Saturday, November 7, 2015

राकेश मारियांची बदली अकस्मात का झाली?

राजन पुराण (२)




जुलै ऑगस्ट महिन्यात शीना बोरा प्रकरण खुप गाजत होते. इंद्राणी मुखर्जी ह्या बाईने आपल्याच पोटच्या पोरीला ठार मारल्याचा गंभीर आरोप होता. चार वर्षापुर्वी या मुलीला ठार मारून रायगड जिल्ह्यातील एका गावात निर्जन जागी पुरून टाकण्यात आले होते. इंद्राणी म्हणजे भारतात खाजगी टेलिव्हीजन नेटवर्क सुरू करणार्‍या पीटर मुखर्जी यांची दुसरी पत्नी. अतिशय महत्वाकांक्षी अशा या महिलेची एक एक छुपी रहस्ये मुंबई पोलिस उलगडत होते आणि दस्तुरखुद्द मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया प्रतिदिन इंद्राणीची जबानी घेण्य़ासाठी राबत होते. तो तपास पुर्ण झाला नसताना अकस्मात एकेदिवशी मारिया यांची मुंबईच्या आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्याने गदारोळ सुरू झाला होता. इंद्राणी मुखर्जी व तिच्यासह यात गुंतलेल्यांना संरक्षण देण्यासाठीस फ़डणवीस सरकारने मारियांना बाजूला केल्याचा आरोपही झाला होता. कोणाला त्याची तारीख आठवते? ८ सप्टेंबर रोजी ही बदली झाली होती. योगायोग असा, की त्याच दरम्यान देशाबाहेर काही घटना घडत होत्या आणि त्याही मुंबईशी व इथल्या पोलिस खात्याशी संबंधित होत्या. मुंबई पोलिसांच्या दफ़्तरी ज्याच्यावर चारपाच डझन गुन्हे नोंदलेले आहेत, अशा छोटा राजनवर त्याच काळात पुन्हा प्राणघातक हल्ला करायचा डाव पाकिस्तानात बसलेल्या दाऊदचा हस्तक छोटा शकीलने आखला होता. राजनच्याच निकटवर्तियांनी खबर दिल्याने शकीलला राजनचा पत्ता मिळाला होता आणि सगळी तयारी झाली होती. ठरल्याप्रमाणे नेहमीच्या त्या हॉटेलमध्ये राजन पोहोचला, की शकीलचे मारेकरी राजनचा गेम वाजवणार होते. पण आधीच खबर लागली आणि राजन तिकडे फ़िरकलाच नाही. नेहमीच्या घरीही परतला नाही. तो गायबच झाला. ही घटना जुलै महिन्यातली. मग त्याला मायदेशी येण्याचे वेध लागले होते. पण मायदेशी म्हणजे कुठे? मुंबईत?

मुंबई आपल्यासाठी सुरक्षित नाही याची राजनला खात्री होती. पोलिस कस्टडी असो किंवा महाराष्ट्रातला कुठलाही तुरूंग असो, तिथे आपण सुरक्षित राहु शकणार नाही, हे राजन ओळखून होता. पण त्याच्यावरचे बहुतेक गुन्हे मुंबईतले असल्याने मुंबई पोलिसांच्याच हवाली त्याला करणे भाग होते. किंवा मुंबई पोलिसांनी त्याला सीबीआयच्या हवाली करायला मान्यता देणे भाग होते. सगळी गफ़लत तिथेच होती. मुंबईत पाठवणार नसाल, तर भारतात यायला राजन राजी झाला असता. किंबहूना त्याला हाताशी धरून अनेक कामे करून घेतलेल्या भारतीय गुप्तचर विभागालाही राजनच्या सुरक्षेची काळजी होतीच. पण त्यात मुंबई पोलिस ही मोठी अडचण होती. म्हणूनच जुलैमध्ये शकीलचा डाव फ़सल्यावर राजनला भारतात आणायची तयारी सुरू झाली होती. त्यातला पहिला भाग होता त्याला परदेशी योग्य देशात अटक करून भारताच्या ताब्यात मिळण्याची हमी असणे. त्यानुसार इंडोनेशियाची निवड झाली. यापुर्वी मधू कोडा प्रकरणातील असाच आरोपी बस्तावडे यालाही इंडोनेशियातून आणले गेले होते. म्हणजेच राजनला तिथे अटक केली तर भारताच्या ताब्यात मिळवणे सोपे व शक्य होते. ती सर्व जुळवाजुळव करण्यात महिन्याभराचा काळ गेला आणि राजनने योग्य वेळी इंडिनेशियात येण्याची सज्जता झाली. त्यात एकच अडचण राहिली होती, ती मुंबई पोलिसांच्या मान्यतेची! त्या बाबतीत मारिया यांच्याविषयी गुप्तचर खाते शंकाकुल असावे. म्हणूनच मारियांना हलवल्याशिवाय राजनच्या अटकेचे नाट्य पुढे सरकू शकले नाही. योगायोग बघा. अटक होईपर्यंत राजनने कधी मुंबई पोलिसांवर शंका घेतली नाही आणि शेवटच्या क्षणी त्याने मुंबई पोलिसात दाऊदचे बगलबच्चे असल्याचा आरोप केला. तोपर्यंत मुंबई पोलिस त्याच्या स्वागताला सज्ज झालेले होते. फ़ार कशाला आर्थर रोड तुरूंगातील कसाबची कोठडी राजनसाठी राखीव केल्याच्याही बातम्या आल्या.

अखेरपर्यंत मुंबई पोलिसांना किती अंधारात ठेवले गेले, त्याची ही कहाणी आहे. राजनला भारतात आणायचे निश्चीत झाल्यावर त्याला मुंबई पोलिसांच्याच ताब्यात देणार, अशी समजूत करून देण्यात आली होती. सरकारने त्या ठराविक कोठडीसाठी एक अध्यादेशही जारी केला होता. मात्र इंडिनेशियातून राजनला घेऊन येणारे विमान आकाशात झेप घेईपर्यंत यात बदल होऊ शकतो, असे कोणाला वाटले नव्हते. इथे मुंबईत सर्व सज्जता करण्यात आलेली होती. पण ज्या दिवशी विमान उडाले त्यानंतर अकस्मात अनेक गोष्टी बदलत गेल्या. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेतली आणि राजनचे सर्व खटले व प्रकरणे सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. ही हुलकावणी कोणाला व कशासाठी देण्यात आली होती? इतके मोठे व गंभीर निर्णय इतक्या तडकाफ़डकी होतात काय? कालपर्यंत एक तयारी चालू असते आणि आज सकाळ उजाडली तर भलतेच काही कानी पडते. असे सरकार चालत नाही की पोलिसी कामही होत नाही. मग इथे असा प्रकार कशासाठी घडला? तर राजनला मुंबईत आणलाच जाणार नाही, याची खबर अखेरच्या क्षणापर्यंत मुंबईच्याच पोलिसांना लागू दिलेली नव्हती. त्याचाच अर्थ राजनला भारतात आणला तरी कुठे ठेवणार, याविषयी त्याच्या शत्रूंना गाफ़ील ठेवण्यासाठी असे केलेले नसेल काय? मुंबई पोलिसांना योजना कळली, की ती आपोआप दाऊदपर्यंत पोहोचू शकते, या भयापोटी ही सावधानता बाळगली गेली काय? नसेल तर आदल्या दिवसापर्यंत कसाबची कोठडी राखीव करायची आणि दुसर्‍या दिवशी सर्व खटलेच सीबीआयकडे वर्ग करायचे हे नाट्य कशासाठी होते? दिर्घकाळ मुंबईतच विविध खात्यात कार्यरत असलेल्या राकेश मारियांची बदली सुद्धा अशीच आकस्मिक नव्हती काय? शेवटच्या क्षणी राजनने मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपाचे गांभीर्य इथे लक्षात येऊ शकते.

काही वर्षापुर्वी चेंबूरच्या एका बारमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी झालेल्या पार्टीत काही सीआयडीचे अधिकारी नशापान करून नाचत असल्याचे चित्रण अनेक वाहिन्यांवर झळकले होते. तो बार राजनच्या साथीदाराचा होता आणि पोलिस तिथे मौजमजा करतात, असे भासवण्यात आलेले होते. अर्थात जाणिवपुर्वकच कोणीतरी ते घडवून आणलेले असणार. हे अधिकारी भले मुंबई पोलिसातले असले, तरी ते त्याचवेळी गुप्तचर विभागाचेही काम करणारे असावेत, हा योगायोग म्हणता येत नाही. म्हणजेच ही छुपी लढाई मुंबई पोलिस व गुप्तचर विभागात चाललेली होती. नव्या मुंबईत सापडलेल्या एका युरेनियम सारख्या संशयित मालाचा तपास याच अधिकार्‍यांकडे होता. एकूण काय तर गुप्तचर विभाग आणि मुंबई पोलिस यांच्यात एक छुपा संघर्ष दिर्घकाळ चालू आहे. त्यात अनेक फ़ोनवरील संभाषणेही चव्हाट्यावर आलेली आहेत. एकदा तर शकील मुंबईच्या पोलिस आयुक्तालाही बदलून टाकेन, असे सांगताना आपण वाहिन्यांवर ऐकलेले असेल. तेव्हा राजनच्या आरोपात तथ्य नक्कीच आहे. आता तर त्याने चक्क काही अधिकार्‍यांची नावे सांगितल्याची बातमी आलेली आहे. राजनवर खटले चालवले जाण्याची गोष्ट दूरची आहे. पण त्याने दाऊदच्या पाठीराख्या अधिकार्‍यांचा पेटारा उघडला, तर अनेक ज्येष्ठ अधिकारीच नव्हेतर त्यांना नेमक्या नेमणूका देणार्‍या राजकारण्यांचेही पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. राजन असो किंवा दाऊद असो, दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. पण त्यातला एक परकीय शत्रूला फ़ितूर झालेला आहे आणि दुसरा देशाच्या गुप्तचर विभागाला सहाय्य करणारा आहे. तेव्हा शत्रूला पाठीशी घालणारे पोलिस व मित्राला पाठीशी घालणारे पोलिस यात फ़रक करावाच लागेल. अर्थात शत्रूला सामिल झालेल्यांचाही गुप्तचर आपल्या स्वार्थासाठी वापर करू शकतात हे विसरता कामा नये.

4 comments:

  1. complex, yet a reality!
    yesteryears of criminal politicking!

    ReplyDelete
  2. अनेक वर्षांपूर्वी अंदाजे 20 - 22 वर्ष, हरियाणात एका कंपनीत संप घडून दंगल झाली होती. त्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकार्यास कामगारांनी मारून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर एका तरुण अधिकार्याने तो संप अतिशय निर्दयी पणे चिरडला ज्याची तुलना जनरल डायरशी तत्कालीन विरोधी पक्षांनी केली. केबल हा प्रकार त्या काळात नविन होता व त्या मुळे भारतभर त्या अधिकार्याचा "पराक्रम" दिसला. नंतर त्या अधिकार्याची बढती वर बदली झाली व अनेक वर्षे तो अधिकारी पडद्याआड प्रगती करत राहिला. हाच तो मारिया का?

    ReplyDelete
  3. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  4. Bhau To the last bullet- Vinita kamte He book jr tumhi vachla asel tr Vinita kamteni Mumbai police department vr Gambhir arop kele ahet....

    ReplyDelete