Sunday, May 15, 2016

नाही दिवा, नाही पणती

Displaying IMG_20160507_115342.jpg
Displaying IMG_20160507_115342.jpg
३ मे शनिवारी भल्या पहाटेच सिक्कीमला रवाना झालो. मात्र अपेक्षेप्रमाणे तिथे रिलायन्स नेटने साथ दिली नाही आणि लिहूनही काही ब्लॉगवर टाकता आले नाही. पण तो अनुभव लिहीण्यासारखा आहे. क्रमाक्रमाने त्यावर लिहीणारच आहे. पण जातानापेक्षा परतीचा प्रवास लाभदायक झाला. सिक्कीम हिमायलाच्या कुशीत असल्याने तिथपर्यंत विमानाने जाण्याची सोय नव्हती. बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यात बागडोगरा विमानतळापर्यंत हवाई प्रवास केल्यावर सव्वाशे किलोमिटर्स भूमार्गाने सिक्कीमला जावे लागले. येतानाही तसाच प्रवास होता. गंगटोकहून बागडोगराला येताना भेटलेला गाडीचा ड्रायव्हर गुरखा वंशाचा व बागडोगराचाच होता. तिथून जवळच नक्षलबाडी असल्याचे ऐकले होते आणि विषय निघाला, तर ड्रायव्हर सुनील गुरंग तिथपर्यंत फ़िरवून आणायला राजी झाला. बागडोगराहून नक्षलबाडी फ़क्त १२ किलोमिटर्स होती. मात्र तिथे बघण्यासारखे काहीच नाही, असे सुनीलचे म्हणणे होते. पण चारू मुझूमदार व कनु सन्याल यांची नावे ऐकली आणि त्यांचे पुतळे गावात असल्याची माहिती त्याने दिली. म्हटले तेच स्थान बघायचे आहे. बाजाराचा दिवस असल्याने वळसा घेऊन तिथे जाण्याचे त्याने मान्य केले. कारण परत येऊन विमान पकडायचे होते. पोहोचलो तेव्हा तिथे झिरझिर पाऊस पडत होता. बाकी गाव एका बाजूला पसरलेले होते आणि त्या स्मारक स्थानापासून नेपाळच्या सीमेकडे जाणारा रस्ता चिखलाने माखला होता. नजरेत भरावे अशी मोक्याची चौकाचीही जागा नव्हती. त्या स्मारकापाशी पोहोचलो आणि ते दुर्लक्षित स्थान बघून कमालीचे अस्वस्थ झालो. स्मारक म्हणावे असे तिथे काहीच नव्हते. दहाबारा फ़ुट रुंदीच्या तुकड्यावर सात पुतळे इवल्या चबुतर्‍यांवर दाटीवाटीने बसवले होते. पुरूषभर उंच चबुतर्‍यांवर दिडदोन फ़ुटाचे फ़क्त चेहरे दिसत होते आणि खाली गिचमिड अक्षरात त्यांची नावे लिहीलेली होती इतकेच! आमच्यासह पुतळेही उघड्या पावसात चिंब भिजलेले होते.
सर्वसाधारण असे स्मारकाचे पुतळे सुबक भव्य चबुतर्‍यावर उभे असतात. त्याच्या सभोवती हिरवळ वा कुंपण असते. खाली सुबक अक्षरात कोरलेला मजकुर असतो. पुतळा कोणी बनवला, कोणी उभारला, त्या व्यक्तींची महत्ताही नमूद केलेली असते. पण इथे तसे काहीही नव्हते. कुठल्याही खेड्यात उघड्यावर जुन्या देवळातल्या भग्न मुर्ती असाव्यात, तशा या सुबक मुर्ती तिथे होत्या. त्यात चेअरमन माओ, त्याचा सहकारी लिन पिआओ, स्टालीन व लेनिन यांच्यासह कॉम्रेड चारू मुझूमदार व त्यांचे सहकारी दत्त व मुखर्जी; असे सात पुतळे दाटीवाटीने इवल्या जागेत बसवले होते. डोक्यावर छत्री नाही, छत नाही किंवा आसपास कुठली सजावट नाही. आज देशात नक्षलवादी म्हटले की कोणालाही त्याचे हिंसक क्रांतिकारी संदर्भ आठवतात. सांगावे लागत नाहीत. पण ज्या नक्षलबाडीमध्ये साडेचार दशकापुर्वी ह्या हिंसक क्रांतीचा उदभव झाला, त्याच गावात आज त्याचा मागमूस दिसत नाही. ज्याने बागडोगराहून दार्जिलींगला पोहोचवले होते, तो ड्रायव्हर मुळचा नक्षलबाडीचा होता. पण त्याच्याही बोलण्यात कुठे त्या क्रांतीविषयी कसले कौतुक नव्हते, की आत्मियता नव्हती. ते कनु सन्यालचे गाव इतकीच माहिती त्याने दिली. मात्र त्या सात पुतळ्यात कनुचा समावेश नव्हता. ज्या शब्दाचा व नावाचा आज जगभर दबदबा आहे, ती नक्षलबाडी अशी त्याच विचारांपासून दुरावलेली बघून अस्वस्थ झालो. सध्या तिथून कॉग्रेसचा शंकर मालाकार नावाचा आमदार निवडून येतो आणि याहीवेळी तोच बाजी मारणार, असे सुनील म्हणाला. ह्या गावाने, तिथल्या संघर्षाने देशात एक राजकीय वादळ उभे केले, त्याचा कुठलाही मागमूस तिथे नसावा हे समजू शकते. पण ते दुर्लक्षित स्मारक मला खुप भावले. कारण ज्यांना आस्था असेल अशाच मुठभर लोकांनी पदरमोड करून त्याची उभारणी केली, हे स्पष्टपणे जाणवत होते, दिसत होते.
नेत्यांची, चळवळी वा आंदोलनाची अनेक स्मारके आपल्या देशात जागोजागी उभी आहेत. त्यांची भव्यदिव्यता नजरेत भरणारी असते. अशा स्मारकांसाठी समित्या स्थापन होतात. त्यात नामवंत प्रतिष्ठींतांचा समावेश होतो. कारण स्मारकांच्या भव्यतेसाठी अफ़ाट खर्च होत असतो आणि तितकी रक्कम जमवू शकणार्‍यांनाच त्यात आणावे लागते. लाखो रुपयांची वर्गणी गोळा करावी लागते. ती देऊ शकणार्‍यांना स्मरणिय व्यक्ती वा आंदोलन चळवळीविषयी काडीची आत्मियता आस्था नसली, तरी चालते. स्मारकाची भव्यता, देखणेपणा व प्रेक्षणियता मोलाची असते. ती उभारणार्‍यांच्या भावना दुय्यम मानल्या जातात. अशा मूलभूत गोष्टींचा त्या स्मारकात संपुर्ण अभाव होता. बघताक्षणी लक्षात आले, की हे स्मारक कोणा समितीने उभे केलेले नसावे किंवा स्मारकासाठी कुठली समितीही स्थापन झालेली नसावी. कदाचित वर्गणी जमवायला पावत्याही छापलेल्या नसाव्यात. ज्यांना आपल्या विचार वा गावाच्या इतिहासाची आत्मियता आहे, अशा लोकांनी किडुकमिडुक गोळा करून जी रक्कम जमवली, त्यातून हे स्मारक उभे राहिले असणार. खर्चाचा अंदाज घेऊन स्मारक उभे केलेले नसावे. तर जमले पैसे त्यातून स्मारक उभे करण्याचा अट्टाहास केलेला असावा. कदाचित ज्यांचे हे स्मारक आहे, त्यांनी ज्या विचारांनी व भावनेने आयुष्य जगले, त्याचे पावित्र्य जपण्याचा प्रयास असावा. खुणेचा दगड म्हणावा तितके साधे सोपे स्मारक उभारलेले आहे. कोणी तिथे टुरीस्ट पर्यटक स्थान म्हणून यावे, अशीही अपेक्षा नसावी. साधेपणा अंगावर येणारा होता. त्या झिरझिर पावसातही उतरून मी व माझ्या पत्नीने स्मारकाचे फ़ोटो काढले. त्याच्या समोर उभे राहून आमचे फ़ोटो काढून घेतले. ड्रायव्हर सुनील हा सगळा प्रकार कौतुकाने अचंबित होऊन बघत होता. समोरच्या पुतळ्यातला जीवंत इतिहास त्याच्या आकलनापलिकडला होता.
मी तिथे भावूक झालो, याचे कारण मी मार्क्सवादी किंवा डाव्या विचारांचा नाही. विचारांची गोष्ट भिन्न आहे. पण ज्या विचारांनी आपण प्रवृत्त झालो, प्रेरीत झालो, या विचारांच्या पावित्र्याचे जतन करण्याचा कसोशीचा प्रयास आदरणिय असतो. नतमस्तक व्हायला भाग पाडणारा असतो. चारू मुझूमदार, कनु सन्याल, कोंडापल्ली सीतारामय्या किंवा जंगल संथाल ही चार दशकापुर्वी डाव्या चळवळीतली धगधगणारी नावे होती. त्यांच्याच क्रांतीविषयक आंदोलनाने हिंसक स्वरूप धारण केले आणि त्यातून नक्षलबाडी पेटली. तिच्या ठिणग्या चौफ़ेर उडाल्या. आज त्या नावाने चालणार्‍या विविध हिंसक संघर्षातही त्या पुर्वजांचा लवलेश आढळत नाही. गांधींच्या नावाने जोगवा मागणारी कॉग्रेस गांधीवादी उरलेली नाही, तशीच नक्षलवाद म्हणून चाललेला प्रकारही त्या विचारआचाराशी प्रामाणिक राहू शकलेला नाही. आपल्याला भावलेल्या विचारसरणीसाठी जीव झोकून देणार्‍यांचे ते स्मारक होते आणि त्यांच्या त्याच निरीच्छ आचाराचे प्रतिबिंब त्या स्मारकात बघायला मिळाले. केजरीवाल कन्हैयापासून सीताराम येच्युरी, प्रकाश कारथपर्यंत कुणामध्ये त्याचा लवलेश आढळून येत नाही. अवहेलना, हाल व कष्ट सोसलेल्या त्या आरंभीच्या नक्षलवाद्यांचे ते स्मारक म्हणून भावु्क करणारे आहे. कवि बोरकरांची खुप जुनी कविता तिथे आठवली. त्या कवितेच्या ओळी कधी इतक्या समर्पक वाटल्या नव्हत्या. नक्षलबाडीच्या त्या नगण्य स्मारकाने त्याच ओळी जीवंत केल्या. ‘परी जयांच्या दफ़नभूमीवर, नाही दिवा नाही पणती; तेथे कर माझे जुळती.’ सात दिवसांच्या सिक्कीम दार्जिलींग सहलीत समाविष्ट नसलेला हा अनुभवच सर्वाधिक प्रभावी व सार्थक करणारा म्हणावा, इतका भारावून गेला. कदाचित माझ्या आयुष्यत मी इतके सुंदर स्मारक कुठले कुणाचे बघू शकलेलो नसेन. कदाचित इतके ओबडधोबड प्रामाणिक स्मारक कुणाला उभारायला जमले नसेल कुठे!

4 comments:

  1. gele 10 divas zale ekahi lekh nahi bhau tumcha, amhi panyachi baghat nahi evdhi tumchya lekha chi vaat baghato..thanks bhau

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    लेखातलं शेवटचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. स्मारक जरी प्रामाणिक असलं तरी त्यामागील विचार खरंच प्रामाणिक होता का? चारू मुजुमदार, कनु सन्याल यांचे पुतळे मी समजू शकतो. पण माओ, स्टालिन, लेनिन, इत्यादि पुतळ्यांचं इथे काम काय? हे तीन कमालीचे खोटारडे आणि रक्तपिपासू हुकुमशहा होते हे चारू व कनूस ठाऊक नव्हते काय? माहीत असल्यास या दोघांनी कधी खेद प्रदर्शित केला आहे का? त्यांना भारतबाह्य शक्ती आपल्याश्या वाटतात आणि या शक्ती वैचारिकदृष्ट्या बुडीतखाती गेलेल्या व कमालीच्या हिंसक आहेत.

    पूर्णपणे भारतीय परंपरेत राहून कम्युनिस्ट चळवळ चालवता का आली नाही? हा कम्युनिस्ट विचारांचं तोकडेपणा आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी डाव्या विचारवंतांनी कधी वैचारिक घुसळण (ब्रेनस्टॉर्मिंग) केल्याचं ऐकिवात नाही. नेमकी हीच भारतीय डाव्यांची शोकांतिका आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  3. प्रिय भाऊ , मला फार काही आश्चर्य वाटलं नाही हा विसर पडण्याचं . या चळवळीनं महाराष्ट्रात प्रवेश केला तेव्हा ती कव्हर ( आणि स्वागतही ) करणाऱ्या पहिल्या पिढीतला मी एक पत्रकार . पण नंतर ही चळवळ भरकटली . शोषण थांबवण्याऐवजी शोषण सुरु झालं . ज्यांचं शोषण थांबवायचं त्या आदिवासींशी हिंसक व्यवहार सुरु झाला / हत्या होऊ लागल्या . भरकटलेल्या चळवळीचं स्मरणही उदात्त न राहता उपेक्षेचं होतं . तसंच ही चळवळ आणि ती स्थापन करणाऱ्या नेत्यांचं झालं .

    ReplyDelete