Saturday, November 28, 2015

अण्णांची महत्ता कोणी, कशी संपवली? //// महायुद्धाची छाया (२)



अरब उठाव असो किंवा भारतातले असंहिष्णूतेचे आंदोलन असो, त्यातले पुरस्कार वापसीचे नाटक असो, यामागे काही ठराविक प्रेरणाशक्ती काम करत असते. वरवर बघितल्यास तसे वाटणार नाही. अशा घटना घडवून आणल्या जातात हे चटकन तर्कबुद्धीला पटणार नाही. कारण त्यातले सर्व धागेदोरे आपल्या समोर येणार नाहीत याची काळजी घेतलेली असते. एखादा चित्रपट वा कथाकादंबरी वाचताना तिची मांडणीच अशी केलेली असते, की त्यातली पात्रे लेखक संयोजकला हवी तशीच वागणारी खेळणारी असतात. सहाजिकच तुमच्या तर्कबुद्धीला ती विचार करू देत नाहीत, तर लेखकाला अपेक्षित असलेले मत तुमच्या माथी तुमचेच मत असावे अशा रितीने परिणाम घडवत असतात. अरब उठाव वा जगातल्या अनेक घटना नेमक्या तशाच घडवल्या जात असतात. तिथे सर्व सज्जता असते आणि योग्यवेळी योग्य पात्रे आपल्या समोर आणून अलगद पेश केले जाते. उदाहरणच द्यायचे तर आपण गुजरातच्या दंगलीकडे बघू शकतो. आजवर भारतामध्ये शेकडो जातीय वा धार्मिक दंगली घडलेल्या आहेत. त्यापेक्षा गुजरातची दंगल किंचितही वेगळी नाही. पण इथे राज्य सरकार व त्याच्या म्होरक्यांनीच ही दंगल घडवून आणली, असे चित्र साळसुदपणे उभे करण्यात आले. त्यात प्रश्न वा शंका विचारणार्‍यांचा आवाज ठरवून दाबला गेला. सलमान खान या अभिनेत्याचा पिता सलीमखान सतत तशा शंका विचारत होते आणि कोणी त्यांची दखलही घेत नव्हता. असे प्रश्न विचारणारे सलीमखान एकटे नव्हते. पण त्यांच्या शंका वा प्रश्न सामान्य जनतेपुढे येऊच दिले नाहीत आणि दंगलीचे खापर एकतर्फ़ी मोदींच्या माथ्यावर फ़ोडण्याचा उद्योग चालू राहिला. माध्यमे, बुद्धीमंत, राजकीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, नामवंत म्हणून पेश करण्यात आलेले प्राध्यापक अभ्यासक; प्रत्येकजण एका सुरात मोदी विरोधी सूर आळवत होते ना?

पण दुसरीकडे शेकडो  पत्रकार, अभ्यासक, कार्यकर्ते वा समाजसेवी असेही होते, ज्यांनी या प्रचाराला आव्हान दिलेले होते. पण माध्यमातून त्यांचा आवाज दडपला गेला. इतक्या सफ़ाईने अशी कारस्थाने राबवली जात असतात. आणि हे फ़क्त इथे झाले असेही मानायचे कारण नाही. पद्धतशीर रितीने योजना आखून हे नाट्य रगवले जात असते. मोक्याचा जागी माणसे पेरलेली असतात. त्यापैकी अनेकांना आपण कुठल्या एका योजनेचा हिस्सा म्हणून काम करतोय, त्याचाही थांगपत्ता नसतो. उदाहरणार्थ अण्णा हजारे यांच्यासारख्या व्यक्तीला अकस्मात जनलोकपाल आंदोलनात ओढले गेले. एकविसाव्या शतकातला महात्मा गांधी व्हायला उत्सुक असलेल्या अण्णांसारख्या व्यक्तीच्या त्या इच्छेचाही वापर अशावेळी करून घेतला जात असतो आणि अण्णांना त्याचा थांग लागलेला नसतो. अकस्मात मिळालेल्या लोकप्रियतेने ते भारावून जातात आणि गरज संपली, मग त्यांना कचर्‍याच्या टोपलीत फ़ेकून दिले जाते. महाराष्ट्रातही खेडापाड्यापर्यंत अण्णांचे महात्म्य पोहोचले नसताना एका रात्रीत अण्णा देशाचा आवाज कसे बनून गेले? कधी अण्णांनी तरी शांतपणे त्याचा विचार केला काय? खरे तर अण्णांना मुंबईतील उपोषण फ़सल्यावर त्याचा बारकाईने विचार करण्याची गरज होती. दिल्लीसारख्या परक्या प्रदेशात त्यांच्यासाठी हजारो लोक अहोरात्र मंचासमोर बसून होते, तिरंगा फ़डकावत होते. त्याच अण्णांचे माहेरघर म्हणावे अशा मुंबईत त्यांच्यासाठी २०-३० हजार लोकही जमू शकले नाहीत आणि तीन दिवसात उपोषणाचा गाशा गुंडाळावा लागला होता. मग दिल्लीत अशी कुठली व कोणाची जादू चालली, की अण्णांसाठी दोन आठवडे गदारोळ चालू राहिला? मी सुद्धा अण्णांच्या त्या आंदोलनाचा एक समर्थक होतो आणि खुप भावनाविवश होऊन पाठराखण करत होतो. थोडक्यात माझ्याशी भावनांचा कोणीतरी सराईतपणे वापर करून घेतला होता.

तेच अण्णा, केजरीवाल यांच्यापासून विभक्त झाले आणि पुढे अण्णांनी कितीही गर्जना केल्या, तरी कुठले आंदोलन उभे राहू शकलेले नाही. लोकपालच्या कालखंडात अण्णांनी एखादे राजकीय विधान केल्यावर त्यांना खडसावणारे अनेकजण पुढे लोकसभेत आम आदमी पक्षाचे उमेदवारही होऊन गेले. यापैकी कितीजणांनी जागेपणी त्यात भाग घेतला आणि कितीजणांनी भावनेच्या आहारी जाऊन त्यात उडी घेतली होती? पण मनिष शिसोदिया वा अरविंद केजरीवाल असे लोक जागेपणी त्यामध्ये आलेले वा आणले गेलेले होते. उलट किरण बेदी, प्रशांत भूषण इत्यादी लोक भावनेच्या वा मानसिक स्थितीमुळे त्यात ओढले गेलेले होते. गरज संपत गेली, तसे त्यांना भल्‍याबुर्‍या मार्गाने बाजूला काढण्यात आले. लोकपाल विषय कुठल्या कुठे फ़ेकला गेला. मात्र ज्यांनी कोणी इथे अरब उठावाची पुनरावृत्ती करायची योजना आखली होती, त्यांना त्यात तितके यश मिळू शकले नाही. पण मुद्दा भारतातला नसून जगभर चाललेल्या अशा योजनाबद्ध राजकीय हेराफ़ेरीचा आहे. यामागे काही योजना असावी तशा घटना घडतात व घडवल्या जातात. जिथे अशी नाटके रंगवली जातात, त्यात स्थानिक पात्रेही अलगद येऊन त्यात आपापली भूमिका निभावताना दिसतात. काही पात्रे तर मुद्दाम आधीपासून त्यासाठी रंगभूषा वा वेशभूषा करून सज्ज ठेवलेलीही दिसतील. पुरस्कार वापसीपासून आम आदमी पक्षाच्या देशव्यापी मोहिमेपर्यंत बघा. शैक्षणिक प्रांतापासून साहित्य कलाक्षेत्रापर्यंत नामवंत म्हणून पेश केलेल्या माणसांची नावे आपण तपासत जाऊ, तेव्हा त्यामध्ये एक समान धागा दिसून येऊ शकतो. गुजरात दंगलीपासून कालपरवा पुरस्कार वापसीच्या नाटकापर्यंत तीच तीच पात्रे वेशभूषा बदलून भूमिका पार पाडताना दिसतील. अरब स्प्रिंग त्यापेक्षा वेगळी घटना नव्हती. तिथेही हा सगळा तमाशा ठरवून घडवला गेला होता.

जगातल्या कुठल्याही देशात, समाजात वा व्यवस्थेत गेलात, तर तिथे कुठल्या न कुठल्या कारणाने नाराज अस्वस्थ असलेला गट सापडतोच. कुठे अनेक गट असतात. ते आपल्यावर अन्याय होत असल्याच्या तक्रारी करीत असतात. कमीअधिक प्रमाणात त्यांच्या तक्रारी खर्‍याही असू शकतात. थोडक्यात आपण ज्याला ठिणगी म्हणतो ती स्थानिक पातळीवर उपलब्ध असते. त्याचा भडका उडवणारे सरपण गोळा करून होळी पेटवणे अशक्य नसते. असे ‘होळकर’ तिथे पोहोचण्याची फ़क्त गरज असते. तेच काम कोणी तरी करतो. मग आपण एक प्रक्षोभक आंदोलन उभे राहिलेले बघत असतो. अशा आंदोलनाचे मार्ग भिन्न असू शकतात. कुठे सशस्त्र हिंसक आंदोलन उभे रहाते आणि सत्तेला शरण आणते. भ्रष्ट व खिळखिळी सत्ता असली तर जनसंख्येसमोर शरण येते. सत्ताधीश अहंकारी असेल तर सद्दाम-गडाफ़ी यांच्यासारखा शेवट त्याच्या नशीबी येतो. जिथे तितके खिळखिळे शासन नसते आणि सशस्त्र उठाव कामाचा नसतो, तिथे मानवाधिकाराचे मुखवटे लावून आंदोलन उभे केले जाते. मात्र दोन्ही बाबतीत कुठून तरी त्यात आर्थिक गुंतवणूक होत असते. म्हणजे अरब स्प्रिंगसाठी आंदोलकांना पैसा पुरवला गेला, तर असद विरोधातील उठावाला शस्त्रे दारुगोळा पुरवला गेला. देशाबाहेरच्या शक्तींनी देशात परिवर्तन घडवण्याचा हा प्रकार कित्येक वर्षे विविध मार्गाने चालू आहे आणि त्याला अर्थातच स्थानिक लोकांचाच हातभार लागलेला आहे. दुसरे महायुद्ध संपल्यापासून जगाची प्रत्यक्ष पारंपारिक युद्धाची रणनिती बदलून गेली आहे. वसाहतवाद व साम्राज्यवाद संपला आणि आपल्या हस्तक राजकारण्यांना सत्तेत बसवण्याचे नवे तंत्र विकसित झाले. अरब स्प्रिंग, पश्चिम आशियातील सध्याचा जिहाद वा भारतातील असंहिष्णुता त्याच निकषावर तपासून बघणे म्हणून अगत्याचे आहे. त्यामागील सुत्रधार, बोलविते धनी तपासणे आवश्यक आहे.  (अपुर्ण)

16 comments:

  1. पहिले महायुध्द प्रत्यक्ष युध्द म्हणून झाले. पण दुसर्‍या महायुध्दाची सुरुवात कशी झाली, आणि मग हळू हळू ते ’युध्द’ स्वरुपात कसे गेले, याची माहिती आणि आजच्या परिस्थितीची तुलना आपण आम्हाला चांगल्या स्वरुपात दाखवू शकाल. अशा विषयावर पण लेख लिहाल का? आधीच लिहिला असल्यास link द्याल का?

    ReplyDelete
  2. भाऊ हे सगळच सामान्य माणसाच्या बुद्धी बाहेरच आहे.तुम्ही इतके विश्लेषण करून लिहिले आहे त्यामुळे थोडेफार तरी समजत आहे

    ReplyDelete
  3. हार्दिक पटेल देखील "होळकर" पंथीयच दिसतो. असो तुमच्या ब्लॉगचा नियमित वाचक आहे, तुमचे लेख वाचले कि एक एक रेफरन्सेस लागत जातायत. ओबामांनी तुर्कीच्या हल्ल्याच केलेलं समर्थन असो कि स्थलांतरानंतर झालेला पॅरीस हल्ला असो, सामान्य माणसाला हे कधीच लक्षात येणार नाही. ब्लॉग लिहिणं थांबवू नका, पुढच्या अनेक पिढ्यांना हा ब्लॉग एक वैचारिक दिशा आणी शैली बहाल करणारा आहे.. शरद पवार हे रसायन उलगडून वाचायला आवडेल, आणी सामान्य माणसाला हे शक्य नाही तेव्हा तुम्हीच हे करू शकता..!!

    ReplyDelete
  4. ह्या सर्व नाटकांचे खरे सूत्रधार कोण? ज्यांचे लाखो कोटी परदेशी बँकांमध्ये पडून आहेत ते की भारताची प्रगती न होऊ देण्यासाठी कटीबद्ध असे उघड आणी छुपे शत्रू? ज्यांचे लाखो कोटी परदेशी बँकांमध्ये पडून आहेत त्यांना भारतावर हुकुमत गाजवायची आहे आणी ज्या बँकात हे पैसे पडून आहेत त्यांनाही हे पैसे हातातून जाऊ द्यायचे नाहीत.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर आहे मकरन्दभाऊ । मी भाऊन्चा ब्लॉग आहे व नित्याने फेसबुकवर दिशा उद्याची नव्या युगाची। भाऊ तोरसेकरान्ची या सदराखाली शेअर करतो ।मला वाटते असे मुद्देसुद,उदाहरणपर्ण, आतले गणित सामान्य मानसा पर्यत असा विचार व राजनीतिकाचा खरा चेहरा व मखवट्याचे विष्लेशन आपल्या पर्यत पोहचवणरा " दिपस्थम्भ भाऊ तोरसेकर "
      भाऊ आपली कालजी व सुरक्षा करावी हि विनन्ती । अमरावती चे दादासाहेब कालमेन्घ व दिलीप इन्गोले कोनी कसे सम्पवले व शिवाजी एज्युकेशन सोसायटी कशी व कोनी हळप केली तसेच होऊ सकते ।

      Delete
  5. भाऊ खुपछान लेख आहे हा। मि तुमचा नियमीत वाचक आहे।

    ReplyDelete
  6. भाऊ, जबरदस्त.
    ज्यांना या बद्दल अधिक जाणून घायचे आहे त्यांनी, व्हिक्टर ओक्त्रोवोस्की यांचे By way Of deception: Victor Octrovosky हे पुस्तक वाचावे.
    व्हिक्टर हे पूर्वीचे जगातील सर्वात ताकतवान अशा मोसाद या इस्रायली गुप्तहेर एजन्सी चे एजंट होते.
    अगदी अमेरिकी अध्यक्षाच्या गळ्याला हात लावण्याची ताकद फक्त मोसाद मधेच आहे. आणि मोसाद्ची पद्धती वाचल्यावर असे वाटते कि, ते अक्षरश काहीही करू शकतात.
    मन मोहन , सोनिया म्हणजे तर किरकोळ कुत्री वाटतात. एकदा पुस्तक वाचायला सुरु केल्यास कोणीही खाली ठेऊ शकत नाही.
    सर्व नाटकाचा रंगमंच एकदा समजल्यास जगातील सर्व घटना ह्या फक्त आणि फक्त ठरवूनच केल्या जातात हे नक्की समजेल.
    अरब जगात जास्त पडसाद उमटू नयेत अशी व्यवस्था करूनच ओसामा बिन लादेन चा खात्मा केला जातो. भारतामध्ये सुरु होणाऱ्या अनु भत्त्या फ्रांस च्या कंपन्यांना मिळू नये म्हणून विनाकारण नवीनच फालातुक पर्यावरणाच्या नावाने गळा काढणाऱ्या स्वयंसेवी संस्थ सुरु होतात. हे सगळे ठरवून होते आणि काही मूर्ख ते न समजता त्यात भारताचीच वाट लावायला तयार होतात. वापरले जातात. सगळा रंगमंच समजून घावा लागतो . सर्वांनी एकदा ते पुस्तक नक्की वाचा.

    ReplyDelete
  7. तर्कबुद्घीला सलाम ! !

    ReplyDelete
  8. गुमनाम है कोइ अन्जान है कोइ

    ReplyDelete
  9. सगळच बधीर करणार प्रकरण आहे.
    अण्णां हजारे एकदम प्रसिद्धीच्या झोतात आल्यावर अनेकांना ते जाणवले.
    पण त्याचा संदर्भ आता केजरीवाल व फोर्ड फाउंडेशन मुळे उलगडला.
    अशा गोष्टी उलगडायला वेळ लागतोच.

    ReplyDelete
  10. हे सगळे जरी खरे असले तरी यावर उपाय काय? त्याचा उहापोह करणे गरजेचे आहे. मला वाटते आपल्या शिक्षण पद्धतीतच अमुलाग्र बदल घडवून आणला पाहिजे. नागरिकांना हे समजण्यासाठी भाऊ आपण कार्यरत आहात खरे पण कितीजण हे समजून घेतात? हा एक मोठाच प्रश्न आहे. फार सुंदर विवेचन आपण केलेले आहे. ब्रिगेडी प्रकरण हा प्रकारही त्यातलाच आहे हे आमच्या सारख्यांना समजते पण सर्वांना ते समजत असेल असे वाटत नाही. त्यावरही आपण प्रकाश टाकावा ही विनंती. कारण ती संघटना विघ्त्नाचे कार्य करीत आहे हे नक्की.

    ReplyDelete
  11. अण्णाचे मुंबई आंदोलन फसले पण दूर प्रदेशातील गाजले याचे कारण सुरुवातीला संघाने मदत केली दिल्लीला, नंतर अण्णांनी संघाला लाथा मारल्यावर संघ दूर राहिला मुंबई आंदोलनापासून. तुम्ही काही तरी गुढ सांगता आहात... तरी फोर्सेस कोणते हे कळत नाही

    ReplyDelete
  12. अमेरिकेचा सुप्त स्वार्थ आत्तापर्यंत फक्त जाणकार लोकच जाणू शकले आहेत. कदाचित भारतातल्या या सगळ्या उठाठेवी मध्ये अमेरिकेचा हि हात असण्याची शक्यता पडताळून पाहायला हवी.
    खूप सुंदर विश्लेषण केल तुम्ही. आंतरराष्ट्रीय राजकारणात रस निर्माण व्हायला लागलाय.

    ReplyDelete
  13. भाऊ खूप छान माहिती आहे. पहिल्या व दुसय्रा महायुद्धाची योजना आखणारे खरे सुत्रधार Secret Society /Illuminati यांसारख्या गुप्त जागतिक संघटना आहेत. आजही सद्य स्थितीत सुरु असलेले तिसरे महायुद्ध हे त्यांच्या Depopulationचा परिपाक आहे.
    अधिक माहितीसाठी दैनिक प्रत्यक्ष वाचन करावे.

    ReplyDelete
  14. यात नक्की तथ्य आहे. मॅग्गसेसे पुरस्कार केजरीवाल ना मिळाला पण त्यांच्या पेक्षा मोठे काम असणारे अनेक आहेत त्यांचा विचार पण नाही झाला. फोर्ड फाउंडेशन यामागे आहे हे नक्की
    केजरीवाल मदर टेरेसा च्या कार्यात काम करायचे त्या काळीच त्यांची पार्श्वभूमी तयार करण्यात आली असावी
    मग दिल्लीत संस्था उभी करणे पुरस्कार मिळवणे अचानक प्रसिद्धिस येणे त्यासाठी अण्णा आणि मीडिया पण त्यांच्या मागे उभी राहते हे काही unplaned नक्कीच नाही
    मैग्सेसे सोशलिस्ट किंवा कम्युनिस्ट होता त्याच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार पण त्याच विचारसरणी च्या लोकांना दिला जातो हे उघड़ सत्य आहे

    ReplyDelete