Friday, April 29, 2016

आविष्कार स्वातंत्र्याची बाजारबसवीयुपीए कारकिर्दीत हेलिकॉप्टर खरेदीत संरक्षण मंत्रालयात झालेल्या घोटाळ्याचा सध्या पर्दाफ़ाश होत आहे. पण मजेची गोष्ट अशी, की ह्या घोटाळ्याचा गाजावाजा आज झालेला नाही. युपीए सत्तेत असताना, हा व्यवहार चालू असतानाच भारतातील एकच वृत्तवाहिनी त्यावर झोड उठवत होती. बाकीचे तमाम नामवंत संपादक पत्रकार त्याबाबतीत मौन धारण करून होते. म्हणजेच तेव्हाच ज्यांनी अशा भानगडीचा पर्दाफ़ाश करायचा, तेच गुपचुप त्या घोटाळ्यावर पांघरूण घालत होते. ज्या टाईम्स नाऊ या एकमेव वाहिनीने त्यावर झोड उठवली होती, तिला हेलिकॉप्टर विक्रेता कंपनीने बदनामी केल्याबद्दल कोर्टात खेचण्याची धमकीही तेव्हा दिलेली होती. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. उलट आता इटालीच्या कोर्टात त्याच कंपनीच्या अनेकांना दोषी ठरवले गेले आहे आणि अनेक भारतीय नेत्यांची नावे भ्रष्ट व लाचखावू म्हणून चव्हाट्यावर आलेली आहेत. पण त्याच निमीत्ताने झालेल्या चौकशी व तपासात भारतीय पत्रकारितेचे बाजारबसवीचे हिडीस रुपही जगासमोर आलेले आहे. कोपर्‍यावर उभे राहून देशविक्रयाचा धंदा करणार्‍या कुणा व्याभिचारी वेश्येपेक्षा भारतातले अनेक नामवंत पत्रकार किंचीतही वेगळे नाहीत. याचाही पर्दाफ़ाश या निमीत्ताने पुन्हा एकदा झाला आहे. कारण याच कागदपत्रांनी वीस नामवंत भारतीय पत्रकारांना दरमहा दोन कोटी रुपयांची किंमत मोजून पापावर पांघरूण घालण्यास भाग पाडण्यात आल्याचे दस्तावेज समोर आले आहेत. कोण आहेत हे पत्रकार आणि त्यांनी किती किंमतीत आपले अविष्कार स्वातंत्र्य बाजारात विकून टाकले? त्यांची नावे समोर आलेली नाहीत. पण त्यांचे चेहरे आपण ओळखू शकत नाही, असे अजिबात नाही. आजही ह्या भानगडीवर प्रकाश टाकण्यात ज्यांनी कंजुषी चालविली आहे, तेच खाल्या मिठाला जागणारे नसतील काय? महिनाभरापुर्वी फ़रारी विजय मल्ल्या काय बोलला होता आठवते?

‘आपण तेजीत असताना अनेक माध्यमसमूह व त्यातील पत्रकारांना ऐष चैन मौज करायला सुविधा व साधने पुरवली आहेत, हे विसरू नका. आज केवळ टीआरपी हवी म्हणून मला बदनाम करू नका’, असा टवीट मल्ल्याने कोणासाठी केला होता? आपल्यापाशी अशा पत्रकारांनी केलेल्या मौजमजेचे पुरावेही आहेत, अशी धमकी मल्ल्याने दिलेली होती. तशीच काहीशी धमकी ऑगस्टा वेस्टलॅन्ड कंपनीने पोसलेल्या पत्रकार वाहिन्यांना दिली आहे काय? नसेल तर काही अपवाद वगळता, बाकी माध्यमे अशी चिडीचूप कशाला आहेत? आपणच गुजरात वा अन्य भानगडी शोधून काढल्या, म्हणून सतत मिरवणारे आणि मोदींना शेकडो प्रश्न विचारून भंडावून सोडणारे पत्रकार, आज हेलिकॉप्टर प्रकरणात असे मौनीबाबा कशाला झाले आहेत? त्यांनी चेहरे लपवले म्हणून सत्यापासून सुटका असते काय? चारपाच वर्षापुर्वी अनेक घोटाळे समोर येऊ लागले, तेव्हा गाजलेले एक नीरा राडीया नावाचे प्रकरण होते. ही बाई अनेक पत्रकारांना खिशात टाकून राजकीय सौदेबाजी करीत होती आणि तिचे दलाल म्हणून हे नामवंत पत्रकार सौदेबाजीत पुढाकार घेत लोकमत बनवण्याचे उद्योग करीत होते. त्यात प्रभू चावला, बरखा दत्त आणि वीर संघवी अशी नावे पुढे आलेली होती. अजूनही ही माणसे पत्रकार म्हणून मिरवत असतात. त्यांनी कधी आपल्या पापाची कबुली दिली आहे काय? वीर संघवी याने आपल्या लिखाणातून पाप झाल्याची निदान कबुली दिली. पण बरखा बेशरमपणे आजही पत्रकार म्हणून मिरवते आहे. पाकिस्तानी हेरखात्याच्या संस्थेने योजलेल्या विविध समारंभाला अगत्याने हजेरी लावून चैन करणार्‍या पत्रकारांचे चेहरे आपल्याला ठाऊक नाहीत काय? मग ऑगस्टा वेस्टलॅन्ड कंपनीकडून पैसे घेऊन देशाची फ़सवणुक करणार्‍यात कुठले पत्रकार विकले गेले असतील, याची वेगळी यादी द्यायला हवी काय?

खरे तर मागल्या दहापंधरा वर्षात माध्यमांचा इतका प्रचंड विस्तार झाला, त्यामध्ये आलेली गुंतवणूक कुठून आली व त्यांचे बोलविते धनी कोण आहेत, त्याचा तपास कुठल्या तरी खास उच्चपदस्थ पथकाकडून होण्याची गरज आहे. विविध मंचावर अविष्कार स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन मिरवणार्‍या पत्रकार संपादकांच्या व्यक्तीगत मालमत्ता व संपत्तीची झाडाझडती होण्याची गरज आहे. अनेकजण दोन दशकांपुर्वी कुठल्या तरी वर्तमानपत्र वा वाहिनीमध्ये सामान्य पत्रकार होते. त्यातल्या कित्येकांनी आजकाल आपल्या मालकीचे माध्यमसमूह उभे केले आहेत. त्यांची खरी मालकी व गुंतवणूक कुठून आली, त्याचाही तपास आवश्यक आहे. कारण यातल्या बहुतेकांनी दहापंधरा वर्षात राजकीय सुपारीबाजी करीत शार्पशूटर होऊन अनेक राजकीय बळी घेतले आहेत. अनेक राजकारण्यांचा गेम केला आहे. किंवा दुसरीकडे जे काही भ्रष्टाचार वा राजकीय गुन्हे झाले, त्यात सहभागी होऊन आपापला हिस्सा उचललेला आहे. म्हणूनच अशा पत्रकार संपादकांचे खरे चेहरे जगासमोर येण्याची गरज आहे. दिल्लीत अशा अनेकांनी आपापल्या मालमत्ता कशाच्या बळावर उभ्या केल्या आणि त्यांच्याकडे इतका पैसा श्रीमंती कुठून आली, ते शोधण्यासारखे आहे. कारण याच लोकांनी पत्रकारिता चक्क ब्लॅकमेलिंगचा धंदा करून टाकला आहे. पीटर मुखर्जी व इंद्राणी मुखर्जी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. सोनिया गांधी यांनी १९९८ च्या लोकसभा निवडणूकीत अकस्मात प्रचारसभा घ्यायला सुरूवात केली आणि नंतर त्या थेट राजकारणात उतरल्या. नेमका तोच मुहूर्त साधून देशात वृत्तवाहिन्यांची सुरूवात झाली. तो योगायोग होता काय? स्टार नेटवर्क नावाच्या परदेशी कंपनीने अकस्मात भारतामध्ये वृत्तवाहिनी सुरू केली आणि त्याचे सर्वकाम एनडीटीव्ही या समुहाकडे सोपवले. तिथून उदयास आलेल्या तमाम नामवंत पत्रकारांची झाडाझडती आवश्यक आहे.

सोनिया राजकारणात उतरल्या आणि वृत्तवाहिन्यांचा जमाना सुरू झाला. तिथपासूनच राजकारणी व पत्रकार यांच्यातल्या संगनमताचा प्रकार वाढत गेला. पत्रकारितेला बाजारबसवी करण्याचे यशस्वी कारस्थान त्यात शिजवले गेले. मग कधी पत्रकार त्या मोहाला बळी पडत उद्योगसमूह किंवा काळ्यापैशाच्या जनानखान्यात जाऊन पडले त्याचा थांग लागला नाही. आता तर काळ्यापैशाखेरीज वर्तमानपत्रे चालू शकत नाही, अशी दुर्दशा झाली आहे. पत्रकारितेने विश्वासार्हता पुर्णपणे गमावली आहे. त्यामुळेच जनतेच्या माथी ज्या गोष्टी मारायच्या आहेत, त्याचा उद्योग तोट्यात चालवावा लागतो. तो चालवायचा तर कुणीतरी त्यात काळापैसा ओतावा लागतो. त्यासाठी त्याचे हितसंबंध जपावे लागतात आणि पत्रकाराला त्याच धन्याची रखेली म्हणून मिरवावे लागते. ही वास्तविकता झालेली आहे. एकदा पातिव्रत्याला तिलांजली दिली, मग अब्रु नावाचा प्रकार शिल्लक उरत नाही आणि अधिकाधिक बोली लावणार्‍याशी शय्यासोबत करण्यात काही गैर उरत नाही. तेच झाल्यावर पैसे मोजणारा देशातला आहे की परदेशी आहे, त्याचे भान कोणी ठेवायचे? देशहित, समाजहित ही दिखावू व्रतवैकल्ये होऊन जातात. जगासमोर वटसावित्रीच्या व्रताचे नाटक रंगवायचे आणि अंधारले मग नाक्यावर येऊन व्याभिचाराचा धिंगाणा घालायचा. मागल्या दोनचार दिवसात ऑगस्टा वेस्टलॅन्ड प्रकरण गाजत असताना अनेक इंग्रजी प्रतिष्ठीत वाहिन्यांचे मौन स्पष्ट आहे. ज्यांनी इटालीच्या कन्येवर बहू म्हणून विश्वास ठेवायचे प्रवचन मागली पंधरा वर्षे देशाच्या जनतेला ऐकवले, त्यांनाच आता इटालीयन न्यायाबद्दल शंका वाटत आहेत. ज्या देशातील न्यायावर विश्वास ठेवू नये, त्या देशाच्या कन्येवर कशाला विश्वास ठेवायचा? कोणापाशी त्याचे उत्तर आहे काय? वेश्यातरी आपल्या व्यापार धंद्याशी यापेक्षा प्रामाणिक असतात. पत्रकारिता आता त्यापेक्षाही रसातळाला गेली आहे.

3 comments:

  1. salya tya nikhilachi sampati kiti ahe hehi sodhayala have.

    ReplyDelete
  2. भाऊ, लेखाचा शेवट फारच अर्थपूर्ण आहे.

    ReplyDelete