
चार दशकांपुर्वीची गोष्ट आहे. तेव्हा अशीच इंदिरा लाट उसळली होती आणि त्यात देशभरचे अनेक राजकीय पक्ष वाहू्न गेलेले होते. शिवसेना तेव्हा नवखा मुंबई परिसरातला पक्ष होता. मध्य उत्तर मुंबईत ३० पैकी १९ नगरसेवक असूनही सेनेचे मनोहर जोशी लोकसभेत एक लाखाच्या फ़रकाने पराभूत झाले होते. पाठोपाठ वर्षभराने आलेल्या विधानसभा निवडणूकीत सेनेला तसाच दणका सहन करावा लागला होता. गिरगावातून एकटे प्रमोद नवलकर सोडता दुसरा सेना आमदार निवडून येऊ शकला नव्हता. अशा पार्श्वभूमीवर सेनेच्या सोबत कोणी मित्रपक्ष नव्हता. पण वर्षभरानंतर आलेल्या पालिका निवडणूकीत ४० नगरसेवक सेनेने निवडून आणले होते. यातले वैशिष्ट्य म्हणजे तुटपुंजे संख्याबळ असतानाही सेनेचे सुधीर जोशी हे सर्वात तरूण नेते मुंबईचे महापौर होऊ शकले होते. ती पालिका निवडणूक ‘वंदे मातरम’च्या वादाने गाजली होती. कॉग्रेसचे माहिमचे नगरसेवक अमिन खांडवानी यांनी पालिका सभेत वंदे मातरम राष्ट्रगीताचा अवमान केला, म्हणून काहूर माजले होते. तोच मुद्दा सेनेने पालिका निवडणूकीत मोठा केला. त्यासाठी खांडवानी यांच्या विरोधात एकमेव उमेदवार उभा करायची भूमिका घेतली. कोळी समाजाचे नेते भाई बंदरकर यांना शेकापचे असूनही सेनेने पाठींबा दिला होता. मात्र त्याचा उपयोग झाला नाही आणि खांडवानी पुन्हा निवडून आले. तेच नाही तर राष्ट्रगीताचा वाद मोठा झाल्याने त्याचा लाभ उठवित मुस्लिम लीगतर्फ़े उभे असलेले ११ नगरसेवक तेव्हा निवडून आलेले होते. पण निकाल लागल्यानंतरच्या राजकारणात सेनाप्रमुख बाळासाहेबांनी मोठी धुर्त चाल खेळली होती. वाद गुंडाळून त्यांनी त्याच मुस्लिम लीगचा पाठींबा महापौर पदासाठी घेतला. मग त्याला संधीसाधूपणा म्हटले गेले होते. तेव्हा साहेबांनी तत्वाला मुरड घातली होती, की तत्वांना तिलांजली दिली होती?
आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४२ जागा महायुतीने जिंकल्यावर पुढल्या विधानसभा निवडणूकीची तयारी सुरू झाली आहे आणि त्यात युतीमधल्या वादाचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळे अनेक शिवसैनिक विचलीत झालेत. अधिक जागा व लोकसभेत स्वत:चे बहूमत मिळाल्यावर भाजपाने मतलबी खेळी सुरू केल्या, असेही आरोप सुरू आहेत. निष्ठा व मैत्रीच्या आणाभाकाही सुरू आहेत. फ़ार कशाला स्वबळावर सेनेने विधानसभा लढवावी, अशी भाषा ऐकायला मिळते आहे. तर दुसरीकडून भाजपाही एकट्याच्या बळावर राज्याची सत्ता मिळवू शकतो, अशीही कुजबुज कानावर पडते आहे. अशा गोष्टी पारावरच्या गप्पा माराव्यात, इतक्या सोप्या व साध्या असतात काय? राजकारण हे आपापल्या तत्वाच्या आधारे केलेली वाटचाल असते. पण विचारधारा व तत्वज्ञान यांना यशस्वी करण्यासाठी व्यवहाराची जोड असावी लागते. चार दशकांपूर्वी साहेबांनी मुस्लिम लीगचा पाठींबा घेताना तत्वांना मुरड घातली. कारण प्रासंगिक विषयापेक्षा इंदिरा लाटेवर स्वार झालेल्या कॉग्रेसचे आव्हान मोठे होते. त्याला पायबंद घालण्यासाठी राजकारणात टिकून रहाण्याला महत्व होते. लाट असूनही कॉग्रेसला स्थानिक पालिकेत सत्ता मिळवता आली नाही, हे दाखवण्याला प्राधान्य होते. म्हणूनच मुस्लिम लीगशीही सोबत करण्यापर्यंत साहेब गेले होते. कारण त्याप्रसंगी तत्वापेक्षा व्यवहार सभाळणे अगत्याचे असते. ज्या समाजवाद्यांना कधीही त्याचे भान राहिले नाही, त्यांचे राजकारण म्हणूनच कायम फ़सत गेले व ती विचारधारा अस्तंगत होत गेली. उलट सेनेला विचारसरणीच नाही, अशी टिका व्हायची; ती शिवसेना अजूनही टिकून आहे. त्याला साहेबांची व्यवहारी चतुराई कारणीभूत आहे. आपलाच हा जुना इतिहास विसरून आजची सेना वा तिचे नेतृत्व अलिकडे वागताना दिसते आणि त्याचेच दुष्परिणाम तिच्या वाट्याला येत असतात.
साहेबांच्या निर्वाणानंतर ज्यांच्या हाती सेनेची सुत्रे आली, त्यांनी ज्यांना आपले निकटवर्तिय म्हणून जवळ केलेले आहे, त्यांच्याकडून राजकीय भूमिका मांडली जाते, तिच्या परिणामांचा दुरगामी विचार कितीसा होतो, याचीच शंका येते. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार करण्याचा विषय हा भाजपाचा अंतर्गत होता. त्याचे गुर्हाळ चालू असताना त्यात सेनेच्या दुय्यम नेत्यांनी लुडबुड करण्याचे कारण नव्हते. पण सुषमा स्वराजच एनडीएच्या पतप्रधान व्हाव्यात; असली भाषा सेनेकडून कशाला वापरली गेली? मुद्दाम मोदींना खिजवण्याचे काही कारण होते काय? असेल तर सेनेचा त्यापासून कोणता लाभ व्हायचा होता? नसेल तर अशा तोंडपाटिलकी करणार्यांना उद्धव ठाकरे यांनी वेळीच लगाम कशाला लावला नाही? फ़ायद्याची गोष्ट बाजूला ठेवा, निदान सेनेचा तोटा होऊ नये, एवढी तरी बुद्धी सेनेच्या दुय्यम नेत्यांकडून वापरली जायला नको काय? बाळासाहेबांची गोष्टच वेगळी होती. त्यांच्या स्वयंभू व्यक्तीमत्वासमोर अनेक पक्षाचे नेते शरणागत व्हायचे. त्याचा लाभ सेनेला मिळत होता. आजच्या सेनेला ती सवलत उपलब्ध नाही. साहेबांच्या हयातीत लिहीले गेलेले ‘सामना’चे लेख आणि आजचे; यावर उमटणार्या प्रतिक्रिया भिन्न असतात. याचे भान सुटल्याने सेनेला अधिकाधिक अडचणी येत असतात. साहेबांनी आपले राजकारण लवचिक ठेवले आणि अस्तित्वाला प्राधान्य दिले होते. तत्वाचे वा निष्ठांचे अवडंबर माजवण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. म्हणूनच साडेचार दशकाहून अधिक काळ त्यांनी राज्यातीलच नव्हेतर राष्ट्रीय राजकारणावर छाप पाडून दाखवली. तोच लवचिकपणाला आज सेना गमावून बसलेली दिसते आहे. इतिहासात डोकावले, तरी आजच्या सेना नेतृत्वाला बाळासाहेबांचे मार्गदर्शन मिळू शकेल. चाचपडत राजकारण करायची वेळ येणार नाही.