Sunday, November 29, 2015

छोटा राजन देशप्रेमी की गुन्हेगार? //// महायुद्धाची छाया (३)छोटा राजनच्या निमीत्ताने लिहीताना त्याने भारतीय हेरखात्याला मदत केली, असे मी अनेकदा लिहीत असतो आणि ते उघड गुपित आहे. सहाजिकच अनेकजणांना ते रुचत नाही. अशी माणसे निरागस असतात किंवा त्यांना हेरखात्याचे काम व त्याची कुठल्याही देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात असलेली आवश्यकता ठाऊक नसते. पहिली गोष्ट म्हणजे बहुतेकांना हेरखात्याची गरज व त्याच्या कामाची शैली वा पद्धती ठाऊक नसते आणि दुसरी गोष्ट हेरगिरीच्या वाचलेल्या अतिरंजित कथा वा पाहिलेल्या चित्रपटामुळे हेरांविषयी लोकांच्या मनात प्रचंड गैरसमज असतात. हेर म्हणजे जेम्स बॉन्ड वा रॅम्बो अशा काही चमत्कारिक समजूती लोकांमध्ये असतात. त्यामुळेच दाऊद वा राजन यांचा हेरखात्याने वापर केला, मग असे निरागस लोक अस्वस्थ होऊन जातात. कुठल्याही देशाला आपली जी धोरणे वा हेतू कायदेशीर मार्गाने साधता येत नसतात, ते साधण्यासाठी बेकायदा मार्गही अवलंबावे लागत असतात. त्या कृत्याला मायदेशी वा अन्य कुठल्या परदेशातील कायदा मान्यता देत नसतो. पण ती कामे झाल्याशिवाय गाडे पुढे सरकणार नसते. मग त्यातून मार्ग कसा काढायचा? तो मार्ग काढायचेच काम हेरखाती परस्पर उरकत असतात. ज्याची जबाबदारी कुठलेही सरकार जाहिरपणे स्विकारत नाही. त्यात गुंतलेल्या आपल्या हेराला संरक्षणही देऊ शकत नाही. दाऊद भले पाकिस्तानात असेल, पण पाकिस्तान सरकार ते कधीच मान्य करत नाही. तसेच छोटा राजनने भारतीय हेरखात्यासाठी कितीही काम केलेले असेल, भारत सरकार ते कधीही उघडपणे मान्य करणार नाही. तसा आग्रह कोणी हेर वा हेरखात्याचा हस्तकही धरणार नाही. म्हणूनच अशा विषयात बोलताना वा लिहीताना आधी हेरखात्याचे काम व गरज समजून घेण्याची गरज असते. मग गुंड गुन्हेगार असून छोटा राजनची मदत का घेतली, हे लक्षात येऊ शकते.

अर्थात हेरखाती देशात वा परदेशात आपल्या कारवाया करताना फ़क्त गुंड गुन्हेगारांचाच वापर करतात, असेही मानायचे कारण नाही. अगदी सभ्य सुसंस्कृत अशा प्रतिष्ठीतांचाही हेरखाती वापर करीत असतात. हस्तक वा हेर हे कामानुसार वा गरजेनुसार निवडले वा घेतले जात असतात. कारण यातला कारभार सगळाच गुपचुप चालत असतो. इस्त्रायलचा एक हेर लेबॅनॉन या अरबी देशात जाऊन थेट मंत्री होऊ शकला, हे लक्षात घेतले; तर यात प्रतिष्ठीत वा नावाजलेले लोकही कसे सामिल करून घेतले जातात, ते समजू शकेल. कधी प्राध्यापक, इतिहासकार, सरकारी अधिकारी, समाजसेवक अशा विविध स्वरूपातले लोक परदेशी व देशी हेरखात्यात हस्तक म्हणून वापरले जात असतात. काहीजणांना विचारांचे आकर्षण असते, काही लोकांना पैसा, स्वार्थ वा भावनांच्या मार्गाने त्यात ओढले जाते. कधीकधी एका देशाचा हस्तक वा हेर दुसर्‍या देशाला फ़ितूर होऊन दुतोंडेपणाही करू शकतो. अमेरिकेने सीआयएचा हस्तक म्हणून भारतात धाडलेला डेव्हीड कोलमन हेडली त्याचवेळी पाकिस्तानी हेरखाते आयएसआय यांच्यासाठीही काम करत होता. मुंबई हल्ल्यासाठी आवश्यक असलेली माहिती व तपशील गोळा करण्याचे काम त्यानेच पार पाडले होते. म्हणूनच ते सत्य समोर आल्यानंतरही अमेरिकेने हेडलीचा ताबा तपास चौकशीसाठीही भारताला दिला नाही. कारण उघड आहे. पाकिस्तानची माहिती देताना त्याने अमेरिकेच्या पापाचाही पाढा वाचला तर? असे अतिशय गुंतागुंतीचे व घातपाती काम हेर करीत असतात. त्याखेरीज अनेकांना आपण हेरगिरीसाठी वापरले जातोय, याचाही थांगपत्ता नसतो. भावना, संबंध, आस्था वा विचारांच्या आहारी जाणार्‍या अशा लोकांचा, परकीय हेर सहजगत्या आपले हेतू साध्य करण्यासाठी अप्रत्यक्ष वापर करत असतात. उदाहरणार्थ भारतातील मुस्लिम तरूणांच्या धर्मभावनांचा गैरफ़ायदा पाक उठवतेच ना?

इथे एक गंमत असते. आपण भारतीय हेरखात्याविषयी सहसा बोलत नाही. पण परदेशी वा पाक हेरांविषयी नित्यनेमाने बोलत असतो. कारण तितकीच माहिती वा बातम्या माध्यमातून आपल्याकडे येत असतात. पाकिस्तानी माध्यमे तपासली तर तितक्याच संख्येने तिथे भारतीय हेरखात्याचा उद्धार चाललेला दिसेल. कम्युनिस्ट देशात गेलात वा कम्युनिस्ट विचारांच्या संस्थांमध्ये गेलात, तर अमेरिकन हेरसंस्था सीआयए विषयी ऐकायला मिळेल. अरबी मुस्लिम देशात गेलात तर इस्त्रायली हेरसंस्था मोसादविषयी शंख चाललेला कानावर येईल. मात्र त्याचे फ़ारसे तपशील बातम्यातूनही येत नाहीत. म्हणूनच प्रत्यक्ष हेरखात्याच्या कामाविषयी लोकांचे अनेक गैरसमज असतात. आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी विसरून भारतीयांनी आपल्याला हिरो मानावे, अशा भ्रमात छोटा राजनही अजिबात नसतो. त्याचेही काही स्वार्थ यातून साधलेले असतात. पण आपण काही गोष्टी देशप्रेमासाठी केल्या, असे तो देखावा म्हणून बोलत असतो. त्या कामाच्या बदल्यात त्याला इथे वा अन्यत्र काही सोयीसवलती मिळत असतात. त्याची तेवढीच अपेक्षा असते. पण आपल्याला कोणी कुठल्या सोयी पुरवल्या, त्याबद्दल तो अवाक्षर बोलणार नाही. एका बाजूने विचार केला, तर तोही खुप प्रामाणिक म्हणावा लागेल. कारण तो कायद्याच्या चौकटीत व व्याख्येत सा्पडणारा गुन्हेगार आहे. पण आजही आपल्या देशात प्रतिष्ठीत म्हणुन जगणारे कित्येक लोक असे आहेत, की जे प्रत्यक्षात आपल्या शत्रू देशाला लाभकारी व मायदेशाला घातक अशा गोष्टी करण्यात गुंतलेले असतात. जाणतेपणी वा अजाणतेपणी त्यांचा वापर शत्रू देशांनी चा्लविलेला असतो. मात्र देशातील कायदे त्यांच्या अशा घातपाती कृत्याला वेसण घालू शकत नसतात. इथे मग कायद्याच्या पलिकडे जाऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागत असतो. जो कोर्टाच्या चौकटीत शक्य नसतो.

कुठलाही सभ्य सुसंस्कृत माणूस आज राजनची पाठ थोपटणार नाही. कारण त्यांच्यासमोर राजन हा खुन, दरोडे वा खंडणी उकळणारा गुन्हेगार आहे. पण त्यानेच शरद शेट्टी, सावत्या अशा दाऊदचे सहकारी व देशाला घातक ठरलेल्या काही लोकांचा काटा दुबईत जाऊन काढण्याचे काम उरकलेले आहे. ते काम भारत सरकार कुठल्या कायदेशीर मार्गाने पार पाडू शकणार होते? दाऊदसारख्या गुन्हेगाराचे मुंबईतले टोळीनेटवर्क, पाक हेरखात्याने बॉम्बस्फ़ोट मालिका घडवण्यासाठी वापरले. त्यात अनेक मुस्लिम तरूणांच्या धार्मिक भावनांचा उपयोग करून घेतला. मग त्यांच्या बचावाला जी एक मोठी फ़ळी कोर्टापासून सार्वजनिक रितीने उभी राहिली, त्यांचे कृत्य खरेच मानवाधिकार म्हणून चालले होते, की पाकिस्तानच्या हस्तकांना वाचवण्यासाठी चालले होते? फ़ाशीच्या विरोधात म्हणुन त्यांनी मानवाधिकाराचा मुखवटा चढवलेला होता. पण आजवर शेकडो गुन्हेगार फ़ाशी गेले, तेव्हा त्यातला एकही मायका लाल इतका आटापिटा करायला पुढे सरसावला नव्हता. त्यातून लक्षात येते, की हे मान्यवर फ़ाशी या शिक्षेसाठी मैदानात आले नव्हते, तर मानवाधिकाराचा मुखवटा चढवून पाकिस्तानी हस्तकाला वाचवायला उघडपणे पुढे आले होते. त्यातले काही शत्रूचे हस्तक असू शकतात, तर काहीजण निव्वळ भावनात्मक मानवी हेतूने आलेले असू शकतात. यांना खेळवणारा इथे कोणतरी असतो. पण कायद्याच्या कचाट्यात त्याला पकडता येत नसते. राजरोस असे लोक देशाच्या व समाजाच्या हितासाठी म्हणत देश व समाजाला विघातक भूमिका पार पाडत असतात. ते अर्थातच शत्रू देशाच्या पथ्यावर पडत असते. हे सर्व समजून घ्यायचे, तर हेरखाती कशी चालतात, त्यांची कार्यशैली वा मोडस ऑपरेन्डी कशी असते, ते बारकाईने समजून घ्यावे लागेल. शेकडो तुकड्यात विखुरलेल्या कोड्याची नेमकी रचना करावी, तेव्हा त्यातले भीषण कारस्थान उलगडू शकते. मग छोटा राजन समजू शकतो, तसाच सन्मान व पारितोषिके परत देण्यामागचे खरे हेतू उलगडू लागतील. छोटा राजन आणि सध्याच्या ‘असंहिष्णूते’चा काही संबंध जोडला जाऊ शकेल काय? खरे तर छोटा राजनपेक्षाही पुरस्कार वापसीचे कारस्थान पुढल्या काही लेखांतून उलगडण्याचा माझा प्रयत्न रहाणार आहे. (अपुर्ण)

1 comment:

  1. http://blog.sureshchiplunkar.com/2015/11/ngos-tool-for-unrest-and-us-spy.html

    ReplyDelete