Tuesday, August 30, 2016

चिन कशाला बिथरलाय?



आजकालची वर्तमानपत्रे वा वाहिन्यांवरील बातम्या बघितल्या तर असे वाटते, की पत्रकारांना मुत्सद्दी लोकांपेक्षा अधिक मुत्सद्देगिरी कळते. राजकारण्यांपेक्षा पत्रकारांना राजकारण उमजते. कायदा सुव्यवस्था वा सुरक्षेत पोलिस व हेरांपेक्षा पत्रकारच जाणकार आहेत. किंबहूना कुठल्याही बाबतीत अन्य कोणापेक्षाही पत्रकारच सर्व काही नेमके जाणतात. फ़क्त पत्रकार आपला पत्रकारीपेशा सोडून बाकी सगळ्या गोष्टीतले जाणते आहेत.’ हे मत सुशांत सरीन यांचे आहे. त्यांना जगात सुरक्षा विषयातले जाणकार म्हणून ओळखले जाते. त्यांना असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण अन्य काहीही असले, तरी सुशांत सरीन हे सामान्य माणूस आहेत आणि तेही वर्तमानपत्रे व वाहिन्यांचे वाचक प्रेक्षक आहेत. बाकीच्या कोट्यवधी वाचक प्रेक्षकांनाही आजकाल तसेच वाटू लागले आहे. कारण जगातला एक पत्रकारिता हा विषय सोडला तर प्रत्येक पत्रकाराला अन्य प्रत्येक विषयाचे खास ज्ञान असते आणि म्हणूनच तो कुणालाही कसलाही जाब विचारत असतो. कशासाठीही कोणालाही मुर्ख ठरवित असतो. कुणाचीही कुठल्याही कारणास्तव खिल्ली उडवत असतो. पण त्याच्याच पेशा व कर्तव्याबद्दल सवाल आला, मग पत्रकाराकडे उत्तर नसते. सुशांत सरीन यांनी उपरोक्त विधान अकस्मात केलेले नाही. परराष्ट्र संबंध व राष्ट्रीय सुरक्षा अशा विषयातले जाणकार म्हणून त्यांनी लालकिल्ला येथील मोदींच्या भाषणावर आलेल्या प्रतिक्रीयांनंतर असे मत व्यक्त केलेले आहे. कारण त्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतपधान मोदींनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. त्यावरून पाकिस्तानची प्रतिक्रीया येण्यापुर्वी मोदींना भारतातच टिकेला सामोरे जावे लागले होते. राजकीय विरोधकांप्रमाणे पत्रकारांनीही त्यावर टिकेची झोड उठवली होती.

काश्मिर पेटला असताना व त्याच आगीत पाकिस्तान तेल ओतत असताना, पंतप्रधानांनी बलुचिस्तानच्या विषयात नाक खुपसण्याचे कारण काय? काश्मिर हा भारताचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बलुचिस्तान कधीही भारताचा भाग नव्हता. त्याची भारताशी संलग्नताही नाही. मग नसत्या विषयात नाक खुपसण्य़ाचे कारण काय? त्यातून मग भारताच्या अंतर्गत विषयात नाक खुपसण्याच्या पाकिस्तानी वृत्तीला खतपाणीच घातले जाते. मोदींनी असे काही बोलल्यामुळे आता पाकिस्तानच्या काश्निरी उचापतींना प्रतिष्ठा मिळाली आहे. जे काही पाकिस्तान करतो, त्याला एकप्रकारे मान्यताच दिली गेली आहे. नसत्या विषयात पंतप्रधानांनी बोलघेवडेपणा करण्याचे काहीही कारण नव्हते. अशा अनेक बुद्धीमान प्रतिक्रीया तात्काळ इथेच मायभूमीत उमटल्या होत्या. त्यात नवल काहीच नाही. मोदी करतील ते चुक आणि मोदी बोलतील तेही चुक; अशीच ज्यांची मानसिकता झालेली आहे, त्यांना मोदींच्या बोलण्यातले योग्य अयोग्य कसे कळावे? कोण बोलला यानुसार प्रतिक्रीया येत असतात. त्यात मोदी बोलले असतील, तर ते काय बोलले यापेक्षा बोलले हीच चुक असते. मग काय बोलले वा त्याचे परिणाम काय आहेत, ही बाब गौण असते. सहाजिकच तशा प्रतिक्रीया येण्याला पर्याय नसतो. ही आता एक मानसिकता झालेली आहे. त्यामुळे मोदींनाही हल्ली अशा कोणाची फ़ारशी दखल घेण्याची गरज वाटेनाशी झाली आहे. काही प्रमाणात सामान्य जनताही अशा शहाण्यांना गंभीरपणे घेईनाशी झाली आहे. पण हळुहळू सुशांत सरीन यांच्यासारखे अभ्यासक जाणतेही त्याकडे काणाडोळा करू लागलेत, असा त्याचा अर्थ होतो. कारण मोदी त्या भाषणात बलुचीस्तान बाल्टीस्तान वा गिलगीट याविषयी कोणत्या हेतूने बोलले, ते मुत्सद्देगिरी अभ्यासणार्‍यांना नेमके कळत होते आणि आता त्याचे परिणामही दिसू लागले आहेत.

कुठल्याही देशाचा राष्ट्रप्रमुख वा पंतप्रधान आपले जाहिर व्यासपीठावरील भाषण करतो, तेव्हा मनातले बोलून दाखवत नसतो. त्यामागे अनेक संदर्भ असतात, अनेक हेतूही दडलेले असतात. अनेक प्रतिक्रीया प्रतिसाद अपेक्षित असतात. त्या भाषण मतप्रदर्शनातील वाक्ये व विधाने मोजून मापून केलेली असतात. त्यातले शब्द दुय्यम आणि त्यातून धरलेला नेम महत्वाचा असतो. ते शब्द वा त्याचे नित्य वापरातील अर्थ घेऊन काहीही हाती लागत नाही. कोणाच्या संदर्भात हे शब्द योजलेले असतात, त्यावर त्यांचा अर्थ वा परिणाम अवलंबून असतो. अन्यथा मोदी बोलले आणि अवघ्या १५ दिवसात जगभर व पाकिस्तानात बलुची-सिंधी असंतोषाच्या ठिणग्या उडू लागल्या नसत्या. त्या अकस्मात उडू लागलेल्या नाहीत. अशा विविध पाकिस्तानी असंतुष्ट समाज घटकांमध्ये अकस्मात समन्वय निर्माण झालेला नाही. जगभर परागंदा होऊन जीवन कंठणार्‍या पाक निर्वासितांची ही एकजुट अचानक झालेली नाही. ती संपुर्ण सज्जता झालेली होती, म्हणूनच मोदींनी आपल्या महत्वपुर्ण भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केला. तो नुसता उल्लेख हा अशा जगभर पसरलेल्या विविध संघटना व गटांना दिलेला संकेत होता. भारत तुमच्या पाठीशी आहे, पाकिस्तानचा रोष पत्करूनही भारत जागतिक व्यासपीठावर तुमची पाठराखण करायला सज्ज आहे, असा तो संकेत होता. म्हणून तो इशारा मिळताच जर्मनी, लंडन अमेरिका इत्यादी जागी पाक विरोधात निदर्शनांची मालिका सुरू झाली. त्याचा बोलविता धनी भारत असल्याचा आरोप होणार. पण त्याची गरज नाही. ह्या परागंदा लोकांना कोणी सहानुभूतीही दाखवत नव्हता, ती भारताने मोदींच्या शब्दातून दाखवली. त्याचेच पडसाद आता उठत आहेत. त्यासाठीच मोदींनी महत्वाचा मोका साधून ती सहानुभूती व्यक्त केली. त्याचा अर्थ उमजण्याइतकी अक्कल ज्यांच्यापाशी मुळातच नाही, त्यांना तो हेतू कसा उमजावा?

पाकिस्तानची चिडचिड समजू शकते. पण मोदींनी केवळ पाकिस्तानला डिवचण्यासाठी असे वक्तव्य लालकिल्ल्याच्या भाषणातून केलेले नव्हते. त्या मोजक्या शब्दात अनेक लपलेले छपलेले हेतू सामावलेले होते. म्हणूनच त्याला दोन आठवडे उलटत असताना, आता चिनने हातपाय आपटायला आरंभ केला आहे. भारतीय पंतप्रधानाने बलुची स्वातंत्र्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्याने चिनला दु:खी वा अस्वस्थ होण्याचे कारण काय? चिनच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने चालविलेल्या दक्षिण आशियाई अभ्यास संस्थेचे संचालक हू शिशांग, यांनी मोदींच्या भाषणावर संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. ही संस्थाच चिनी सरकारची आहे आणि तिथे चिनच्या परराष्ट्र संबंध व शेजारी देशांतले नाते, याचा अभ्यास चालतो. त्यातूनच चिनची या विषयातली धोरणे चर्चिली जात असतात. अशा संस्थेच्या संचालकाला बलुची स्वातंत्र्याविषयी इतके संवेदनाशील असण्याचे कारण काय? त्यावर भारताने मतप्रदर्शन केल्याने विचलीत होण्याचे कारण काय? भारताने बलुची विषयात ढवळाढवळ केली, तर त्यात चिनला हस्तक्षेप करायची वेळ येईल; अशी जळजळीत प्रतिक्रीया शिशांग यांनी कशाला दिलेली आहे? ज्या मोदी उक्तीची मायदेशी शहाण्यांनी पत्रकारांनी खिल्लीच उडवली, त्यावर हसण्याऐवजी हा चिनी जाणकार इतका कशाला चवताळला आहे? त्याच्या चवताळण्याची कारणमिमांसा करायला गेल्यास, भारतीय संपादक पत्रकारांच्या निर्बुद्ध मानसिकतेचे धिंडवडेच निघू शकतात. कारण त्या भाषणातील निरूपद्रवी वाटणार्‍या मोजक्या शब्दांतून मोदींनी एकाच वेळी पाक-चिन अशा दोघांच्या महत्वाकांक्षांवर दुखर्‍या जागी घाव घातला आहे. तसे नसते तर नवाज शरीफ़ यांनी परदेशी आपले दूत पाठवण्याचे पाऊल उचलले नसते आणि चिनी अधिकार्‍याने बलुची प्रकरणात हस्तक्षेप करण्याची धमकी भारताला दिलीच नसती. हे काय गौडबंगाल आहे? (अपुर्ण)

9 comments:

  1. छानच सुंदर भाऊ

    ReplyDelete
  2. भाऊ.........मस्त लेख........ नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण / माहितीपूर्ण आणि वाचनीय ...!! या विषयाचे इतके सुंदर विश्लेषण आता कोठे वाचायला मिळतच नाही. ....आता उत्कंठा आहे याच विषयावरील पुढील भागाची....!!

    ReplyDelete
  3. Replies
    1. Hello u will need to download Google marathi input for Windows. This will enable u to transliterate.

      Delete
  4. Excellent analysis on the issue. Sharif never expected such type of diplomacy from india.it is a tit for tat policy by modi, same time it is a warning that never underestimate india.

    ReplyDelete
  5. Excellent analysis of the issue.pakistan never expected such type of reply from india. Pan ata modishi hath ahe.

    ReplyDelete
  6. भाऊ तुमचा या विषयावरील लेख फार दिवसांपासून अपेक्षित होता तो आज वाचयला मिळाला, खूप छान विश्लेषण आहे, पुढील भागात बरेच गौप्यस्फोट होतील अशी अपेक्षा आहे.

    ReplyDelete
  7. Ya lekhat Kharya lok bhawana vyakt zalya aahet. Barech patrakar halli Modi nawachi kavil zalya pramane lihit ani baralat aahet. Loksatta tar purnpane chronic kavil madhe gelela aahe.

    ReplyDelete
  8. सुंदर! आम्ही सर्वजणं दुसर्या भागाच्या प्रतीक्षेत आहोत.

    ReplyDelete