Friday, April 8, 2016

पाकिस्तानी राजदूताच्या उचापती

पठाणकोट हवाईतळावर वर्षारंभी झालेल्या घातपाती हल्ल्याचा तपास करायला पाकिस्तानी पथक नुकतेच येऊन गेले. त्यावरून इथे कल्लोळ माजला होता. कारण त्या पथकामध्ये कोणी पाक हेरखात्याचा अधिकारी होता. म्हणजे त्यांना इथे येऊ देण्यातच घात झाल्याचा अनेक पुरोगाम्यांचा दावा होता. आता तर पाकिस्तानच भारतावर उलटला आहे. कारण ज्या संयुक्त तपासाची कल्पना पाकिस्तानने मांडली, त्यानेच उलट तपासासाठी भारतीय पथकाला पाकिस्तानात प्रवेश दिला जाणार नसल्याचे घोषित केले आहे. मात्र अजून तशी घोषणा पाक सरकारने केलेली नाही, तर भारतातल्या पाकिस्तानी राजदूताने केलेली आहे. मजेची गोष्ट अशी, की त्यामुळे इथल्या पाकप्रेमींना उमाळे फ़ुटले आहेत. त्यांना अकस्मात भारताविषयी कमालीचे प्रेम दाटून आले आहे. कालपरवा दिल्लीच्या विद्यापीठात पाकवादी घोषणा देण्यात कुठलाही देशद्रोह नसल्याचे दावे करणार्‍यांना आता उपरती झाली आहे काय? नसेल तर त्यांनी इतक्या टोकाला जाऊन मोदी सरकारला धारेवर धरण्याचे कारण काय? कोणाला इतका देशप्रेमाचा उमाळा आला आहे, हा म्हणूनच संशोधनाचा विषय आहे. पण परराष्ट्र संबंध आणि त्यातली मुत्सद्देगिरी इतकी सोपी नसते पाकिस्तानलाही इतकी मग्रुरी आली आहे काय? वरकरणी अशा गोष्टी दिसत असतात. त्यामुळे सामान्य माणसाची दिशाभूल करणे सोपे असते. पण मुत्सद्देगिरी नेहमीच फ़सवी असते. त्यात बोलले जाते, त्यापेक्षा वेगळेच काही चालू असते. वास्तविक पाकिस्तानला आजतरी भारताशी वैर करणे परवडणारे नाही, तरीही त्यांचा हा राजदूत अब्दुल बासित इतक्या विचित्र पद्धतीने कशाला वागतो आहे? पाक राजदूत बासित यांचे वर्तन राजशिष्टाचाराला सोडून असल्याने भारतातून त्यांची हाकालापट्टी व्हावी, अशी पाकिस्तानची इच्छा दिसते. अन्यथा बासित यांनी इतका आगावूपणा वारंवार केला नसता.
कुठल्याही देशाचा राजदूत अन्य देशात असताना दोन्ही देशाचे संबंध गुण्यागोविंदाने नांदावेत, यासाठी प्रयत्नशील असतो. किंबहूना तेच त्याचे काम व कर्तव्य असते. पण बासित हे गृहस्थ कायम दोन देशातील संबंधात वितुष्ट वाढावे म्हणूनच काम करताना दिसतात. म्हणूनच भारताने त्यांना इथून हाकलून लावणे योग्य ठरेल. परदेशाच्या भारतातील राजदूत मुत्सद्दी यांची वागणूक धड नसेल, तर त्यांना माघारी पाठवून देण्याचा यजमान देशाला अधिकार असतो. पण भारताने बासित यांना तशी वागणूक अजून तरी दिलेली नाही. त्याचा फ़ायदा घेऊन हा माणूस अधिकाधिक आगावूपणा करीत असतो. त्याला भारताने खरेच हाकलून लावला पाहिजे. पण दुसरीकडे हा माणूस असे कशामुळे वागतो आहे, त्याचाही आढावा घ्यायला हरकत नसावी. पाकिस्तानला दिवसेदिवस बलुचिस्थान व अन्य प्रांतामध्ये बंडखोरीची डोकेदुखी वाढते आहे. बलुची बंडखोरांनी पाक सत्तेविरुद्ध बंडाचे निशाण उभारलेले आहे आणि त्याला रोखताना पाकिस्तानला नित्यनेमाने लष्कराचा वापर करावा लागतो आहे. मोठ्या प्रमाणात तिथे हिंसाचार माजलेला असून, माध्यमांनाही तिथल्या बातम्या देण्यास बंदी घातली आहे. हजारोच्या संख्येने बलुची लोकांची कत्तल झाली असून तितक्याच संख्येने बलुची बेपत्ता असल्याच्या तक्रारी आहेत. अशा बंडखोरांनी खुलेआम आपल्या स्वातंत्र्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहनही केलेले आहे. काही लोकांनी तर भारतीय तिरंगा आपल्या भागात फ़डकवण्यापर्यंत मजल मारलेली आहे. ह्या बातम्या सोशल माध्यमातून झळकत असतात. पण भारतीय माध्यमातही त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. पण दिवसेदिवस ही नाराजी पाकिस्तानच्या हाताबाहेर चालली आहे. त्याला भारताची ‘सहानुभूती’ किंवा नैतिक पाठींबा नसेलच, असे कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. बासित यांची तीच पोटदुखी आहे.
बासित वा इथले पाक हस्तक जसे इथल्या फ़ुटीरवाद्यांना हाताशी धरून उचापती करीत असतात, तशाच उचापती पाकिस्तानातही होत असतात. मात्र त्यामागे भारताचा हात असल्याचे सिद्ध करणे पाकिस्तानला शक्य झालेले नाही, ही त्यांची समस्या आहे. पाकिस्तानात राहून भारतीय मुत्सद्दी वा राजदूताला ते शक्य नसल्याने, अशी कामे अफ़गाणिस्तानातून भारतीय हस्तक करतात, हा पाकचा आरोप आहे. मोदी सत्तेत आल्यापासून अशा कारवायांना जोर चढला आहे. त्यालाच शह देण्यासाठी मग इथे असहिष्णूता विरोधी आवाज उठवले जातात. आपण तरी कोणावर उघडपणे पाकिस्तानचे हस्तक म्हणून आरोप करतो का? पण त्यांचा बोलविता धनी कोण आहे ते लपून रहात नाही. भारताच्या कारवायाही तिथे तशाच असू शकतात. पण पाकिस्तानला त्यावर आवाज उठवता येत नाही. कारण ज्यांच्याकडून घातपात चालू असतात तेच पाकिस्तानी बलुची नागरीक असतील, तर काय करायचे? त्याचा राग म्हणून बासित सारख्यांना पुढे करून उचापती केल्या जातात. बासित या पाक राजदूताचे आरोप पाकिस्तानच्या नैराश्याचे द्योतक आहे. आपण इथे भारतात जसे फ़ुटीरवाद्यांशी संवाद साधतो, तसे काही भारतीय राजदूताने बलुची वा अन्य पाकिस्तानी नाराजांशी करावे, ही त्यामागची अपेक्षा आहे. म्हणजे मग भारताला पाकिस्तानात अस्थीरता आणायची असल्याच्या आरोपाला वजन येऊ शकते. पण भारताकडून तशी कुठलीही आगळिक होत नाही. पण जे काही चालू आहे, त्यामागील भारताची चिथावणी पाकिस्तानला नेमकी ठाऊक आहे. मात्र त्याला शह देता आलेला नाही. म्हणून राजनैतिक पातळीवर उचापती करून भारताला पाकशी संबंध तोडायची पाळी आणायची, असा काहीसा डाव यातून खेळला जात असावा. बासित यांना अशा वागण्यासाठी भारतातून हाकलून लावण्यास भाग पाडायचा त्यातला हेतू लपून रहात नाही.
बलुची बंडखोरीमुळे पाकिस्तानला अंतर्गत डोकेदुखी झाली आहे. पण त्याच प्रांताच्या सागर किनार्‍यावर ग्वादार बंदर चीन विकसित करतो आहे आणि तिथे चीनचे बस्तान बसले, तर हिंदी महासागरात चीन शिरजोर होऊ शकतो. त्याला शह देण्यासाठीच व्याप्त काश्मिर व बलुची बंडखोरीला भारताने प्रोत्साहन देणे स्वाभाविक आहे. नुसते बंदरच बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात येत नाही, तर ग्वादार बंदरापासून चिनकडे जाणारा महामार्गही विविध नाराज बंडखोरांच्या भूमीतून जातो आहे. त्यामुळेच त्या भागातील बंडखोरी व उचापतींनी त्याच दोन्ही भारतीय शत्रूंची झोप उडालेली आहे. म्हणून मग चीन राष्ट्रसंघात अझहर मसूदची पाठराखण करतो आहे आणि पाकचा इथला राजदूत भारताला डिवचण्याचे उद्योग करतो आहे. याच्या उलट मैत्री व शांततेसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे नाटक भारताने छानपैकी रंगवलेले आहे. त्यामुळे पाकिस्तान मोदी सरकारला खेळवत असल्याचे आरोप झाल्यास नवल नाही. ते आरोप व्हावेत अशीच मोदी सरकारची रणनिती आहे काय? बांगलादेश युद्धापुर्वी पुर्व पाकिस्तानाच्या यादवी युद्धात जगाने हस्तक्षेप करावा, यासाठी इंदिराजींनी काही महिने प्रयत्न चालविला होता. त्यासाठी भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून जयप्रकाश नारायण जगातल्या मोठमोठ्या नेत्यांच्या भेटी घेत फ़िरले होते आणि सर्वांनी पाठ फ़िरवल्यानंतरच इंदिराजींनी पुर्व पाकिस्तानात हल्ला केला होता. सैन्य पाठवले होते. सध्याच्या पकिस्तानात विविध प्रादेशिक अस्मितांचा संघर्ष अधिक टोकदार होईल आणि पंजाबी शिरजोरी विरुद्ध सामुहिक भावना उफ़ाळून येईल, तेव्हा पाकिस्तान मोडकळीस आलेला असेल. अशा वेळी तिथे हस्तक्षेप स्वस्त व लाभदायक असू शकेल. आणि तशी स्थिती असेल, तेव्हा त्यात मित्राला वाचवायला चीनही धावून येण्याची शक्यता कमी असेल. पाक राजदूत अब्दुल बासित त्यालाच हातभार लावत आहेत काय?

1 comment: