Thursday, November 5, 2015

‘बाजीगर’, ये ‘डर’ का ‘अंजाम’ है



कुठल्याही समाजात वा देशात सार्वजनिक प्रसार-प्रचार माध्यमांचा समाजमनावर मोठा प्रभाव असतो. त्यातून जे सांगितले जाते व भासवले जाते, त्यावर समाजमनाची जडणघडण होत असते. अनेकदा तर अतिशय सुप्तपणे अशी माध्यमे लोकमानस घडवण्याचा उद्योग साळसूदपणे करीत असतात. चित्रपट त्याचाच एक भाग असतो. संघटित संस्थेला लोकांवर जितका प्रभाव पाडता येत नाही, तितका लोकप्रिय कलावंत वा त्याच्या कलाकृतीचा जनतेवर प्रभाव असतो. लोक अशा कलाकाराचे अनुकरण वा नक्कल करत असतात. १९७० च्या कालखंडात आपण गेलो तर कान झाकणारे केस राखणारे तरूण आपल्याला दिसायचे. तो अमिताभ, राजेश खन्ना वा ॠषिकपूर यांचा जमाना होता. पुढे शहारुख, सलमान वा ॠतिक रोशनचा जमाना आल्यावर त्यांच्यासारख्या केशभूषा वेशभूषा आपल्याला समाजात दिसू लागल्या. तीच भाषा व शब्द कानावर पडू लागले. इतका प्रसार माध्यमांचा जनमानसावर प्रभाव पडत असतो. कारण कथेतून गीतातून असे कलावंत प्रेक्षकाच्या सुप्त मनाशी हळुवारपणे खेळत असतात. त्याच्या मनावर प्रभाव पाडत असतात. आयुष्यात अवघड वाटणार्‍या गोष्टी अशा कथानकात सोप्या करून सांगितलेल्या असतात. म्हणून मग त्याचा प्रभाव लोकांवर पडताना दिसतो. मग लोक तसे का वागतात, असा प्रश्न त्याच कलावंताने विचारणे कितपत योग्य असेल? तुम्ही जेव्हा सामान्य लोकांचे आयडॉल बनता, तेव्हा लोकांच्या वर्तनाला तुम्हीच आकार देत असता. मग लोक तसे आपल्यामुळे वागू लागले, हे लक्षात ठेवले पाहिजे आणि आपण लोकांसमोर काय पेश करतोय, त्याचे भान राखले पाहिजे. सुधारणा समाजात वा सामान्य माणसात व्हावी, अशी अपेक्षा अशा आयडॉलना बाळगता येत नाही. अपेक्षित बदल त्यांनीच लोकांपुढे पेश करायचे असतात. शहारुखचे ताजे विधान त्याच संदर्भाने तपासले पाहिजे.

दिल्लीचा हा सामान्य कुटुंबातला तरूण मुंबईत अभिनेता व्हायचे स्वप्न घेऊन आला आणि आज दोन दशकांनंतर भारतीयांचा आयडॉल होऊन बसला आहे. त्याचे कलाजीवन कुठून सुरू झाले? त्याची पहिली लोकप्रियता त्याने कशातून संपादन केली? ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या शहारुखच्या चित्रपटाला वीस वर्षे पुर्ण झाल्याचे कौतुक मध्यंतरी वाचण्यात आले. त्यात ती भूमिका आपण कशी नाकारली होती, त्याची आठवण शहारुखने कथन केली आहे. कशासाठी त्याने ‘दिलवाले’ची भूमिका नाकारली होती? त्याच्या आधी त्याचे चाललेले चित्रपट तीनच होते, ज्यांना चांगले यश मिळाले होते. त्याच लोकप्रियतेवर स्वार होऊन पुढे जायचा शहारुखचा मनसुबा होता. म्हणून ‘दिलवाले’मधली भूमिका त्याला नको होती. ती अतिशय रोमांटिक व गुलछबू प्रियकराची होती. उलट त्याच्या आधी त्याचे लागोपाठ येऊन गाजलेले चित्रपट होते, बाजीगर, अंजाम आणि डर! या तिन्ही चित्रपटात एकांगी व एकतर्फ़ी प्रेमाने पागल होऊन मुलींवर अत्याचार करणारे नकारात्मक पात्र शहारुखने रंगवले होते. म्हणजेच जनमानसात त्याला लोकप्रियता कशामुळे मिळाली? त्याच्या खलनायकी भूमिकेमुळे! ती लोकप्रियता अभिनयासाठी होती, की त्यातल्या कथेतून जे आक्रमक प्रियकराचे पात्र रंगवले गेले, त्याची लोकप्रियता होती? आपल्या हेतू व मतलबासाठी मुलींच्या जीवाशी व भावनांशी बेछूट निर्दय खेळ करणारा खलनायक शहारुखने रंगवला होता. तोच प्रेक्षकाला भावला होता. कुठल्याही संवेदनशील विचारी माणसाच्या मनाचा थरकाप उडवणारा, असे पात्र शहारुखने तिन्ही चित्रपटात रंगवले होते आणि पुढेही तशाच थाटाच्या भूमिका करण्याचा त्याचा मानस होता. अभिनय बाजूला ठेवा. त्याने रंगवलेले पात्र लोकांच्या मनाचा थरकाप उडवून गेले नाही, तर त्याच्याविषयी सहानुभूतीच निर्माण करून गेले.

त्या तिन्ही चित्रपटानंतर शहारुखची लोकप्रियता निर्माण झाली. त्याच्याविषयी कोणाला तिटकारा वाटला नाही. पण त्याच दरम्यान एक भयंकर घटना मुंबई नजिकच्या उल्हासनगर शहरात घडली होती. रिंकू पाटिल नामक एका कोवळ्या शाळकरी मुलीवर एकतर्फ़ी प्रेम करणार्‍या हरीश पटेल नामक तरूणाने रिंकू होकार देत नाही म्हणून तिला परिक्षाकेंद्रात जाऊन जिवंत पेटवून दिले होते. अवघा समाज तेव्हा चवताळुन उठला होता. महिनाभर वृत्तपत्रात त्यावरून काहुर माजले होते. तेव्हा कोणाला तीच भूमिका प्रत्यक्ष जीवनात वठवणारा हरीश पटेल आवडला होता काय? त्याच्याविषयी सार्वत्रिक चीडच निर्माण झाली होती. पण दोनतीन वर्षांनी शहारुखने तोच हरीश पटेल आपल्या तीन लोकप्रिय चित्रपटातून अप्रतिम रंगवला आणि त्याचा भिन्न नावाने रंगवलेला हरीश पटेल लोकांनी डोक्यावर घेतला. त्याने रंगवला होता खलनायक, पण तोच हिरो म्हणून डोक्यावर घेतला गेला. त्यातून शहारुखने जनमानसाला वा तरूणांना काय शिकवण दिली? तिने होकार द्यावा किंवा नकार द्यावा, याला काही किंमत नाही. आपल्यात हिंमत असेल, तर आपण तिला आपलीच मालमत्ता बनवू शकतो. होणार नसेल, तर ठार मारून टाकू शकतो. हीच मर्दुमकी आसते. शहारुखने यापेक्षा कुठला वेगळा पुरूषार्थ लोकांपर्यंत पोहोचवला होता? मागल्या दोन दशकात रिंकू पाटिलसारखे भवितव्य किती मुळींच्या वाट्याला आले? त्याचा काही हिशोब आहे काय? निर्भयाकांडापासून अशा अनेक घटना दाखवता येतील, की त्यात समान विकृत मानसिकतेची पुनरावृत्ती होत राहिली. दुसर्‍याला काय वाटते वा आवडते-नावडते याच्याशी आपल्याला कर्तव्य नाही. आपले तेच खरे आणि ते दुसर्‍यावर लादायचे असते. सहनशीलता हा मुर्खपणा असतो, यापेक्षा अन्य कुठला संदेश शहारुखने लोकांपर्यंत पोहोचवला होता?

कथा कादंबर्‍या अशा गोष्टी सुप्तमनाशी खेळत असतात आणि त्याच्यातल्या सत्प्रवृत्ती वा दुष्प्रवृत्तींना खेळवत असतात. चिथावण्या देतात, तशीच समजूत घालत असतात. शहारुखने भूमिका केल्या म्हणून त्याला कला म्हणायचे? त्या गाजलेल्या चित्रपटातून निव्वळ असंहिष्णूताच तरूणांच्या मनात भरवली गेली. दुर्दैव असे की किती नकळत अशा विकृतीने तरूण मुलींच्याही मनातला राग लोभ चीड बोथट करून टाकली. त्यात अत्याचार अन्याय होणार्‍या मुलींविषयी कितीशी कळकळ प्रेक्षक आपल्या मनात जतन करू शकला? उलट सामान्य माणसाच्या मनातल्या हळव्या, कोवळ्या भावना असतात, त्याचीच अशा कथानकातून राखरांगोळी करण्यात आली. समाजाविषयी, आसपासच्या मुली माणसांविषयी सहानुभूतीही त्यातून अगदी सहजगत्या मारली गेली. खलनायकी आपण हसत हस्ता स्विकारली. खलनायकाला आपण डोक्यावर घेऊन नाचलो. त्यालाच आयडॉल करण्यापर्यंत समाजाची मजल गेली. ‘तू हा कर, या ना कर, तू है मेरी किरन!’ हा आशेचा किरण नव्हता येऊ घातलेला भयावह अंध:कार होता. तो आणणारा व लोकांच्या गळी सहजगत्या उतरवणारा शहारुख नाही काय? आपला हा पुर्वेतिहास शाहरुख इतक्या सहजगत्या आज विसरून गेलाय? सवाल एका अभिनय खलनायकीचा नाही. त्याच भूमिकेतून लोकप्रिय होताना लोकभावना बोथट करण्याचा आहे. जनमानसातील सहानुभीती बधीर करण्याचा आहे. त्यालाच आज समाजात असंहिष्णूता बोकाळत असल्याची भिती वाटते? कोणी शिकवली ही असंहिष्णुता लोकांना? कोणी रिंकूच्या जळितकांडाचे उदात्तीकरण केले? शाहरुख वा त्याचे कोणी समर्थक त्यावर कलाविष्कार म्हणून पांघरूण नक्कीच घालतील. पण कलावंत हा मानवी मनात उदात्त भावना जागवणारा असावा. अमानुषता जागी करणारा नसावा. शहारुख कशाने भयभीत झालायस?

4 comments:

  1. agdi khara ahe. kalakaranni javabdari ne vagna bandhankarak ahe.

    ReplyDelete
  2. सिनेमात भुमिकेत घुसण्याची आवश्यकता असल्याबद्दल सांगण्यात येते. घुसाना जरूर! पण नॉट अॅट द कॉस्ट ऑफ सोशल हार्मनी.
    आणि व्यक्तिगत जीवन पाहिले तर सहीष्णुतेच्या बाबतीत आनंदचआहे .

    ReplyDelete
  3. भाऊ, महाभारत काय सांगते मग? बाई ला जुगारात लावा! घालावी का बंदी?

    ReplyDelete
  4. Mahabharat sangate bai la jugarat lavanaryancha Ani ticha maan n thevanaryancha sarvnash hoto...
    He karan ahe apalya nirbudh lokavar picture cha prabhav kasa padato..

    ReplyDelete