Friday, November 27, 2015

तहरीर चौक ते सिरीया लिबीया //// महायुद्धाची छाया (१)



आज सिरीयात धुमश्चक्री चालू आहे आणि तिथला सत्ताधीश बशर अल असद हतबल होऊन गेला आहे. कारण कुठलाही शस्त्रसज्ज देश उठतो आणि सिरीयात वाटेल तसे हवाई हल्ले करतो आहे. त्यातल्या काही हल्ल्याचा असद निषेध करतो आणि काही हल्ल्याचे समर्थन करतो आहे. अर्थात रशियाने असदची खुर्ची वाचवण्यासाठी हवाई हल्ले केलेत, म्हणून असद त्यांचे स्वागत करतो आहे. तर अमेरिका व पाश्चात्य देश त्यालाच संपवायला निघालेत, म्हणून असद त्यांचा निषेध करतो आहे. पण आपल्या प्रदेशात कुणीही हवाई सरहद्द ओलांडली म्हणून असद वा त्याची सेना हल्लेखोरांचा (तुर्कस्थानप्रमाणे) बंदोबस्त कशाला करत नाही? तर त्याच्यपाशी हवाई दल उरलेले नाही किंवा अशा हल्ल्यांना चोख उतर देण्याइतकी सज्जता उरलेली नाही. नाटो संघटनेच्या युद्धसज्ज देशांनी मनमानी करून असदचे सरकार व त्याच्या सुरक्षा दलांना नामोहरम करून टाकलेले आहे. त्याची सुरूवात आज झालेली नाही. त्याला आता पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. २०१० च्या सुमारास अकस्मात ट्युनिशिया नावाच्या इवल्या अरब मुस्लिम देशात ‘अरब स्प्रिंग’ म्हणजे अरबी उठाव नावाचे एक बंड सुरू झाले. तिथे असलेल्या सत्ताधीशाच्या विरोधात सामान्य गांजलेल्या जनतेने उठाव केला आणि बघता बघता ती अन्याय्य सत्ता कोलमडून पडली. त्यातून प्रेरणा घेऊन मग तशाच प्रकार इजिप्तच्या होस्ने मुबारक या लष्करी सत्ताधीशाच्या विरूद्ध सुरू झाला. इजिप्तची राजधानी असलेल्या कैरो महानगरात शेकडो लोक तरूणांच्या नेतृत्वाखाली तहरीर चौकात जमले आणि घोषणा देवू लागले. ती संख्या क्रमाक्रमाने वाढत गेली आणि पोलिसांच्या आवाक्यात परिस्थिती राहिली नाही. म्हणून लष्कराला पाचारण करावे लागले. राष्ट्रपती निवासाच्या समोर जमलेल्या जमवाला आवरायला रणगाडेच येऊन हजर झाले. पण जमाव आवरला नाही की पांगला नाही.

असे जगात आजवर अनेकदा झाले आहे. सोवियत साम्राज्य कोलमडू लागले, तेव्हा तिथले सेनाधिकारी व गुप्तचर संघटनेने लोकशाही आणायला निघालेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनाच स्थानबद्ध करून सत्ता ताब्यात घेतली होती. त्यांच्या विरोधात येल्तसीन या स्वातंत्र्यपेमी नेत्याने जनतेला लाल चौकात येण्याचे आवाहन केले आणि अक्षरश: लक्षावधी लोक तिथे जमले. त्यांच्यावर रणगाडे घालण्यात आले तरी जमाव हटला नाही. तेव्हा लोकभावनेला शरण जाऊन सैनिकांनी गोळ्या झाडण्याचे नाकारले. परिणामी सोवियत युनियन ढासळले आणि रशियात जवळपास अराजक माजले होते. काहीशी तशीच स्थिती इजिप्तमध्ये तहरीर चौकाच्या आंदोलनानंतर झाली. कित्येक दिवस चौकात तंबू ठोकून बसलेल्या लक्षावधी लोकांवर गोळ्या चालवायला सेनेने नकार दिला आणि तशीच अन्य शहरातली स्थिती असल्याने सेनेने आंदोलकांच्या भूमिकेला मुजरा करून राष्ट्राध्यक्ष होस्ने मुबारक यांना सत्ता सोडायला भाग पाडले. हा उठाव कुठल्या राजकीय पक्षाने वा संघटनेने केलेला नव्हता. तर उत्स्फ़ुर्त अशा तरूणांच्या आंदोलनाने त्याला जन्म दिला होता. नव्याने जगाला जवळ आणणार्‍या सोशल मीडियातून झपाट्याने लोकांपर्यंत संदेश जाणे व त्याला प्रतिसाद मिळण्याच्या सोयीने ही क्रांती घडवून आणली होती. मग त्याचे पडसाद बाजूला सिरीया व लिबीया नामक अरबी देशात उमटू लागले. आजवर तिथे गळचेपी केलेल्या संघटना, विरोधी मत यांनी पुढाकार घेतला आणि नव्याने पुढे आलेल्या तरूण पिढीच्या समर्थनाला उभे राहून क्रांतीचा झेंडा हाती घेतला ट्युनिशिया व इजिप्त येथील उठाव आणि सत्तापालट निदान उत्स्फ़ुर्त दिसत होते, त्यात परदेशी उघड हात नव्हता. पण लिबीया वा सिरीयाची कहाणी एकदम भिन्न होती. या दोन देशातील उठावाला साथ देण्यासाठी खुलेआम अमेरिका व नाटो देशाच्या फ़ौजा मैदानात आल्या होत्या.

आपल्याकडे तेव्हा लोकपाल आंदोलन पेटले होते आणि त्यात कोणीही मान्यवर राजकीय वा प्रस्थापित राजकीय संघटना नेते दिसत नव्हते. तुलनेने अजिबात अनोळखी असे चेहरे त्यात नेतृत्व करीत होते आणि त्यांची समाजसेवी स्वयंसेवी अशी ओळख होती. भारतीय सत्ता, घटनाधिष्ठीत सरकार आणि कायदे यांना आव्हान देत, त्यांची जनमानसातील प्रतिष्ठा निकामी करण्याचा पवित्रा त्यात दिसत होता. म्हणूनच एका बाजूला सत्ताधीशांच्या विरोधात हा उठाव चालू होता, तर दुसरीकडे त्याचवेळी लोकशाही प्रक्रियेत सहभागी असलेल्या अन्य पक्षांवरही आरोपांची बरसात चालू होती. एकप्रकारे प्रस्थापित संपुर्ण राजकीय व्यवस्थाच मोडीत काढल्याशिवाय जनतेला न्याय मिळू शकत नाही, अशी भूमिका लोकपाल आंदोलनातून मांडली जात होती. ती जवळपास अरब उठावाचीच प्रतिकृती होती. फ़रक इतकाच होता, की अरबी प्रदेशात त्याला जितके यश मिळू शकले, तितके इथे मिळू शकले नाही. ट्युनिशिया व इजिप्त पाठोपाठ इजिप्तची राजव्यवस्था ढासळली होती. मात्र तिथे पर्यायी कुठलीही व्यवस्था सज्ज नव्हती. त्याच्याहीपेक्षा सिरीया व लिबीयाची स्थिती खराब होती. कारण तिथे तर अमेरिका व नाटो देशांनी मानवतेचा मुखवटा धारण करून सत्ता खिळखिळ्या करण्याचा पवित्रा घेतला होता. लिबीयाचा गडाफ़ी व सिरीयाच असद आपल्याच बंडखोर नागरिकांचा उठाव चेपण्यासाठी रासायनिक अस्त्रे वापरत असल्याचा दावा करून, त्यांना रोखण्यासाठी नाटो विमानांनी त्या दोन्ही देशात बेछूट हवाईहल्ले आरंभले होते. थोडक्यात तहरीर चौकाप्रमाणे इथेही सत्ताधीश बदलण्यासाठी बंडखोर लोक अपेशी झाल्यावर नाटो व अमेरिकेचा उतावळेपणा लपून राहिला नाही. मात्र या दोन्ही सत्ताधीशांनी शरण जाण्यास नकार दिला आणि त्यात लिबीयाचा गडाफ़ी मारला गेला. तर सिरीयात कायमचे अराजक उभे राहिले. आजचा सिरीया त्याचे परिणाम भोगतो आहे.

सिरीयातील आजच्या दुर्दशेला जितका असद जबाबदार आहे, तितकेच व थोडे अधिक अमेरिका व नाटो जबाबदार आहेत. की सगळा अरब उठावाचा तमाशा बनाबनाया खेळ होता? त्याचा तपशील हवा असेल, तर अनेक पुरावे शोधावे लागतील, अनेक गुंतागुंतीची कोडी सोडवावी लागतील. ती सोडवताना आपण थेट भातरातल्या एवार्ड वापसीपर्यंतही येऊन पोहोचू शकतो. कारण अरब उठाव हे उत्स्फ़ुर्त आंदोलन नव्हते किंवा लोकपाल आंदोलनही तसे भारतीयांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात पुकारलेला एल्गार वगैरे काही नव्हता. आजचा पुरस्कार वापसीचा तमाशाही तितकाच योजनाबद्ध आहे. म्हणूनच जगातल्या विविध भागात देशात व प्रदेशातल्या या घटनांचा परस्पर संबंध जोडण्याची गरज आहे. त्या तपशीलात जाण्यापुर्वी एक नमूना बघा. कालपरवा म्हणजे पॅरीसचे स्फ़ोट व रशियन विमन पाडण्याच्या दरम्यानच शेजारी ट्युनिशियातही मोठा घातपाती जिहादी हल्ला झालेला आहे. आणि त्याच ट्युनिशियात राजकीय आवर्तन घडून आले, त्याचे श्रेय काही स्वयंसेवी संस्थांना देत त्यांच्यावर नोबेल पारितोषिकाची खैरात करण्यात आलेली आहे. कुठल्याही देशात सत्तांतर करण्याबद्दल नोबेल देण्याचा पायंडा कधीपासून पडला? नोबेलचे उद्दीष्ट जगात सत्तांतर घडवणे असे आहे काय? कोण ह्या संस्था, त्यांचे कर्तृत्व कोणते? त्यांनी ट्युनिशियाचे काय कोटकल्याण केले? अरब उठाव घडवून आणण्यासाठीच नोबेल त्यांना दिले जाणार असेल, तर त्याचाच परिणाम असलेल्या उध्वस्त लिबीया, सिरीया व तिथल्या निर्वासितांच्या मुडद्यांसाठी कोणाला सन्मानित करायचे? कारण सत्तांतराइतकेच लाखो निर्वासितांचे उध्वस्त जीवन आणि लाखोंचे मृत्यूही त्याच अरब उठावाचे फ़लित नाही काय? हे सन्मान कोण कशासाठी देतो आणि त्या स्वयंसेवी संस्थांचा खरा बोलविता धनी कोण आहे? सिरीयाला विध्वंसाच्या खाईत लोटून जगाला महायुद्धाच्या कडेलोटावर आणून उभा करणारा, तोच खरा खलनायक नाही काय? (अपुर्ण)

5 comments:

  1. तहरीर आणि ट्यूनिशीय सुद्धा लोक आंदोलने नव्हती . OTPOR नावाची संघटना CIA ने ह्यासाठी स्थापन केली होती . सध्या ते लोक canvasopedia या नावाने काम करतात.

    ReplyDelete
  2. भाउ भारतात पन अन्ना च्या आंदोलन ज्या वेळी Peak वर होते त्या वेळी UPA ने रविवारी तहरीर चौक हौउ नये म्हनुन पुर्न Northan and western greed चा electric सप्लाय बंद केला होता. पन दाखवले गेले जगातले सगल्यात मोठे पॉउर failure. whats up face book internet 8 तासा साठी बंद होते. metro पुर्न railway band होती. संशोधन करा

    ReplyDelete
  3. Copy कसे करता येईल वरिल लेख?कुणी सांगेल का?

    ReplyDelete
    Replies
    1. जसे इतर ठिकाणी कॉपी करता तसेच करायचे!

      Delete
  4. http://blog.sureshchiplunkar.com/2015/11/ngos-tool-for-unrest-and-us-spy.html

    ReplyDelete