Thursday, November 19, 2015

छोटा शकील आणि खोटा शकीलमध्यंतरी म्हणजे बिहार निवडणूकांचा प्रचार रंगात आला असताना अकस्मात देशातील बुद्धीमंत, कलावंत असंहिष्णूतेने चिंतित झाले होते. पण बिहारमध्ये भाजपाचा पराभव झाल्यावर त्यांना त्याच असंहिष्णूतेचा विसर पडला आहे. ती भाषा एकदम बंद झाली आहे. आता दुसरी बाजू बघा. कॉग्रेसचे नेते आणि प्रवक्ते शकील अहमद यांनी छोटा राजन वा अनुप चेतिया यांच्याबाबतीत एक वादग्रस्त विधान केले. ‘राजन वा चेतीया हे मुस्लिम नाहीत. अन्यथा मोदी सरकारची त्यांच्या बाबतीतली भूमिका वेगळी राहिली असती.’ यावरून वादळ उठले आणि झाल्या प्रकाराबद्दल माफ़ी मागून शकील यांना विषय गुंडाळता आला असता. पण त्याऐवजी त्यांनी नाराज प्रतिक्रीयांची भाजपा समर्थक म्हणून खिल्ली उडवली आणि देशातील ‘बुद्धीमंतांनी’ आपली पाठराखण केल्याचे दुसरे विधान केले. याचा अर्थ असा, की शकील यांनी जे वादग्रस्त विधान केले, त्याचे या देशातील बुद्धीमंत समर्थन करतात. म्हणजे बुद्धीमंतांनाही असेच वाटते, की छोटा राजन व अनुप चेतिया मुस्लिम असते, तर मोदी सरकारने त्यांच्याशी वेगळी वागणुक केली असती. ह्याचा एकूण अर्थ स्पष्ट आहे. भारत सरकार वा आजचे मोदी सरकार मुस्लिमांना पक्षपाती वागणुक देत असते. हा केवळ शकील यांचा दावा नाही, तर देशातील बुद्धीमंतांचाही तोच दावा आहे. अर्थात शकील खोटे बोलत नाहीत. कारण त्यांना जे बुद्धीमंत वाटतात वा माध्यमातून ज्यांना बुद्धीमंत म्हणून पेश केले जाते, त्यांची वागणूक तशीच असते. भारतात हिंदू समाजाविषयी आकस व्यक्त करण्याला बुद्धीमंत असा दर्जा मिळत असतो. उलट हिंदूंवर अन्याय होत असल्याने चिडून प्रतिक्रीया देण्याला इथे प्रतिगामी ठरवले जात असते. तेच सलमान खुर्शीद किंवा मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन सांगत असतात. एकूण या प्रकारातून भारतातल्या तथाकथित बुद्धीमंतांचा खरा चेहरा समोर आला आहे.

पण नुसताच या बुद्धीमंतांवर आरोप करण्यापेक्षा त्याची पार्श्वभूमी तपासणेही योग्य ठरेल. शकील यांनी जे विधान केले आहे त्यांना गुन्हेगार ठरवण्यात माध्यमातल्या जाणत्यांनी उतावळेपणा केला किंवा सत्य दडपण्यासाठी धावाधाव केली, असेही म्हणता येईल. किंबहूना त्यावरून असे काहुर माजवले, की सामान्यत: हिंदुत्ववादी किंवा राष्ट्रप्रेमी असतील त्यांनी शकील यांच्यावर तुटून पडावे. आणि झालेही तसे्च! पण शकील यांचे विधान किती लोकांनी तपासले? त्याचे स्पाष्टीकरण तरी कोणी मागितले काय? समजा त्यांचा दावा खरा आहे, तर शकील यांनी आपल्या विधानाचा संकोच कशाला केलेला आहे? राजन व चेतिया मुस्लिम असते तर मोदी सरकारची भूमिका वेगळी राहिली असती, म्हणजे कशी राहिली असती? आता जी भूमिका या दोघांबद्दल मोदी सरकारने घेतली आहे, त्यात शकील यांना काय आक्षेपार्ह वाटले आहे? समजा त्यांच्याच लाडक्या कॉग्रेस पक्षाचे सरकार असते, तर त्यांनी मुस्लिम नाहीत म्हणून या दोघांबद्दल कोणती भूमिका घेतली असती? असे प्रश्न शकीलना विचारले गेले पाहिजेत. तेव्हाच त्यांची वास्तव भूमिका स्पष्ट झाली असती आणि मगच त्यांच्यावर टिका करणे वा त्याचे समर्थन करणे योग्य ठरले असते. पण यातले काहीही झाले नाही. नुसताच धुरळा माध्यमांनी उडवला आणि त्यात तितक्याच उत्साहात मोदी समर्थकही सहभागी झाले. किंबहूना तसा गोंधळ माजवण्यासाठी व राजन व चेतिया यांच्या अटकेसंबंधी शंका निर्माण करण्याच्याच हेतूने शकील यांनी अर्धवट विधान केले आणि माध्यमांनी त्यावर गदारोळ माजवून सामान्य माणसाची निव्वळ दिशाभूल करण्यात धन्यता मानली. शकील यांचा हेतू स्पष्ट आहे. मुस्लिम असते तर त्यांना जिवंत मायदेशी आणण्यापेक्षा मिळतील तिथे ठार मारण्याचा डाव मोदी सरकारने खेळला असता, असे त्यांना म्हणायचे आहे. मात्र तेवढेच बोलायचे त्यांनी सराईतपणे टाळले आहे.

पाकिस्तानात दडी मारलेल्या दाऊदला ठार मारण्याचे अनेक डाव आजवर भारतीय गुप्तहेर खात्याने योजलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. अगदी जेव्हा शकील यांच्या लाडक्या सोनिया गांधींच्या इशार्‍यावर नाचणारे मनमोहन सरकार सत्तेत होते, तेव्हाही दाऊदला ठार मारण्याच्या योजना आखल्या गेल्या व सज्जताही केली गेली. पण ती अखेरच्या क्षणी सरकारी हस्तक्षेप झाल्याने पुर्णत्वास जाऊ शकली नाही, हे आता उघड गुपित आहे. अनेक माजी अधिकार्‍यांनी आणि गुप्तचरांनी त्याची जाहिर साक्ष दिलेली आहे. आणि तीच तर शकील अहमद यांची खरी पोटदुखी आहे. पण सोनियांच्या हाती सत्ता असतानाही छोटा राजनला वा चेतियाला असतील तिथे ठार मारण्याच्या योजना भारतीय हेरखात्याने कघी आखल्या नाहीत. ही शकील यांची वेदना आहे. किंबहूना कॉग्रेस प्रवक्ते शकील अहमद आणि त्यांच्याशीच नाम-साधर्म्य असलेला दाऊदचा विद्यमान उजवा हात ‘छोटा शकील’ याचेही तेच दुखणे आहे. पाकिस्तानात बसलेल्या व पाक हेरखात्याच्या इशार्‍यावर इथे भारतात उत्पात घडवणार्‍या शकीलने कितीदा तरी राजनला ठार मारण्याचे बेत आखले. पण त्याला ते डाव तडीस नेता आले नाहीत. ही त्याची पोटदुखी आहे आणि नेमकी तीच कॉग्रेस प्रवक्ता शकील अहमद यांची पोटदुखी आहे. मात्र त्याविषयी मौन धारण करून हे महाशय अतिशय संदिग्ध भाषेत ‘वेगळी भूमिका’ असे शब्द योजतात. तर निदान त्यांना काय हवे आहे, ते तरी विचारले गेले पाहिजे ना? म्हणजे राजन-चेतिया बाजूला ठेवा, दाऊदचा विषय घ्या! त्याच्याशी मोदी सरकारने कसे वागावे अशी शकील यांची अपेक्षा आहे? दाऊदलाही भारतात सुखरूप आणावा, असे त्यांना मनापासून वाटते काय? राजनला आणले तसे दाऊदलाही आणा, अशी मागणी त्यांनी कशाला केलेली नाही? असे सवाल शकीलना कोणीच का विचारू नये?

खरे तर शकील यांचे दुखणे सोपे आहे. त्यांना राजनपेक्षा दाऊदची चिंता सतावते आहे. कारण पाकिस्तानात जाऊन दाऊदला मारण्याच्या योजना मोदींच्या कारकिर्दीत यशस्वीरित्या पार पाडल्या जातील, अशा भयाने शकील अहमद व्याकुळ झालेले आहेत. आणि तिथेच मोदी सरकारची ‘वेगळी भूमिका’ त्यांच्या पोटात गोळा आणताना दिसते आहे. पण तसे उघडपणे बोलण्याची हिंमत त्यांना झालेली नाही. दाऊदला ठार मारण्याच्या योजना आखता, तर राजनलाही परदेशातच ठार मारण्याची भूमिका का घेतली नाही, असा त्यांच्या विधानाचा खरा रोख आहे. पण तसे बोलण्याऐवजी त्यांनी ‘वेगळी भूमिका’ अशा शब्दांची पळवाट शोधली आहे. इतकीच या शकील मियांना आपल्या लाडक्या दाऊदची चिंता सतावत असेल, तर त्यांनी तशी तयारी करून दाऊदला मायदेशी आणण्याची योजनाच मोदी सरकारला सादर करावी. त्याला सरकारने नकार दिला, मग आपल्या मनातील गरळ भरचौकात येऊन ओकावी. वास्तविक खुर्शीद अहमद वा मणिशंकर अय्यर यापासून सुधींद्र कुलकर्णी, बरखा दत्त असे एकाहून एक पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे सखे-सोबती अहमद यांच्या सेवेला सज्ज आहेत. त्यांच्या मध्यस्थीने दाऊदशी बोलणी करून व पाक सरकारच्या मदतीने दाऊदला मायदेशी आणता येऊ शकेल. अडचण एकच आहे, की पाक सरकारला तोच दाऊद आपल्या देशात दडला असल्याचे मान्य करावे लागेल. बोगस नावाचा पासपोर्ट खोटा ठरवण्यात राजन प्रकरणी इंडोनेशिया सरकारने जे सहकार्य केले, ते पाक सरकारला करावे लागेल. ती सुविधा अहमद यांनी उपलब्ध करून देणे शक्य आहे. पण त्यातून भारतातले पाकिस्तानप्रेमी व छुपे समर्थक चव्हाट्यावर येतील ना? म्हणून अपुरे व ‘छोटे’ विधान करून ‘शकील’ यांनी नुसती मळमळ व्यक्त केली. खरे दुखणे मात्र सराईतपणे लपवून ठेवले आहे. दाऊद मारला जाण्याची चिंता त्यांना खरे तर सतावते आहे, इतकेच! थोडक्यात छोटा शकील तरी खरे मनातले बोलतो, हा खोटा शकील मात्र मनातले दडवून दिशाभूल करतोय.

6 comments:

 1. सर, विच्छेदन केलत ओ.. खुपच छान.. मी तुमचे लिखान बिनधास्त FB, whatsapp वर टाकतो.. group मध्ये भयीन शांतता पसरते मग, कसले पुळचट लोक आहेत हो ..तेच एखादी सहानभूतीची post आली की पटापट पोपट बोलतात..

  ReplyDelete
 2. सत्य वचन. आपल्या लेखणीतून आपण नेत्यांचे अचूक मोजमाप करता आपले लेखन खूप अभ्यास पूर्ण आहे, नेत्यांची पोट दुखी आणि कळ आपण अगदी अचूक पकडतात छान वाटते लेख आवडला.

  ReplyDelete
 3. Sir, mast lekh, @prasad saheb ekdam sahamat. tumachyasarkhech mi pan bhaunche lekh majhya wall war share karato. lok like karayla pan ghabartaat! itake pulchat ahet.

  ReplyDelete
 4. खरेच भाऊ एकदम बरोबर

  ReplyDelete
 5. अभ्यासपूर्ण व बिनधास्त सच्चे लेखन. खूपच मार्मिक विश्लेषण असते आल्या लेखात. आपल्या बेगडी राजकीय नेत्यांचे खोटे मुखवते आपण नेहमीच जराही भीड-मुर्वत न ठेवता तारा-तारा फाडत असता. असेच लिहीत रहा.

  ReplyDelete
 6. Ha blog fakt marathit n rahata hyache english and hindit hi translation whave. Hi ek chalval mhanun ubhi rahili pahije. Desh virodhi bhumikene deshache aataparyant khup nuksan zale aahe. Applykadehi bhavishyat Egypt sarkhe sarkar ulthavnyache prayatna jarur hoteel. Award wapasi test run asava.

  ReplyDelete