Saturday, November 21, 2015

धार्मिक यादवीच्या वाटेवर युरोप



दोन महिन्यांपुर्वी ‘तरूण भारत’मध्ये ‘उलटतपासणी’ हा रविवारचा स्तंभ लिहायला मी सुरूवात केली, तेव्हा माझा पहिलाच लेख आठवतो कुणाला? ‘भाकड पुराणकथा आणि सत्यकथा’ असे त्याचे शिर्षक होते आणि १३ सप्टेंबरला तो प्रसिद्ध झाला होता. नेमक्या दोन महिन्यांनी त्यात वर्तवलेल्या भितीची १३ नोव्हेंबर रोजी प्रचिती आली. पश्चिम आशियातील मुस्लिम अरब निर्वासितांचे लोंढे युरोपकडे धावत होते आणि त्यांना जवळ करायला नजिकच्या अरबी श्रीमंत देशातले सत्ताधीश राजी नव्हते. अशा निर्वासितांपैकी एक कुटुंब बुडाले आणि त्यातल्या कोवळया बालकाचा वाहुन किनारी लागलेला मृतदेह बघून जग हळहळले होते. अशावेळी त्याच हृदयद्रावक घटनेची दुसरी भयंकर बाजू लिहायचे व बोलायचे धाडस कोणी करत नव्हता. तेव्हाच मी हे भाकित केले होते. नेमके शब्द सांगायचे तर मी म्हटले होते, ‘इतक्या सहजतेने घुसता येते असे दिसेल, तेव्हा निर्वासित म्हणून अरबी प्रदेशातून युरोपात त्सुनामीसारख्या लाटा येतच रहाणार आहेत आणि मग बंदुकीच्या गोळ्याही त्या लोंढ्याला रोखू शकणार नाहीत. कारण मग बंदुकधारी युरोपियन पोलिस व लष्कराला आतले घरभेदी आणि बाहेरचे घुसखोर अशा दोन्ही बाजूने लढावे लागणार आहे.’ १३ नोव्हेंबर शुक्रवारी त्याची प्रचिती पॅरीसकरांना आली. कारण ज्या घातपाती घटनांनी दिडशे लोकांचा बळी घेतला, त्यात नुकतेच युरोपात दाखल झालेल्यापैकी काही निर्वासित होते आणि त्यांनी निर्घृणपणे सामान्य निरपराध फ़्रेंच नागरिकांचा बळी घेतला. दोन महिन्यात जग किती बदलले? तेव्हा या निर्वासितांना आश्रय द्यायला पुढे धावलेले तेच युरोपिय देश, आता सुडाची भाषा बोलत आहेत आणि तेव्हा त्या कोवळ्या बालकाच्या मृतदेहासारखी वेशभूषा करून किनार्‍यावर लोळलेले भंपक नाटकी संवेदनाशील लोक, युरोपियन शहरात नव्याने मेणबत्त्या पेटवण्याचे जुनेच नाटक रंगवत आहेत.

वास्तव नाकारून भलताच आभास निर्माण जरूर करता येतो. पण म्हणून वास्तव संपवता येत नाही, तर ते चेंगटपणे तुमचा पाठलाग करीत रहाते. कधीतरी येऊन तुमचा गळा पकडत असते. आधीच काहीजणांना दुसर्‍या महायुद्धानंतर आफ़्रिकन व अरबी देशातून निर्वासित वा स्थलांतरीत म्हणून पाश्चात्य देशांनी आपल्याकडे सामावून घेण्याचा उद्योग केला. त्यामागे अर्थातच अपराधगंड होता. दिर्घकाळ त्या देशांवर साम्राज्य गाजवले आणि त्यांची आर्थिक लूट केल्याच्या भावनेतून ही उपरती पाश्चात्य देशांना झालेली होती, अधिक उदारमतवाद व पुरोगामी भूमिकेतून बहुसंस्कृती समाज निर्माण करण्याचे थोतांड युरोपात सुरू झाले. त्यातून ह्या स्थलांतरीतांना युरोपात आणायचा अव्यापारेषू व्यापार सुरू झाला होता. लौकरच त्याचे दुष्परिणामही दिसू लागले होते. पण ते वास्तव स्विकारले तर पुरोगामीत्वाचे पितळ उघडे पडले असते. म्हणून त्याच्यावर युक्तीवादाचे पांघरूण घालून सत्य दडपण्यात धन्यता मानली गेली. उलट छान चालले आहे, असे भासवण्यासाठी अधिकाधिक स्थलांतरीत मुस्लिमांना युरोपिय देशात आणले गेले. त्यातच पुन्हा मानवाधिकाराचे अवडंबर माजवण्यात आले आणि दुसरीकडे युरोपियन महासंघ म्हणून भौगोलिक सीमा पुसट केल्या गेल्या. प्रत्येक देशात निवडून आलेल्या सरकारला महासंघ म्हणून नेतृत्व करणारे ओलिस ठेवू लागले. आताही निर्वासितांचा लोंढा आल्यावर प्रत्येक देशाने सक्तीने अमुक इतके निर्वासित घेतलेच पाहिजेत, अशी सक्ती झाली आणि खोट्या पुरोगामीत्वाचे पितळ उघडे पडू लागले. मागल्या पाच दशकात जे मुस्लिम-अरब पाश्चात्य देशात आलेले होते, त्यांच्या धार्मिक उचापतींनी गांजलेल्या जनतेने व काही राजकारण्यांनी या निर्वासितांना घेण्य़ास साफ़ नकार दिला. तर दुसरीकडे पुरोगामीत्वाच्या नेत्यांनी सीमाच खुल्या करून टाकल्या. परिणाम व्हायचे थांबले नाहीत.

मागली दहा पंधरा वर्षे युरोपात स्थलांतरीत होऊन वसलेल्या अनेक मुस्लिमांनी आपापल्या संघटना उभ्या करून तिथे असलेल्या प्रस्थापित कायद्यांना आव्हान देत आपल्यासाठी इस्लामिक कायदे हवेत अशी मागणी सुरू केली होती. जिथे मुस्लिमांची दाट वस्ती आहे, तिथे अन्यधर्मिय वा स्थानिक मूळ रहिवाशांना हिंडणे फ़िरणेही अशक्य करून सोडले होते. आपल्या मनासारखे होत नसेल तर भीषण दंगली माजवण्याचा सपाटा लावला होता. सहासात वर्षापुर्वी याच पॅरीसमध्ये काही आठवडे अकस्मात गाड्या पेटवून देण्याचा उद्योग चालू होता. स्पेन, ब्रिटन या देशात जिहादी हल्ले झाले होते आणि अफ़गाण, इराक, सिरीयात त्या देशांचे सैन्य गेल्याच्या विरोधात आक्रमक निदर्शने मुस्लिम स्थलांतरीत करत होते. म्हणजेच नव्या देशाचे नागरिकत्व घ्यायचे, पण भूमिका मात्र इस्लामिक धर्माशी निगडीत ठेवायची, असला दुटप्पी खेळ राजरोस चालू होता. आश्रित म्हणून पाश्चात्य देशात जायचे आणि तिथल्या सरकार व कायद्यावर कुरघोडी करायची, हे साधेसरळ धोरण राबवले जात होते. त्याला विरोध केल्यास पुन्हा मानवाधिकाराचा आडोसा घ्यायचा. हा खेळ इतका मोकाट झाला होता, की त्यातून हळुहळू युरोपियन अस्मिता डोके वर काढू लागली होती. अरब-मुस्लिम किंवा स्थलांतरीत नकोत, अशा भावनेला बळ मिळू लागले. तर तीच अस्मिता दडपण्याला पुरोगामी प्राधान्य दिले गेले. म्हणजेच समस्येला सामोरे जाण्यापेक्षा समस्या नाकारण्यात धन्यता मानली गेली. परिणामी सिरीया इराकमध्ये यादवी माजल्यावर लक्षावधी मुस्लिम-अरबांचा लोंढा युरोपकडे वळला. आज जे संकट युरोपला भेडसावते आहे, ते जिहादींनी आणलेले नाही, तर तिथल्या पुरोगामी नाटकाचे दुष्परिणाम आहेत. सत्य नाकारण्यातून आलेले संकट आहे. मुस्लिमांची धार्मिक आक्रमकता रोखण्यापेक्षा तिला चुचकारण्यातून उदभवलेला धोका आहे.

गेल्या पंधरा वर्षात सातत्याने युरोपियन देशातल्या स्थानिक सरकारांचे अधिकार कमी करून त्यांच्या डोक्यावर महासंघाचे निर्णय लादले गेले. महासंघाची संसद म्हणून काम करणारी मंडळी प्रत्यक्षात कुठूनही निवडून आलेली नसतात, तर त्या त्या देशाच्या सरकारने नियुक्त केलेले अधिकारी वा प्रतिनिधी असतात. पण एकूण युरोपचे धोरण हेच जनतेने निवडून न दिलेले लोक करतात. मग त्यांनी धोरण ठरवायचे आणि बाकी निवडून आलेल्या प्रत्येक देशातील सरकारांनी त्यानुसार कार्यक्रम राबवायचे. असा लोकशाहीचा तिथे गळा घोटला गेला आहे. आपल्याकडे मागली दहा वर्षे सोनिया गांधींनी नेमलेल्या राष्ट्रीय सल्लागार मंडळाने निर्णय घेतले आणि मनमोहन सिंग सरकार त्यानुसार कारभार करत गेले. त्यातलाच प्रकार युरोपियन महासंघात चालू असतो. थोडक्यात लोकशाहीचा बळी देण्याला आता लोकशाही ठरवले गेले आहे. म्हणून तिथल्या जनतेला नको असतानाही त्यांच्या माथी हे अरबी-मुस्लिम निर्वासित मारले गेले आणि नसलेली मुस्लिम बिगरमुस्लिम समस्या जन्माला घातली गेली. आपण आज बघत आहोत, ती समस्या अशी पुरोगामी राजकारणाने उभी केलेली आहे. म्हणजे स्थानिक लोकांच्या डोक्यावर सक्तीने लादलेले स्थलांतरीत मिर्‍या वाटत असतात. त्याबद्दल तक्रार केली, तर तुमच्यावर भेदभावाचा आरोप केला जातो. वास्तविक कोणी कसला भेदभाव करीत नाही, उलट आपण मुस्लिम वा अरब आहोत हा अहंकार निर्वासितांमध्ये आहे आणि त्यापुढे पाश्चात्य देशांनी व तिथल्या जनतेने झुकावे, असा आग्रह मुस्लिमांचा आहे. समस्या इतकी सोपी आहे. तुमच्याच घरात घुसून तुम्हालाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रकार आहे. आणि त्याचे कर्तेकरविते तिथले पुरोगामी आहेत. आपल्याला भारतातले पुरोगामी पाकिस्तानचे पक्षपाती कशाला असतात असा प्रश्न पडतो, त्याचे हे पाश्चात्य उत्तर आहे. जगभरचे पुरोगामी असेच असतात.

सांगायचा मुद्दा इतकाच, की कालपरवा पॅरीसमध्ये जो हिंसाचार घडला, त्याला इसिसपेक्षा तिथले पुरोगामी खरे जबाबदार आहेत. कारण पुरोगाम्यांच्या लोकशाहीत अल्पसंख्यांची गुलामी म्हणजे बहुमताचे राज्य असते. आपल्याकडे भाजपा वा नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे बहुमताचा कौल लोकसभेत मिळवला आहे, तर तोच भारतीय पुरोगाम्यांना गुन्हा कशाला वाटतो, त्याची साक्ष यातून मिळू शकते. आमचे मान्य करणार असाल तर लोकशाही, अन्यथा लोकशाहीचा गळा घोटणारे युक्तीवाद आणि बुद्धीवाद म्हणजे लोकशाही; असे एकूण पुरोगामीत्वाचे स्वरूप आहे. लेखक समिक्षक प्रा. शेषराव मोरे यांनी पुरोगामी दहशतवाद असा शब्द वापरला, त्याचे हे जगभरचे प्रत्यंतर आहे. कुठल्याही देशात वा समाजात जे लोक सातत्याने संहिष्णूतेचा आग्रह धरत असतात, ते मुळातच असंहिष्णू असतात. त्यांना आपले अल्पमत इतरांच्या माथी मारण्यासाठी संहिष्णूता हवी असते. पण जेव्हा सत्ताधिकार त्यांच्याच हाती येतो, तेव्हा अतिशय निर्दयपणे हे पुरोगामी स्वातंत्र्य व संहिष्णूतेचा गळा घोटतात, असा जगाचा इतिहास आहे. अगदी रोमन ग्रीक साम्राज्य असेच संहिष्णूतेने रसातळाला गेले. ग्रीक-रोमन धर्माच्या देवतांची हेटाळणी नवोदित ख्रिश्चन धर्मीय पंडित करीत होते आणि त्यात सत्तेने कधी हस्तक्षेप केला नाही. त्यातून ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत गेला आणि एकदा त्यांची संख्या वाढल्यावर अन्य धर्मीयांना धर्मस्वातंत्र्यच उरले नाही. चर्चची सत्ता आली आणि अन्य धर्मीयांचे धर्मांतर किंवा कत्तल, इतका सोपा मार्ग अवलंबिला गेला. तेच पुढे मुस्लिम सत्ताधीशांनी केले आणि अलिकडल्या काळात पुरोगामी अशा मार्क्सवादी कम्युनिस्टांनी सत्ता हाती आल्यावर केलेले दिसेल. तेव्हा पुरोगामी वा तत्सम राजकीय भूमिकेतला हा छुपा डाव समजून घेतला नाही, मग कुठल्याही स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राचा विनाश व्हायला वेळ लागत नाही.

कालपर्यंत ख्रिश्चन असलेल्या युरोपातील बहुतेक राष्ट्रातून आता त्या धर्माचे प्रभाव वर्चस्व संपलेले आहे. पुरोगामीत्वाने ख्रिश्चन धर्माला विकलांग करून टाकल्यावर मुस्लिम धर्मीय तिथे क्रमाक्रमाने आपले संख्याबळ वाढवत आहेत आणि संहिष्णूतेच हवाले देणारे या जिहादी इस्लामचे बाहू पसरून स्वागत करीत आहेत. एकेकाळी रोमनांचा धर्म व संस्कृती याचप्रकारे बुडवणार्‍या ख्रिश्चनांवर काळाने उगवलेला हा सूड म्हणता येईल. सांगायचा मुद्दा इतकाच, की यात मुस्लिम वा ख्रिश्चन हा वाद नसून तिथे शिरजोर झालेल्या विध्वंसक पुरोगामीत्वाने पुढारलेल्या प्रगत युरोपियन समाजाला देशोधडीला लावण्याचे षडयंत्र यशस्वी केले आहे. आता जसजसे दिवस जातील तसतशी युरोपात ख्रिश्चन मुस्लिम यादवी आकार घेत जाईल. त्यात सध्या तरी लोकसंख्या ख्रिश्चनांची अधिक आहे. पण लढायची वा प्रतिकाराची शक्तीच युरोपियन गमावून बसले आहेत. कुठलाही समाज वा लोकसमुह कसल्या तरी अस्मितेसाठी लढत असतो. मुस्लिमांना आपण आक्रमक म्हणतो, कारण ते धार्मिक अस्मितेसाठी प्राण पणाला लावायला सज्ज असतात. पण ज्यांना असली कुठलीच अस्मिता नसते, ते कशासाठीही लढू शकत नाहीत. युरोपची तीच दुर्दशा पुरोगामीत्वाने केलेली आहे. म्हणून मुठभर जिहादी त्यांना ओलिस ठेवू शकतात. मनमानी कत्तल करू शकतात आणि सुसज्ज सशस्त्र दले खडी असूनही तिथले सरकार व सत्ताधीश दुबळे भासू लागतात. अगतिक होतात. त्यांना अधिकच खच्ची करण्यासाठी मग त्यांच्या हाती पुष्पगुच्छ वा मेणबत्तीचे हत्यार दिले जाते आणि त्यातून आपण अधिकच लढवय्ये झाल्याच्या भ्रमात त्यांना मशगुल करता येते. तितके मग जिहादींना सोपे बळी मिळू लागतात. थोडक्यात आता युरोप धार्मिक यादवीच्या दिशेने जाईल किंवा लौकरच त्याची पुढारलेला ख्रिश्चन प्रगत समाज ही ओळख पुसली जाईल. मोजक्या शब्दात बोलायचे तर युरोपचा सिरीया, अफ़गाणिस्तान व्हायची लक्षणे दिसू लागली आहेत.


पूर्वप्रसिद्धी  तरूण भारत नागपूर
रविवार  २२/११/२०१५

12 comments:

  1. भाऊ तुम्ही great आहात … एक आणि एक शब्द १०००% पटला …

    ReplyDelete
  2. भाऊ...माझा एवढा अभ्यास नाहिये पण यूरोप महासंघाने याआधी कड़वट निर्णय घेऊन अशा गोष्टी दड़पुन टाकल्या आहेत...कारण ज्या पद्धतीने त्यानी तातडिने कारवाई करुन खरे गुन्हेगार शोधले व मारून टाकले ते बघुन वाटते की नक्कीच ते निर्वासित मुस्लिम समाजावर जागता पहारा ठेवतील..शेवटी कोणताही देश स्वताला देशोधडीला जाताना कसा बघू शकेल? त्यामुळे यूरोपच इस्लामीकरण होईल असे वाटत नाही...हा पण यादवीची शक्यताही नाकारता येत नाही...

    ReplyDelete
    Replies
    1. मी इथे सहमत आहे. युरोप law and order सांभाळेल अशी आशा करू. आणि हे सगळेच मुस्लीम विस्थापित इसीसचे नाहीत. मूठभर दहशतवादी येण्याच्या भीतीने लाखो लोकांना मारावयास सोडणे हा उपाय वाटत नाही.

      Delete
    2. मग भले आपला घात झाला तरी चालेल. सावरकर वि गांधी.

      Delete
  3. जबरदस्त. मर्मभेदी. अद्वितीय !

    ReplyDelete
  4. भाऊ १००० वर्षे लिहित राहा. केवळ तुम्हीच इतके साक्षेपी आणि व्यासंगी लिहू शकता. बाकीची पिलावळ या व्यवसायाला लाज आणते. जैसा एक लव्ह जिहाद चल रहा है, वैसा ही दूसरा एक जिहाद चल रहा है...उसका खतरनाक नाम है मिडिया जिहाद. सारे अंग्रेजी प्रेसवाले, और समाजवादी अन्यभाषी पत्रकार इसके सदस्य है, उनका काम है, ऐसे नौजवानों को भड़काना जिन्हें अपने या दुसरो के किसी भी धर्म के बारे सही मालूमात नहीं. ये सब अल-कायदा का विचार और ईसिस का डर फैलाकर अपनी रोटी सेंकते है. इन्हें कभी भी पत्रकार कहकर उस अछे व्यवसाय का अपमान नहीं करना चाहिए. इन्हें इनके सही नाम से ही पुकारना चाहिए जैसे के मिडिया जिहादी श्री. अन्धेराजी बाळ. या फिर मिडिया जिहादी श्रीमती......बरखाबाई कश्मिरवाली, या फिर राजलालटेन दे(फ़ोकटका माल) साईं....

    ReplyDelete
  5. युरोपातील सद्य परिस्थितीचे अगदी योग्य विश्लेषण.. धन्यवाद भाऊ.

    ReplyDelete
  6. यूरोपचा अफगानिस्तान नाहि तर नर्क व्हायला हवा.वसाहतिच्या माध्यमातुन खुप अत्याचार केलेत या लोकांनि.काश्मीर मध्ये दिवसाढवळ्या हत्याकांड झालित.संपूर्ण भारतात दशहतवादाने थैमान मांडले.त्यावेळि कुठल्याहि यूरोपीय देशाने भारताला मदतिचा हात दिला नाहि.मला सिरिया मधिल हिसाचाराचे दुख वाटत नाहि कि पेरिस चे.

    ReplyDelete
  7. America hou denar nahi... jagatle sagale christion ek hotil.... ya virodhat.

    ReplyDelete
  8. Bhau -

    Geli 5 warsh mi Sweden madhe rahto aahe...yatlya bahusankya samasya mi yachi dehi yachi dola pahto aahe...otherwise nutral asalelya deshat ata muslim nirwasitanmule barech issue yet aahet.

    Ratri beratri gadya petawane nityache zale aahe...
    Mi rahat asalelya Goteborg shaharat kahi bhag ase aahet jithun local swed lok completely haddapar zale aahet.

    Sweden Democrat navachi ek kattar sanstha an tyancha raajkiya paksha hi nighala aahe...jya pakshala maglya sarwatrik nivadnukit 7% mate milali hoti...matra ya weli 25% milali aahet...4 warshat lokanchya manaseekte madhe zalela ha prachand badal yach mule zaala aahe....

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks for sharing. Marathi people like you must share their experiences, opinions on Marathi blog, Marathi pages and Marathis Facebook communities

      Delete
  9. थोड्या फार फरकाने जवळपास जगभरात हे लोण पसरत आहे. ज्या देशात हे सहन केले जात नाही ते देश वेगळ्या अतिरेकी मार्गाने टार्गेट करण्याचे उद्योग चालु आहेत .
    भारतासारख्या देशात काही लोकांना नवपुरोगामीत्वाचे डोहाळे लागलेत!
    थोडक्यात नविन राजा मागणार्या विहिरीतल्या बेडकांमधे आणि या भंपक पुरोगाम्यांमधे भरपुर साम्य आहे !
    अप्रतिम ब्लॉग !!

    ReplyDelete