Friday, November 13, 2015

मतचाचण्यांचा जमाना संपलाबिहारच्या निकालांनी राजकीय वादळ उभे केले आहे. पण त्यामागचा सुत्रधार किती लोकांना आधी ठाऊक होता? भारतीय लोकशाहीत निवडणूका जिंकणे हे यशाचे प्रतिक झाले आहे. तुम्ही कुठल्या मार्गाने यश मिळवता याला अर्थ नसतो, तर जिंकणे निर्णायक असते. दिड वर्षापुर्वी ते यश मोदींनी मिळवून दाखवले. आठ सार्वत्रिक निवडणूकात त्रिशंकू लोकसभेचा पायंडा त्या निकालांनी मोडला गेला. पण त्या निकालांचा किती अभ्यास होऊ शकला? कोणकोणते घटक या चमत्काराला कारणीभूत झाले, त्याचा कुठलाही वेध राजकीय अभ्यासकांनी घेतला नाही. म्हणूनच आधी नुसत्या मतचाचण्या घेऊन आडाखे बांधण्यात विश्लेषक धन्यता मानत होते आणि निकालांनी चाचण्या फ़सल्यावर जुन्याच राजकीय समजूतींच्या आधारे विवेचन करण्याच्या पळवाटा शोधल्या गेल्या. उदाहरणार्थ मोदींनी गुजरातच्या एका कार्यक्रमात मुस्लिम मौलवीने दिलेली टोपी घातली नाही वा त्यांची मुस्लिम विरोधी प्रतिमा असल्याने, त्यांना कधीकाळी पंतप्रधान होताच येणार नाही, असे छातीठोकपणे सांगितले जात होते. त्यासाठी विविध पुरावे दिले जात होते. कुठलीही चाचणी मोदींना वा भाजपाला मित्रपक्षांसह बहुमतापर्यंत घेऊन जायला तयार नव्हती. पण भाजपाला बहुमत मिळाले आणि मित्रपक्षांसह ३३४ इतकी मजल मारल्यावर नवेच विवेचन सुरू झाले. मतदार विकासाच्या आश्वासनाला भुलला असा सोपा खुलासा करण्यात अभ्यासक रमले. काळ बदलतो आहे आणि नवे काही प्रयोग होत असल्याचे भानही या अभ्यासकांना नव्हते. १९८० च्या दशकात प्रणय रॉयने मतचाचण्यांचा प्रयोग यशस्वॊ करून दाखवला आणि सगळी माध्यमे आणि अभ्यासक तीन दशके त्याच्याच आहारी गेले. मागल्या लोकसभेने त्याही प्रयोगाला मागे टाकले आणि निवडणूका सरळ सरळ मार्केटींगच्या आखाड्यात आणूस सोडल्या. हा बदल अजून अभ्यासकांना उमजलेला नाही.

मतचाचण्या जनमानसाचा कानोसा घेतात आणि तुमच्या विषयीची आस्था किंवा नाराजी समोर आणू शकतात. पण त्यात बदल करण्याचे काम चाचण्यांपडून होत नाही. मग त्यावरचा उपाय म्हणून अन्य मित्रांची मदत घेणे, विविध लोकप्रिय उमेदवार पक्षात वा गोटात आणण्याची पळवाट शोधली जाते. पण नाराजी कमी करून लोकमत आपल्या पक्षाविषयी पोषक बनवणे चाचण्य़ातून शक्य होत नाही. त्यासाठी लोकमताची व राजकारणाची जाण आवश्यक असते. त्यातून मग लोकमत आकर्षित करण्याचे वा नाराजी कमी करण्याचे उपाय सापडू शकतात. त्यांचा अवलंब करून नाराजी बोथट करणे वा अधिक लोकमत ओढणे शक्य असते. पक्ष वा नेत्यांच्या गुणांची जनतेला असलेली गरज प्रकर्षाने मांडून निवडणुका जिंकण्याची रणनिती आखता येत असते. आपल्या विरोधकांविषयी असलेली नाराजी वापरून आपल्याला पोषक वातावरण निर्माण करण्याच्या कल्पना सापडू लागतात. मोदींच्या विरोधात मागल्या दहाबारा वर्षात विरोधक वा माध्यमांनी जी प्रतिकुल प्रतिमा उभी केलेली होती, तिला दुसरी बाजू होती. ती अन्य कुणाच्या लक्षात आलेली नव्हती. ती ओळखणारा एक माणूस होता, त्याचे नाव प्रशांत किशोर! राष्ट्रसंघात अधिकारी म्हणून काम केलेल्या प्रशांत किशोरला भारतात येऊन काही करायची इच्छा होती आणि त्याने मोदींना पंतप्रधान बनवण्यसाठी काही विश्वासू सहकार्‍यांच्या मदतीने योजना आखली. मोदींच्या गळी ती योजना उतरवण्यापासून जे काम सुरू झाले, ते पुर्ण होऊनच थांबले. मोदींच्या गोटात प्रशांत दाखल झाल्यापासून प्रत्येक प्रतिकुल स्थितीला तो अनुकुल  बनवत गेला. बाकी काम भाजपा व संघाच्या संघटनेकडून पुर्ण होत राहिले. तिथपर्यंत विजयाची घोडदौड चालू होती. पण लोकसभेतील यशानंतर भाजपाला प्रशांतची गरज उरली नाही आणि तो दुरावत गेला. त्यानेही अन्य पर्याय शोधले.मोदींना पंतप्रधान बनवणे हा पहिला प्रयोग होता. पण तो योगायोगही असू शकेल. म्हणून त्याची पुनरावृत्ती आवश्यक होती. म्हणून मग प्रशांतकडे भाजपाने दुर्लक्ष केले म्हणून नाराज होण्यापेक्षा दिल्लीत दुसरा प्रयोग मांडला. विधानसभेच्या निवडणूका येऊ घातल्या होत्या आणि केजरीवाल हाच भाजपाला खरा आव्हानवी्र होता. त्याला हाताशी धरून प्रशांत किशोरने आपली बुद्धी तिथे पणाला लावली. पराभूतच होऊ घातलेल्या कॉग्रेसच्या दारी तो गेला नाही, तर लढू शकणार्‍या आम आदमी पक्षाला त्याने हात दिला. उलट भाजपाने दरम्यान प्रशांत किशोरच नव्हेतर विजयाला हातभार लावणार्‍या मित्रपक्षांनाही तोडण्याचा सपाटा लावला होता. तरी मोदीलाटेने निर्माण केलेल्या वातावरणाचा लाभ महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, काश्मिर अशा राज्यात मिळून गेला होता. म्हणून भाजपाचे नवे नेतृत्व कमालीचे फ़ुशारले होते. नवे पक्षाध्यक्ष अमित शहा म्हणजे आधुनिक चाणक्य असल्याचा साक्षात्कार अनेक भाजपावाल्यांना झाला होता आणि हरयाणा-महाराष्ट्रात यशस्वी ठरलेली रणनिती बिनदिक्कत पुढे रेटली जात होती. ती रणनिती म्हणजे प्रत्यक्षात ‘पवारनिती’ होती. अन्य पक्षातले स्थानिक दांडगे नेते उमेदवार आयात करून स्वबळावर निवडणूका लढवणे. अधिक जागा व बहुमत जिंकणे. कुठल्याही भल्याबुर्‍या मार्गाने सत्ता संपादन करणे. आपली दुबळी बाजू सुधारण्यापेक्षा अशा लबाडीला प्राधान्य देत रणनिती बनवले गेले. दिल्लीत मग त्याचेच अनुकरण झाले आणि कुणालाही भाजपात आणायचा सपाटा लावला गेला. उलट केजरीवाल मात्र प्रशांत किशोर म्हणेल, तसे आपल्या दुबळेपणावर मात करत गेले. तर अमित शहा उसने उमेदवार व मिसकॉलने पक्ष सदस्य वाढवण्यात रमून गेले. दिल्लीच्या निकालांनी त्यांना धडा दिला. पण कुंभकर्ण झोपेतून इतक्या सहज उठतो कधी? त्यासाठी प्रशांत किशोरला बिहारमध्ये आणखी एक प्रयोग करावा लागला.

 फ़ेब्रुवारीत दिल्लीचे निकाल लागले होते आणि नऊ महिन्यांनी बिहारचे निकाल लागले आहेत. मागले सहा महिने प्रशांत किशोर बिहारचा प्रयोग करत होता. मे महिना अखेरीस त्याने नितीशकुमार यांची भेट घेतली आणि कामाला सुरूवात केली होती. तर लालू वा नितीश कुठला कचरा बाहेर फ़ेकतात, तोच गोळा करण्यात अमित शहा गर्क होते. बारकाईने बघितले तर लोकसभेची पुनरावृत्ती बिहारमध्ये झालेली दिसेल. तेव्हा मोदींच्या विरोधात ज्या विकृत वा असभ्य टिका-शब्दांचा वापर झाला, त्यांचाच आधार घेऊन प्रशांत किशोरने राजकीय प्रचाराने मुद्दे निर्माण केले होते. बिहारमध्ये मोदी वा शहा जितके म्हणून नितीश विरोधातले शब्द वापरत होते, त्याचीच प्रशांत किशोरने हत्यारे बनवून भाजपावर उलटवलेली आहेत. डीएनए, शब्दवापसी, बिहारी-बाहरी असे अनेक मुद्दे भाजपाने नितीशचे पारडे जड करायला पुरवले. ‘वो चायवाला’ हे मणिशंकर अय्यर यांचे हेटाळणीयुक्त शब्द फ़िरवून ‘चायपे चर्चा’ प्रशांतनेच आरंभली होती. मुद्दा इतकाच की मतचाचण्यांचा जमाना संपला असून, मतदार जिंकायचा तर नवनव्या कल्पनांची आता गरज आहे. अर्थात कॉग्रेससारख्या दिवाळखोर पक्षाला प्रशांत किशोर वाचवू शकणार नाही. ज्याच्यापाशी लढण्याची जिद्द व पात्रता आहे, त्यालाच असे कल्पक रणनितीकार विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतात. उद्या याच प्रशांतने गुजरातच्या हार्दिक पटेल याला हाताशी धरलेम तर भाजपाची तिथली दिर्घकालीन हुकूमत ढासळू शकेल. कारण हार्दिकमध्ये ती क्षमता आहे जी मोदी, केजरीवाल वा नितीशमध्ये होती. त्याचा लवलेश राहुलमध्ये नाही. भाजपाचे नेते व समर्थक यशाचे हे रहस्य जितके लौकर जाणतील, तितके लौकर सावरू शकतील. चाणक्य पडद्याआड असतो, तो चंद्रगुप्ताला यशस्वी करतो. अमित शहा व इतर भाजापा नेते स्वत:ला चाणक्य व चंद्रगुप्त एकत्रित समजून वागत आहेत. त्याचे परिणाम समोर येत आहेत.

8 comments:

 1. baki sarva thik ahe hardik jinkane ashakya ahe evadhe nakki

  ReplyDelete
 2. दिशा उद्याची नव्या युगाची।

  ReplyDelete
 3. प्रशांत किशोर आपणास चाणंक्या सारखा वाटतो, पण चाणंक्य महान तत्त्वज्ञ, राजकारणी आणि राष्ट्रभक्त होता. प्रशांत किशोर तर बाजारबुणगा पोटार्थी.

  ReplyDelete
 4. पायाखाली जे जळत आहे ते पहायला भाजप नेते तयारच नाहीत...

  ReplyDelete
 5. सदेतोड़ ,परखड़ मत 100 % सहमत , परंतु हार्दिक बद्दल चे मत मान्य नाही , हार्दिक उतावला आहे , नेता होण्याचे गुण त्यात नाहीत

  ReplyDelete
 6. विरोधक एकत्रित लढाईत भारतीय जनता पक्ष पराभव

  ReplyDelete
 7. Yogya vishleshan bhau! Pan hardik patel no way??

  ReplyDelete
 8. Hardik Patel is just baby not aware of anything some leader insider BJP & cong are pulling him out for own patel lobby

  ReplyDelete