Wednesday, April 6, 2016

तंझील अहमद मुस्लिम नव्हता का?

गेल्या आठवड्यात एका विवाह समारंभासाठी आपल्या गावी आलेल्या तंझील अहमद याची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. देशातील सर्वोच्च मानल्या जाणार्‍या राष्ट्रीय तपास यंत्रणेतला एक महत्वाचा अधिकारी अशी तंझीलची ओळख होती. कालपरवा पठाणकोट हवाईतळावर हल्ला झाला, त्याच्याही तपासात हा अधिकारी पुढे होता आणि त्याच्याही आधी अनेक घातपाती हल्ले व तपासात त्याचा महत्वाचा हिस्सा होता. अर्थात त्याला आपल्या देशात फ़ारसे महत्व नसते. कोणीही पोलिस अधिकारी वा सैनिक हा मरण्यासाठीच जन्माला आलेला असतो, असा आपल्या देशातील पुरोगामी सिद्धांत आहे. पण पोलिसांकडून कोणी मारला गेल्यास, त्याच्यावर अन्याय झाला किंवा काय, त्यासाठी अनेकाचा जीव टांगणीला लागतो. तसा जीव कासावीस झाला तरच तुम्हाला सेक्युलर असल्याचे प्रमाणपत्र मिळते. पोलिसाच्या जीवाला तेवढी या देशात किंमत नाही. म्हणून असेल, तंझील संशयास्पद रितीने मारला गेला तरी त्यासाठी राष्ट्रीय माध्यमात फ़ारसा गदारोळ झाला नाही. त्याबद्दल विचार करायला नको. पण तंझील नुसताच भारतीय पोलिस अधिकारी नव्हता. तो नावाने व धर्माने मुस्लिम होता, त्याचे काय? कोणीही मुस्लिम कशाही कारणास्तव मारला गेला, तरी इथल्या सेक्युलरांचे जीव कासावीस होतात ना? मग तंझीलसाठी कोणा पुरोगाम्याचे डोळे कशाला ओले झालेले नाहीत? इशरतपासून याकुब अफ़जलपर्यंत गुन्हेगारांसाठी अश्रू ढाळणार्‍या कुणाही सेक्युलर शहाण्याला तंझीलच्या नावावरून तो मुस्लिम असल्याचे अजून कसे लक्षात आलेले नाही? आले असेलच तर त्यापैकी कोणी अजून टाहो कशाला फ़ोडलेला नाही? की तंझील धर्माने मुस्लिम असला तरी जिहादी घातपाताचा तपास करणार्‍यापैकी एक होता, म्हणून त्याच्याविषयी इतकी पुरोगामी अनास्था असावी?
काही महिन्यांपुर्वी दिल्लीनजिक दादरी येथे अखलाख महंमद नावाच्या व्यक्तीची हत्या झाली, तेव्हा त्याचा धर्म अनेकांना आठवला होता आणि मुस्लिमांचे जिणे या देशात कसे अशक्यप्राय झाले, त्याचा साक्षात्कार त्यांना झाला होता. त्यावरून किती कल्लोळ उडाला होता? पुरोगामी साहित्यिक आपापले पुरस्कारही परत देऊन असहिष्णूतेचा डंका पिटू लागले होते. तेव्हा त्याचाच मुलगा भारतीय हवाई दलाचा सैनिक असल्याचेही माध्यमांनी काळजीपुर्वक शोधून काढले होते. त्याच्या देशप्रेमावर शंका घेतली गेल्याबद्दल उर बडवले होते. त्यांना तंझील अहमदविषयी इतकी अनास्था कशाला? ज्यावेळी तंझीलची दोन अज्ञात इसमांनी हत्या केली, त्याच दरम्यान मुंबईत प्रत्युषा नावाच्या एका अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले. तिच्या प्रियकरानेच तिला आत्महत्येला प्रवृत्त केले आणि म्हणूनच ती आत्महत्या नसून हत्याच असल्याचे सिद्ध करायला तमाम माध्यमे व शहाणे आकाशपाताळ एक करीत आहेत. पण यातल्या कोणाला तंझीलची हत्या बघता आलेली नाही किंवा त्याच्या खुन्यांचा शोध घेण्यासाठी आवाज उठवण्याची गरज भासलेली नाही. किती चमत्कारीक विरोधाभास आहे ना? ज्या माणसाने आजवर कित्येक वर्षे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपला जीव धोक्यात घालण्यातच धन्यता मानली, त्याची इतकी सहजगत्या हत्या झाल्याची कोणालाच फ़िकीर नसावी का? याला पुरोगामीत्व म्हणतात. एका अभिनेत्रीसाठी सर्वांचा जीव तिळ तिळ तुटतोय. पण समाजासाठी जीव धोक्यात घालणारा हकनाक मारला गेला, त्याची कुणाला तमा नाही. अगदी आजवरचे मुस्लिमप्रेम निकामी झाले आहे. बाकी काही नाही तरी तंझील मुस्लिम आहे म्हणून तरी आक्रोश कराल की नाही? नसेल तर का नाही? तंझील मुस्लिम असला तरी इशरत वा अफ़जलसारखा जिहादी नव्हता, म्हणून इतकी अनास्था?
आपल्या कार्यकाळात तंझील अहमदने अनेक महत्वाच्या घातपाती प्रकरणांचा छडा लावण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे. इंडियन मुजाहिदीन वा जिहादी गटांची पाळेमुळे शोधण्यापासून त्यांचे छुपे गट उध्वस्त करण्यात तंझीलने मोठी हिंमत दाखवलेली आहे. म्हणून पुरोगाम्यांचा त्यांच्यावर राग आहे काय? की जिहादी नसेल तो मुस्लिमच नाही आणि म्हणूनच पुरोगामी नाही, अशी सेक्युलर समजूत आहे? पाच दिवस उलटून गेल्यावरही कुठल्या वाहिनीला तंझीलच्या हत्येविषयी व्यापक चर्चा करायची बुद्धी झालेली नाही. एक महत्वाचा अधिकारी इतक्या सहजपणे मारला जातो, पण कुठेही गाजावाजा होत नाही? सर्वसाधारणपणे मुस्लिमांविषयी पुरोगामी पक्षपाती असतात, असाही आरोप होतो. पण तो किती खोटा आहे त्याची ही साक्ष आहे. पुरोगाम्यांना मुस्लिमांविषयी आस्था नाही, की आपुलकी नाही. मुस्लिमांना न्याय मिळावा असाही त्यांचा प्रयत्न नसतो. त्यांना जिहादी मुस्लिमांविषयी आस्था आहे. म्हणून तर इशरतपासून अफ़जल, याकुब वा तशाच मुस्लिमांसाठी पुरोगाम्यांचा जीव कासावीस होतो. पण तंझीलची हत्या त्यांना नगण्य वाटते. म्हणून एकाही पुरोगाम्याने या पोलिस अधिकार्‍याच्या हत्येविषयी काहुर माजवले नाही किंवा त्याच्या खुन्यांना शोधण्याबद्दल आग्रह होताना दिसत नाही. पण त्याचवेळी प्रत्युषा नावाच्या अभिनेत्रीच्या आत्महत्येसाठी आटापिटा चालू आहे. प्रत्युषाने समाजासाठी अथवा देशासाठी असे कोणते कार्य केले आहे? आपल्या खाजगी जीवनातील वाद किंवा निराशेमुळे तिने काही केले. त्यासाठी किती गाजावाजा? सामान्य माणसाच्या जीवनात काडीचेही स्थान नसलेल्या व महत्व नसलेल्या गोष्टी माध्यमातून कशा लोकहिताच्या म्हणून गळी मारल्या जातात, त्याचा हा नमूना आहे. एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍याच्या कुटुंब व पत्नीविषयी कोणाला आस्था त्याच काळात दिसू नये?
ह्याला पत्रकारिता म्हणायचे की संवेदनशीलता? देशातला एकूण बुद्धीवाद किती रसातळाला गेला आहे, त्याचाच अनुभव आपण घेत आहोत. शेकड्यांनी शेतकरी दिवाळे वाजले, कर्जबाजारीपणा आला, म्हणून आत्महत्या करीत असतात. त्यापैकी कितीजणांच्या कुटुंब वा पत्नी-सहकार्‍यांची अशी आपुलकीने विचारपुस होते? शेतकर्‍यांच्या आत्महत्येलाही कोणीतरी जबाबदार असेलच ना? कोणीतरी त्याला आयुष्यात निराश केले वा कर्जभरण्याचा लकडा लावून आत्महत्येला प्रवृत्त केले असेलच. त्याबाबतीत शोध घेऊन गुन्हे दाखल व्हावेत, म्हणून माध्यमांनी काही प्रयत्न केले आहेत काय? प्रत्युषा नामक अभिनेत्रीची आत्महत्या हा देशातील हजारो शेतकर्‍यांच्या आत्महत्या दुय्यम ठरवणारा विषय बनवणारे कोणत्या लायकीचे मानायचे? आपल्या आलिशान जीवनात सर्व सुखसोयी असताना भावनेच्या खेळात निराश होऊन आत्महत्या केली, हा इतका मोठा विषय कसा होऊ शकतो? दुसरीकडे शेकड्यांनी शेतकरी वा कष्टकरी आहेत, ज्यांना जगणे अशक्य झाल्याने आत्महत्या करायची पाळी आलेली आहे. पण त्याची कारणमिमांसा करून खर्‍या गुन्हेगारांना शोधण्याचा विचारही ज्यांच्या मनाला शिवत नाही, ते आजकालचे बुद्धीमंत आहेत. त्यात कष्टकरी शेतकरी मेल्यास कोणाला फ़िकीर नसते. त्यात कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी मारला गेल्याचे दु:ख नसते. पण गुन्हेगार, घातपाती वा देखाव्याच्या आभासी जगातली कोणी अभिनेत्री मरणे म्हणजे अवघ्या जगावर संकट आल्यासारखा टाहो फ़ोडला जातो. आपल्या देशाची बुद्धी व समाजातील भावभावना किती बधीर अमानुष झाल्यात, त्याचेच हे नमूने नाहीत काय? जिथे जीवंत माणसांच्या जीवंत भावनांना काडीमात्र किंमत नाही आणि काल्पनिक भ्रामक तत्वांचे अवडंबर माजवले जाते. दुष्काळात लाखो करोडो लोक पिचलेले असताना, गोरेपणा किंवा केसांची निगा राखण्याच्या जाहिराती दाखवणार्‍या वाहिन्यांवरच्या बातम्या तरी वास्तविक जगातल्या किती असतात? एक आहे तुमचा आमचा वास्तविक सुखदु:खांचा भारत आणि दुसरी आहे भ्रामक जगातली आयडिया ऑफ़ इंडिया!

3 comments:

 1. भाऊ हे राँडीचे लायकीचे आहे

  ReplyDelete
 2. भाऊराव,

  जर कोणी भारतवादी मुस्लिम असेल तर त्याचे हाल कुत्रंही खाणार नाही. याची सोय प्रसारमाध्यमांनी करून ठेवली आहे.

  एक उदाहरण चटकन आठवलं. पाकिस्तानात नजरकैदेत खितपत पडलेले खान अब्दुल गफारखान यांच्या दु:स्थितीबद्दल एक शब्द तरी भारतीय प्रसारमाध्यमांत छापून आलेला आठवतोय का कुणाला? कुठे गेले सगळे मुस्लिमांचे कैवारी? जरा चांगली वागणूक मिळावी म्हणून भारतीय प्रसारमाध्यमांकडून वा शासनाकडून काहीच प्रयत्न का केले गेले नाहीत? राजीव गांधींनी खानसाहेबांना भारतरत्न दिलं. पण त्याच्या आईने वा आजोबाने खानसाहेबांसाठी इकडची काडी तरी तिकडे केली होती का?

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete