Tuesday, April 26, 2016

अराजकाच्या कडेलोटावर युरोप

हा लेख लिहीत असताना अकस्मात ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीवर एक बातमी झळकली. महंमद उस्मान घनी नावाचा एक पाकिस्तानी नागरिक ऑस्ट्रीयाच्या तुरूंगात असून गेले चार महिने त्याच्याविषयीची माहिती मिळवणयासाठी तिथले पोलिस धडपडत आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी पाकिस्तान सरकारशी संपर्क साधला असून, त्यांच्या चौकशी करणार्‍या पत्राला पाक सरकारने साधी पोचपावतीही दिलेली नाही. हा पाक नागरिक ऑस्ट्रीयात कुठून कसा पोहोचला? त्याला अटक कशाला झाली आहे? पोलिसांना त्याची माहिती कशाला हवी आहे? त्याचे उत्तर पॅरीसचा घातपाती हल्ला असे आहे. त्यात ह्या महंमद उस्मान घनीचा हात होता, असा संशय आहे. मात्र प्रत्यक्षात हल्ला झाला तेव्हाही उस्मान घनी ऑस्ट्रीयाच्या तुरूंगातच होता. पण हल्ला करणार्‍यांशी त्याचे लागेबांधे उघड झाले आहेत. कारण त्याचा पाकिस्तान व लष्करे तोयबा यांच्याशी असलेला संबंध सिद्ध झाला आहे. तोच बॉम्ब बनवणारा असून घातपाताचे उत्तम नियोजन करणारा म्हणून ओळखला जातो. मुंबईतील २६/११ च्या संपुर्ण घातपाताचे नियोजन त्यानेच केलेले होते. आताही इसिसच्या युद्धात सहभागी व्हायला गेलेला असताना, तिथून त्याने युरोपकडे नजर वळवली. सिरीयातून गेल्या वर्षी निर्वासितांचा जो लोंढा परागंदा होऊन युरोपमध्ये धावू लागला, त्यातूनच उस्मान घनी ग्रीसमार्गे ऑस्ट्रीयात पोहोचला. पण त्याचा सिरीयन पासपोर्ट शंकास्पद वाटल्याने तिथल्या निर्वासित छावणीतून त्याला इतर दोघांसह ताब्यात घेतले गेले. अधिक तपास केल्यावर तो सिरीयन नसून पाकिस्तानी असल्याचे नजरेत आले. आजकालच्या युरोपची ही अशी दुर्दशा झालेली आहे. तिथे नागरिकांपेक्षा घातपाती जिहादी व अतिरेक्यांची सरबराई चालू आहे. मग परिणाम कसे असतील?
गेल्या नोव्हेंबर महिन्यात एकापाठोपाठ स्फ़ोट व हल्ले पॅरीसमध्ये झाले होते. त्यातला मुख्य आरोपी बेल्जमची राजधानी ब्रसेल्सला पळून गेला. तिथेच दडी मारून बसला होता. अतिशय कष्टपुर्वक माहिती काढून त्याला मुस्लिम वस्तीतून अटक करण्यात आली, त्याच्या दोनच दिवसांनी ब्रसेल्सचा विमानतळ व मेट्रो रेल्वेत स्फ़ोट घडवले गेले. हे घातपाती कोण होते, त्याचा शोध घेताना विमानतळावरच्या एका कॅमेराने टिपलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले. त्यातल्या दोघांना पोलिसांनी सहज ओळखले. पण तिसरा संशयित मात्र बेल्जियन पोलिसांना अपरिचित होता. मजेची गोष्ट म्हणजे त्याला तुर्कस्थानच्या पोलिसांनी नेमके ओळखले. तो मोरक्कन वंशाचा बेल्जियन नागरिक होता. दोन पिढ्या बेल्जममध्ये स्थायिक झालेल्या मुस्लिम आईबापांचा मुलगा. पण तो तिथून सटकला आणि सिरीयात इसिसच्या बाजूने लढाईत भाग घ्यायला गेलेला होता. त्याला तुर्की सीमेवर पकडला. तुर्की पोलिसांनी त्याला मायदेशी धाडून दिले. तशी माहिती राजदूतालाही दिली होती. म्हणजेच बेल्जियम पोलिसांना हा घातपाती असल्याची माहिती तुर्कस्थानने आधीच दिलेली होती. पण त्यांनी त्याला किरकोळ भुरटा गुन्हेगार म्हणून सोडून दिले. आता त्यानेच ब्रसेल्सच्या विमानतळावर स्फ़ोट घडवले, म्हणून तिथले सरकार डोके आपटून घेत आहे. त्याच बेल्जमचे गृहमंत्री मुस्लिमांनी विमानतळावरच्या हल्ल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला असेही सांगतात. ही एकूण युरोपची आजची वस्तुस्थिती आहे. तिथल्या लोकसंख्येत मागल्या दोनतीन दशकात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत मुस्लिमांची सरकारी धोरणानेच भर घातली गेली. त्याचेच परिणाम आपण भोगत आहोत, अशी धारणा सामान्य जनतेत मूळ धरू लागली आहे. कारण दोन शतके जगावर राज्य करणार्‍या युरोपात आजकाल अराजक माजलेले आहे. तिथल्या मूळनिवासी लोकांना जीव मूठीत धरून जगायची नामुष्की आलेली आहे.
ही वेळ युरोपियन नागरिकांवर कुणा जिहादी घातपात्यांनी आणलेली नाही. ज्यांच्यावर त्यांनी देशाचा कारभार सोपवला, त्यांच्याच निर्णय व धोरणातून ही पाळी आलेली आहे. कारण मागल्या काही वर्षात दोन कोटीच्या आसपास बाहेरची लोकसंख्या युरोपमध्ये घुसली आहे. सिरीयामध्ये यादवी माजली, त्यामुळे जीवाच्या भयाने लाखो लोक जीव मूठीत धरून पळत सुटले. त्यातले बहुतांश युरोपच्या दिशेने आले. यातली मजा अशी, की अरबी व मुस्लिम असलेल्या त्या लोकसंख्येने नजिकच्या सौदी, कतार, दुबई वा तत्सम देशात आश्रयाला धाव घेतली नाही. त्यापेक्षा हजारो मैल दूरच्या युरोपात धाव घेतली. जीवावर उदार होऊन सागरी सफ़र साध्या नौकांनी करून, हे लक्षावधी मुस्लिम युरोपच्या दारात जाऊन उभे राहिले. त्यातून मानवी संकट उभे करण्यात आले. कारण युरोपियन महासंघाच्या कायद्यानुसार कुणालाही आश्रय मागितल्यास मदत करण्याची सक्ती आहे आणि तशी कुठलीही तरतुद शेजारच्या अरबी देशात नाही. मध्ययुगिन मानसिकतेने चालणार्‍या अरबी देशात घुसखोरी करणार्‍याला मुंडके छाटून ठार मारले जाऊ शकते. या लक्षावधी परागंदा लोकांच्या घोळक्यातून अनेक जिहादी युरोपात पोहोचले आणि निर्वासित म्हणून त्यांनी विनाचौकशी घुसखोरी केली आहे. वास्तविक तेव्हाच इसिसच्या प्रवक्त्याने निर्वासितांमध्ये आपले हस्तक असल्याचे खुलेआम सांगितले होते. त्यामुळे आपण संकटाला आमंत्रण देतोय, हे युरोपियन राज्यकर्त्यांना पक्के ठाऊक होते आणि झालेही तसे़च. हा लोंढा एकदा युरोपच्या विविध देशात घुसला आणि धुमाकुळ घालू लागला, तेव्हा खुप उशीर झाला होता. कारण त्यांच्यावर गोळ्या घालण्याची मुभा पोलिसांना कायदा देत नव्हता आणि त्यांना पिटाळून लावण्याची मोकळीक मानवाधिकार कायदा देत नव्हता. सहाजिकच घातपाती जिहादी पोसणे, ही युरोपने स्वत: लादून घेतलेली सक्ती होती. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
जगातले सुखवस्तु समाज म्हणून ज्यांच्याकडे मागल्या दोन शततकात बघितले गेले, त्या युरोपियन देशांत आज पुरते अराजक माजले आहे. घुसखोर वा निर्वासिताचे रूप घेऊन आलेल्या अरबी, आफ़्रिकन मुस्लिमांच्या घोळक्यांनी बहुतेक युरोपियन शहरात आपल्या मूळ संस्कृती वा वर्तनामुळे धुमाकुळ घातला आहे. म्हणून खर्‍या युरोपी नागरिकांचे जगणे धोक्यात आले आहे. नववर्षदिनी एका शहरात मध्यरात्री जमून लोक आनंदोत्सव करीत असताना मुलींवर सामुहिक बलात्कार झाले. अनेक घरात घुसून लुटमार व बलात्कार झाल्याच्या तक्रारी आल्या. पण सरकारी धोरणानेच हे संकट आलेले असल्याने तिथल्या माध्यमातून अशा बातम्याही दडपल्या जात आहेत. सहाजिकच सोशल माध्यमातून अशा बातम्या झळकतात आणि त्यातून अफ़वांचे पेव फ़ुटते. त्यामुळे आता मुळनिवासी युरोपियन व स्थलांतरीत निर्वासित यांच्यात जागोजागी यादवी माजण्याच्या शेकडो घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. डेन्मार्क नावाच्या देशातील काही तरूणांनी ‘राष्ट्रीय चाचे’ नावाची संघटना स्थापन केलेली असून, त्यांच्या यांत्रिक नौका सागरी गस्त करतात. सागरमार्गे येऊ बघणार्‍या निर्वासितांचा बंदोबस्त करण्याचे काम अशा अनेक गटांनी हाती घेतले आहे. जर्मनीत पेगिडा नावाची संघटना झपाट्याने लोकप्रिय होत असून, त्यांनी आफ़्रिकन वा मुस्लिम अरबी लोकांना देशातून हाकलून लावण्याची मोहिम सुरू केली आहे. त्यासाठी एक राजकीय पक्ष स्थापन केला असून त्याची लोकप्रियताही वाढते आहे. स्वीडन, डेन्मार्क, ऑस्ट्रीया अशा देशातून मुस्लिम विरोधी लोकमत संघटित होऊ लागले आहे. अर्थात ही नवी बाब नाही, तर हे बळावलेले दुखणे आहे. कित्येक वर्षापासून बहुरंगी समाजाच्या उभारणीचे खूळ युरोपियन राज्यकर्त्यांच्या डोक्यात शिरले आणि त्यासाठी अरबी वा मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात समाविष्ट करून घेण्यातून, ही समस्या जोपासली गेली आहे.
उदारमतवाद म्हणजे धर्माचे अवडंबर नको असे मानणार्‍यांचे वर्चस्व युरोपियन देशात वाढले आणि त्याच्या अतिरेकाने बहुरंगी संस्कृती निर्माण करण्यासाठी लोकसंख्या विस्कटून टाकण्याचे धोरण स्विकारले गेले. त्यातच कष्ट करणार्‍यांची गरज असल्याने अन्य देशातील, वंशातील लोकांना नागरिकत्व बहाल करण्याचे धोरण पत्करावे लागले. त्यातून उत्तर आफ़्रिका व मुस्लिम देशातून येणार्‍या भणंगांना मोठ्या संख्येने आश्रय दिला गेला. युरोपियन वा ख्रिश्चन आपली अस्मिता गुंडाळून स्वागत करीत असले, तरी येणार्‍या नवागतांनी आपली अस्मिता तिथे लादण्याचा आक्रमकपणा सुरू केला. आपल्या नव्या दत्तक देशाने अरबांशी, मुस्लिम देशांशी संबंध कसे ठेवावेत, याचे आग्रह अशा स्थलांतरीतांनी सुरू केले. इराक युद्धात नाटोचे सदस्य म्हणून ज्यांनी भाग घेतला, त्यांना मुस्लिम विरोधी ठरवून हेच स्थलांतरीत आपल्याच देशाच्या विरोधात जिहादला उभे राहू लागले. अशी स्थिती असताना आणखी त्यांचेच बळ वाढवणारी लोकसंख्या युरोपात सामावुन घेण्याची भूमिकाच घातक होती. पण बहुरंगी समाज व उदारमतवादाच्या आहारी गेलेल्या राज्यकर्त्यांना समजावणारा कोणी उरला नव्हता. म्हणून गेल्या दोनतीन वर्षात अशाच लाखो लोकांना निर्वासित म्हणून स्विकारले गेले आणि काही देशांनी त्याला नकार दिल्यावर त्यांना युरोपियन महासंघाने सक्ती करण्यापर्यंत मजल गेली. याचा एकत्रित परिणाम हळुहळू दिसू लागला आहे. आज कुठल्याही युरोपियन लहानमोठ्या शहरात नवागत मुस्लिम व मुळचे युरोपियन यांच्यात सतत हाणामारीचे प्रसंग वाढत आहेत. लौकरच त्यातून भयंकर मोठी यादवी उफ़ाळली, तर नवल वाटण्याचे कारण नाही. कारण उस्मान घनी वा त्याच्यासारखे किती हजार जिहादी युरोपात निर्वासिताचा मुखवटा लावून घुसलेत, त्याची कुठलीही गणती अजून झालेली नाही.
याविषयीच्या बातम्या कुठल्याही भारतीय माध्यमात फ़ारश्या आढळणार नाहीत की युरोपियन मुख्य प्रवाहातील माध्यमात सापडणार नाहीत. तशा बातम्या देण्यालाही आता वर्णद्वेषी ठरवले गेले आहे. पण अन्य किरकोळ माध्यमातून ज्या बातम्या झिरपत आहेत, त्यांची मुख्य माध्यमातील घटनांशी सांगड घातली, तर सत्य उमजू शकते. आजच्या घडामोडी युरोपला कुठे घेऊन जातील हे डोळसपणे बघितल्यास सहज लक्षात येऊ शकते. कधीकाळी काश्मिरला पृथ्वीवरचा स्वर्ग मानले जायचे. आज जिहादने ग्रासलेल्या काश्मिरचा नरक होऊन गेला आहे. युरोपचा तसाच काश्मिर होऊ घातला आहे. कारण श्रीनगर वा अनंतनागसारख्या बातम्या य्रुरोपच्या अनेक गावे शहरातून नित्यनेमाने येऊ लागल्या आहेत. मानवाधिकाराच्या अतिरेकाची युरोपच्या नंदनवनाला नजर लागली आहे. ज्या युरोपने जगाला ट्रोजन हॉर्सची गोष्ट कित्येक शतके ऐकवली, तोच युरोप त्यातला आशय विसरून गेला असेल, तर इतिहासाची पुनरावृत्ती होणारच ना?
(बेळगाव तरूण भारत – अक्षरयात्रा रविवार २४/४/२०१६)

3 comments:

 1. <>


  भाऊ याचा अर्थ युरोपात आता परत उजवी विचारसरणी मूळ धरू लागली आहे असा घ्यायचा का?

  ReplyDelete
 2. मस्तच भाऊ उत्तम लेख

  ReplyDelete
 3. ज्या युरोपने जगाला ट्रोजन हॉर्सची गोष्ट कित्येक शतके ऐकवली, तोच युरोप त्यातला आशय विसरून गेला असेल, तर इतिहासाची पुनरावृत्ती होणारच ना?

  ReplyDelete