Thursday, April 28, 2016

सत्यमेव जयते आणि तीन सिंह

इशरत वा मालेगावच्या प्रकरणात नवनवे खुलासे होत असताना त्याची उत्तरे कॉग्रेसच्या तात्कालीन नेत्यांनी द्यायला हवीत ना? पक्षातर्फ़े तरी त्याचे काही स्पष्टीकरण व्हायला नको काय? पण त्या विषयात काहीही विचारले, मग कॉग्रेस प्रवक्ते एकच उत्तर देतात. दोन वर्षे आम्ही सत्तेत नाही. मोदी सरकार येऊन दोन वर्षे होत आली. मग काही गडबड असेल, तर मोदी सरकारने इतके दिवस कुठलीच कारवाई कशाला केलेली नाही? त्यात तथ्य नक्कीच आहे. सत्तांतर २६ मे २०१४ रोजी झाले. आणखी एका महिन्यांनी दोन वर्षे या सत्तांतराला पुर्ण होतील. म्हणजेच तेविस महिने उलटून गेले आहेत. मग खरेच कॉग्रेस युपीए सरकारने काही गडबड केली असेल, तर मोदी सरकारने सत्ता हाती येताच इतका विलंब कशाला लावला? यापुर्वीच युपीएचे वाभाडे काढायला हवे होते. पुरावे जगासमोर आणून कॉग्रेस नेत्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडायला हवे होते. पण त्यातले काही झालेले नाही अणि नुसत्या माध्यमातून वावड्या उडवल्या जात आहेत. ठराविक माहिती वा कागदपत्रे फ़ोडून माध्यमात गदारोळ कशाला चालू आहे? सरकारनेच या माहितीच्या आधारे कशाला कारवाई केलेली नाही? ही अशी व इतकी संगतवार माहिती माध्यमांकडे येतेच कशी? त्याची नेमकी सांगड घालण्याचे काम माध्यमातले पत्रकार करतात, मग सरकारची यंत्रणा काय करते आहे? सरकार इतके शांत वा निष्क्रीय कशामुळे आहे? त्याचे उत्तर मोदी सरकार देत नाही, की भाजपा देत नाही. म्हणूनच त्याचे उत्तर आपणच शोधायला हवे. पहिली गोष्ट म्हणजे ही इतकी भयंकर प्रकरणे आहेत आणि इतकी गुंतागुंतीची आहेत, की कुठल्याही शोधपत्रकाराच्या आवाक्यातली नाहीत. त्याची संगती लावणे हे गुन्हे तपासासारखे जटील काम आहे. अन्यथा नुसता धुरळा उडवला जाईल आणि प्रत्यक्षात काहीही सिद्ध होणार नाही. मग ‘सत्यमेव जयते’ असे म्हणण्यात काही अर्थ उरेल काय?
भारत सरकारचे एक मानचिन्ह आहे, त्यात आपण तीन सिंह एकत्र जोडलेले बघतो आणि त्याच्या खाली भारत सरकारचे ब्रीदवाक्य लिहीलेले असते, ‘सत्यमेव जयते’! पण सत्य इतक्या सहजासहजी विजयी करता येत नाही. त्यासाठी अपरंपार मेहनत घ्यावी लागते. बाकी कोणी नाही, तरी नरेद्र मोदी हे नेमके जाणतात. म्हणूनच त्यांनी सत्ता हाती आली, म्हणून घाईगर्दीने कुठली कारवाई केली नाही, की सूडबुद्धीने पावले उचलली नाहीत. इंदिराजींच्या विरोधात चरणसिंग यांनी अशीच एक घाईगर्दी केली होती आणि त्यातच जनता पक्ष बुडाला होता. किंबहूना अशा अनेक प्रकरणांचा सत्ता हाती आल्यावर निचरा करावा लागेल, हे मोदी आधीपासूनच ओळखून होते. त्यांना सत्ता मिळण्याची चिन्हे दिसू लागताच, अशा विषयात व तपासकामात रस असलेली माणसे त्यांच्या भोवती आधीपासून जमा होत गेली. त्याला योगायोग म्हणता येणार नाही. कदाचित मोदी टीम म्हणून कार्यरत असलेल्या काहीजणांनी तशी भविष्यात उपयुक्त ठरणारी टीम प्रयत्नपुर्वक तयार केली वा जमवलेली असावी. लोकसभेच्या निवडणूकीचे वेध लागले, तेव्हा अनेक घटना नवलाच्या व चमत्कारीक वाटतील अशा घडत होत्या. अनेक पक्षाचे वा राजकारणापासून दूर असलेले नामवंत लोक मोदींच्या मोहिमेत सहभागी होऊ लागले होते. त्यामध्ये विचित्र वाटतील अशी काही नावे होती आणि त्यांच्या राजकारणात येण्याची कारणेही लक्षात येत नव्हती. कारण त्यापुर्वी त्यांनी कुठल्याही पद्धतीने राजकारणात वा सार्वजनिक जीवनात लुडबुड केलेली नव्हती. मग अकस्मात त्यांनी भाजपात सहभागी होण्याचे कारण तरी काय होते? त्यातले दोन सरकारी सेवेतून निवृत्त झालेले आणि एकजण मुदतपुर्व निवृत्ती घेऊन महिन्याभरात भाजपात दाखल झाला होता. योगायोग असा की त्या तिघांच्या नावात सिंह आहे. शिवाय तिघेही कुठल्या ना कुठल्या प्रकारे आज उपस्थित होणार्‍या प्रकरणांशी संबंधित आहेत.
आर. के. सिंग हे चिदंबरम गृहमंत्री असताना देशाचे गृहसचिव होते. अफ़जल गुरूला फ़ाशी देण्याच्या वेळेस तेच अधिकारावर होते आणि अनेक बाबतीत त्यांचे चिदंबरम यांच्याशी खटके उडत असायचे. निवृत्त झाल्यावर ते गप्प होते आणि लोकसभेचे वेध लागले, तेव्हा अकस्मात बातमी आली की सिंग यांनी भाजपात प्रवेश केला असून ते बिहारमधून लोकसभा लढवतील. त्याचवेळी लोकपाल विधेयकाचा मामला गाजत होता. माजी सैनिकांच्या एका मेळाव्यात निवृत्त लष्करप्रमुख व्ही. के. सिंग हरयाणा येथे मोदींच्या संपर्कात आले. मग ते अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी झाले व राळेगण येथे अण्णांनी उपोषण आरंभले, तेव्हा सिंग अण्णांच्या गावातच होते. मात्र लोकसभेचे वेध लागले आणि हे दुसरे सिंग भाजपात दाखल झाले. दुसरा योगायोग असा, की हे युपीएकालीन दुसरे वरीष्ठ अधिकारी आहेत, ज्यांचा आपल्या मंत्र्याशी व सरकारी धोरणांशी खटका उडत राहिला. अगदी कोर्टात जाण्यापर्यंत त्यांनी युपीएशी दोन हात केलेले होते. २०१४ उजाडले तेव्हा डॉ. सत्यपाल सिंग मुंबईचे पोलिस आयुक्त होते. हे तिसरे वरीष्ठ अधिकारी आहेत. त्यांनीही लोकसभा निवडणूक चार महिन्यांवर आलेली असताना आपल्या पदाचा तडकाफ़डकी राजिनामा दिला व दोनचार दिवसातच ते राजकारणात आले. त्यांनीही भाजपातच प्रवेश केला. योगायोग असा, की इशरत प्रकरणात नेमल्या गेलेल्या एस आय टी पथकाचे सत्यपाल सिंग प्रमुख होते आणि काही वादविवादामुळे त्यांनी त्यापासून फ़ारकत घेतलेली होती. अशा रितीने युपीएकडून दुखावलेले वा मतभेद असलेले तीन वरीष्ठ अधिकारी भाजपात अकस्मात दाखल झाले आणि तिघांचेही नाव सिंह होते. मग हे तीन सिंह ‘सत्यमेव जयते’ सिद्ध करण्यासाठी सव्वा दोन वर्षापुर्वी मोदींना येऊन मिळाले होते काय? असतील तर त्याचा आजच्या गौप्यस्फ़ोटाशी काही संबंध आहे काय?
सत्य हे कल्पनेपेक्षा चमत्कारीक असते. भारताचे मानचिन्ह असलेले तीन सिंह आणि ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य यांची अशी सांगड घातली जाऊ शकते काय? कारण सध्या ज्या भानगडी चव्हाट्यावर येत आहेत, त्यामागेही सत्याचाच विजय होतो, असे प्रत्येकाचे म्हणणे आहे आणि त्यामागे हे तीन सिंह असू शकतात काय? ज्या भानगडी चव्हाट्यावर आणल्या जात आहेत, त्यातली गुंतागुंत जोडणे व सोडवणे, यात याच तीन सिंह मंडळींचा अनुभव कामी येतो आहे काय? अशा अनुभवी वरीष्ठ अधिकार्‍यांना पक्षात घ्यायचे आणि त्यांच्या अनुभवाचा प्रशासनासाठी कुठलाही उपयोग करायचा नव्हता, तर त्यांना पक्षात आणले कशाला? नुसतेच किरकोळ भूमिका देऊन बाजूला ठेवले आहे कशाला? व्ही. के. सिंग राज्यमंत्री म्हणून सरकारमध्ये आहेत. पण सत्यपाल सिंग व आर. के. सिंग काय करीत असतात? दोन वर्षे निव्वळ खासदार म्हणून ते राजकारण करत होते, की काही कागदपत्रे व त्यात दडलेल्या भानगडींची सांगड घालण्याचे काम करीत होते? एखाददुसरे वादग्रस्त प्रकरण सोडले तर या तिघांचा कुठे फ़ारसा गाजावाजा झाला नाही. पण आता जी प्रकरणे पटकथा लिहील्यासारखी बाहेर येत आहेत, त्यांची सुसंगत मांडणी बघता, मोदी सरकारने हाती आलेली कागदपत्रे व तपशील त्यांच्याकडे सोपवला होता काय, अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण माध्यमातून जशी सुसंगत एखाद्या मालिकेसारखी प्रकरणांची मांडणी चालू आहे, ते पत्रकारांच्या आवाक्यातले काम वाटत नाही. दांडगा प्रशासकीय व तपासकामाचा अनुभव असल्याखेरीज असे पुरावे, तपशील व साक्षीपुरावे संगतवार मांडणे शक्य नसते. ‘सत्यमेव जयते’ उच्चारणे सोपे असले तरी ते सिद्ध करणे अवघड असते. तीन सिंग मागली दोन वर्षे त्याच कामात गुंतले होते आणि पटकथा पद्धतशीर पुर्ण झाल्यावर नवी ‘सत्यमेव जयते’ मालिका वृत्तवाहिन्यांवर सुरू झाली आहे काय?

(काही मित्रांची राष्ट्रीय मानचिन्हात वास्तविक चार सिंह असल्याचे नजरेस आणून दिले, त्यांचे आभार. लेखात ‘तीन सिंह बघतो’ असा उल्लेख आहे. ‘तीन सिंह असतात’ असा दावा मी केलेला नाही.)


12 comments:

 1. Bhau fourth lion is hidden in motto/emblem.what about it?

  ReplyDelete
 2. मुंबईचे पूर्व पोलीस कमिशनर श्री. सत्यपाल सिंह ............मुदतीपूर्वीच निवृत्त झाले आणि भा ज पा च्या तिकिटावर ' बागपत ' उत्तरप्रदेशमधून ' लोक सभेवर ' निवडून देखील आले. त्यांच्या लोकसभेवर निवडून येण्यामुळे महाराष्ट्राच्या एका राज्यस्तरीय पक्षाच्या प्रमुखांना ( जाणता राजा )' क्लेश ' झाले व त्यांनी असे विधान केले कि यापुढे कमिशनरच्या जागेवर एखाद्याची निवड करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या राजकीय निष्ठा तपासून पाहायला हव्यात. श्री सत्यपाल सिंह यांना महाराष्ट्रातील भरपूर अंतर्गत माहिती आहे जी भा ज पा साठी एक ' असेट ' आहे.

  ReplyDelete
 3. 4 सिंह आहेत. पण 3 च दिसतात.

  ReplyDelete
 4. मस्त भाऊ मोदी हुशार आहेत

  ReplyDelete
 5. भाऊ एकदम सही
  2010 ते 2012 या काळात युपीए मंत्री सहभागी असलेली भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे कॅग रिपोर्ट इतर कारणांमुळे बाहेर आली. ( तोपर्यंत सरकार व शासन आणि माध्यमांचे मालक व चालक यांची भागिदारी चालु होती ) मी अनेक माध्यमातील चर्चांचा रेकॉर्ड ठेवला आहे.
  हेच एडिटर इन चिफ व तथाकथित पुरोगामी (म्हणे विचारवंत ) त्यावेळी अशा भ्रष्टाचारी सरकारी मंत्र्याना कव्हर आॅपरेशन करत होती व भाजप च्या प्रवक्ता ला जाॅज॔ फंर्नाडिस यांच्या वेळच्या शवपेटी अथवा यडुरआप्पांच्या भ्रष्टाचारा विषयी प्रश्न विचारून जनतेची दिशाभूल फसवणूक करत होते. व जनता IPL सारेगमप लाफटर शो बघण्यात गक॔ होती/आहे.
  हेच एडिटर इन चीफ आत्ता पण सत्तेतील भाजपला दोन वर्षे उशिर का केला म्हणून परत कठड्यात पकडत आहेत.
  म्हणजे एखादा खुनाचा गुन्हेगार दोन पकडला गेला तर पकडणाऱ्या पोलीसांना/नागरिकाला गुन्हेगाराच्या पंगतीत नेऊन बसवणार/गुन्हेगार ठरवणार काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो.
  यामागे वाटते तेवढे सोपे षडयंत्र नाही तर फार विचार पुर्वक रचलेले दुरगामी दुर पल्याचे व दुरदुष्टी असलेले कारस्थान आहे. (JNU काढताना केवढा उदात्त हेतू सामान्य माणसाला वाटला होता त्याची विषारी फळे समजायला दोन पिढ्या लागल्या).
  त्यामुळे या सर्वांची पाळेमुळ्या सकट उकडायला दोन दशके मोदी सारख्या नेतृत्वाला लागतील.
  मिडिया देशातील नागरिकांच्या विचारशक्ती वरच केवळ प्रभाव नाहीतर विषेश करुन गेली 15-16 वर्षे आघात करत आहे.
  एखादी विदेशी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च केंद्र स्थानी पोहचण्या साठी यांचाच हात आहे (पिटर मुखर्जी प्रकरणात भाऊ आपण याचा उल्लेख केला आहे ).
  भारतासारख्या अध॔शिक्षित व गाफिल नागरिकंच्या देशात विदेशी व्यक्ती च्या हातात सत्ता दिल्याचे हेच परिणाम देशाला भोगायला लागणार.
  भाऊ तुमच्या सारखे निरपेक्ष परखड निपक्षपाती लेखक ( ज्या प्रमाणे शिवाजी महाराज यांच्या वेळी संत तुकाराम रामदास स्वामी सारखे प्रत्येक समाजातील संत कार्यरत होते तेव्हाच समाज जागृती निर्माण झाली व देशप्रेमी देशासाठी बलिदान करणारी पिढी निर्माण झाली ) एवढेच कशाला टिळक महात्मा गांधी नी पण देशाच्या स्वातंत्र लढ्या साठी जनतेला एकत्र करण्यासाठी गणेशोत्सव व भजन याचा पण वापर केला.
  हे तारतम्य भाजप सारख्या पक्षाने (काही प्रमाणात रामदेवबाबा ना बरोबर घेऊन निवडणूकी पुर्वी दाखवले त्याचे सातत्य नंतर दाखवता आले नाही आणि दाखवले तरी सेक्युलर त्यावर तुटुन पडतील कारण विधायक देशकार्या साठी जनतेला एकत्र आणण्याचा प्रयत्न माध्यमांनी व त्यांच्या सहाय्याने सरकाने हाणुन पाडला आहे. त्याच दरम्यान अनेक बाबा/माता यांच्यी प्रकरणे बाहेर पडली.
  अल्पसंख्यकाचे लंगुचालन माध्यमातून व पुरोगामी च्या सहाय्याने चालु होते.
  या सर्व घटनांचा क्रम खरच चक्रावून टाकणारा आहे.

  ReplyDelete
 6. ऑगस्ता की डील के लिए 50 करोड़ में बिक गये देश के 20 पत्रकार >>>>> या ५० विकाऊ पत्रकारानमध्ये खालील नावें खात्रीने असतीलच असतील : बरखा दत्त / प्रणव रॉय / निधी राजदान / राजदीप सरदेसाई / सागरिका घोष / करण थापर / निखिल वागळे / कुमार केतकर ..........पैसे कसले दिले तर गप्प बसण्याचे ...!!

  ReplyDelete
 7. चौथा सिंह दिसत नसतो.तो असतोच.तो आहे खराखुरा भारतभाग्यविधाता -नरेंद्र मोदी!!!!!

  ReplyDelete
 8. तो चौथा सिंह सिंग च्या ऐवजी स्वामी झाला का????

  ReplyDelete
 9. अत्यंत सूचक आणि बारीक विश्लेषण
  धन्यवाद भाऊ
  प्रणाम

  ReplyDelete
 10. The hidden �� Lion .. everybody knows.. Narendra Modi..

  ReplyDelete
 11. हरदीप सिंह पुरी : चौथा सिंह

  ReplyDelete
 12. भाऊ तुम्ही ग्रेट आहात, आज 2017 मध्ये हे तीनही सिंह सरकार मध्ये मंत्री झालेले आहेत, आणि ही शक्यता तुम्ही दीड वर्ष पूर्वीच वर्तवली होती
  Hats Off...!

  ReplyDelete