Sunday, April 17, 2016

त्यापेक्षा दंगलीत मेलेले बरे!

गुजरातची दंगल हा मागली पंधरा वर्षे देशातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू होऊन राहिला. त्यातून हिंदू व्होटबॅन्क तयार झाली. बारा वर्षात लोकसभा निवडणूकीने त्याचा फ़ुगा फ़ोडला. पण जुगाराची नशा चढलेल्यांना कधी त्यातून बाहेर पडणे शक्य नसते. म्हणून असेल, आताही आसाम बंगालच्या निवडणूकीत कॉग्रेस पुन्हा त्याच गुजरात दंगलीचे राजकीय भांडवल करू बघते आहे. वास्तविक त्याचा आधी गुजराथी लोकांना कंटाळा आला आणि त्या राज्यातून कॉग्रेस जवळपास नामशेष होऊन गेली. पुढल्या काळात क्रमाक्रमाने अन्य राज्यातले तथाकथित पुरोगामी गुजरात दंगलीवर बोलून थकले आणि नामशेष झालेत. पण त्यातूनच आपला उद्धार करून घेण्याचा या पुरोगामी जुगार्‍यांचा मोह काही संपताना दिसत नाही. सहाजिकच आताही बंगाल आसाममध्ये त्याचाच वापर सुरू झाला आहे. त्याचा कितीसा लाभ कॉग्रेस वा पुरोगाम्यांना मिळतो, हे निकालाच्या दिवशी दिसेलच. पण देशातल्या मुस्लिमांना त्याबद्दल काय वाटते, त्याचा खुलासा कुतुबुद्दीन अन्सारी याने आधीच करून टाकला हे बरे झाले. याचे कारण देशातले मुस्लिम पुरोगाम्यांना वाटते तितके धर्मांध नाहीत आणि मुर्खही नाहीत. अर्थात कुतुबुद्दीन अन्सारी म्हणजे कोण, असा प्रश्न तुम्हाला एव्हाना पडलेला असेल. कारण असा कोणी कुठल्या मुस्लिम संघटनेचा नेता वा मुस्लिम विचारवंत तुम्ही कधी ऐकलेला नाही. हे नाव कधी कुठल्या वाहिनीवरल्या चर्चेतला चेहरा म्हणून तुमच्या समोर आलेले नाही. तो कुठल्या कोर्टात जाऊन दंगलीतील पिडीतांचा न्याय मागणाराही नाही. कुठल्या राजकीय पक्षाचा मुस्लिम नेता म्हणूनही तुम्ही बघितलेला नाही. मग हा कुतुबुद्दीन कोण, असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. पण तितकीच चमत्कारीक गोष्ट अशी, की तुम्ही त्याला अगदी चेहर्‍याने ओळखू शकता. तुम्हाला त्याचे फ़क्त नाव ठाऊक नाही.
कुतुबुद्दीन अन्सारी हा गेल्या दिड दशकात गुजरात दंगलीचे राजकारण झाले त्याचा चेहरा आहे. किंबहूना त्याचाच मुखवटा लावून दंगलीवरचे राजकारण होत राहिले. आता त्यालाही आपल्या अशा चेहर्‍याचा कंटाळा आला आहे. म्हणून असेल, चिडून त्याने संतप्त प्रतिक्रीया दिलेली आहे. यापेक्षा त्या दंगलीत मारला गेलो असतो तर बरे झाले असते, असे कुतुबुद्दीन म्हणतो. कारण आपल्या वेदना, यातना आणि उध्वस्त आयुष्याचे पुरोगाम्यांनी केलेले राजकीय भांडवल, त्याला आणखीच उध्वस्त करून गेले आहे. देशातल्या प्रत्येक वर्तमानपत्राने व माध्यमाने त्याचा चेहरा जगाला ओळखीचा करून दिलेला आहे. कारण जीव वाचवण्यासाठी हात जोडून गयावया करणारा तो रडवेला चेहरा, आता जगाला परिचित झाला आहे. आणि तोच चेहरा आपल्या पोस्टर व प्रचार साहित्यात पुन्हा छापून कॉग्रेससह पुरोगामी पक्षांनी आसाम व बंगालमध्ये मुस्लिमांकडे मतांचा जोगवा मागण्याचा प्रयास केला आहे. म्हणून कमालीचा विचलीत झालेला कुतुबुद्दीन म्हणतो, त्यामुळे त्याच्या जगण्याला कायमचा धोका निर्माण झाला आहे. आपणच हा फ़ोटोतून प्रचारासाठी व हिंदूंना बदनाम करण्यासाठी संमती दिली, असा लोकांचा त्यातून समज निर्माण होतो. मग आपल्याविषयी हिंदूंची मने कलुषित होतात, असे त्याचे म्हणणे आहे. ते स्वाभाविक आहे. कारण त्या्चे छायाचित्र राजकीय प्रचारासाठी सातत्याने वापरणार्‍या कोणीही त्याच्या उध्वस्त जीवनाला नव्याने आकार देण्यासाठी वा पुनर्वसनासाठी कुठलीही मदत केलेली नाही. आजही दोन वेळची चुल घरात पेटावी, म्हणून त्याला झुंजावे लागते आहे आणि त्याच्या नशिबी आलेल्या वेदनांचा बाजार मात्र भलतेच दलाल तेजीने चालवित आहेत. कृपया आपला चेहरा किंवा फ़ोटो कोणी राजकारणासाठी वापरू नये, असे आवाहन त्याने केले आहे. या आवाहनातून कुतुबुद्दीन त्याच्या वेदनांचा बाजार भरवणार्‍यांना उघडे पडत नाही काय?
कुतुबुद्दीन असा एकटाच नाही. बडोद्यात दंगलीमध्ये बेकरी पेटवून संपुर्ण कुटुंब जाळली गेलेली जाहिर शेख कुठे वेगळी आहे? अहमदाबादच्या गुलमर्ग सोसायटीतले जे जाळून मारले गेले, त्यांच्या वेदना कुठे वेगळ्या आहेत? त्यांच्या यातनांचा बाजार मांडून तीस्ता सेटलवाडने कित्येक कोटींची माया केली व त्यावर चैन केली. त्यासाठी तिच्याकडे हिशोब मागणार्‍यांना न्याय देण्य़ासाठी कोणीही पुरोगामी पुढे आलेला नाही. ते काम गुजरात पोलिसांना करावे लागते आहे. कुतूबुद्दीन त्यातलाच एक पिडीत आहे. पण त्याच्यासारखे दुर्दैवी फ़क्त दंगलीचे बळी नाहीत. त्यांच्याच न्यायासाठी धावून आलेल्या पुरोगामी दलालांनी सर्व धंदा केला आणि पिडितांना वार्‍यावर सोडून दिले. अर्थात कुतुबुद्दीनने ह्या बाजार वा व्यापारातील कमाईचा कुठलाही हिस्सा आजही मागितलेला नाही. त्याचे म्हणणे इतकेच आहे, की तुमचा व्यापार चालू द्यात. त्याचे चटके व होरपळ तरी माझ्या वाट्याला येऊ देऊ नका, अशी त्याची विनंती आहे. कारण जेव्हा कधी त्याच्या त्या रडव्या छायाचित्राचा व्यापार सुरू होतो, तेव्हा त्याच्या जीवनात नवे वादळ येत असते. कशीबशी उभी केलेली संसाराची झोपडी गदगदा हलू लागते. दंगल झाली तेव्हा कुतुब २९ वर्षाचा होता. आज त्याचे वय ४१ झाले आहे. गेल्या पंधरा वर्षात राजकीय पक्ष, संघटना, सिनेमावाले आणि दहशतवादी संघटनांनी आपल्या चेहर्‍याचा मिळेल तितका गैरवापर करून झाला आहे. ‘यापेक्षा त्या दंगलीत मारला गेलो असतो तर बरे झाले असते. कारण आज ते छायाचित्र बघून माझीच वयात येणारी मुले मला विचारतात, अब्बू, तुम्ही असे रडत कशाची भिक मागत आहात? त्या पोरांना मी उत्तर देऊ शकत नाही. माझ्या जगण्याला आग लावून हे कोणाच्या पोळ्या भाजून घेत आहेत?’ कुतुबचे हे प्रश्न मनाला हेलावून सोडणारे आहेत. कारण आपल्या वेदनांचा बाजार त्याला अधिक यातना देतो आहे. हीच गुजरातसह देशातल्या लाखो मुस्लिमांची शोकांतिका आहे.
कुतुबुद्दीन एकटाच नाही. देशातले कित्येक लाख मुस्लिम आज जगण्यासाठी व गरीबीशी झुंजत असताना, त्यांच्या वेदनांवर फ़ुंकर घालणारा कोणी उरलेला नाही. पण त्याच वेदनांच्या आगीवर आपापली स्वार्थाची पोळी भाजून घेणार्‍यांना प्रतिष्ठीत मानले जाते आहे. जणू मुस्लिमांच्या वेदना यातना व क्लेश हा पुरोगामी बाजारातील एक स्वस्त कच्चा माल झालेला आहे. मुस्लिम जितके दु:खी व अन्यायग्रस्त असतील, तितका पुरोगामी राजकारणाचा बाजार गरम राहिल, अशी एक समजूत तथाकथित सेक्युलर शहाण्य़ांनी करून घेतली आहे. म्हणून मग शक्य होईल तिथे व तेव्हा मुस्लिमांच्या जखमांवरच्या खपल्या काढल्या जात असतात. त्यांच्यावर अधिकाधिक हल्ले व्हावेत, यासाठी चिथावण्या देणारे राजकारण खेळले जात असते. धार्मिक अधाधुंदी माजवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू असतात. याच्या उलट जिथे मुस्लिम व हिंदू यांच्यात सौहार्द निर्माण होत असेल, त्यात अडथळे निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयासही चालू असतो. म्हणून मग रडवेल्या केविलवाण्या कुतुबुद्दीन अन्सारीचे तेच ह छायाचित्र सातत्याने समोर आणले जाते. पण आज तोच कुतुब आपल्या खर्‍या वेदना दु:ख कथन करतो, त्या शब्दांना कुठे माध्यमात प्रसिद्धी मिळत नाही. त्यावर कुठे वाहिन्या चर्चा करीत नाहीत. जिथे कुतुबसारख्या खर्‍या जखमा भळभळा वहात आहेत, त्यावर फ़ुंकर घातली जात नाही. त्याच्या आजच्या वेदनेची गळचेपी माध्यमे़च करीत आहेत. एक छायाचित्र दशलक्ष शब्दांपेक्षा अधिक बोलके असते म्हणतात. पण इथे लक्षात येते की कुतुबुद्दीनचे तेच एक छायाचित्र अब्जावधी वेदना व शब्दांच्या मुसक्या बांधते आहे. किंबहूना कुतुबसारख्यांच्या मुस्कटदाबीसाठीच त्याचे ते छायाचित्र आज सढळपणे वापरले जात आहे ना?

3 comments:

 1. बरोबर भाऊ मस्त

  ReplyDelete
 2. भाऊराव,

  तुम्ही म्हणालात :

  >> .... जिथे मुस्लिम व हिंदू यांच्यात सौहार्द निर्माण होत असेल, त्यात
  >> अडथळे निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयासही चालू असतो.

  यावरून नुकतीच घडलेली एक घटना आठवली. तृप्ती देसाई यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवळाच्या गाभाऱ्यात घुसायचा प्रयत्न केला होता. यांत लोकभावानांना पायदळी तुडवणे तर झालेच शिवाय आजून एक अतिशय धक्कादायक गोष्ट घडली.

  ती म्हणजे त्यांच्या सोबत सलीमा गुलाब मुल्ला नावाच्या एक मुसलमान स्त्रीदेखील गाभाऱ्यात घुसणार होत्या. याप्रसंगी हिंदूंना मुद्दामहून डिवचण्याचा हेतू स्पष्ट दिसून येतो. कोल्हापुरात हिंदू मुस्लिम दंगल झालेली नाही. हिंदू आणि मुस्लिम सौहार्दाने नांदले तर मुस्लिम मतपेढीस गळती लागते हा आजवरचा अनुभव आहे.

  तृप्ती देसाईंनी साडी नेसायचं नाकारून सलवार खमीस घालूनच गाभाऱ्यात शिरण्याचा हेका धरण्यामागचं कारण उघड आहे. त्यांना मुस्लिम महिला महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यात घुसवून दंगल घडवून आणायची आहे.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  संदर्भ :

  १.
  http://www.pudhari.com/news/kolhapur/31949.html

  २.
  http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:Zjn7vilkpsUJ:www.pudhari.com/news/kolhapur/31949.html+&cd=3&hl=en&ct=clnk&gl=uk

  ReplyDelete
 3. गुजराथ दंगलीत ज्यांनी सर्वस्व गमावले त्यांच्या बद्दल सहानुभूती नक्कीच आहे. पण त्या आधी गोधरा येथे साबरमती एक्सप्रेस च्या एस -६ बोगीत जे कार सेवक व निरपराध जाळले गेले त्या बद्दल मात्र हे पुरोगामी व त्या पैशावर श्रीमंत झालेली तिस्ता सेटलवाड मात्र एक चकार शब्द ही बोलत नाही नुकताच आज तक ह्या वृत्त वाहिनीवर सदर विषया वरचा व्हिडिओ दाखविण्यात आला. जरूर जरूर बघावा असा आहे.

  ReplyDelete