Wednesday, November 4, 2015

मायावती, मुलायम आणि शत-प्रतिशत भाजपामहाराष्ट्रातल्या दोन महापालिका व अनेक नगरपरिषदांच्या निकालावरून सध्या अनेकजण आपापले आकलन मांडत आहेत. त्यात मग राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून दिल्लीतल्या पंतप्रधानापर्यंत कोणा कोणाविषयी नापसंती मतदाराने व्यक्त केली, त्याचा तपशील समोर येत आहे. अर्थात मतदार यापैकी कोणालाच आपले खरे मत सांगत नाही आणि त्यांनाही अशा वास्तविक मताची गरज नसते. असे आकलन करणारे आपलीच मते सामान्य जनते़ची म्हणून माध्यमातून लोकांच्या गळी मारण्याचे उद्योग करत असतात. म्हणूनच तर मोदींनी लोकसभेपुर्वी कितीही काहुर माजले तेव्हा ‘टोपी’ घातली नव्हती. तेव्हा किमान लाखभर वेळा विविध वाहिन्यांनी मोदींनी एका मौलवीकडून टोपी नाकारल्याचे अगत्याने दाखवलेले होते. जो नेता अशी मुस्लिमांची टोपी स्विकारत नाही, त्याला या देशाची सेक्युलर जनता पंतप्रधान पदावर बसवू शकत नाही, याची हमी प्रत्येक पुरोगामी विचारवंत देत होता. पण लोकांनी नेमके उलटेच केले. मोदींनी टोपी स्विकारली नाही म्हणूनच त्यांना पंतप्रधान पदावर आणून बसवले. पण त्याचवेळी देशभरच्या मतदाराने एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट केली, ती म्हणजे या देशातल्या पुरोगामी अभ्यासकांना सामान्य माणसाचे मत अजिबात कळत नाही. किंवा जे काही लोकमत असेल ते ओळखण्याचा सोपा मार्ग म्ह्णजे, राजकीय अभ्यासक सांगत असतील त्याच्या नेमक्या उलट्या बाजूने वारे वहात असल्याची खुणगाठ बांधणे. म्हणजे जनमत मोदींना पोषक आहे, असे जेव्हा माध्यमे व विचारवंत सांगू लागतील, तेव्हा हमखास समजावे, की आता भाजपासह मोदींचे दिवस भरलेत म्हणून! याचाच उलटा अर्थ असा, की जोवर माध्यमे मोदींचा अस्तकाळ दाखवत रहातील, तोवर मोदींनी निश्चींत असायला अजिबात हरकत नाही. कारण तोच आता एक राजकीय निकष झाला आहे.

पण त्याची दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी. महाराष्ट्रातले मतदान किरकोळ होते. त्यापेक्षा महत्वाचे मतदान देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात पार पडले. तिथले निकाल भाजपाला सावधानतेचा इशारा देणारे आहेत. तिथे नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आणि त्यात भाजपाच्या लोकसभेतील यशावर बोळा फ़िरवला गेला आहे. हे मुद्दाम एवढ्यासाठी सांगायचे, की सध्या भाजपाने शत-प्रतिशत होण्याचा निर्धार केला आहे. ‘पार्लमेन्ट टू पंचायत’ अशी अमित शहा यांची घोषणा आहे. म्हणूनच ८० पैकी ७१ जागा ज्या उत्तर प्रदेशने भाजपाला दिल्या, तिथल्या पंचायत निवडणूक निकालांना महत्व आहे. तिथे आणखी सव्वा वर्षाने विधानसभेच्या निवडणूका व्हायच्या आहेत. तिथल्या मतदाराने काय कौल दिला आहे? तर चार पक्षात विभागल्या गेलेल्या राजकारणात आपले अस्तित्व संपुर्णपणे पुसले गेलेल्या बहुजन समाज पक्षाने मोठी मुसंडी मारलेली आहे. सर्वाधिक जागा मायावतींच्या बसपाने जिंकल्या आहेत, तर दुसर्‍या क्रमांकावर सत्ताधारी समाजवादी पक्ष आहे. २०१२ मध्ये तिथे मायावतींची सत्ता होती आणि विधानसभेत त्यांना जबरदस्त फ़टका बसला. त्यांनी शंभराहून अधिक जागा गमावल्या आणि त्याबरोबरच सत्ताही गमावली. त्यांच्या जागी मुलायमसिंग यादव यांच्या पक्षाने बाजी मारली आणि एकहाती सत्ता त्यांच्याकडे आली. पण अडीच वर्षात झालेल्या लोकसभा मतदानात सगळीच उलथापालथ झाली. विधानसभेच्या मतदानात तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेलेला भाजपा सर्वाधिक नव्हेतर जवळपास सर्व जागा जिंकून यशस्वी झाला. मात्र दिड वर्षात तिथे पुन्हा चक्रे फ़िरलेली आहेत. ती तशीच आगामी विधानसभा लोकसभेपर्यंत रहातील, असे म्हणता येत नाही. पण ७१ जागा जिंकणार्‍या भाजपासाठी तो एक इशारा असू शकतो. उत्तर प्रदेश नेहमी चमत्कार घडवतो असा इतिहास आहे.

गेल्या लोकसभा निवडणूकीत समाजवादी व कॉग्रेस या दोन पक्षाच्या नेत्यांचे कुटुंब वगळता, अन्य कोणी उमेदवार निवडून आला नाही. मायावतींच्या बसपाला तर एकही जागा जिंकता आलेली नव्हती. पण त्यानंतर मायावतींनी संसदीय कामकाज सोडले, तर बाकी उघड कुठले राजकारण केले नाही. त्या शांतपणे आपली पिछेहाट कशामुळे झाली त्याचा शोध घेत राहिल्या. २००७ मध्ये ब्राह्मण जातींनाही सोबत घेत त्यांनी जी मतांची जुळणी केली होती, ती कुठे विस्कटली त्याचा शोध घेताना गाजावाजा न करता त्यांनी नव्याने पक्ष संघटना उभारण्याचे काम हाती घेतले. दिड वर्षात योग्य मार्गाने मायावती वाटचाल करीत असल्याचे ताज्या निकालांनी दाखवून दिले आहे. उलट लोकसभेतील प्रचंड यशाने फ़ुगलेल्या भाजपाला नशेची झिंग चढली आहे. म्हणूनच पंचायत मतदानाने त्याना तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकले जाण्याची नामुष्की आली आहे. प्रत्येक निवडणूक वेगळ्या विषयावर होत असते. तशीच लोकसभा व पंचायत निवडणूकांची तुलना योग्य नाही. पण हा वास्तव विचार झाला. भाजपाची राजकीय भूमिका तशी नाही. त्यांना ‘पार्लमेन्ट टू पंचायत’ अशी एकहाती सत्ता हवी आहे. त्याचे अध्यक्ष अमित शहा त्याचा वारंवार उल्लेख करीत असतात. म्हणूनच उत्तरप्रदेशच्या ताज्या निकालांचा अभ्यास पक्ष म्हणून करावा लागतो. वाराणशी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. तिथेही निम्मे सोडा अवघ्या चार जागा भाजपा मिळवू शकला आहे. तर कुठेही आवाज नसलेल्या मायावतींनी राज्यात सर्वाधिक जागा जिंकण्याचा चमत्कार घडवला आहे. याचा अर्थ इतकाच, की बोलघेवडेपणा कामाचा नाही. तर लोकांमध्ये जाऊन मतांची बेगमी करणे अगत्याचे आहे. मायावतींच्या या यशाची भाजपाच्या पराभवाशी तुलना करण्याचे आणखी एक कारण आहे. मायावतींनी पक्षाची नव्याने उभारणी हाती घेतली. भाजपाने काय चालविले आहे?

लोकसभा जिंकल्यापासून भाजपाने पक्षाची संघटना आणखी मजबूत करण्याचा विचार गुंडाळून ठेवला आणि मार्केटींगच्या मार्गाने जायचा सोपा रस्ता शोधला आहे. त्यात जाहिरातबाजी, गाजावाजा, वादग्रस्त विधाने यांच्यासह अन्य पक्षातून यशस्वी नेते उमेदवार फ़ोडणे, ही भाजपाची नवी रणनिती आहे. पराभवामुळे मायावतींना अनेक सहकारी सोडुन गेले. काही मोठ्या नेत्यांनी त्यांच्याकडे पाठ फ़िरवली. तर काही समाजघटक त्यांना सोडुन गेले होते. त्यांना वा अन्य पक्षातल्या नेत्यांना फ़ोडून आणायचे डावपेच मायावती अजिबात खेळल्या नाहीत. त्यापेक्षा समाजाच्या व विभागाच्या कोणत्या मतदाराने आपल्याकडे कोणत्या कारणास्तव पाठ फ़िरवली, त्याचा कसून अभ्यास त्यांनी केला आणि तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्याशी मंथन केले. गाव तालुका पातळीपर्यंत पक्ष संघटना नव्याने बांधण्याचे काम हाती घेतले. तिथे न थांबता त्यांनी २०१४ मध्ये तब्बल अडीच वर्षे आधी २०१७ च्या विधानसभेची तयारी सुरू केली. जवळपास सर्व चारशे मतदारसंघातील विधानसभेचे उमेदवार त्यांनी गेल्या वर्षअखेर ठरवले असून त्यांच्यावर मध्यंतरी येणार्‍या स्थानिक निवडणुका जिंकण्याची जबाबदारी सोपवली होती. ज्यांना विधानसभा जिंकायच्या आहेत, अशांनी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतीत यश मिळवून आपलीच उमेदवारी निश्चीत करायचा मायावतींचा फ़ंडा, त्यांना उपकारक ठरला आहे. त्यातून नुसत्या अधिक जागाच जिंकता आलेल्या नाहीत, तर तालुका व ग्रामपातळीवर पक्ष संघटना नव्याने उभी राहिली आहे. भाजपाचे काम इतके शिस्तबद्ध राहिलेले नाही, ही त्या पक्षाची मोठी समस्या होत चालली आहे. मोदींच्या नावावर आपण ग्रामपंचायतीपासुन लोकसभेपर्यंत कुठलीही बाजी मारू शकतो; अशा समजूतीतून भाजपा बाहेर पडायला तयार नाही त्यातूनच मग डोंबिवली असो की विरार नवीमुंबई असो, पालिकाही स्वबळावर जिंकण्याची स्वप्ने बघितली जात आहेत. त्यातून भाजपाला बाहेरचा कोणी सोडवू शकणार नाही. स्वत:च त्यातून बाहेर पडावे लागेल. अन्यथा भविष्यकाळ संकट बनून येत असतो.

3 comments: