Tuesday, November 17, 2015

जिहाद प्रतिकारक झुंडींचा प्रादुर्भाव



झुंड किंवा जमाव कधीच विचार करत नाही. झुंडी हे सामुहिक मानसशास्त्र आहे. तिथे माणसे अनेक असतात, पण त्या सर्वांचे मन एकसारखे काम करीत असते. जेव्हा अशी झुंड विध्वंसक मार्गाने जाऊ लागते, तेव्हा त्यापासून तिला परावृत्त करण्याचा कुठलाही समजूतदार वा शांततापुर्ण मार्ग नसतो. त्या विध्वंसक वा हिंसक झुंडीपेक्षा अधिक विध्वंस व हिंसा करण्याची क्षमताच त्या आक्रमणाला थोपवू शकत असते. कारण झुंड विचारांनी चालत नसते. म्हणूनच तिला विचारांनी परावृत्त करता येत नाही. सहाजिकच एक झुंड कार्यरत झाली आणि आक्रमकपणे विध्वंस करू लागली, मग तिच्यापासून आपला बचाव करण्यासाठी दुसरी झुंड कार्यरत करावी लागते. किंबहूना अशी आक्रमक हिंसाचारी झुंड उर्वरीत समाजा्ला वा लोकसंख्येला प्रतिकारक झुंडीत रुपांतरीत करीत असते. कारण तिच्यामागची चालना हिंसक असते आणि हिंसाचारच तिची भाषा असते. झुंडींना दहशत व धाक ही भाषा समजू शकते. याचसाठी सरकारने कायदा व्यवस्था म्हणून पोलिस वा सुरक्षायंत्रणा नावाच्या आदेशानुसार लगेच कार्यरत होणार्‍या झुंडी पदरी बाळगलेल्या असतात. कुठलीही दंगल हिंसाचार सुरू झाला वा होण्याची शक्यता असली, मग सरकार पुढले काम पोलिसांवर सोपवत असते. त्याहीपेक्षा जेव्हा आक्रमकतेचा अनुभव येतो, तेव्हा कायदा व्यवस्था प्रस्थापित करायचे काम लष्करावर सोपवण्यात येते. त्याचा साधासरळ अर्थ असा, की युद्धाच्याच धर्तीवर आता हिंसा गेलेली असते. दंगलखोर जमाव हा शत्रू समजून लष्कराने कारवाई करायची असते. तिथे प्रचलित नागरी कायदा बाजूला केलेला असतो. झुंडी जेव्हा हाताबाहेर जातात, तेव्हाच त्यांना युद्धपातळीवर हाताळावे लागते. जगभर जिहाद व मुस्लिम आक्रमकता हळुहळू उर्वरीत समाज व देशांना युद्धपातळीवर घेऊन चालली आहे. त्याचा व्यापक परिणाम जगातल्या मुस्लिम समाजाला भोगावा लागणार असे दिसते आहे.

मुठभर जिहादी वा अतिरेकी काहीही कृत्य करतात आणि त्यासाठी इस्लामला दोषी धरू नये किंवा मुस्लिमांना बदनाम करू नये, असा एक युक्तीवाद विचारवंत करू लागले आहेत. आजवर तशी भाषा मुस्लिम धार्मिक विचारवंत मांडत होते. आता पुरोगामी म्हणवणार्‍यांनी ती भाषा सुरू केली आहे. त्यातून आपण मुस्लिम समाजाचे हित साधत आहोत अशी त्यांची धारणा असली, तरी क्रमाक्रमाने हेच लोक मुस्लिमांच्या विरोधात एक कडवी जनभावना जन्माला घालत आहेत. कालपरवा ज्या युरोपने लाखो मुस्लिम अरबी निर्वासितांना सामावून घेण्याचे उदात्त पाऊल उचलले, त्यांच्यावरच हकनाक मरण्याची पाळी जिहादने आणली आहे. मग असे काही घडते, तेव्हा मुठभर भरकटलेल्या मुस्लिमांचे ते कृत्य आहे, असा बचाव मांडला जातो. पण जे कृत्यच मुळात धर्माच्या नावाने केलेले असते, त्याचा धर्माशी संबंध नाही, हा युक्तीवाद काय कामाचा? इतकी जर ती इस्लामची विटंबना असेल, तर त्याच्याविरोधात किती मुस्लिम रस्त्यावर येतात? कुणा वृत्तपत्राने व मासिकाने प्रेषित पैगंबराचे व्यंगचित्र काढले, तर धर्म विटाळला म्हणून जगभरचे मुस्लिम विनाविलंब रस्त्यावर येऊन धुमाकुळ घालतात. धर्माची अशी किरकोळ विटंबनाही त्यांना क्षणभर सहन होत नाही. ती संवेदनशीलता खरी असेल, तर पॅरिसचे हत्याकांड धार्मिक घोषणा देत झाल्यावर तितकीच तातडीची प्रतिक्रीया मुस्लिम लोकसंख्येतून कशी उमटत नाही? मुठभर जिहादींनी केलेले कृत्य इस्लामची विटंबना असेल, तर तेव्हाही जगभर मुस्लिमांनी तसाच संताप व्यक्त केला पाहिजे ना? पण नेहमी उलटाच अनुभव येतो. किरकोळ कारणाचे अवडंबर माजवून मुस्लिम रस्त्यावर येऊन दंगा करतात. पण जिहादी हत्याकांड झाल्यावर मात्र साधा निषेधाचा सूर लावून विषय संपवला जातो. हे आता बिगरमुस्लिमांच्या लक्षात येत चालले आहे आणि त्याची तीव्र प्रतिक्रीयाही उमटू लागली आहे.

आजवर असे हत्याकांड झाल्यावर निषेधाच्या मिरवणूका व मेणबत्त्या लावून विषय निकालात निघत होता. पण पॅरीसच्या घटनेनंतर संहिष्णू युरोपियन समाजात झुंडीचा भाव निर्माण होताना दिसतो आहे. भले माध्यमातून त्याच्या बातम्या येत नसतील. पण स्थानिक वृत्तपत्रे चाळली, तर युरोपात उमटलेल्या संतप्त प्रक्षोभक प्रतिक्रीया सहज दिसू शकतात. पॅरिस हत्याकांडानंतर युरोपच्या अनेक देशात निर्वासित अरब मुस्लिम वसलेल्या छावण्या व वस्त्यांमध्ये जाळपोळ व दंगली झाल्या आहेत. याचा अर्थ मागल्या काही वर्षात निमूट जिहादी हिंसा सोसणार्‍या युरोपियन देशांमध्ये आता सहनशीलता संपू लागली आहे. पोलिस व सरकार अशा जिहादचा बंदोबस्त करणार नसेल, तर आपणच आपल्या बचावासाठी घराबाहेर पडले पाहिजे, अशी वृत्ती युरोपात डोके वर काढू लागली आहे. पुरोगामीत्वाचे व्रत घेतलेली मुख्य प्रवाहातील माध्यमे अशा बातम्या देत नाहीत वा लपवून ठेवतात. म्हणून सत्य संपत नसते. मागल्या तीन दिवसात युरोपच्या अनेक देशात व भागात मुस्लिम विरोधातील भावना कमालीच्या प्रक्षुब्ध झाल्या आहेत. म्हणूनच आपली तटस्थता सोडून फ़्रान्स सरकारला सिरीया-इराकमधील इसिसच्या अड्ड्यांवर थेट बॉम्बहल्ले करायची वेळ आली आहे. सूडबुद्धीने वागल्यासारखे फ़्रेंच लढावू विमानांनी इराकमध्ये केलेले हल्ले फ़्रेंच जनतेची समजूत घालण्यासाठी केले आहेत. तितक्याच तत्परतेने अमेरिकेतही राजकारण हलू लागले आहे. आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत उमेदवारी मिळवू बघणारे डोनाल्ड ट्रंप यांनी तर अमेरिकेतील काही मशिदीच बंद करण्याचा विचार बोलून दाखवला आहे. बेल्जियन पंतप्रधानांनी तीच इच्छा व्यक्त केली आहे. थोडक्यात तटस्थ व धर्मनिरपेक्ष युरोपियन जनतेचे रुपांतर जिहादविरोधी झुंडीत होण्याची चिंता या नेत्यांना सतावू लागली आहे. त्या प्रतिक्रीयेला रोखण्यासाठीच आपण मुस्लिमधार्जिणे नाही हे दाखवायची राजकीय कसरत सुरू झाली आहे.

किंबहूना हा जगभरच्या मुस्लिम समाजाला नव्हेतरी त्यांच्यातल्या आक्रमक व आगलाव्या नेत्यांना इशारा आहे. ज्या नागरी स्वातंत्र्याचा गैरफ़ायदा घेऊन इस्लामच्या नावाने धार्मिक धुमाकुळ घालण्याचे डावपेच आजवर खेळले गेलेत, त्याची सामुहिक प्रतिक्रीया हळुहळू झुंडीच्याच स्वरूपात उमटण्याला चालना मिळते आहे. इस्लामचे हे आक्रमक हिंसाचारी रूप म्हणजे मोजक्या मूठभर माथेफ़िरूंचे पाप आहे, असे सांगून यापुढे सामान्य माणसाची दिशाभूल होऊ शकत नाही, इतकाच त्याचा अर्थ आहे. तो लौकर समजून घेतला नाही, तर जगभरात अनेक देशात मुस्लिम विरोधातील वातावरण प्रक्षुब्ध व्हायला आरंभ होईल. त्याची एक प्रचिती भारताशेजारी म्यानमारमध्ये आलेली आहे. ज्या धर्माची शिकवणच शांततेची आहे, तिथल्या बौद्ध धर्मगुरूंनीच मुस्लिम विरोधातील हिंसाचाराचे नेतृत्व केलेले आहे. हा धर्मगुरू शांतताप्रेमी बौद्ध समाजाला हिंसेसाठी प्रवृत्त करू शकला, कारण तो समाजही इस्लामच्या आक्रमक पवित्र्याने बिथरला होता. त्याला कोणाचे तरी नेतृत्व हवे होते आणि राजकीय नेतृत्व पुढे आले नाही, तर धार्मिक नेतॄत्वाने कामगिरी पार पाडली. जी म्यानमारच्या बौद्ध लोकासंख्येची चिंता होती, तीच आता युरोपातील बिगरमुस्लिमांची चिंता होऊ लागली आहे आणि म्हणूनच मुस्लिम विरोधी भावनांना चालना मिळते आहे. सहाजिकच त्याचा राजकीय लाभ उठवणार्‍या संस्था संघटना उदयास व भरभराटीस येऊ लागल्या आहेत. थोडक्यात माथेफ़िरू हिंसक इस्लामची प्रतिक्रीया म्हणून अनेक देशात बिगरमुस्लिम हिंसक झुंडी आकार घेऊ लागल्या आहेत. त्यांच्यावर धर्मांधतेचा वा वांशिक भेदभावाचा आरोप करून उपयोग होणार नाही. कारण आता झुंडीची मानसिकता बिगर मुस्लिमातही शिरजोर होत चालली आहे. त्याचे परिणाम भयंकर असू शकतात, हे पुरोगाम्यांनीही वेळीच लक्षात घेतलेले बरे.

3 comments:

  1. पुन्हा एकदा अचूक आणि द्रष्टे विश्लेषण !

    ReplyDelete
  2. आक्रमक झुंडीची आवश्यकता आहेच.

    ReplyDelete
  3. Mazya facebook wall var link takali aahe ya lekhachi.

    ReplyDelete