदेवर झालेला हल्ला असो, त्यात भारताचीच काही घातपाती योजना होती आणि त्यात पकडले व दोषी ठरवले गेलेले आरोपी चक्क निर्दोष असल्याचा दावा, पाकिस्तानच्या आधी भारतीय सेक्युलर शहाण्यांनी केलेला नाही काय? कालपरवा डेव्हीड लोकमन हेडली याच्या साक्षीनंतर उठलेले वादळ आठवा किंवा तेरा वर्षापुर्वी अहमदाबाद येथे झालेल्या चकमकीत इशरत जहान मारली जाण्याचा प्रसंग घ्या. त्यात आधी भारतातल्या पाकप्रेमी सेक्युलर मंडळींनीच भारतावर शंका घेतल्या आहेत ना? मग आजच त्यांना पोटशूळ कशाला?

हेडलीच्या साक्षीचा विषय निघाला आणि त्यात गृहखात्याच्या काही माजी अधिकार्‍यांनी हेडलीच्या वक्तव्याला दुजोरा दिला, तेव्हा कोण खवळले होते? इशरत प्रकरणातले तपासप्रमुख सतीश वर्मा यांनी मणि नावाच्या अधिकार्‍याकडून काय वदवून घेण्याचा प्रयत्न चालविला होता? त्यांनी तर मणीला असेही सांगितले, की संसदेवरचा हल्ला भारताच्याच गुप्तचरांनी केला होता. पण मणी त्याला बधला नाही. इशरत कशी निर्दोष होती, ते सिद्ध करण्यासाठी भारतीय हेरखात्याला घातपाती ठरवण्याचा उद्योग कोणी चालविला होता? तेव्हाचे गृहमंत्री चिदंबरम यांनी आपल्याच अधिकार्‍यांना खोटे पाडणारे प्रतिज्ञापत्र कोर्टाला सादर करून आधीचे प्रतिज्ञापत्र बदलले होते. त्यामध्ये इशरतला दोषी ठरवणारी मूळची भूमिका बदलून भारतावर ठपका ठेवण्याचा उद्योग कोण करीत होते? पाकिस्तानने कधी भारतातल्या चकमकीसाठी भारतीय गुप्तचर खात्याला दोषी ठरवण्याचा उद्योग केला नाही. ते काम चिदंबरम, तीस्ता सेटलवाड इत्यादी सेक्युलर करीत होते ना? भारतातल्या माध्यमांनी इशरत प्रकरणात भारतीय पोलिस व गुप्तचरांना खुनी ठरवण्यासाठी आपली बुद्धी खर्ची घातलेली नाही काय? मुंबई हल्ला झाल्यावर गुप्तचर खात्याने पाकिस्तानशी असलेले धागेदोरे शोधून काढले होते. पण त्यामागे भारतीय गुप्तचरांचाच डाव असल्याचा शोध माजी पोलिस अधिकारी मुश्रीफ़ यांनी लावला आणि तमाम सेक्युलर त्यांची पाठ थोपटायला मोठ्या उत्साहात पुढे सरसावले नव्हते काय? भारतातल्या प्रत्येक घातपात जिहादी हिंसेला भारतातलेच लोक, हिंदूत्ववादी किंवा पोलिस कसे जबाबदार आहेत, त्याचा तपशील शोधाण्यात कोण आघाडीवर राहिला आहे? ते काम पाकिस्तानला इथल्या सेक्युलर शहाण्यांनी कधीच करू दिले नाही. एक पुरोगामी कर्तव्य म्हणून सेक्युलरांनी भारताला अशा प्रत्येक वेळी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केलेले आहे.

मग आज तेच काम पाकिस्तानचे तपास पथक करत असेल, तर भारतीय पुरोगाम्यांनी पाकिस्तानची व त्या पथकाची पाठ थोपटायला नको काय? पण उलटेच काही घडते आहे. अकस्मात हे पुरोगामी आता पाकिस्तानी तपास पथकाला चोराच्या उलटया बोंबा मारणारे म्हणून दोष देत आहेत. ज्या कामाचा मोबदला आजवर मिळत होता, तोच थांबल्याने व पाकिस्तान आपलेच काम आपणच करू लागल्याने इथले पुरोगामी विचलीत झालेत काय? मुंबई हल्ल्यासाठी अमेरिकेने व राष्ट्रसंघानेही सईद हाफ़ीज याला दोषी मानून त्याच्यावर निर्बंध जारी केलेले आहेत. पण इथल्या पुरोगाम्यांना मुश्रिफ़ यांचा दावा खरा वाटतो. त्यांना आताही पाकिस्तानचा दावा खराच वाटायला हवा. देशात नित्यनेमाने घातपात व जिहादी हिंसा चालू असताना त्याचा बंदोबस्त करण्यापेक्षा तीन वर्षापुर्वी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संघाच्या शाखेत हिंसेचे प्रशिक्षण दिले जाते असा बेछूट आरोप केला होता. त्याबद्दल तोयबाचा म्होरक्या हाफ़ीज याने शिंदे यांची पाठ थोपटली होती. अशा भारतामध्ये पाकिस्तान कधी कुठला घातपाती हल्ला करू शकेल काय? नसेल तर पठाणकोटचा हल्ला भारतानेच पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी गुपचूप घडवून आणलेला असेल ना? गुजरातची दंगल जशी सरकारने घडवून आणली आणि तिचे खापर गोध्राच्या जळितकांडावर फ़ोडले, तसाच काहीसा प्रकार पठाणकोटमध्ये घडलेला असणार. कन्हैयाकुमारनेही आता त्याची ग्वाही दिलेली आहे ना? गोध्रा आणि दिल्लीच्या ह्या दंगलीत मूलभूत फ़रक असल्याचा शोध या नव्या सेक्युलर बुद्धीमंताने लावला आहे. तसाच पठाणकोटचा हल्ला आणि अन्य जिहादी हल्ले यात फ़रक असणारच. सेक्युलर विचारवंतांमध्ये काहीतरी समजूतीचा गोंधळ झालेला दिसतो. कारण त्यांच्याच आजारच्या पुरोगामी तर्कानुसार त्यांनी पाकिस्तानच्या प्रत्यारोपाचे स्वागत करायला हवे ना?

पण एक गडबड झाली आहे. पठाणकोटच्या तपासासाठी मोदी सरकारने पाक पथकाला भारतात येण्याची परवानगी दिली. त्यासाठी मोदींना झोडायचे, तर पाकची बाजू घेऊन चालणार नाही. पाकिस्तानची पाठराखण केली तर मोदींनी पाक पथकाला येऊ देणे रास्त ठरेल. तेव्हा मोदींना चुकीचे ठरवण्यासाठी पाकिस्तानच्या प्रत्यारोपाला विरोध करणे भाग आहे. मोदींचे पाक धोरण चुकीचे ठरवायचे, तर पाकिस्तानला गुन्हेगार म्हणायलाच हवे. त्यामुळे मग सेक्युलर भूमिका कोलांटी उडी मारून विरोधात गेली आहे. आज पाकिस्तान स्वत:ला निर्दोष ठरवण्यासाठी झटतो आहे आणि कालपरवापर्यंत भारताले सेक्युलर पाकला निर्दोष ठरवण्यासाठी झटत होते. इशरतपासून अफ़जलपर्यंत सेक्युलर लोकांची भाषा वा युक्तीवाद आणि आजचा पाकिस्तानचा दावा, जसेच्या तसे नाहीत काय? हा सेक्युलर युक्तीवाद व तर्कवाद समजून घ्यायला जावे तितका गोंधळच उडत असतो. कालपर्यंत भारतीय पोलिस, गुप्तचर विभाग वा तपास यंत्रणांनाच खुनी म्हणणारे आपले सेक्युलर; अकस्मात इतके दुसर्‍या टोकाला जाऊन पाकिस्तानच्या विरोधात का बोलू लागलेत? पाकिस्तानने नेहमीच स्वत:वरचे आरोप फ़ेटाळून लावलेत. त्यात नवे असे काहीच नाही. मुंबई हल्ल्यानंतरही पाकने सर्व आरोप व पुरावे फ़ेटाळलेच होते. मग तेव्हा कोणी सेक्युलर शहाणे इतके चवताळून कशा उठले नव्हते? तर त्यात मोदी फ़ॅक्टर नव्हता. आज मोदींवर खापर फ़ोडण्यासाठी पाकिस्तानची बाजू कोणाला घ्यायची नाही. कशी मजा आहे ना? मोदी या निकषावर पुरोगामीत्व आपल्या भूमिका व निष्कर्ष बदलत असते. पाकने तरी वेगळे तपास पथक इथे कशाला पाठवायला हवे होते? तीस्ता सेटलवाड, प्रशांत भूषण वा तत्सम लोकांना कामाला जुंपले असते, तरी त्यांनी हाच निष्कर्ष काढून दिला असता ना? इशरतची चकमक जशी खोटी होती, तसाच पठाणकोटचा हल्लाही एक बनावच असणार ना?

1 comment:

  1. भाऊ या सेक्युलर व पूरोगामींच्या थोबाडित सनसनीत चपराक

    ReplyDelete