Monday, November 23, 2015

तुकाराम ओंबळे यांना अनावृत्त पत्र

   

प्रिय तुकारामजी ओंबळे,

मला ठाऊक आहे की हे पत्र वाचायला तुम्ही आज हयात नाही. खरेच ती किती चांगली गोष्ट आहे ना? कारण जखमी होऊन हयात राहिला असता, तर पश्चात्तापाने तुम्ही त्या विकलांग अवस्थेत आत्महत्याही करू शकला नसता. त्यापेक्षा अजमल कसाबला ‘आलिंगन देवून तुम्ही या जगाचा निरोप घेतलात, तेच खुप चांगले झाले. किंबहूना तेव्हा देश किती संहिष्णू व सुरक्षित होता, त्याचीच तुम्ही आपल्या ‘आलिंगन’ कृतीतून साक्ष दिलीत. ज्या गिरगाव चौपाटीवर तुम्ही कसाबला असे आलिंगन दिलेत, तिथेच आजची तरूण पिढी कुणा मुस्लिमाला विश्वास असल्याचे सांगायला आलिंगन द्यायला पुढे जाताना बघितल्यावर तुमच्या कृतीचा जो अर्थ घेतला गेला हे तुम्हाला कितपत मानवले असते? देश सुरक्षित होता म्हणून त्याने संहिष्णूतेचा आदर्श निर्माण केला ना तेव्हा? कसाबच्या टोळीचे दहा शांतता सैनिक सागरी मार्गाने मुंबईत आले आणि त्यांनी कशी स्मशान शांतता प्रस्थापित केली होती ना? त्या ओबेराय टॉवर्स, ताजमहाल या पंचतारांकित हॉटेलपासून बोरीबंदरच्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकातही किती शांतता पसरली होती ना? शाहरुख, आमिर वा मणिशंकर अय्यर व सुधींद्र कुलकर्णी किती सुखावले होते? देशातले तमाम पुरोगामी विचारवंतही शांत बसले होते. तुम्ही त्या कसाबला ‘आलिंगन’ दिलेत आणि त्या शांतता सोहळ्याची समाप्ती झाल्यावर बुद्धीमंतांनी ‘मुंबई स्पिरीट’ म्हणून त्या संहिष्णू सोहळ्याचा दांडगा समारोह गेटवेपाशी साजरा केला होता. तेव्हाही इथल्या तरूण पिढीने तिथे मेणबत्त्या पेटवायला झुंबड उडवली होती. आमच्यासारखे मुठभर लोक मात्र तुम्ही आणि करकरे, साळसकर, कामथे इत्यादी लोक शहीद झाल्याचा अंधश्रद्ध टाहो फ़ोडून आक्रोश करीत राहिले. पण इतक्या मोठ्या देशात काही लोक तरी मुर्ख अंधश्रद्ध असणार ना? बरे झाले हे सर्व बघायला तुम्ही हयात नव्हता.

आता तो अमिर खान काय म्हणाला ऐकलेत? त्याच्या पत्नीला देश असुरक्षित वाटतोय. स्वाभाविकच आहे. मागल्या दिड वर्षात देशात कुठेही मोठी घातपाताची घटना घडलेली नाही, देशातले जिहादी हिंसाचाराचे प्रकार अकस्मात थंड पडलेत. माणसे हकनाक मारण्याच्या तमाम उदात्त शांततामय मोहिमा संपुष्टात आल्यात. मग देशाच्या सुरक्षेची चिंता खर्‍या संवेदनाशील माणसांना भेडसावणारच ना? त्यांनी नाही तर कोणी टाहो फ़ोडायचा अशा काळात? ओंबळेजी, तुम्ही गेल्यापासून मागल्या सात वर्षात देशातली भाषा व शब्दकोषच काहीच्या काही बदलून गेलेत. तुम्ही ज्या अर्थाने सुरक्षा, संहिष्णूता वा शांततेचा अर्थ लावत होता, त्याच्या उलट अर्थाने आजकाल सगळे शब्द वापरले जातात. कोणीही उठून देशाच्या पंतप्रधानाची खिल्ली उडवू शकतो, इतकी इथे अविष्कार स्वातंत्र्याची सध्या गळचेपी झालेली आहे. कुणालाही देशात आंदोलन करण्याची मुभा असल्याने लोकशाही धोक्यात आलेली आहे. खुल्या वातावरणात मुक्त मतदान व निवडणुका होत असल्याने, देशात एकप्रकारे भयंकर हुकूमशाही प्रस्थापित झाली आहे. माणसे किती हिंसक झालीत ठाऊक आहे? कालपरवा तुमच्यासारखेच कर्नल संतोष महाडिक काश्मिरात जिहादींकडून मारले गेले. त्यांची पत्नी आपल्याला पतीच्या जागी सैन्यात भरती करावे, अशी इच्चा व्यक्त करते. किती हा हिंसेचा हव्यास ना? नाहीतर आमच्या आमिर खानची पत्नी किरणकडे बघा. ती इतक्या सुरक्षित भारतात वास्तव्य करायलाच घाबरून गेली आहे. तिच्यासह आमिरला भारतातली सुरक्षा भयभीत करू लागली आहे. देश सोडून कुठे इराक सिरीया वा हिंसाग्रस्त युरोपात जायचे डोहाळे त्यांना लागले आहेत. सर्वच शब्द आणि त्यांचे अर्थ कुठल्या कुठे बदलून गेलेत. आजची भाषा तुम्हाला कळली नसती ना? किती बदलून गेला ना आपला देश ओंबळेजी?

एका बाजूला तुमच्या बलिदान स्थळी कसाबचा धर्मबंधू फ़लक घेऊन आपल्यावर विश्वास ठेवायचे आवाहन करतोय आणि दुसरीकडे त्याचाच धर्मबंधू आमिरखान देशावर विश्वास राहिला नाही म्हणून ग्वाही देतोय. विश्वास, सुरक्षा, संहिष्णूता, प्रतिष्ठा, न्याय कशाला म्हणून नेमका अर्थ उरलेला नाही. दोन दिवसांनी तुमचे व सहकार्‍यांचे पुण्यस्मरण करायचा दिवस आहे. किती तरूण मुंबईकर तिकडे फ़िरकतील याची मला शंका आहे. पण त्याचवेळी आमिरखान, शाहरुखखान यासारखे महानुभाव रस्त्यात विश्वास दाखवा म्हणून ‘आलिंगन’ मागायला उभे राहिले; तर कोट्यवधी तरूण तरूणी तिथे धावतील. त्यातल्या कुणाला सुद्धा तुमची आठवण उरलेली नाही. देशप्रेम आता शहीद शिकवत नाहीत, त्याचा वास्तवाशी संबंध नाही. तुमच्यासह कित्येकांची कुटुंबे उध्वस्त होऊन गेली. कशासाठी? तर देश व भारतीयांना सुरक्षित राखण्यासाठी, अशी माझ्यासारख्या काही बेअक्कल लोकांची समजूत आहे. कालपरवा कर्नल महाडिक त्यासाठीच हरपले असे मला वाटते. पण तो निव्वळ मुर्खपणा असतो, आजच्या व्याख्येनुसार! तुमच्या अनाथ झालेल्या कन्येला पित्याप्रमाणे पोलिसात जावेसे वाटले, पण परदेशी पळून जायची कल्पनाही तिच्या मनाला शिवली नाही. घर उध्वस्त झाले याचे भान विसरून कर्नल महाडीक यांची पत्नी सैन्यात भरती व्हायला बघते. याला असंहिष्णुता म्हणतात आजकाल. संहिष्णूता व सुरक्षा आपल्याला किरण खान शिकवतात. त्यासाठी रामनाथ गोयंका फ़ौंडेशन व्यासपीठ उपलब्ध करून देते. तुम्हा शहीदांच्या कुटुंबिय पत्नीच्या भावना मांडायला कुठले व्यासपीठ उरलेले नाही. कारण हे तुमचे कुटुंबिय असंहिष्णू वा हिंसक काहीतरी बोलण्याचीच शक्यता भयभीत करते आजच्या बुद्धीवादाला. म्हणून म्हटले तुम्ही हयात नाही, हे खुप चांगले झाले. अन्यथा मरणाच्या यातनांपेक्षा अधिक वेदना सहन कराव्या लागल्या असत्या तुम्हाला!

आजकाल आम्ही भारतात रहातच नाही. आम्ही जगतो, ‘आयडिया ऑफ़ इंडिया’ नावाच्या भासमात्र जगात! त्याचा वास्तवातल्या कुठल्याही घटना घडामोडींशी संबंधच उरलेला नाही. आमचे जग टिव्हीच्या पडद्यावर असते आणि चित्रपटाच्या कथानकातून वा काल्पनिक कथा कादंबर्‍यातून आम्ही जगतो. आमच्या त्या कल्पनिक जगात खर्‍या धोक्याच्या जाणिवा नसतात. मात्र काल्पनिक भ्रामक भितीने आम्ही पछाडलेले असतो. जिथे म्हणून हिंसेने थैमान घातले आहे, त्यात शांतता सुरक्षा दिसू लागते आणि शांत सुरक्षित जीवनाला आम्ही घाबरून जातो. तसे नसते तर कसाबच्या हल्ल्यानंतर शाहरुख आमिर व पर्यायाने त्यांच्या चहात्यांना भिती वाटली असती आणि त्यांनी तेव्हाच देश सोडायचा विचार बोलून दाखवला नसता का? ज्या देशाने व समाजाने प्रतिष्ठा पैसा व यश देवून डोक्यावर घेतले, त्याची आमिरला कशाला भिती वाटली असती? ज्या इस्लाममध्ये चित्रपट नाचगाण्याला अक्षम्य गुन्हा मानले आहे. त्याच विचारसरणीचे भय आमिरला वाटत नाही आणि त्याचा धंदा करून प्रतिष्ठीत झालेला हा माणूस आज आपल्याच चहात्यांच्या प्रेमाने भयभीत होऊन गेलाय, याचा अर्थ कसा लावायचा? ओंबळेजी तुम्ही गेल्यानंतर देश खुप बदललाय हो! आता शब्दांचे अर्थ जसेच्या तसे वाचणार्‍या, ऐकणार्‍यापर्यंत पोहोचतील याचीही शाश्वती उरलेली नाही आपल्या देशात. अर्थाचा अनर्थ करण्याचा उद्योग इतका तेजीत आलेला आहे, की शब्दांनाही आपल्यात सहभागी असलेल्या अक्षरांचा विश्वास वाटेनासा झाला आहे. याकुब मेमनला शहीद ठरवून अंत्ययात्रेला लोटलेल्या हजारो लोकांच्या गर्दीने इथे कोणी विचलीत होत नाही, पण नथूरामच्या स्मृतीदिनी शे-सव्वाशे लोक जमले तर इथल्या बुद्धीवाद्यांना दरदरून घाम फ़ुटतो. कदाचित काही वर्षांनी तुमच्याही स्मृतीदिनी मुठभर लोक जमले तर देश धोक्यात आल्याचा ओरडा सुरू होऊ शकेल. म्हणून म्हटले तुम्ही हयात नाही, हे बरे झाले. सुटलात ओंबळे, तुम्ही आणि तुमचे अन्य सहकारी या देशाच्या, समाजाच्या पाशातून!
-----------------------------------
तुम्ही २६/११ रोजी काय करणार?

मागल्या सहा वर्षापासून मी व्यक्तीगतरित्या एक व्रत पाळतो. २००८च्या मुंबई हल्ल्यानंतर विचलीत झाल्यावर काय करावे अशा विचारांनी मी अस्वस्थ होतो. दु:खात सहभागी होण्याची भंपक कल्पना मला मानवत नाही. कारण त्यातल्या वेदना यातनांची भागिदारी शक्य नसते. पण ज्याच्याविषयी सहवेदना आहे, त्याच्या वेदनांची थोडी अनुभूती घ्यावी असे डोक्यात आले. ओंबळे वा २६/११ च्या घटनेत जे शहीद झाले, त्यांना मनाविरुद्ध या जगाचा निरोप घ्यावा लागला. जगण्याची इच्छा आकांक्षा हा जबरदस्त मोह असतो आणि त्याच्यावर पाणी सोडण्याची वेदना तितकीच असह्य असते. थोडक्यात आपल्याला मानवणार नाही वा असह्य होईल असे काही करून त्या शहीदांना आपल्या परीने श्रद्धांजली देण्यासाठी काय करता येईल असा विचार सुरू झाला. व्यक्तीगत पातळीवर शक्य असलेले एक व्रत मी सुरू केले. गेल्या सहा वर्षात २६ नोव्हेंबर या दिवशी मी अनवाणी असतो. घरात असो किंवा बाहेर असो, कुठेही पायात चप्पल वा पादत्राणे घालत नाही. रस्त्यावरची घाण चिखल वा काच पत्रा लागून जखम होण्याची चिंता मन पोखरते. बाहेर पडलो की लोक विचित्रपणे बघतात. कोणी विचारलेच तर मी कारण सांगतो. आपणहून काही सांगत नाही. पण माझा अनुभव चांगला आहे. श्रद्धांजली म्हणून योजलेला हा मार्ग अनेकांना भावतो. काहीजण त्याचे अनुकरणही करतात. आमिर खानला दोष देणे सोपे आहे. आपण काय करणार याचे उत्तर कधीतरी शोधायला हवे. माझे उत्तर मी शोधले आहे. व्रत म्हणून पाळतो आहे. ज्यांना यात तथ्य वाटेल, त्यांनीही आपल्या परीने असे काही करावे, ज्याची जाहिरात व्हायची गरज नाही. पण त्यातून आपल्यासाठी हौतात्म्य पत्करतात, त्याची जाणिव कायम उरात रहावी असे काहीही करावे. मात्र मनात महाडीक, ओंबळे वा देशासाठी शहीद होणार्‍यांविषयी आत्मियता असेल, तरच असे काही करावे. आपण काही उदात्त वा सक्तीने करतोय अशी भावना असेल, तर अजिबात असे काही करू नये. कारण हा अनुभूतीचा व सहवेदनेचा विषय आहे. देश समाज आणि आपले व्यक्तीगत जीवन यांच्यात तसूभर फ़रक ज्यांना वाटला नाही, त्यांच्या त्या भावनेशी श्रद्धेशी एकरूप होण्याचा हा किंचित प्रयत्न अशी माझी धारणा आहे. ती भावना मला सुरक्षेची हमी देते म्हणून!   - भाऊ तोरसेकर

(आवडले भावले तर शेअर करा)

4 comments:

 1. नमस्कार , तुमचे ब्लॉग मी नेहमीच वाचतो. पण हा ब्लॉग कुठेतरी २६/११ ची खपली काढून गेला. तुम्ही करत असलेले व्रत खूप वेगळे आणि अनुकरणीय आहे. मी सुद्धा ते व्रत आचरणात आणणार आहे.
  धन्यवाद
  सुहास बसिडोनी

  ReplyDelete
 2. भाऊ, तुमचे विचार सध्या फक्त काही लाख मराठी वाचकांपर्यंत पोहोचतायत, तुमचे विचार कोट्यावधी भारतीयांपर्यंत पोहचले पाहिजेत. नाहीतर राजदीप सरदेसाई आणी बरखा दत्त सारखे विषारी पत्रकार आणी आमिर खान, गिरीश कर्नाड सारखी हजारो अतिशाहणी मंडळी देशात यादवी युद्ध माजवतील. तुमचे national level च्या काही चांगल्या पत्रकारांबरोबर सबंध असतील तर त्यांची मदत घेत येइलच पण माझ्यासारखे चाहते आपापल्या पद्धतीने मदत करायचा प्रयत्न करतीलच.

  आता उशीर नको, तुमचे विचार कोट्यावधी भारतीयांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करुया.

  ReplyDelete
 3. Bhau batobar ahi aapan pan ya tolkyat sahabhagi houya jay khurshid aayar

  ReplyDelete
 4. मनोज मंडलिकNovember 24, 2015 at 4:37 PM

  डोळ्यात पाणी अाले अाणि डोक्यात सनक देखील अाली का अाम्ही ह्या लोकांना (आ. खान, शा. खान) माेठे केले ह्याचा त्रास होताेय शेवटी ती......

  ReplyDelete